Breking News

सोमवार, २६ मार्च, २०१८

बेढब आकाराचे गतिरोधक वाहनधारकांसाठी जीवघेणे

 बेढब आकार, गरजेपेक्षा जास्त संख्या, उंची व रुंदी प्रमाणात नाही, निकषाप्रमाणे एकही गतिरोधक बनविण्यात आलेले नसल्याने तळोदा शहरात गतिरोधक वाहनधारकांसाठी जीवघेणे बनले आहेत. ओबड-धोबड आकाराच्या गतिरोधकांमुळे अनेकदा वाहनधारकांना दे धक्का करत वाहन पुढे न्यावे लागत असल्याने डोकेदुखी ठरत आहेत..
तळोदा शहरात कॉलनी परिसरांमध्ये तयार करण्यात आलेले गतिरोधक सर्व निकष धाब्यावर बसवून तयार करण्यात आले आहेत. शहरातील काही मुख्य रस्त्यांवर देखील अशाच प्रकारचे गतिरोधक दिसून येत आहेत. त्यामुळे ओबड-धोबड गतिरोधक ओलांडतांना वाहनधारकांना कसतर करावी लागते. गतिरोधकांच्या गरजेपेक्षा जास्त उंचीमुळे वाहने बंद पडणे, ग्राऊंड लेव्हल कमी असल्यास वाहन गतिरोधकावर घसरणे यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. गतिरोधक ओलांडतांना किरकोळ अपघातही घडतात. गतिरोधकांची गरजेपेक्षा जास्त संख्या असल्याने
अनेकजण पर्यायी रस्त्याने जाणे पसंत करतात. शहरातील शंभर ते दोनशे मीटर अंतराच्या रस्त्यावर देखील तीन ते चार गतिरोधक असल्याचे चित्र आहे. गतिरोधक असणाऱ्या ठिकाणी दुचाकी जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी काही ठिकाणी गतिरोधक तोडल्याचेही दिसून येतात. नविन रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणे, त्यावर करण्यात आलेल्या गतिरोधक निकषाप्रमाणे बनविण्यात आले आहेत किंवा नाही याची तपासणी करणे पालिकेचे काम असतांना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मात्र वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ओबड-धोबड गतिरोधकांचे सर्वेक्षण करुन निकषाप्रमाणे गतिरोधक टाकणे गरजेचे झाले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पांढरेपट्टे व दिशादर्शक फलक नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे रस्त्यावर पांढरेपट्टे मारणेही अपेक्षित आहे. गतिरोधक उभारतांना गतिरोधकाची उंची निकषाप्रमाणे २.५ ते १० से.मी. केल्यास वाहनधारक गतिरोधकाकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवतात, असे पालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे..








गुरुवार, २२ मार्च, २०१८

गरोदर माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी 'खुशहाली ॲप' ठरतेय् वरदान अतिदुर्गम भागातील धडगाव व तळोदा तालुक्यात पोहोचले 'अरमान'

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात गरोदर माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
यावर मात करण्यासाठी शासन व प्रशासन पराकोटीचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच आता प्रशासनाच्या प्रयत्नांना जोड मिळाली आहे ती एम खुशहाली ॲपची! शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्यासाठी अरमान व टाटा ट्रस्ट यांचामार्फत 'एम खुशहाली ॲप' तयार करण्यात आले असून या माध्यमातून ५३४८ गरोदर माता व १४९१ बाळाची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी २३३८ माता आणि २३२ बाळांना या माध्यमातून सेवा पुरविण्यात आली आहे. एक सक्षम पाऊल माता व बाळ मृत्यू कमी करण्यासाठी 'अरमान'तर्फे उचलण्यात आले आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील गरोदर मातांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होत आहे.. नंदुरबार जिल्ह्यात माता व बाळ मृत्यू कमी व्हावे याकरिता अरमान या संस्थेने एम खुशहाली ॲप तयार केले असून या माध्यमातून बालमृत्यू व गरोदर माता मृत्यूवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर प्रकल्पास टाटा ट्रस्टतर्फे वित्तीय सहाय्यता केली जात असून जिल्हा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्पाची अंमलबजावणी धडगाव व तळोदा तालुक्यात प्रायोगिक तत्वावर केली जात आहे. यात तळोदा तालुक्यात प्रतापपूर, सोमावल, बोरद, वाल्हेरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर धडगाव तालुक्यातील बिलगाव व चुलवड या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांसह एकूण १५१ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
सदर उपक्रमासाठी ३७ परिचारिकाना भ्रमणध्वनी वितरीत करण्यात आले आहेत. या माध्यमातून योग्य जोडपे, त्यांच्या वयातील अंतर, रक्तगट, गर्भवती महिला व बाळाबाबतची संपूर्ण माहिती मोबाईलद्वारे ॲपमध्ये लोड करण्यात येते. सदर संकलित माहिती आरोग्यविभाग व अरमान यंत्रणेच्या बोर्डवर उपलब्ध होते. त्यामुळे स्वयंचलित पद्धतीने महिलेचे वय, अपेक्षित प्रसूती तारीख तसेच कृती आराखडा देय भेटी, भेटीचे नियोजन कार्यबद्ध स्वरुपात करता येते. नोंदणी झालेल्या बाळ आणि गर्भवती महिलांना टॅबलेटच्या सहाय्याने विविध ॲनिमेशन दाखवून बाल संगोपन, लसीकरण, आहार, ॲनेमिया, स्तनपान, धोकादायक आरोग्य चिन्हे, प्रसूती, डायरिया, कुटुंब नियोजन, एच.आय.व्ही.. बाबत मार्गदर्शनासोबत जनजागृती केली जात आहे. अतिदक्षतेच्या मातांना मोबाईलच्या माध्यमातून तात्काळ वैद्यकीय सुविधाही पुरविल्या जात आहेत. या उपक्रमातंर्गत ५३४८ गरोदर माता व १४९१ बाळाची नोंदणी करण्यात आलेली असून २३३८ महिलांच्या आणि २३२ बाळांना सेवा पुरविण्यात आली आहे. संबधित प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिचारिकांच्या मदतीने संस्था हे मिशन राबवित आहे. हे मिशन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सी.ओ. कार्ल परेरा, प्रकल्प व्यवस्थापक आशिष भोसले, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे व जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. नितीन बोडके, टाटा ट्रस्टच्या स्मृती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली टीम प्रकल्प समन्वयक निलचंद्र शेंडे व त्यांची टीम मेहनत घेत असून तळोदा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, धडगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश बडे, डॉ. रेखा शिंदे, डॉ. कांतीलाल पावरा, डॉ. सोहम पाडवी, डॉ. साईिसंग पावरा, डॉ. विनोद, डॉ.जोशी, डॉ. निर्मल जगदाळे, डॉ. राठोड, डॉ.लांडे, डॉ. प्रशांत हिंगणकर यांचे सहकार्य लाभत आहे..

अरमान व टाटा संस्थेच्या विद्यमाने राबविला जात असलेला सदर उपक्रम हा दुर्गम व अतिदुर्गम भागात महत्वाचा ठरत आहे. या माध्यमातून आरोग्य विभागाला अतिदक्षतेच्या गर्भवती महिला तात्काळ कळण्यास मदत होत आहे. ॲनिमेशनच्या माध्यमातून केलेले समुपदेशन हे महिलांना समजण्यास सोपे आहे. सदर उपक्रमामुळे माता व बाळ मृत्यू कमी करण्यास हातभार लागत आहे. . -महेंद्र चव्हाण . तालुका वैद्यकीय अधिकारी, तळोदा.















  

बुधवार, ७ मार्च, २०१८

जेव्हा डॉक्टर देवदूत होतात!

धुळ्याचे डॉ.राहूल भामरेंनी दिले महिलेला जीवदान
तळोदा तालुक्यातील बोरद येथील एका महिलेस किडनीनजीक गाठ असल्याने त्यांना कुटुंबियांनी महाराष्ट्र व गुजरात मधील किडनी उपचार होत असलेल्या रुग्णालयात नेले होते. मात्र, सदर गाठ काढतांना शस्त्रक्रिया करावी लागणार असून यात किमान ६० ते ७० टक्के किडनी डॅमेज होण्याची शक्यता तेथील डॉक्टरांनी बोलून दाखविली. यामुळे नेमके काय करावे या विवंचनेत कुटुंबिय पडले होते. यावेळी धुळे येथील राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहूल भामरे यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळ्यातील तज्ञ डॉ.सुभाष भामरे यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स करून त्यांचा सल्ला घेऊन आपल्या
हॉस्पिटलमध्ये सदरची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. किडनीला कोणतीही इजा न होऊ देता डॉ.भामरे यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने डॉक्टरला खरच परमेश्वराचाच अवतार का म्हणतात, आम्हाला देवदूतच भेटला अशी भावना रुग्ण महिला व त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. . तळोदा तालुक्यातील बोरद येथील मनिषा दत्तात्रय पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना नंदुरबार येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, योग्य निदान न झाल्याने धुळे येथे राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहुल भामरे यांच्याकडे उपचारसाठी दाखल केले. यावेळी मनिषा पाटील यांच्या किडनीला लागूनच गाठ असल्याचे निदर्शनास आले. यावरत्यांचे पती दत्तात्रय पाटील यांनी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे ठरवले व मुंबई, बडोदा, नडीयाद येथील किडनीतज्ञांकडे धाव घेतली. गाठीवर ६ सेमीचे फेरी नेफ्रिक मास्क असून गाठ मोठे आतडे व किडनीच्या मध्यभागी असल्याने शस्त्रक्रिया केल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता तेथील तज्ञ डॉक्टरांनी वर्तविली. काही केल्या किडनी निकामी होणारच या भितीने पाटील कुटूंबिय भयभीत झाले. त्यातच राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ.राहुल भामरे यांनी दत्तात्रय पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून शस्त्रक्रियेसाठी येण्यास सांगितले. कोणतीही इजा न होऊ देता शस्त्रक्रिया शक्य असल्याचे डॉ.भामरे यांनी सांगितल्यानंतर दत्तात्रय पाटील यांनी शस्त्रक्रियेसाठी होकार दिला. सदर शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी प्रगत तंत्रज्ञानामुळे केंद्रीय संरक्षणमंत्री ना.डॉ.सुभाष भामरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिलेल्या सल्ल्यामुळे व डॉ.राहूल भामरे, डॉ.भूषण वाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी तीन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर किडनीला कोणतीही इजा न होता यशस्वी केली. यामुळे डॉ.राहूल भामरे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. डॉक्टर नव्हे तर देवदूत आम्हाला भेटले, अशी प्रतिक्रिया रुग्ण महिला व त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखविली..





गुरुवार, १ मार्च, २०१८

दिव्यांग प्रवाशाचा नाशिक ते निजामपूर ताटकळत प्रवास!

 आरक्षित आसन मिळेना! : महामंडळाने वाहकांना सूचना देण्याची मागणी
 दिव्यांगांसाठी एसटी बसमध्ये जागा आरक्षित असतांना देखील बसण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे दिव्यांगांमध्ये नाराजी पसरली आहे. राज्य परिवहन महामंडळाने वाहकांना सूचना देवून आरक्षित जागा दिव्यांग प्रवाश्यांना उपलब्ध करुन द्यावी, अशी अपेक्षा तळोदा येथील अपंग शिक्षक विनोद पगार यांनी दै.'पुण्यनगरी'शी बोलतांना व्यक्त केली आहे.. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिला, अपंग, विद्यार्थिनी, दिव्यांग, पत्रकार, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरक्षण असते. खिडकीजवळ किंवा आसनाच्या पाठीमागे आसन राखीव असल्याचे लिहिले जाते. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. जो पहिल्यांदा सीट पकडेल तोच तेथे बसून प्रवास करतो. यामुळे महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थिनींना उभे राहून किंवा चालकाच्या केबिनमध्ये बसून प्रवास करावा लागत आहे. या बसेसमधील आरक्षण केवळ नावालाच असल्याचा आरोप करत आपल्या सोबत घडलेला प्रसंग त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केला. तसेच दै.'पुण्यनगरी'शी याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली आहे. सकाळी ११ वाजेदरम्यान नाशिकहुन नंदुरबार येथे येण्यासाठी त्यांनी बीटी- १४, 3447 या क्रमांकाची बस गाठली. बस लांब पल्याची असल्याने प्रवाश्यांनी तुडूंब भरलेली होती. मात्र महत्त्वाचे काम असल्याने याच बसने शिक्षक पगारे यांना जावे लागणार होते. लांबचा प्रवास व अपंग असल्याने शिक्षकास प्रवास करणे जिकरीचे ठरणार होते. मात्र आपण अपंग आहोत, त्यासाठी शासनाकडून आरक्षित आसन असल्याने ती मिळवू असा मनात विचार करत त्यांनी प्रवास सुरु केला. त्यांनी याकरिता वाहकाला विनंती करून दोन नंबरचेआसन अंपंगासाठी राखीव असल्याचे निदर्शनास आणून दिले. प्रवास लांबचा असल्याने एवढ्या लांबपर्यंत उभे राहणे शक्य नसल्याचे कारण देखील त्यांनी सांगितले. मात्र मी त्यांना त्या जागेवरुन उठवू शकत नाही. ते नाशिकहून बसले असल्याचे म्हणत तुम्हीच त्यांना उठवा, असे म्हणत वाहकाने हात झटकले. शेवटी दिव्यांग असलेले पगारे यांना नाशिक ते निजामपूरपर्यंतचा प्रवास उभे राहून करावा लागला. दरम्यान वाहकाकडून अशी वागणूक मिळाल्याने अपंग शिक्षक पगार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य परिवहन महामंडळाने वाहकांना सूचना देवून आरक्षित जागा अपंग प्रवाश्यांना उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा अपंग शिक्षक पगार यांनी व्यक्त केली आहे..