Breking News

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

नात्यांची नाळ शेवटच्या श्वासापर्यंत जपणारे पो.अधिकारी स्व.ओंकारराव मराठे

सुधाकर मराठे :     
          परिस्थिती माणसाला थांबवत नाही; जिद्द हरली तरच माणूस थांबतो. या विचाराला आपल्या संपूर्ण आयुष्याने खरे ठरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे तळोद्याचे स्वर्गीय ओंकारराव मराठे.
          ७ ऑगस्ट १९३६ रोजी तळोदा येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्व. शंकरराव गणू मराठे हे कष्टकरी होते. शंकररावांना पाच पत्नी होत्या. त्यापैकी गिनीबाई यांचे ओंकारराव हे पुत्र, तर दुसऱ्या आईपासून जन्मलेल्या नबाबाई संपत मराठे या त्यांच्या मोठ्या बघीनी होत्या. दोघा भाऊ-बहिणीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.

        त्या काळात तळोदा पालिकेचा माध्यमातून कंदिलांमध्ये तेल टाकून गावातील दिवे लावले जात. अशा परिस्थितीत शंकरराव गणू मराठे कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.  
       ओंकाररावांनीही लहानपणापासूनच परिस्थितीशी दोन हात केले. शिक्षणाची पुरेशी संधी मिळाली नाही आणि त्यांनी केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र शरीराने धडधाकट, बुद्धिमान आणि जिद्दी असलेले ओंकारराव परिस्थितीपुढे कधीच झुकले नाहीत.

मित्रांनी दाखवला पोलीस भरतीचा मार्ग

                 घरात खाण्याची भ्रांत, खिशात पैसे नाहीत आणि भविष्याची कोणतीही निश्चित दिशा नाही, अशा परिस्थितीत त्यांच्या मित्रांनी त्यांना पोलीस भरतीचा प्रयत्न करण्यासाठी आग्रह केला. त्यांच्यासोबत धर्मदास माळी आणि जगन माळी हेही होते.
                एकदा प्रयत्न करून बघूया, या आशेने ओंकारराव मित्रांसोबत पोलीस भरतीसाठी गेले. त्या काळात महाराष्ट्र आणि गुजरात हे संयुक्त राज्य होते. मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द लहानपणापासूनच असावी. पोलीस भरतीच्या सर्व परीक्षा त्यांनी जिद्दीने उत्तीर्ण केल्या आणि स्वतःला सिद्ध केले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांना मात्र यश मिळाले नाही. पण जिद्दीने पेटलेल्या ओंकाररावांनी आपल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार केला.

१९५६ साली त्यांनी पोलीस खात्यात प्रवेश केला
         सध्या गुजरात राज्यात असलेल्या झगडिया येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली. एका गरीब कुटुंबातील मुलाने कठोर परिश्रमाच्या जोरावर सरकारी नोकरी मिळवली आणि आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्यानंतर ते कधीही थांबले नाहीत. गुजरात राज्यातील पोलीस क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केली जी आजतागायत कायम आहे. 
उत्तर प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आणि गुजरात राज्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती. आनंदी बेन पटेल यांचा सोबत...

वडिलांच्या मायेची ती आठवण...
     ओंकाररावांच्या बालपणीचा एक प्रसंग आजही मनाला चटका लावून जातो. त्यांना चित्रपट पाहण्याची आवड होती. मात्र घरची परिस्थिती इतकी बिकट होती की, चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या खिशात दमडीही नसे. पैसे नसल्यामुळे कधी कधी चित्रपटगृहात त्यांना आत प्रवेश मिळत नसे. अशावेळी त्यांचे वडील शंकरराव गणू मराठे तेथे पोहोचत.
      “दादा, मी तुमच्या दिव्यांमध्ये तेल ओतण्याचे काम करीन; पण माझ्या पोराला चित्रपट बघू द्या... अशी विनंती ते करीत आणि आपल्या मुलाला चित्रपट पाहण्याची संधी मिळवून देत.
         हा प्रसंग केवळ गरिबी सांगणारा नाही; तर एका कष्टकरी वडिलांच्या आपल्या मुलावरील अपार प्रेमाची साक्ष देणारा आहे.

संसार उभा केला, मुलांना घडवले
         पोलीस खात्यात सेवा बजावताना ओंकाररावांनी उंच पदे गाठली. परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी आपला संसार सुखाचा केला. त्यानंतर धरणगाव येथील कल्याणी कुटुंबातील शोभादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना प्रथम राजेश हा मुलगा, तर भारती आणि तरुणा या कन्या झाल्या. आपल्या मुलांना त्यांनी चांगले शिक्षण, संस्कार आणि आयुष्याची भक्कम दिशा दिली.
          त्यांचे चिरंजीव राजेश मराठे हे गुजरात येथे ONGC मध्ये चीफ मॅनेजर (एच.आर.) या पदापावेतो गेले. त्यांची द्वितीय कन्या भारतीबेन या एअर होस्टेस होत्या, तर कनिष्ठ कन्या तरुणाबेन या शिक्षिका आहेत. कुटुंबातील सर्वांचे लग्नसोहळेही त्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून थाटामाटात पार पाडले.
 मात्र मन तळोद्यातच राहिले...
        नोकरीमुळे गुजरातमध्ये वास्तव्य असले तरी तळोद्याशी असलेली त्यांची नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. गावात आले की जुन्या मित्रांना भेटणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा भाग होता. जगन माळी, धर्मदास माळी यांच्यासह अनेक जुन्या मित्रांशी ते सतत संपर्कात राहत. वर्षे सरली. परिस्थिती बदलली. नोकरीत पद वाढले. जीवनमान बदलले. मात्र जुन्या माणसांबद्दलचे प्रेम आणि गावाबद्दलची आपुलकी त्यांच्या मनातून कधीच कमी झाली नाही.

नबाबाई म्हणजे ओंकाररावांच्या काळजाचा तुकडा
        नबाबाई संपत मराठे ही ओंकाररावांची बहिण, दोघांचे नाते अतूट होते. आई गिनीबाई लहानपणीच देवाघरी गेल्यानंतर ओंकाररावांच्या बालपणात बहिण नबाबाईंचा आधार होता. या नात्यातील माया आयुष्यभर कायम राहिली. नबाबाईंची परिस्थितीही अत्यंत बिकट होती. त्यांनी काबाडकष्ट करून आयुष्याचा संसार उभा केला. अनेक कठीण प्रसंग आले; पण भाऊ ओंकाररावांनी तिला कधीही एकटे सोडले नाही.
          नबाबाईंची मुलगी म्हणजे आशाबाई आमची आई. ओंकाररावांचा आशाबाईंना नेहमीच मोठा आधार होता. तिच्या अडचणीच्या काळात ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत. हे नाते केवळ भाऊ-बहिणीचे नव्हते; ते मायेचे, आधाराचे आणि आयुष्यभर जपलेल्या विश्वासाचे होते.
बहिणीच्या शेवटच्या इच्छेसाठी अहमदाबादहून तळोदा
          २०१६ साल. नबाबाई आजारी पडल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक होती शेवटली घटका मोजत असताना. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांना आपल्या भावाला एकदा पाहायचे होते, त्यांना भेटायचे होते. ही इच्छा ओंकारदादांना समजताच त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. अहमदाबादवरून ते थेट तळोद्याला आले. आपल्या बहिणीची भेट घेतली. तिच्याशी मनभरून बोलले. तिच्या जवळ बसले. ती दोघा भावा-बहिणीची शेवटची भेट ठरली.
       ओंकारदादांनी बहिणीला भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नबाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. काही नाती शब्दांत व्यक्त होत नाहीत. ती अशाच शेवटच्या भेटीतून, अश्रूंमधून आणि आयुष्यभराच्या मायेच्या आठवणींतून व्यक्त होतात. बहिण गेली, पण तिच्या मुलीला भाऊ कधी विसरला नाही
        आज आम्ही ज्या नबाई नावाच्या इमारतीत वास्तव्यास आहोत, ते घर म्हणजे स्वर्गीय नबाबाई आणि स्वर्गीय ओंकारराव मराठे यांची वडिलोपार्जित मिळकत, नबाबाई गेल्यानंतरही ओंकाररावांनी आपल्या भाचीला (आशाबाईला) कधीही एकटे सोडले नाही. उलट, त्यांच्या वाट्याला असलेल्या घरातील हिस्सा त्यांनी आपल्या भाचीला दिला.
         ही केवळ घराची किंवा मालमत्तेची गोष्ट नव्हती. ही बहिणीच्या मृत्यूनंतरही तिच्या मुलीची जबाबदारी आपलीच आहे, या भावनेतून केलेली कृती होती. नाते रक्ताचे असते; पण ते जपण्यासाठी मन मोठे असावे लागते. ओंकाररावांचे मन तसेच मोठे होते. पोलीस अधिकारी झाले, पण माणूसपण कधी हरवले नाही
         गरीब घरातून निघालेला मुलगा पोलीस खात्यात दाखल झाला. कठोर परिश्रमाने उंच पदावर पोहोचला. कुटुंबाला सुख दिले. मुलांना शिक्षण दिले. त्यांचे संसार उभे केले. पण या सगळ्या यशानंतरही त्यांनी आपल्या मातीला, आपल्या गावाला आणि आपल्या माणसांना कधीच विसरले नाही. यशाने त्यांना मोठे केले; पण नात्यांनी त्यांना माणूस म्हणून मोठे ठेवले.
          शेवटच्या दिवसांतही नात्यांची परंपरा कायम ठेवली, कोरोना महामारीत ओंकाररावांची प्रकृती बिघडली आणि अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. माणूस शरीराने निघून जातो; पण त्याने जपलेली नाती, दिलेला आधार आणि केलेल्या आठवणी मागे राहतात.
         आजही त्यांच्या संस्काराने पुढे जात असलेले त्यांचे चि.राजेश मराठे आणि त्यांच्या पत्नी नलिनी मराठे यांनी ओंकाररावांनी जपलेली नात्यांची ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. ओंकाररावांचे आयुष्य मागे वळून पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते
         गरिबीने त्यांना झुकवले नाही.
परिस्थितीने त्यांची जिद्द मोडली नाही.
यशाने त्यांना आपल्या मातीपासून दूर केले नाही. आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी नाती जपण्याचे कर्तव्य सोडले नाही.

स्व. शंकरराव गणू मराठे यांचा कष्टकरी मुलगा, स्व. ओंकारराव मराठे- गुजरात पोलीस खात्यातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी,
आणि नबाबाई संपत मराठे यांचा जिवाभावाचा भाऊ...
       ही त्यांची केवळ ओळख नाही; तर एका संघर्षमय आणि माणुसकीने भरलेल्या आयुष्याची कहाणी आहे. बहिणीसाठी अहमदाबादहून तळोद्याला धावून येणारा भाऊ, भाचीसाठी स्वतःचा घरातील हिस्सा देणारा मामा, मित्रांना आयुष्यभर जपणारा सोबती, कुटुंबाला शिक्षण-संस्कार देणारा पिता, पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा पती, नातवंडांना आठवणींची आणि संस्कारांची शिकवण देणारा आजोबा आणि तळोद्याची माती शेवटपर्यंत मनात जपणारा एक माणूस...

हीच स्वर्गीय ओंकारराव मराठे यांची खरी ओळख.

          आज ते आपल्यात नाहीत; पण त्यांच्या आठवणी आहेत. त्यांच्या मायेचा स्पर्श आहे. त्यांनी जपलेली नाती आहेत. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पुढच्या पिढीला दिलेला माणुसकीचा वारसा आहे.

      काही माणसे काळाच्या पडद्याआड जातात; पण त्यांनी जपलेली नाती त्यांच्या जाण्यानंतरही बोलत राहतात...

स्वर्गीय ओंकारराव मराठे यांना विनम्र अभिवादन!...
Thnk U DADA....


शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२६

४५ वर्षांचा नित्यनियम आज कायमचा थांबला... स्व.सावित्री आज्जीं अनंतात विलीन

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून जातात. त्यांचं असणं इतकं सहज आणि स्वाभाविक वाटतं की, एक दिवस ते आपल्यात नसतील, याची कल्पनाही मनाला शिवत नाही.

सावित्री आज्जी आमच्यासाठी अशाच होत्या.

गेल्या तब्बल ४५ वर्षांपासून त्यांचा एक नित्यनियम होता. आमच्या शेजारी असलेल्या चिंतेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्या न चुकता आमच्या घरी यायच्या. आमच्या आईला त्यांनी भाची मानलं होतं. मंदिराचं दर्शन झालं की त्यांची पावलं आपोआप आमच्या घराकडे वळायची.

आई बाहेर येईपर्यंत त्या दाराबाहेर उभ्या राहायच्या आणि आई दिसताच नतमस्तक होऊन तिचे पाय पडायच्या.

हा केवळ पाय पडण्याचा विधी नव्हता...

त्यामागे होता नात्याचा आदर, मनातली श्रद्धा, आपुलकी आणि त्यांनी जपलेले संस्कार.

४५ वर्षांत कितीतरी दिवस आले आणि गेले. परिस्थिती बदलली, माणसं बदलली; पण सावित्री आज्जींचा हा नित्यनियम मात्र बदलला नाही. अगदी अंथरुणाला खिळेपर्यंत त्यांनी हा नित्यक्रम जपला.

त्यांनी आम्हाला केवळ नात्यांचा आदर शिकवला नाही, तर नाती कशी जपायची, माणसांशी कसं प्रेमाने वागायचं आणि मनातलं दुःख कुणाजवळ सांगून मन हलकं कसं करायचं, हेही शिकवलं.

आज्जींची आणखी एक खास गोष्ट होती—त्यांची हाक.

त्या कधीच एकाच व्यक्तीला एक हाक मारत नसत.

दारातून किंवा अंगणातून त्यांची आरोळी आली की ती अशीच असायची...

"आशा... संगीता... उषा... शालिनी... शेजल... बेना..."

एकेक नाव घेत त्या सगळ्यांना हाक मारायच्या. त्यांच्या आवाजात एक वेगळीच आपुलकी असायची. ती हाक ऐकली की, आज्जी आल्या आहेत, हे घरातल्या प्रत्येकाला कळायचं.

आणि मग त्यांची छोटीशी भेट सुरू व्हायची.

कधी दोन मिनिटं, कधी थोडा वेळ...

मनात साठवलेल्या काही गोष्टी सांगायच्या. एखादी अडचण, एखादा जुना प्रसंग, घरातील एखादी गोष्ट किंवा मनातली खंत—सगळं मोकळेपणाने सांगायच्या.

मनातलं बोलून त्यांचा भार हलका व्हायचा आणि मग त्या पुन्हा आपल्या मार्गाने निघून जायच्या.

त्यांची ही दोन मिनिटांची भेट आज किती मोठी होती, हे त्यांच्या जाण्यानंतर जाणवत आहे.

त्या येताना कधी मोठ्या अपेक्षा घेऊन येत नव्हत्या. फक्त माणसं भेटायची, दोन शब्द बोलायचे, आईचे पाय पडायचे आणि समाधानाने निघून जायचं.

कधी कधी आपल्या आयुष्यातील छोट्या वाटणाऱ्या गोष्टींची किंमत आपल्याला त्या कायमच्या हरवल्यानंतर समजते.

आज्जींच्या बाबतीतही तसंच झालं.

आज त्यांची ती हाक ऐकू येणार नाही.
"आशा... संगीता... शालिनी... शेजल... बेना..."
अशी नावं घेत अंगणात घुमणारा त्यांचा आवाज आता फक्त आठवणीत राहणार आहे.

आज दिनांक १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता सावित्री आज्जींची प्राणज्योत मावळली.

ही बातमी मनाला चटका लावून गेली.

कालपर्यंत चिंतेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आमच्या घराकडे येणारी त्यांची पावलं आज कायमची थांबली. आईचे पाय पडण्यासाठी दारात उभ्या राहणाऱ्या त्या आता दिसणार नाहीत.

उद्या मंदिरात नेहमीप्रमाणे घंटानाद होईल. लोक दर्शनासाठी येतील. रस्त्यावरची वर्दळही नेहमीसारखी असेल. पण आमच्या घराकडे पाहताना मन मात्र नकळत विचारेल

"सावित्री आज्जी आज का आल्या नाहीत?"

त्यांच्या येण्याने घराच्या उंबरठ्याला एक वेगळीच आपुलकी होती. त्यांच्या हाकेने घर जिवंत व्हायचं. त्यांच्या दोन शब्दांनी मन हलकं व्हायचं आणि त्यांच्या नमस्काराने नात्यांचा अर्थ समजायचा.

माणूस जातो... पण त्याने दिलेले संस्कार आणि आठवणी कधीच जात नाहीत.

सावित्री आज्जींनी आम्हाला प्रेम दिलं, आपुलकी दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाती जपण्याचे संस्कार दिले.

४५ वर्षे त्यांनी हे नातं मनापासून जपलं. आता त्यांची प्राणज्योत मावळली असली तरी त्यांनी पेटवलेला संस्कारांचा दिवा आमच्या मनात कायम तेवत राहील.

चिंतेश्वर महादेवाच्या चरणी आज एकच प्रार्थना...

"महादेवा, आमच्या सावित्री आज्जींच्या आत्म्यास चिरशांती दे. त्यांच्या निष्पाप आणि प्रेमळ मनाला तुझ्या चरणी स्थान दे. त्यांनी आम्हाला दिलेलं प्रेम, आपुलकी आणि संस्कार कायम जपण्याची शक्ती आम्हाला दे."

सावित्री आज्जी,

तुमची ती हाक आता ऐकू येणार नाही...
आईचे पाय पडण्यासाठी तुमची पावलं आता दारात येणार नाहीत...
दोन मिनिटं बसून मनातलं सांगणारी तुमची ती भेट आता होणार नाही...

पण तुमच्या आठवणी?

त्या मात्र आयुष्यभर आमच्यासोबत राहतील.

तुम्ही दिलेले संस्कारच तुमची खरी ओळख आहेत.

🌹 सावित्री आज्जींना भावपूर्ण श्रद्धांजली!
🙏 ॐ शांती 🙏

000 111 222

शुक्रवार, २६ जून, २०२६

आकाशाला गवसणी घालणारा दिवचा अविस्मरणीय प्रवास

दिनांक २६ जून २०२६...     
   अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला दिवस अखेर उजाडला. आम्ही दहा मित्रांनी केंद्रशासित प्रदेश दिव येथे विमानाने प्रवास करण्याचा बेत आखला होता. प्रत्येकाच्या मनात उत्सुकता, आनंद आणि नव्या अनुभवाची ओढ होती. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वीच एक दुःखद बातमी आली. आमचा मित्र विशाल सूर्यवंशी याच्या काकूंचे दुःखद निधन झाल्यामुळे त्याला या सहलीला येणे शक्य झाले नाही. त्याची उणीव आम्हा सर्वांना सतत जाणवत होती.
       पहाटेपासूनच प्रत्येकाची लगबग सुरू झाली होती. सामानाची आवराआवर, वेळेचे नियोजन आणि मित्रांच्या सततच्या फोनमुळे वातावरण उत्साहाने भरून गेले होते. प्रवासाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता लक्षात घेऊन अनेक चर्चा रंगल्या. नंदुरबारपर्यंत चारचाकीने जायचे की दुचाकीने, यावर बराच वेळ खल झाला. शेवटी आमच्या समूहातील मावळा दादाभाऊ पाटील यांनी ठामपणे सांगितले, आपण दुचाकीनेच नंदुरबारला जाऊ. सकाळची पाच वाजताची ट्रेन पकडू आणि वेळेत सुरतला पोहोचू. त्यांच्या या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने होकार दिला. यात आमचे स्नेही असलेले राहुल व बापू यांनी मात्र बगल देत स्वतंत्र प्रवास करणे निवडले.
              ठरल्याप्रमाणे पहाटे आम्ही दुचाकींवरून नंदुरबार गाठले. तिथून बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर पोहोचेपर्यंत गप्पा, विनोद, एकमेकांची खेचाखेच आणि हास्याचा अखंड वर्षाव सुरू होता. प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून गेला होता. अखेर आम्ही सुरतला सुखरूप पोहोचलो. आमच्या दहा जणांच्या समूहात माझा ज्ञानूचा व विशालचा यापूर्वी विमानप्रवासाचा अनुभव होता. मात्र इतर सर्व मित्रांसाठी हा आयुष्यातील पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि उत्सुकता दिसत होती. कोणी विमान किती मोठे असेल याची चर्चा करत होते, तर कोणी खिडकीजवळची जागा मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. प्रत्येकजण हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये आणि मनात कायमचा जपून ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
       सुरत विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रथम सुरक्षा तपासणी, बोर्डिंग पास, ओळखपत्रांची पडताळणी अशा सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्या. विमानतळाचे भव्य आणि आधुनिक वातावरण पाहून अनेक मित्र अक्षरशः भारावून गेले. प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून छायाचित्रे काढत होता. काहींनी सेल्फी घेतले, तर काहींनी विमानाच्या पार्श्वभूमीवर आठवणी टिपल्या. अखेर तो बहुप्रतीक्षित क्षण आला. बोर्डिंगची घोषणा होताच आम्ही सर्वजण उत्साहाने विमानात प्रवेश केला. विमानातील आसनावर बसल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदासोबत थोडीशी भीतीही स्पष्ट दिसत होती. सीट बेल्ट लावताना एअर होस्टेसच्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या. काही क्षणांतच विमानाने धावपट्टीवर वेग घेतला आणि एका झटक्यात आकाशात झेपावले.

       विमान जमिनीपासून उंचावत असताना खाली दिसणारी सुरत शहराची दृश्ये, लहानशा खेळण्यांसारख्या दिसणाऱ्या इमारती, नागमोडी वळण घेणारे रस्ते आणि पांढऱ्याशुभ्र ढगांमधून होणारा प्रवास हा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे. पहिल्यांदाच विमानप्रवास करणाऱ्या मित्रांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि समाधान यांचा सुंदर मिलाफ दिसत होता. त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती. स्वप्न प्रत्यक्षात उतरले! या अविस्मरणीय प्रवासाची ही तर केवळ सुरुवात होती. पुढे दिवच्या निसर्गसौंदर्याने, समुद्रकिनाऱ्यांनी, ऐतिहासिक वारशाने आणि मित्रांच्या सहवासाने हा प्रवास आयुष्यभरासाठी मनात कोरला जाणार होता. २६ जून २०२६ चा हा दिवस आमच्या सर्व मित्रांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण बनून कायम स्मरणात राहील.....

शुक्रवार, ५ जून, २०२६

माणुसकीच्या स्पर्शाने उभारी देणारा अधिकारी - निर्मल तोरवणे

  धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले निर्मल तोरवणे हे नाव केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर माणुसकीचा जीवंत अनुभव देणारा एक दिलदार, प्रेमळ आणि सोज्वळ व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या वागणुकीतला आत्मीयतेचा सूर, सहकार्याची तयारी आणि मनमिळावूपणा अनेकांना आजही सावरणारा, आधार देणारा ठरला आहे. अशा व्यक्तींचा आपल्या जीवनात असणं म्हणजे नशिबाचं भाग्यच.

        माझ्या व्यक्तिगत संघर्षाच्या काळात मी खूप अडचणीत होतो. आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि निर्णयाच्या उंबरठ्यावर थांबलेला. त्या वेळी तोरवणे साहेब एका देवदूतासारखे आले. सुधाकरजी, टेन्शन घेऊ नका. तुमचे काहीही काम असले तरी आपण मार्गी लावु, हे त्यांचे शब्द अजूनही कानात घुमतात. त्यांनी एकाही क्षणी कुठलीही मागणी केली नाही, कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. दिलं तर केवळ भरभरून प्रेम, मदत आणि साथ.
           माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी त्यांनी ज्या प्रकारे मदतीचा हात दिला, ती उभारी विसरणं अशक्य आहे. माझं आयुष्य जेव्हा आर्थिक संकटांमुळे ढवळून निघालं होतं, तेव्हा त्यांच्यामुळेच स्थिरता आली. कठीण प्रसंगांमध्ये त्यांचं नेहमीच एक वाक्य असायचं सुधाकरजी, टेन्शन घेऊ नका, मार्ग काढू. आणि हे केवळ बोलण्यापुरतं नव्हतं, तोरवणे साहेब प्रत्यक्ष कृतीतून तो मार्ग शोधून देत असत...
          त्यांनी माझ्याकडून कुठलीच अपेक्षा केली नाही मी त्यांना भेटायला गेलो तर फक्त एक चॉकलेट ते माझ्याकडून घेत आणि या गोड माणसाला मी जाताना अगदी निरागसपणे न विसरता चॉकलेट घेऊन जात. त्यांची बदली झाली याचा मेसेज नुकताच त्यांच्या तोंडीच समजला. साहजिकच, मनाला एक कळ लागली. तो मेसेज ऐकून दुःख वाटले.. खरं सांगायचं तर ते केवळ अधिकारी नव्हते, तर एका मोठ्या मनाचे, दयाळू हृदयाचे माणूस आहे. त्यांच्या अशा वृत्तीमुळे त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. जी फक्त फाईल किंवा टेबलपुरती नव्हती, तर थेट लोकांच्या हृदयाशी जोडलेली होती.
         तोरवणे साहेबांनी माझ्यासह अनेकांना हात दिला, आधार दिला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन आज मी जे काही स्थिर आहे, ते केवळ त्यांच्या निःस्वार्थ मदतीमुळे. माझ्या आयुष्यात त्यांनी जे स्थान निर्माण केलं आहे, ते शब्दात मांडणं कठीण आहे. माणसं येतात आणि जातात, पण काहीजण आपल्या आयुष्यात अशी छाप सोडतात की ती आठवण संजीवनी ठरते. निर्मल तोरवणे साहेब म्हणजे अशीच एक व्यक्ती – ज्यांना विसरणं अशक्य, आणि ज्यांचं ऋण शब्दांनीही फेडणं अशक्य!..
           आयुष्यात खूप प्रेम करा आणि माणसं भेटले साहेब यात आपण माझा हृदयात कधी स्थान केलं हे मलाही कळलं नाही पण या संकटात आपली लाभलेली साथ ही कधीही मला विसरता येणार नाही आपणास कधीही कुठलीही कशीही पद्धतीची मदत लागली तर मी कशाही पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल हा शब्द मी तुम्हाला देतो.. बदली झाल्याचा संदेशाने थोडा भारावून गेलो मात्र पुणे सारखा मेट्रोपोन्टीन सिटी मध्ये तुमच्या माध्यमातून आमचं स्थान कुठेतरी राखले जाईल याची शास्वती ही तेवढीच प्राप्त झाली...

गुरुवार, २८ मे, २०२६

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर मराठे

तळोदा : तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ मे २०२६ रोजी तळोदा येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली. या सभेत सन २०२६-२७ या वर्षासाठी संघाच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुधाकर मराठे, उपाध्यक्षपदी भरत भामरे, सचिवपदी सम्राट महाजन तर कोषाध्यक्षपदी महेंद्र सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
          माजी अध्यक्ष सम्राट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीला संघाचे मार्गदर्शक भरत भामरे, ईश्वर मराठे, दत्तात्रय सूर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, किरण पाटील, नरेश चौधरी, वसंत मराठे, हंसराज महाले, दीपक मराठे, नारायण जाधव, वैभव कर्णकार, हेमंत मराठे आदी पत्रकार उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला मावळत्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. त्यानंतर मागील वर्षाचा हिशोब व इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
         तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. संघाच्या माध्यमातून गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान, पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव तसेच पेपर विक्रेते व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविले जातात. नवीन कार्यकारिणीने आगामी काळात संघटन अधिक मजबूत करून पत्रकार हिताचे कार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला. नूतन पदाधिकाऱ्यांवर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....

सोमवार, १८ मे, २०२६

MiSS U...

पडत उठत शिकलेली सायकल : बालपणातील सायकलची आठवण

           यथार्थ दुसरीत असताना त्याने सायकल शिकायला सुरुवात केली. वय लहान होते, पण सायकल चालवण्याची त्याला खूप उत्सुकता होती. नवीन सायकल घेण्याऐवजी आम्ही घरात असलेली जुनी सायकलच दुरुस्त करून तयार केली. ती सायकल यथार्थच्या उंचीपेक्षा थोडी मोठी आणि उंच होती.         
त्या सायकलला साईड सपोर्टर लावण्याचा प्रयत्न केला. पण ते नीट बसत नव्हते. कसेबसे लावले तरी यथार्थ चालवताना ते लगेच तुटत होते. त्यामुळे एक दिवसातच आम्ही ते काढून टाकले. मग ठरवले की, त्याला साईड सपोर्टरशिवायच सायकल शिकवायची.
                दररोज संध्याकाळी मी त्याला सायकल घेऊन अमरविद्या कॉलनी आणि अक्कलकुवा रस्त्यावर सरावासाठी घेऊन जात होतो. जवळपास एक तास तो सायकल चालवण्याचा प्रयत्न करत असे. सुरुवातीला त्याला संतुलन राखणे कठीण जात होते. सायकल कधी डगमगायची, कधी थांबायची. कधी पाय पटकन खाली ठेवावा लागायचा. तरीही तो हार मानत नव्हता.
            हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. फक्त चार दिवसांतच त्याने बऱ्यापैकी अंतर स्वतः सायकल चालवत पार केले. यानंतर मी त्याला रात्री बसस्टँडवर घेऊन जाऊ लागलो. तिथे त्याला वाहतुकीचा अनुभव मिळत होता. वळण कसे घ्यायचे, पुढे-मागे येणाऱ्या वाहनांकडे कसे लक्ष ठेवायचे, हे तो हळूहळू शिकू लागला. त्यानंतर सुट्टीचा दिवशी तो कॉलेज ग्राऊंडवर येऊ लागला व सायकल चालवू लागला.
              या सगळ्या सरावात तो अनेकदा पडला देखील. कधी गुडघ्याला खरचटले, कधी हाताला थोडी जखम झाली. पण तो लगेच उठून पुन्हा सायकलवर बसायचा. पडल्यामुळे तो घाबरला नाही. आज यथार्थ आत्मविश्वासाने सायकल चालवतो तेव्हा त्या दिवसांची आठवण छान वाटते. त्या काही दिवसांच्या सरावातून त्याने केवळ सायकल चालवायला नाही, तर धैर्य आणि प्रयत्न करण्याची सवयही शिकली. आमच्यासाठी ही एक सुंदर आणि जपून ठेवण्यासारखी आठवण आहे....

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

शाळेच्या संस्कारांचा पहारेकरी ; चार दशकांचा निष्ठावंत सेवक : शिपाई भटू भाऊ

           काही व्यक्ती पदाने लहान असतात, पण त्यांच्या सेवेतून त्या संस्थेचे मूल्य मोठे करतात. असेच येथील पी. सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, अक्कलकुवा येथे दि. 16 डिसेंबर 1985 रोजी भटू त्रंबक मराठे, हे शिपाई या पदावर रुजू झाले. त्या काळात संस्थेचे मुख्याध्यापक म्हणून कै. व्ही. एन. तिवारी (चाचा) यांचे मार्गदर्शन लाभत होते. शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व दिले जात असलेला तो सुवर्णकाळ होता. शाळा व ज्युनिअर कॉलेजमध्ये अत्यंत प्रफुल्लित, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण होते. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असायची, वर्ग अक्षरशः फुललेले असायचे आणि शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना होत होती.
        अशा सकारात्मक आणि जबाबदार वातावरणात भटू भाऊंनी आपल्या सेवेला सुरुवात केली. शिपाई पदावर असूनही त्यांनी केवळ कामगार म्हणून नव्हे, तर शाळेचा एक अविभाज्य घटक म्हणून आपली ओळख निर्माण केली. शाळेची स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त राखण्याची जबाबदारी त्यांनी सुरुवातीपासून अत्यंत प्रामाणिकपणे स्वीकारली आणि ती जबाबदारी त्यांनी तब्बल 2026 पर्यंत अखंडपणे निभावली.
        दररोज सकाळी लवकर शाळेत येणे, सर्वप्रथम शाळेची स्वच्छता करणे, पटांगण झाडणे, वर्गखोल्या स्वच्छ करणे, बाके पुसणे- ही सर्व कामे त्यांनी नित्यनेमाने आणि मनापासून केली. मात्र, त्यांच्या कार्याला वेगळी उंची देणारी बाब म्हणजे त्यांची धार्मिक व संस्कारशील वृत्ती.

       शाळा परिसरातील पिंपळ, वड व औदुंबर अशा वृक्षांची पूजा करणे, त्यांना फेऱ्या घालणे, तसेच शाळेत असलेल्या देवतांच्या फोटोंना रोज अगरबत्ती लावणे—हे सर्व त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा अविभाज्य भाग होते. या कृतींमुळे शाळा परिसरात एक वेगळीच प्रसन्न, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनाही त्या वातावरणाचा लाभ होत असे.
            भटू भाऊंची सेवा ही केवळ कर्तव्यापुरती मर्यादित नव्हती; ती समर्पण, निष्ठा आणि आत्मीयतेने भरलेली होती. शाळेप्रती असलेली आपुलकी, संस्थेच्या प्रतिष्ठेची जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला आदर त्यांच्या वागणुकीतून सातत्याने दिसून येत होता.
         दि. 1 मे 2026 रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्या दिवशी ते शाळेचा निरोप घेतील, पण त्यांच्या पावलांच्या खुणा, त्यांच्या प्रार्थनेचा गंध आणि त्यांच्या सेवेतून रुजलेले संस्कार या शाळेच्या भिंतींमध्ये, वृक्षांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या आठवणींमध्ये कायम जिवंत राहतील. दि. 31 मे 2026 रोजी भटू त्रंबक मराठे हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्या दिवशी ते शाळेला निरोप देतील, पण त्यांनी दिलेली सेवा, रुजवलेले संस्कार आणि निर्माण केलेली सकारात्मक परंपरा ही कायम स्मरणात राहील.
             भटू भाऊंची सेवा ही निश्चितच प्रशंसनीय, अनुकरणीय आणि गौरवास्पद आहे. अशा निष्ठावंत सेवकांमुळेच शैक्षणिक संस्था केवळ ज्ञानाचे केंद्र न राहता संस्कारांची देवभूमी बनते....

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

वचननिष्ठेचा जिवंत आदर्श : आप्पासाहेब लक्ष्मणराव बबनराव माळी

              आमचे आधारवड आप्पा साहेब लक्ष्मणराव बबनराव माळी हे अत्यंत उदार, दिलदार, मातीशी जोडलेले रांगडे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या स्वभावातील माणुसकी, साधेपणा आणि प्रेमळपणा यामुळे ते प्रत्येकाच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान मिळवून आहेत. त्यांची आध्यात्मिक वृत्ती म्हणजे देवावर अढळ श्रद्धा, मनःशांती, संयम, सेवा, नम्रता आणि जीवनाला दिशा देणारी सकारात्मक ऊर्जा आहे. ते नियमित देवपूजा करतात आणि देवावर त्यांची अढळ श्रद्धा आहे. देवावरचे त्यांचे निस्सीम प्रेम त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत आले असल्याचे ते नेहमी म्हणतात. 
          नेतृत्वगुण असलेले आप्पा साहेब पी. ई. सोसायटीचे अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत आहेत. संस्था चालक म्हणून त्यांनी दिलेले योगदान खरोखरच मोलाचे आहे. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक लोक घडले, अनेकांचे जीवन बदलले आणि संस्था अधिक सक्षम झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला आज पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.
           औपचारिक शिक्षणाच्या कागदी पदव्या कमी असल्या तरी जीवनातील अनुभव, व्यवहारज्ञान आणि शहाणपण यामुळे ते खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आहेत. संयम, सातत्य, कुटुंबावरचे प्रेम आणि कुटुंबप्रमुख म्हणून निभावलेली जबाबदारी ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख आहे.
         ते कुटुंबावर, समाजावर आणि तरुण पिढीवर मनापासून प्रेम करतात. कठीण परिस्थितीतही त्यांनी कधी हार मानली नाही. असंख्य संकटांना सामोरे जात त्यांनी नेहमीच योग्य मार्ग शोधला.
             माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी आधार दिला आणि तरुणांची साथ कधीही सोडली नाही. समाजाला चांगली दिशा देणारे आप्पा साहेब हे खरोखरच आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यासारखा मार्गदर्शक आणि आधार मिळणे हे आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. 
            खरे आप्पा ओळखायचे असतील तर आप्पा साहेबांचा सहवास आवश्यक आहे. सहवासात मिळते अनुभवाची शिदोरी, जी कित्येक पुस्तके वाचूनही सापडणार नाही. असंख्य माणसे वाचलेला माणूस, आमची आभाळमाया - कधीमधी चिडणारे, पण लगेच विसरून त्याहीपेक्षा अधिक प्रेम करणारे, साधे, भोळे, दिलदार आणि मनाचा राजा असलेले आप्पासाहेबाना वाढदिवसाच्या सप्तरंगी शुभेच्छा.

आप्पा साहेब, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

पहिला विदेश टूर थायलंड : अनुभव, मैत्री आणि आठवणींचा सुवर्णप्रवास

दि.02 फेब्रुवारी 2026
                आयुष्यातील पहिला विदेश दौरा करण्याचा योग माझ्या आयुष्यात थायलंड टूरच्या माध्यमातून आला. हा प्रवास केवळ पर्यटनाचा नव्हता, तर तो माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा, शिकवण देणारा अनुभव आणि आयुष्यभर जपण्यासारखी आठवण ठरला.
                   सुरुवातीला या टूरसाठी मी आणि सुनील सूर्यवंशी (कालू भाऊ) असे दोघे जाणार होतो. मात्र कालू भाऊ यांचे पासपोर्ट वेळेवर न आल्यामुळे त्यांचा जाण्याचा बेत रद्द झाला. त्यांच्या जागी माझा वर्गमित्र असलेला विशाल सूर्यवंशी माझ्यासोबत सहभागी झाला. हा बदल अचानक झाला, पण पुढे जाऊन विशाल हा या प्रवासातील एक महत्त्वाचा सहप्रवासी ठरला.                या संपूर्ण टूरमध्ये सहभागी होण्यामागे रांझनी येथील डॉ.नारायण जाधव यांचा मोठा वाटा होता. त्यांचा हा दुसऱ्यांदा परदेश दौरा असल्यामुळे त्यांना आधीच अनुभव होता. त्यांच्या आग्रहामुळे, प्रोत्साहनामुळे आणि विश्वासामुळेच मी खऱ्या अर्थाने या टूरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

 तळोदा ते पुणे- ओळखींचा आणि नव्या मैत्रीचा प्रवास
              तळोदा येथून निघताना मी केवळ डॉ. नारायण जाधव यांनाच चांगल्या प्रकारे ओळखत होतो. इतरांशी फक्त तोंडओळख होती, तर काहीजण अगदीच नवखे होते. पोपट पाटील, डॉ.गोकुळ (आबा) बोरसे, डॉ. मेघराज पाटील, मी आणि विशाल सूर्यवंशी असे आम्ही सर्व 28 तारखेला तळोदा येथून पुण्याकडे रवाना झालो. पुढे नंदुरबार येथून टूरचे प्रमुख पंकज भावसार आणि महेश राजपूत यांनी ट्रॅव्हल्स बुक केली होती. त्यांच्याशी माझी ही पहिलीच भेट होती.
प्रवासादरम्यान डॉ. सुधीर पाटील, डॉ.माधव पाटील आणि डॉ. गिरासे हेही आमच्यासोबत जोडले गेले.             
              सर्वजण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असतानाही, आमच्यात लवकरच एक मैत्रीपूर्ण, आपुलकीचे आणि आनंदी वातावरण तयार झाले. गप्पा, हशा, चेष्टा आणि अनुभवांची देवाणघेवाण करत आम्ही ट्रॅव्हल्सने पुण्यातील डॉ. सुधीर पाटील यांच्या साडूकडे पोहोचलो. ते पुण्यात बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून आहेत. त्यांच्या फर्म हाऊसवर आम्ही खुप धमाल केली. निसर्गरम्य वातावरण, स्विमिंग पूल, मोकळी जागा आणि खेळाची साधने पाहून सगळ्यांचाच उत्साह वाढला. त्या ठिकाणी काही क्षणांतच आमच्यातील अंतर कमी झाले आणि आम्ही एका कुटुंबासारखे वाटू लागलो. आम्ही पोहलो, खेळलो, गप्पा मारल्या गाणे म्हटले नाचलो आणि एकत्र धमाल केली. 
                   मात्र याच आनंदाच्या क्षणांत अजित पवार यांच्या निधनाची बातमी आम्हाला कळली. ही बातमी मनाला चटका लावणारी होती. सर्वांनी काही क्षण शोक व्यक्त केला, आणि त्या दु:खद घटनेची छाया आमच्या मनावर उमटली.

पुणे एअरपोर्ट पहिल्या विमानप्रवासाची धडधड
                    रात्री आम्ही पुणे येथील  एअरपोर्टकडे रवाना झालो. माझ्यासह विशाल सूर्यवंशी आणि इतर काही जणांचा हा पहिलाच विमानप्रवास होता. विमानतळावर पोहोचल्यावर भव्य इमारत, सुरक्षा तपासणी, चेक-इन काऊंटर, बोर्डिंग पास, इमिग्रेशन प्रक्रिया, कागदपत्रांची तपासणी आणि चलन बदल या सर्व गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या. येथे पोहचल्यानंतर आम्हाला आणखी 17 मित्र भेटले. त्यावेळी नरेंद्र भाई सिंधी हे आयोजक असल्याचे समजले त्यांच्या सोबतच असलेले त्यांचे जवळचे मित्र संदीप लूला व अन्य ठिकठिकाणाहून आलेले सर्व जण एकत्र जमले.. संदीप लूला यांनी मला स्थलांतर प्रक्रिये दरम्यान मदत केली.          
       प्रत्येक टप्प्यावर आम्ही शिकत होतो, एकमेकांना मदत करत होतो आणि नव्या अनुभवांचा आनंद घेत होतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही रात्री 12 वाजता पुण्याहून फ्लाइटने उड्डाण केले..

 विमानप्रवास            
   आकाशातील स्वप्नवत क्षण विमानात बसण्याचा माझा पहिलाच अनुभव अविस्मरणीय होता. टेकऑफच्या वेळी जाणवणारी धडधड, खिडकीतून दिसणारे शहराचे लहान होत जाणारे दिवे, ढगांचे शुभ्र समुद्र आणि आकाशातील शांतता, हे सर्व मनात खोलवर कोरले गेले. प्रवासादरम्यान सर्व मित्र एकमेकांशी अनुभव शेअर करत होते. काहीजण उत्साहात होते, काहीजण थोडे भावूक, तर काहीजण स्वप्न पाहत होते..

पहाटे 5 वाजता-बँकॉकमध्ये आगमन     
               पहाटे 5 वाजता आम्ही थायलंड देशाची राजधानी बँकॉक (Bangkok) येथे पोहोचलो. विमानतळावर पाऊल ठेवताच परदेशी वातावरण, शिस्तबद्ध व्यवस्था आणि आधुनिकता लगेच जाणवली. थायलंड- ठिकाणांचे महत्व आणि आकर्षण थायलंडमधील बौद्ध मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे, शॉपिंग मॉल्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहून मी भारावून गेलो.
प्रत्येक ठिकाणाचा स्वतःचा इतिहास, महत्व आणि सौंदर्य आहे. येथील संस्कृती, कला, खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अनुभवणे म्हणजे एक वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखे वाटत होते.
रात्रीची लाईफ    
                थायलंडची ओळख थायलंडची रात्रीची लाईफ अत्यंत प्रसिद्ध आहे. रात्री शहर अधिकच उजळते-रंगीबेरंगी दिवे, संगीत, स्ट्रीट फूड, मार्केट मार्केटस, पार्ट्या आणि उत्साही वातावरणामुळे शहर जिवंत भासते. पार्ट्या, डिस्को, पब ही येथील संस्कृती आहे..  
कोरल आयलंड       
              कोरल आयलंड येथील अनुभव माझ्यासाठी अत्यंत रोमांचक आणि अविस्मरणीय ठरला. येथे आम्हाला अंडर सी (समुद्राखालील) जग पाहण्याची अनोखी संधी मिळाली. रंगीबेरंगी मासे, प्रवाळ (कोरल) आणि समुद्रातील जिवंत सृष्टी पाहून मन थक्क झाले. त्यानंतर पॅराग्लायडिंग करताना आकाशातून समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद वेगळाच होता.         
   बनाना राईड आणि बाईक राईड करताना वेग, थरार आणि हास्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कोरल आयलंडवरील प्रत्येक क्षण साहस, आनंद आणि आठवणींनी भरलेला होता.
वाहतूक व्यवस्था
              शिस्त आणि सोय येथील वाहतूक व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट आहे. मेट्रो, स्कायट्रेन, बस, टॅक्सी, व वर्दळ असतानाही एकही हॉर्न आम्ही ऐकला नाही हे नवलच, सर्व काही वेळेवर, स्वच्छ आणि शिस्तबद्ध. परदेशातील शिस्त पाहून आपणही बरेच काही शिकतो..  
मैत्री, अनुभव आणि आठवणी
             हा दौरा 3 रात्र 4 दिवसांचा होता, पण या थोड्या दिवसांत आम्ही आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी कमावल्या. या प्रवासात मला डॉ. नारायण जाधव, पंकज भावसार, जयेश राजपूत, डॉ.सुधीर पाटील, डॉ. माधव पाटील, डॉ. गिरासे, डॉ. मेघराज पाटील, पोपट पाटील, आबा पाटील, विशाल सूर्यवंशी आणि इतर सर्व मित्रांसोबत घालवलेले क्षण आयुष्यभर स्मरणात राहतील.   
              माझ्यासाठी पहिला विदेश टूर थायलंड हा केवळ प्रवास नव्हता, तर तो स्वप्नपूर्ती, आत्मविश्वास, नव्या नात्यांची सुरुवात आणि आयुष्य समृद्ध करणारा अनुभव ठरला. डॉ. नारायण जाधव यांच्या प्रेरणेमुळे सुरू झालेला, पंकज भावसार, नरेंद्र भाई, संदीप लूला, यांच्या नियोजनामुळे यशस्वी झालेला,                            
               थायलंडमधील सुंदर क्षण मनात साठवत आम्ही परतीच्या तयारीला लागलो. परतीपूर्वी आम्ही इंदिरा मार्केट येथे खरेदीसाठी गेलो. तेथील रंगीबेरंगी बाजारपेठ, स्मृतिचिन्हे, कपडे, शोभेच्या वस्तू आणि स्थानिक वस्तूंनी मन वेधून घेतले.
                 त्यानंतर आम्ही स्वर्णभूमी (Suvarnabhumi) विमानतळावर पोहोचलो. हा भव्य, आधुनिक आणि अत्यंत शिस्तबद्ध विमानतळ पाहून थक्क व्हायला झाले. परतीचे उड्डाण घेताना मनात आनंद, समाधान आणि आयुष्यभरासाठी जपण्यासारख्या आठवणी होत्या. याठिकाणी विष्णू यांचे समुद्र मंथनचा देखावा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
         या सहलीत नवीन भेटलेल्या मित्रांमध्ये शिक्षण कमी झालेले असले तरी अनुभवातून शिकलेला, स्वभावाने गोड व दुसऱ्याला हसवण्यासाठी जगणारा, चिनोदा येथील पोपट पाटील, एक अनुभवी व शिस्तीत गोठलेले डॉ.आबा पाटील, उत्सवाची गोफ असलेले सर्वांच्या मदतीला धावून येणारे डॉ.मेघराज पाटील, अनुभवी शांत संयमी असलेले डॉ.सुधीर पाटील, सूक्ष्म निरीक्षक अभ्यासक मातीशी जोडलेले डॉ.माधव पाटील, आपल्या व्यावसायिक जीवनात कमी वयात अनेक भाषा अवगत केलेले दिलदार मित्र महेश राजपूत, कमी वयात अनेक देशांच्या भ्रमंती केलेले उदार मतवादी असलेले आपल्या जवळच्यानीही जग फिरावे अशी इच्छा असलेले पंकज भावसार आणि अशा सर्व अष्टपैलूंना एका दौऱ्यात गुंफण्याची कला असलेले डॉ.नारायण जाधव यांच्या सहवास लाभला आणि सर्व मित्रांच्या मैत्रीमुळे संस्मरणीय ठरलेला हा प्रवास माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण अध्याय बनून राहील......

सुधाकर मराठे तळोदा
     09595008844