Breking News

सोमवार, २८ मे, २०१८

दै.पुण्यनगरीचे वृत्ताची दखल

तळोदा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले नसल्याचे निदर्शनास आल्याने दि. ११ मे रोजी दै.पुण्यनगरीतून बारा ग्रामपंचायतींकडून पाणी नमूने पाठविण्यात दिरंगाई, नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसूतक नाही या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते. सदर वृत्ताची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत दि.१७ रोजी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान तातडीने गटविकास अधिकारी यांनी संबधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर बाराही गावांचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी दै.पुण्यनगरीचे आभार मानले आहेत..
                                             तळोदा तालुक्यात हातपंप, विहिरी, बोअरवेल असे एकुण ६७ जलस्त्रोत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विविध माध्यमातून तालुक्यातील लाखो नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होते. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व व मान्सून सुरु झाल्यावर तालुक्यातील सर्व गावातील जलस्रोताचे नमुने संकलित करुन ते तपासणीसाठी तालुका आरोग्य प्रयोगशाळेत पाठवून पाणी नमुन्याची अनुजीव व रासायनिक तपासणी केली जाते. ही प्रक्रिया मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर करणे आवश्यक असते. मात्र तळोदा तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतीकडून पाण्याचे नमुने पाठवले नसल्याने ग्रामसेवकांचा बेजबाबदारपणा व नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत दि.११ रोजी दै. पुण्यनगरीने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने दखल घेत संबधितांवर तात्काळ कारवाई करा व याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा असे आदेश गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार तातडीने गटविकास अधिकारी यांनी संबधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या. त्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील मान्सून पश्चात रासायनिक व जैविक तपासणी करून घेण्यासाठी स्त्रोतांचे पाणी नमुने संकलन करण्याचे कामे सुरू असताना संबधित ग्रामपंचायतींकडून आजपर्यंत पाणी नमूने पाठवण्यात आले नाही. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे नमूने तात्काळ तपासणी करण्यात यावे. पाणी नमुने दूषित आल्यास तात्काळ कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता करून ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. मात्र सदर कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याने सदरचे वर्तन हे महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तवणूक) नियम १९६७ मधील ४ चे उल्लंघन करणारे व अक्षम्य कसूर करणारे असून प्रशासनास नियमबाह्य व बेजबाबदार वर्तन केल्यामुळे संबंधितांवर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ शिस्तभंग विषयक कार्यवाहीचा प्रस्ताव का सादर करण्यात येऊ नये? असा प्रश्न उपस्थित करत नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. परिणामी तातडीने संबधित ग्रामपंचायतीकडून कार्याची पूर्तता करत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे विस्तार अधिकारी के.बी.पाटील यांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी दै.पुण्यनगरीचे आभार मानले आहेत..

 ➤➤➤ या होत्या पाणी नमूने पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या ग्रामपंचायती➤➤➤
नवागांव, मोड, मोहिदा, रतनपाडा, रामपूर, मोदलपाडा, नळगव्हाण, पिंपरपाडा, शिर्वे, सोमावल बुद्रुक, सोमावल खुर्द, वाल्हेरी.. 

➤➤➤जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तात्काळ संबधित ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत जाब विचारला होता. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी तात्काळ पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यावरून संबधित ग्रामसेवकांनी कार्यपूर्तता केली असून तालुक्यातील एकूण ६७ ग्रापंचायतीकडून पाण्याचे अहवाल सादर केले आहेत. . -
के.बी.पाटील. विस्तार अधिकारी, पं.स.तळोदा. 







बारा ग्रामपंचायतीकडून पाणी नमूने पाठविण्यात दिरंगाई

नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसूतक नाही तळोदा शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणाहून पाण्याचा उपसा होतो. विहिरी, बोअरवेल व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विविध माध्यमातून तालुक्यातील लाखो नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होते. तळोदा तालुक्यात नुकत्याच सादर केलेल्या सर्व्हेक्षण अहवालानुसार हातपंप, विहिरी, बोअरवेल असे एकुण ६७ जलस्त्रोत आहेत. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व व मान्सून सुरु झाल्यावर तालुक्यातील सर्व गावातील जलस्रोताचे नमुने संकलित करुन ते तपासणीसाठी तालुका आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले जातात. तिथे विविध पाणी नमुन्याची अनुजीव व रासायनिक तपासणी केली जाते. मात्र १२ ग्रामपंचायतींनी अद्यापपर्यंत पाण्याचे नमुनेच तपासणीसाठी पाठविले नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सदर ग्रामपंचायतींचा कामातील बेजबाबदारपणा दिसून येत असून या ग्रामपंचायतींना त्यांचा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा आरोग्याची काहीच चिंता नसल्याचे दिसून होते.पेयजलासाठी वापर होणाऱ्या पाणी स्त्रोताची वेळोवेळी तपासणी होणे आवश्यक आहे. अनुजीव तपासणी वर्षातून चार वेळा तर रासायनीक तपासणी किमान दोनवेळा होणे अपेक्षित आहे. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विशेष अभियानात मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर अशी दोन वेळा पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. उर्वरित काळात नाममात्र शुल्क आकारुन पाणी नमुना तपासणी प्रयोगशाळेतून केली जात असल्याची चर्चा आहे..

मंगळवार, १५ मे, २०१८

खोल विहिरीत उतरल्यावर भागते तहान रात्रंदिवसाच्या उपशाने हंडाभर पाण्यासाठी डेब्रामाळ ग्रामस्थांचा संघर्ष

रात्र असो की दिवस, ऊन असो अथवा वारा मात्र डेब्रामाळच्या ग्रामस्थांचा संघर्ष सुरु असतो तो तहान
भागविण्यासाठी. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरींनी तळ गाठल्याने व परिसरात दुसरी पाण्याची सोय नसल्याने तहान भागविण्यासाठी दोर बांधून खोल विहिरीत उतरुन येथील ग्रामस्थ पाण्याची तहान भागविण्यासाठी कसरत करीत आहेत. यामुळे जीवितही धोक्यात येते. रात्रं-दिवस विहिरीत असणाऱ्या झऱ्यातून घोटघोट पाण्याचा उपसा करुन हंडाभर पाणी मिळविण्यासाठी मोठे दिव्य डेब्रामाळच्या रहिवाश्यांना पार पाडावे लागत आहे. प्रशासनातर्फे सुमारे ४१ लाखाची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली खरी मात्र ही योजना पूर्ण होऊन ग्रामस्थांची तहान भागणार कधी याची प्रतिक्षा कायम आहे. 
                                                   अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा नदी काठी वसलेले डेब्रामाळ हे गाव अक्कलकुवा पासून 120 km अंतरावर 620 लोकवस्ती असलेले छोटेसे गाव आहे. सातपुडयाच्या पायथ्याशी व नर्मदा नदीच्या काठी वसलेले या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. आजही या भागात बांबू, साग, बेहडा, सोलई, सीताफळे आदीसह विविध वृक्षाचे जतन बऱ्यापैकी आहे. असे असले तरी योग्य उपाययोजना अभावी धरण उशाला असून देखील नागरीकाना पाण्यासाठी जीव धोक्यात घालत 200 फूट खोल विहिरीत उतरून पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या भागातील ग्रामस्थांना
 पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असून वर्षानुवर्षे हेच रडगाणे डेब्रामाळ ग्रामस्थाच्या नशिबी आले आहे. गावात पिण्याचे पाण्याचे स्रोत म्हणून 4 हातपंप व 2 विहिरी आहेत. एप्रिल मे महिन्यात पाणी पातळी खालावूनदरवर्षी भर उन्हाळ्यात जलस्रोत आटतात परिणामी पाणी टँचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो.. गावात असलेल्या 200 फूट विहिरीत जीव धोक्यात टाकत दोन तरुण दोरच्या साहाय्याने विहरित उतरतात, या विहरीत जेमतेम एक झरा असून तो अल्पप्रमाणात पाझरतो. या झऱ्यातुन पांझरणारे पाणी ताटलीत साठवून ते एका हंड्यात भरून वर चढवले जाते, एक हँडा भण्यासाठी अर्धा ते एक तासाचा अवधी लागतो. ही प्रक्रिया सकाळ पासून सुरू होऊन रात्री उशिरा पर्यत सुरू असते. लवकर पाणी मिळावे याकरिता
  ग्रामस्थ दिवसभर विहरिचा अवतीभवती तात्काळत उभे राहतात. दर 4 तासाने आळीपाळीने तरुण विहरित उतरून पाणी काढतात. अनेकवेळा पाय निसडून अपघात घडण्याच्या घटना देखील येथे घडल्या आहेत. शासनाच्या विविध योजना यापूर्वी कागदोपत्री येथे राबविल्या गेल्याचे चित्र असले तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे. गावात यापूर्वी छोटे मोठे मातीचे बंधारे बांधण्यात आले होते. त्यावर मेंटनेस करून त्याच्या फायदा ग्रामस्थाना होण्याकरिता उपाययोजना आखल्या गेल्या पाहिजे होत्या मात्र तसे झालेले दिसत नाही. गावात यापूर्वी जलयुक्त शिवाराचे निवड झाली असली तरी केवळ कृषी विभागाकडूनच जलयुक्त शिवाराचे कामे झाले आहेत, या भागात वनविभागाची जमीन अधिक असून देखील अद्याप पावेतो कामे झालेले नसल्याचे बिकट स्थिती आहे. यापूर्वी सदर गाव जलयुक्त शिवार सह मुख्यमंत्री ग्राम दत्तक
योजनासह व विविध योजनेसाठी या गावांची निवड करण्यात आली होते. मात्र यात राजकीय घडामोडीमुळे डेब्रामाळ व परिसरातील गावे सुटले, मात्र नर्मदा बचाव कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष घातल्याने पुन्हा नियोजन कृती आराखडा तयार करून गावे निवडण्यात आली. सध्या डेब्रामाळ गावकरिता आदिवासी उपाययोनांतर्गत मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत नर्मदा नदीतून पाणी आणण्याबाबत प्रशासन नळ पाणीपुरवठा योजनेकरिता 40 लाख 83 हजाराची योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. वेळोवेळी याबाबत झालेली तक्रारीच्या आढावा घेत नियोजनाच्या अभाव दूर करण्यासाठी खुद्द दस्तखुद जिल्हाधिकारी यांनी या गावाची प्रथमच पाहणी करून याबाबत समस्यां जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या विशेष दौऱ्यात खुप वर्षापासुन गंभीर असलेल्या पाण्याच्या टंचाई वर कायम स्वरूपी मात कशी करता
येईल याकरिता 10 में 2018 ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात सामिल असलेल्या डेबरामाळ ग्राम पंचायतीत फलकाचे अनावरण व समस्यां जाणून जाणून घेण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, मा. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या जिल्हा कार्यवाह, योगिनी खानोलकर, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री विनय गौड़ा, आदींच्या उपस्थित भेट दिली. यावेळी आसुसलेल्या जनतेकडून त्यांचे स्वागत ढोल तश्याने केले. साहेब आले म्हणजे समस्यां सुटणार अशी धारणा ठेवत जणू देवच आपला दारी आल्यागत पारंपरिक ढोल वाजवत जिल्हाधिकाऱ्याचे स्वागत केले. डेबरामाळचे सरपंच , उपसरपंच , होतकरु युवक व ग्रामस्थ महिला पुरुषांसह जाऊन गावातील पाण्याचे सर्व स्त्रोत पाहिले. यावेळी पाणी पातळी उंचावण्यासाठी व पाण्याची योग्य नियोजनासाठी आम्ही काहीही करण्यास तयार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर पाण्याचे कमी झालेले स्त्रोत परत कसे मिळवता येतील या वर जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. आजच्या स्थितीला प्रशासन डेब्रामाळ या अतिदुर्गम भागात पोहचले असले तरी पाणी कधी पोहचणार हा प्रश्न कायम असून, तात्पुरता स्वरूपात उपाययोजना न होता कायमस्वरूपी व्हावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

 प्रतिक्रिया* 
➤➤➤ नळ पाणीपुरवठा योजनेला मंजूरी मात्र अंमलबजावणी तात्काळ होणे अपेक्षित डेब्रामाळ गावासाठी विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यात आली असून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. परिसरातील जलयुक्त शिवार कामांची पाहणी केली असून कामे प्रगतीपथावर आहेत. टंचाई निवारणासाठी उपाययोजना सुरु असून लवकरच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. . 
- डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी जिल्हाधिकारी, नंदुरबार.


*प्रतिक्रिया* 
➤➤➤ या अतिदुर्गम भागात पलासखोब्रा, कंजाला, वेलखेड़ी आणि सांबर हे गावे असून डेब्रामाळ या गावाट सर्वात जास्त पाणी टँचाई आहे. डेब्रामाळ गाव हे सातपुड्याच्या कुशीतले गाव असून जवळच नर्मदा नदी आहे. हे गाव डोंगराळ भागात असल्याने प्रशासन येथे पोहचण्यास कमी पडत आहे. शासनाचे योग्य ते नियोजन नसल्यांने या भागात पाणी साठवण होत नसून दरवर्षी एप्रिल महिन्यातच पाणी पातळी खालावते परिणामी पाण्याचे स्रोत आटतात्. ग्रामस्थांना रोजनदारी बुडवत विहिरीत उतरून जीव घोक्यात घालत पाणी काढावे लागते.
 *सखाराम वळवी* सामाजिक कार्यकर्ते डेब्रामाळ 

*प्रतिक्रिया*
➤➤➤ डेब्रामाळ हे अक्कलकुवा तालुक्यातील शेवटच्या गावांपैकी एक असून या भागत आजही प्रशासनाच्या योजना पूर्णतः पोहचत नाही, त्या पोहचण्यास दिरंगाई होते. भौतिक सुविधा नसल्याने अधिकारी देखील येथे येण्यास धजावत नाहीत. काही योजना या केवळ कागदावरच रंगविला जातात. निसर्गाची साथ लाभली असताना केवळ उपाययोजनेच्या अभावामुळे पाणी टँचाईला समोर जावे लागत आहे.
        
         *पोपटी वळवी* 
      *ग्रामस्थ डेब्रामाळ* 

*प्रतिक्रिया*
➤➤➤ डेबरामाळ ग्राम पंचायत मुखमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तनाचा एक भाग झाल्याबददल खुप आंनद होत आहे.अतिदुर्गम असलेल्या व साध्या साध्या गोष्टीपासून वंचित असलेल्या आदिवासी बाँधवाना या अभियानाच्या निमित्ताने त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यात आमचा वाटा असेल हे आमचे भाग्य समजतो.                                 *योगिनी खानविलकर* 
मा. मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या जिल्हा कार्यवाह, 












शनिवार, १२ मे, २०१८

गटविकास अधिकाऱ्यांनी दिली भेट : हातपंपांची केली तातडीने दुरूस्ती

तळोदा तालुक्यातील केलवापाणी ग्रामथसंना
पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. येथील अबालवृध्दांना डोंगरदऱ्या पार करुन पाणी आणावे लागत आहे. याबाबत शुक्रवारच्या दै.'पुण्यनगरी' मधुन येथील ग्रामस्थांची व्यथा सचित्र मांडण्यात आली. सदर वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून चार दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहे. संबधित अधिकाऱ्यांनी खर्डी ग्रामपंचायतीला भेट देऊन नादुरुस्त हातपंप तातडीने दुरुस्त करावा तसेच केवलापाणी येथील समस्या सोडविण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत.. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यात तळोदा तालुक्यातील एकही गाव-पाड्याचा सामावेश केलेले नाही. मात्र तालुक्यात काही गावांमध्ये पाणीटंचाईची भयानक परिस्थिती आहे. गावातील हातपंप दुरुस्त करून तातडीने पाण्याच्या प्रश्न मार्गी लावावा, दोन वर्षांपासून मंजूर असलेल्या विहीरीचे कामे तातडीने करावीत तसेच पेसा व चौदाव्या वित्त आयोगाचा निधीतून लक्कडकोट व खर्डी बु. या ठिकाणी सहा हातपंप नादुरुस्त असल्याने ते तातडीने दुरुस्त करावेत. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी एस.बी.खर्डे यांना दिला होता. येथील नागरीक जीव धोक्यात घालुन, रोजगार बुडवून पाणी
 आणत असल्याचे विदारक स्थितीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथील नागरीकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे. येथील ग्रामस्थांची व्यथा दै.'पुण्यनगरी' सचित्र मांडताच प्रशासन खडबडून जागे झाले. बातमीची दखल घेत नवनियुक्त गटविकास अधिकारी व त्यांच्या पथकाने खर्डी बु. ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लक्कडकोट, केलवापाणी याठिकाणी भेटी देऊन गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केलवापाणी येथे तयार करण्यात आलेल्या विहीरीवर पेसा अंतर्गत पंपिंग मशीन व पाईप लाईन करून चार दिवासात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. लक्कडकोट येथील नादुरुस्त असलेल्या सात हातपंपाची पाहणी करून तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी बांधकाम उपअभियंता गावडे, पाणी पुरवठा अभियंता राहुल गिरासे, खर्डी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक पावरा, महिला व बालकल्याणच्या अधिकारी उपस्थित होते..

➤➤➤ खर्डी बु.ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या. गावात सात हातपंप नादुरुस्त आहेत. ते तातडीने दुरुस्त केले. केलवापाणी येथील विहीरितून पाणी पुढे नेण्यासाठी पेसा अंतर्गत निधीतून पंपिंग मशीन बसवण्याचा प्रस्ताव सादर केला असून येत्या चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल.. -
                एस.बी.खर्डे, गटविकास अधिकारी, तळोदा. 




शुक्रवार, ११ मे, २०१८

पाण्यासाठी 'मरणयातना' आमच्या नशिबी का?

केलवापाणीवासीयांचा प्रशासनाला सवाल ; टंचाई आराखड्यात गावासाठी उपाययोजनांचा उल्लेखही नाही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यात तळोदा तालुक्यात एकही गावपाड्यात टंचाई नसल्याचे नमूद केले आहे. मात्र मैलोन्मैल पाण्यासाठी रानोवनी भटकंती करुन डोंगर उतारावरुन जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी खर्डी बु.ग्रामपंचायीतंर्गत येणाऱ्या लक्कडकोट, खर्डी बु., केलवापाणी येथील रहिवाश्यांना कसरत करावी लागत आहे. डोंगर टेकड्यांवरुन पाय निसटून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. पाण्याची तहान भागविण्यासाठी मिळेल त्याठिकाणाहून शुद्ध-अशुद्ध पाण्याने येथील रहिवासी गुजराण करीत असल्याचे दाहक वास्तव मात्र प्रशासनाच्या नजरेआड गेल्याने असे जगणे आमच्या नशिबी का? असा सवाल येथील रहिवाश्यांना उपस्थित होत आहे. .  ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखड्यात तळोदा 

तालुक्यात एकही गावपाड्यात टंचाई  नसल्याचे नमूद केले आहे. मात्र मैलोन्मैल पाण्यासाठी रानोवनी भटकंती करुन डोंगर उतारावरुन जीव धोक्यात घालून हंडाभर पाण्यासाठी खर्डी बु.ग्रामपंचायीतंर्गत येणाऱ्या लक्कडकोट, खर्डी बु., केलवापाणी येथील रहिवाश्यांना कसरत करावी लागत आहे. डोंगर टेकड्यांवरुन पाय निसटून अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. पाण्याची तहान भागविण्यासाठी मिळेल त्याठिकाणाहून शुद्ध-अशुद्ध पाण्याने येथील रहिवासी गुजराण करीत असल्याचे दाहक वास्तव मात्र प्रशासनाच्या नजरेआड गेल्याने असे जगणे आमच्या नशिबी का? असा सवाल येथील रहिवाश्यांना उपस्थित होत आहे. .

  खर्डी बुद्रुक येथील दिलशा बिलाड्या वळवी यांच्या घराशेजारील  हातपंप पाच महिन्यापासून नादुरुस्त . 
  छगन माकत्या वळवी यांच्या घराशेजारील हातपंप ४ महिन्यापासून नादुरुस्त . 
  लक्कडकोट येथील जालमसिंग हुप्या पाडवी यांच्या घराशेजारील हातपंप  २ महिन्यापासून नादुरुस्त .
  मांग्या हुप्या वळवी मागील १५ दिवसापासून हातपंप नादुरुस्त. *  
  सुरत्या विऱ्या वळवी याच्या घराशेजारील हातपंप मागील ४ महिन्यापासून नादुरुस्त.  
 बाज्या भटया वळवी याच्या घराशेजारील हातपंप मागील महिन्या भरापासून नादुरुस्त.

तळोदा तालुक्यातील खर्डी बु. ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या लक्कडकोट, खर्डी बु, केवलापाणी या ठिकाणी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून डोंगर उतरून नदीतून पाणी आणावे लागत आहे. पाणी पिण्याजोगे नसल्याने विविध आजाराने सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे पेसा निधी, १४ वा वित्त आयोगाच्या निधी जातो कोठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत संभ्रमावस्था असून लक्कडकोट व खर्डी बु. या ठिकाणी सहा हातपंप नादुरुस्त आहेत. ते तातडीने दुरुस्त करावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी एस.बी.खर्डे यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. तळोदा तालुक्यातील खर्डी बुद्रुक, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लक्कडकोट,
 खर्डी बु. व केवलापाणी या तीन गावांना पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी ३ ते ४ कि.मी. डोंगर उतरून नदीतून पाणी आणावे लागत आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना रोजंदारी बुडवत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.चिमुरडे भर ऊन्हात पाण्याचा शोध घेत आहेत. तळोदा शिवाराच्या काही भागातील पाणी पातळी खालावली आहे. या भागातील ग्रामस्थांनी वेळोवेळी हातपंप दुरुस्तीसाठी निवेदने दिले असताना प्रशासनाने उपाययोजना न केल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. यावर उपाय म्हणून केलवापाणी ग्रामस्थांनी श्रमदान करत १२ ते १५ फूट विहीर खोदून पाण्याची सोय केली होती. मात्र पाण्याची पातळी खालावल्याने या विहीरीचे पाणी देखील आटत आले आहे. पाण्याच्या शोधत डोंगर उतरून नदीतुन पाणी आणावे लागत आहे. नदीत पाणी कमी असल्याने झरे निर्माण करून पाणी भरले जात आहे. एका हंडा भरण्यासाठी तास्नतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. मिळालेच पाणी पिण्याजोगे नसल्याने विविध आजार उद्भवत आहेत. यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावातील हातपंप व पाण्याचे स्रोत आटण्याच्या स्थितीत आहेत. मागील दोन महिन्यापासून गावातील हातपंप नादुरुस्त आहे. याबाबत वेळोवेळो तक्रार केली आहे. याबाबत सरपंच ग्रामसेवक यांना विचारणा केली तर ते हातपंप दुरुस्ती वाहन आल्याशिवाय होणार नसल्याचे सांगत दुरुस्तीकरिता हजार रुपयांची मागणी करीत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात विहिरी मंजूर होऊन दोन वर्षे लोटली तरी देखील कामाला सुरुवात झाली नसल्याने प्रशासनाच्या उदासिनतेमुळे ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. लक्कडकोट व खर्डी बु याठिकाणी मागील ५ ते ६ महिन्यापासून ६ हातपंप बंद आहेत. ते तातडीने दुरुस्त करावे. तसेच चौदा वित्त आयोग, पेसा अंतर्गत येणारा निधीचा खर्च कुठे व कसा केला जातो याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण केले असून याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे. निवेदनावर राजेंद्र पाडवी, काळूसिंग वळवी, मानसिंग पाडवी, दिलवरसिंग वळवी, बिलाड्या वळवी, तुळशीराम पाडवी, सिंग्या नाईक, सुरपसिंग वळवी, मगन नाईक, नूरजी पाडवी, धनसिंग वळवी, कालूसिंग नाईक, रमेश पाडवी आदींसह ४० ते ४५ रहिवाश्यांच्या सह्या आहेत.
              राजेंद्र पाडवी  
सामाजिक कार्यकर्ते लक्कडको

                                              *प्रतिक्रिया* 

 खर्डी बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या केवलापाणी येथे भीषण टँचाई निर्माण झाली असून ग्रामस्थरोजनदारी बुडवत पाण्याच्या शोध घेत आहेत. डोंगर उतरून महिला हंड्यावर पाणी आणत आहे. नदीतील झरे आटल्याने एक हंडा भरण्यासाठी 10 मी द्यावे लागतात. याभागात 2 वर्षांपूर्वी विहिरी मंजूर झाली असून अद्याप पावेतो काम झालेले नाही. प्रशासनाने दुर्लक्षकेल्याने ठिकठिकाणी हातपंप नादुरुस्त आहेत.

                                                                                                  
                                                                               *प्रतिक्रिया*
भांगडी जेगला वळवी
               
गावात पाण्याची सोय नसल्याने पाण्यासाठी डोंगर उतरावे लागते. झऱ्यातुने कचरा साफ करत पाणी काढावे लागते. पाणी भरण्यासाठी बराचवेळ लागत असल्याने रोजनदारी बुडते. अनेकवेळा डोंगर चढून जाताना पाय घसरून खाली पडतो, लहान मोठे चिमुरड्याना घेऊन जीव धोक्यात टाकत पाणी आणावे लागते.. एवढे करूनही स्वच्छ पाणी मिळत नाही. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.. 











मंगळवार, ८ मे, २०१८

तळोदा तालुक्यातील अनेक भागात भर उन्हाळ्यात पाण्याची भूजल पातळी प्रचंड खालावल्याने कूपनलिका बंद पडत आहेत. पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळ्याला अद्याप महिना-दीड महिन्याचा अवकाश असल्याने पिके वाचवायची कशी? अशा विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. शासकीय पातळीवर लोकसहभागातून राबविल्या जाणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार सारख्या योजना राबवून पाणी पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत मात्र कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.. तळोदा तालुका पाण्याच्या बाबतीत सुखी तालुका म्हटला जात होता. मात्र, मागील पाच वर्षांपासून सिंचन योजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे व पीक पेरा नियोजन नसल्याने अती पाण्याचा
उपसा करणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढत गेल्याने तालुक्यातील अनेक भागात ३० मीटरवर असलेली पाणी पातळी आता ६० मीटरवर गेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कुपनलिकांमधील १०० फुटांवर असलेल्या मोटारी २०० फुटांवर उतरविल्या आहेत. तालुक्यात २०० फुटांवर जमिनीत खडक लागत असल्याने त्याच्या खाली बोअर होत नाही. फेब्रुवारी महिन्यातच दलेलपूर, कढेल, खेडले, तऱ्हावद या भागातील पाणी पातळी खालाविली. त्यानंतर चिनोदा, रांझणी, मोरवड, तळवे, खरवड, पिंपरपाडा, तलावडी, सिलिंगपूर, बंधारा, सावरपाडा, राणीपूर, रोझवा, गोपाळपूर, पाडळपूर, सलसाडी, रेवानगर, सरदार नगर, रोझवा पुनर्वसन, भंवर, गणेश बुधावल यासह तळोदा शिवाराचा काही भागातील पाणी पातळी खालावली आहे. तालुक्यात सर्वात जास्त उसाची लागवड असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या उपसा भूगर्भातून केला जातो. त्या प्रमाणात पाण्याचा निचरा जमिनीत होत नसल्याने पाणी पातळी खाली जात असून मागील पाच वर्षांपासून दरवर्षी हा प्रश्न तालुक्याला भेडसावत आहे. यावर उपाययोजना मात्र होत नसल्याने दिवसेंदिवस पाणी प्रश्न बिकट होत आहे. यावर गावगावात नियोजन होऊन उपलब्ध पाण्याच्या साठ्याप्रमाणे पिकांचा पेरा व्हायला हवा. परंतु याबाबत शेतकरी सुद्धा नियोजन करीत नसून अधिक पैसा देणारे उसासारखे पिके घेत असल्याने व रात्रदिवस पाण्याच्या उपसा होत असल्याने पाणी पातळी खालावत आहे. शासकीय पातळीवर सुद्धा यावर उपाययोजना केली जात नसून गाळमुक्त शिवार गाळमुक्त धरण योजना राबवून गावातील लहान-मोठ्या तलावातील व शासकीय लघुसिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जातेय. याची दखल जलसंपदा विभागाने मात्र कधीच घेतली नाही.. जलयुक्त शिवार सारख्या योजनाची व्याप्ती वाढविली पाहिजे मागच्या वर्षी तालुक्यात आठ गावात ही योजना राबविली गेली आहे. या वर्षी १० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे मागच्या वर्षीच्या आठ गांवात या योजनेची फलश्रुती काय ते या वर्षीच्या पावसाळ्यानंतरच कळेल. आज पाणी प्रश्न बिकट झाला असून हातात असलेली पिके वाचवायची कशी? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावत आहे..

सोमवार, ७ मे, २०१८

उंट सवारीतून मिळतोय रोजगार

नंदुरबार व सारंगखेड्यातील युवकांची चरितार्थासाठीची धडपड

शिक्षण करूनही नौकरी मिळेल याची कोणतीही शाश्वती नाही. बेरोजगार राहण्यापेक्षा काहीतरी उद्योग करून चारीतार्थ चालविण्यासाठी  अनेकांची धडपड असते.त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार व सारंगखेडा येथील काही युवकांनी राजस्थानमधील पावागड येथून काही उंटाची खरेदी करत स्वतःसाठी रोजगाराचे साधन उपलब्ध केले. उंटाची सावरीचा आनंद देत दररोज ४०० टे ५००  रुपयांची मिळकत या तरुणांना मिळत आहे. तळोदा परिसरात हे चित्र पहावयास मिळत आहे.
                                 नंदुरबार व सारंगखेडा येथील काही तरुणांनी ३ ते ४ उंट राजस्थान व पावागड येथून विकत आणले असून या उंटावर बसवून बालकांना उंटाची सैर करवत आहेत. उंट पालन करणारे व्यावसायिक मुलांच्या शाळेच्या सुट्यांचा अंदाज घेत शनिवार, रविवार दाखल होत आहेत. पूर्वी ग्रामीण भागात कधीतरी उंट, हत्ती, असे दुर्मिळ प्राणी बघायला मिळत होते. मात्र आता शहरासह खेडे गावात देखील वारंवार असे प्राणी दृष्टीस पडत आहेत. उंटाला राजस्थानमधील जहाज ओळखले जाते. पूर्वी बिकानेर, राजस्थान, ज्योतपुर येथील उंट कधीतरी यायचे मात्र आता जिल्ह्यातीलच युवकांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी उंटांची खरेदी करुन अनेकांना सवारीचा आनंद देत स्वत:साठी रोजगाराचे साधन उपलब्ध करुन घेतले आहे. . सारंगखेड्यातील युवकांची चरितार्थासाठीची धडपड नंदुरबार येथील विकास भीमराव चव्हाण, अनिल सुका पाथरे, कैलास विकास चव्हाण आदींसह काही तरुणांनी उंटाचे नर-मादीची जोडी ६० हजारामध्ये विकत आणली आहे. आज हे तरुण गावोगावी
जाऊन प्रत्येक गाव पिंजून पोटाची खळगी भरण्यासाठी बच्चे कंपनी, लहान-मोठया मुलांना उंटाची सफर घडवून दोन पैसे मिळविताना दिसत आहे. पालक देखील हौशीने आपल्या मुलांना, नातवाना उंटांवर बसविण्याच्या आनंद घेत आहे. उंटावर एकावेळी दोन ते तीन मुलांना बसवून काही अंतरापावेतो सफर घडवून आणत आहे. एका पालकांकडून उंटाच्या मालकाला १० रु. मिळत आहेत. दिवसभरातून हे तरुण ३०० ते ४० रुपये कमवत आहेत. उंटांना दिवसभरात चारा पाण्याची सोय करीत हाताला चांगला रोजगार मिळत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ठिकठिकाणी काही शेतकरी या उंटांना मोफत चारा देतात. बाळ-गोपालांना या उंटावर बसण्याच्या वेगळाच आनंद असतो. उंट पाहण्यासाठी लहान बालके मोठया प्रमाणात गर्दी करीत असून उंटामागे मागे फिरत मनोरंजन करीत आहेत. मुलांची उंटावर  बसण्याची इच्छा पूर्ण होते. तर यातून तरुणांना यातून रोजगार ही मिळतो आहे..

    विकास भिमराव चव्हाण 
        नंदुरबार साक्री रोड
                  

                       
 प्रतिक्रिया
   ➤ शिक्षण करून देखील नौकरी मिळत नाही, याकरिता मागील वर्षी पावगड येथून 60 हजार किमतीचे नर मादी असे 2 उंट विकत आणले आहेत. बालकांना उंटाचे आकर्षण मोठ्या प्रमाणात असते या व्यवसायामुळे चांगला रोजगार प्रात होत आहे. पुढे उंटाची संख्या वाढवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.. 








रविवार, ६ मे, २०१८

आवाजवी खर्च व जुन्या प्रथांना फाटा देत आदर्श विवाह...

तालुक्यातील मोदलपाडा येथील रिता व शरद या नवदापत्याने पारंपरिक प्रथा व विवाहाला लागणारा अवाजावी खर्चला फाटा देत, एका दिवसात लग्न लावून आलेल्या वऱ्हाडीचा वेळ वाचवत नव्या आयुष्याची सुरुवात आदर्शरित्या केली. याबाबत सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
                           लग्न म्हटलं कि बँड, बाजा, बाराती असे चित्र पाहण्याची सवय आपल्याला झाली आहे. पण या संपूर्ण प्रथा आणि परंपरेला फाटा देण्याचे काम तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथील रिता व शरद यांनी केला आहे. तळोदा तालुक्यातील मोदलपाडा येथील भानू सोमला वळवी यांची जेष्ठ सुकन्या तर कै. लालसिंग नूऱ्या वळवी माजी जि. प.सभापती यांची पुतणी रिता हिचा विवाह अक्कलकुवा तालुक्यातील बाभलपूर येथील रोहिदास टेडया पाडवी यांचा सुपुत्र शरद याच्याशी जुडला. NIM नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झालेल्या रिताने राज्यात वेळोवेळी पडत असलेला दुष्काळ, शेतकऱ्यांची होत असलेली आत्महत्या, स्थलांतर सह शिक्षण बेरोजगारी आदी विविध समस्यांनी ग्रासलेला आदिवासी समाजातील विवाहात अवाजवी खर्च होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे विवाह या शुभ प्रसंगी वाद उफाळून आल्याचे अनेक प्रकार घडतात. यावर आळा बसावा याकरिता विवाहात अवाजवी खर्च टाळत पारंपरिक व साध्या पद्धतीने विवाह करण्याच्या निर्णय तिने घेतला. तिने याबाबत तिचे वडील भामु सोमला वळवी यांना बोलून दाखवले, यावर वडिलांनी शिका मोर्तब करत त्यांचे व्हायी रोहिदास वळवी व जावई शरद यांना विचारणा केली. त्यांनी देखील याबाबत सकारात्मकता दाखवल्याने दोघे कुटुंबियांकडून लग्नात अवाजवी खर्च न करण्याच्या निर्णय घेतला. विवाहात पारंपरिक वाद्य वाजवून तसेच उन्हात आलेल्या वऱ्हाडी मंडळीं, तान्हुनले बालकांचे हाल होऊ नये हा हेतू ठेवत त्यांनी विवाह एका
दिवसात आटोपण्याचे ठरवले. 30 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 10 दरम्यान हळद 11 ते 2 दरम्यान आहेर व 4 ते 6 दरम्यान लग्न अश्या पद्धतीने एका दिवसात विवाह पार पडला. या विवाहास खासदार हिना गावित, आमदार विजय गावित, रमेश गावित तंटामुक्त अध्यक्ष, अमरसिंग वळवी, ग्रा.सदस्य जगदीश वळवी उपसरपंच, सतिराम वळवी यासह मान्यवरणी उपस्थिती लावून वधू वरास आशीर्वाद दिले तर माजी मंत्री पद्माकरजी वळवी, काँग्रेस तालुका अध्यक्ष रोहिदास पाडवी, पो.पाटील विलास पाडवी, दक्षता समिती सदस्य सरपंच बळीराम पाडवी, यांनी या नवंदाम्पत्याचे सत्कार करून त्याच्या या कार्याचे कौतुक केले. 2 दिवस लागणारी हळद, त्यात येणाऱ्या मंडळींचे नियोजन, विविध खाद्य पदार्थ, बँड बाजा, डी.जे. घोडा बग्गी, फोटो शूटिंग,आहेर, मंडप, स्टेज, वाजंत्री, संगीत सजावट आदींसह विवाहास होणाऱ्या खर्चाला फाटा देत अगदी साधेपणाने आदिवसी पारंपरिक ढोल वाद्य लावून, जुन्या रूढी प्रथाना बगल देत, रिता व शरद यांचा विवाह सोहळा पार पडला. विवाहात लाखोंची उधळपट्टी करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा विवाह ठराणार असून लग्नात अवाजावी खर्च करणे टाळत समाजपयोगी कार्य करा असा सल्लाच रिता व शरदने या विवाहातून दिला आहे.......

 प्रतिक्रिया 
रिता व शरदने दाखवले धाडस, तसेच लग्नात आर्थिक उधळण करण्याऐवजी पारंपरिक पद्धतीने केलेला एकदिवसीय विवाह सोहळा हा येत्या काळात आदिवासी समाजात परिवर्तन घडविणारा असेल.. 
    *माजी मंत्री पद्माकरजी वळवी* 

 विवाह समारंभाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून तो सर्वसामान्यास पेलावला जात नाही. बँड, डी. जे. आदीवर आवाजावी खर्च होतो. परिणामी अनेकवाडा वाद होऊन आनंदादायी सोहळा हा सुखमय होतो. तसे होऊ नये याकरिता नवीन पायंडाची सुरवात आम्ही करण्याचा प्रयत्न केला... 
          भामु वळवी वधू पिता