Breking News

सोमवार, २६ मार्च, २०१८

बेढब आकाराचे गतिरोधक वाहनधारकांसाठी जीवघेणे

 बेढब आकार, गरजेपेक्षा जास्त संख्या, उंची व रुंदी प्रमाणात नाही, निकषाप्रमाणे एकही गतिरोधक बनविण्यात आलेले नसल्याने तळोदा शहरात गतिरोधक वाहनधारकांसाठी जीवघेणे बनले आहेत. ओबड-धोबड आकाराच्या गतिरोधकांमुळे अनेकदा वाहनधारकांना दे धक्का करत वाहन पुढे न्यावे लागत असल्याने डोकेदुखी ठरत आहेत..
तळोदा शहरात कॉलनी परिसरांमध्ये तयार करण्यात आलेले गतिरोधक सर्व निकष धाब्यावर बसवून तयार करण्यात आले आहेत. शहरातील काही मुख्य रस्त्यांवर देखील अशाच प्रकारचे गतिरोधक दिसून येत आहेत. त्यामुळे ओबड-धोबड गतिरोधक ओलांडतांना वाहनधारकांना कसतर करावी लागते. गतिरोधकांच्या गरजेपेक्षा जास्त उंचीमुळे वाहने बंद पडणे, ग्राऊंड लेव्हल कमी असल्यास वाहन गतिरोधकावर घसरणे यासारखे प्रकार सातत्याने घडत आहेत. गतिरोधक ओलांडतांना किरकोळ अपघातही घडतात. गतिरोधकांची गरजेपेक्षा जास्त संख्या असल्याने
अनेकजण पर्यायी रस्त्याने जाणे पसंत करतात. शहरातील शंभर ते दोनशे मीटर अंतराच्या रस्त्यावर देखील तीन ते चार गतिरोधक असल्याचे चित्र आहे. गतिरोधक असणाऱ्या ठिकाणी दुचाकी जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी काही ठिकाणी गतिरोधक तोडल्याचेही दिसून येतात. नविन रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची गुणवत्ता तपासणे, त्यावर करण्यात आलेल्या गतिरोधक निकषाप्रमाणे बनविण्यात आले आहेत किंवा नाही याची तपासणी करणे पालिकेचे काम असतांना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे मात्र वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ओबड-धोबड गतिरोधकांचे सर्वेक्षण करुन निकषाप्रमाणे गतिरोधक टाकणे गरजेचे झाले आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर पांढरेपट्टे व दिशादर्शक फलक नसल्याने अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे रस्त्यावर पांढरेपट्टे मारणेही अपेक्षित आहे. गतिरोधक उभारतांना गतिरोधकाची उंची निकषाप्रमाणे २.५ ते १० से.मी. केल्यास वाहनधारक गतिरोधकाकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवतात, असे पालिका कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे..








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा