प्रेमपत्र
प्रिय
खरं तर मला हा अधिकार आहे का नाही, हे ठरायचे आहे. तरी मी तुला प्रिय म्हणतो. कारण यानंतर तो कदाचित मला अधिकार मिळू शकेल, किंवा मिळणारही नाही. म्हणूनच प्रिय......
मी यापूर्वी कधीच असे पत्र लिहिलेले नाही. कदाचित इतक्यांदा मला प्रेम झाले नसेल, किंवा तुला आता पत्र पाठवण्याची हिच योग्य वेळ असेल म्हणून. म्हणूनच मी तुला हे पत्र लिहितोय.
गेल्या चार वर्षांपासून आपण एकमेकांना ओळखतो. आपल्यात चांगली मैत्री आहे. नकळत दररोज एकमेकांना आपण भेटतो, आणि एसएमएस, नेट चॅटींगही करतो. जोपर्यंत आपण एकत्र असतो, तोपर्यंत एक वेगळाच आनंद माझ्या मनाला स्पर्श करत असतो. तो मी आता पत्रांतून मांडू आणि सांगू शकत नाही, हेही तितकेच खरे आहे.
पण आज अचानक तू, नाही मी, नाहीच मुळी, पावसाने तुझी आठवण करून दिली. मी खिडकी बाहेर डोकं काढलं, मला एक जोडपं जाताना दिसलं, आणि मला असा भास झाला, की, ते दोघे आपणच आहोत. आपलंच प्रेम या पावसाच्या टपोऱ्या थेंबांमध्ये एकमेकात गुंतत, एकमेकांना आधार देत, आणि एकमेकांच्या भावनांमध्ये चिंब भिजत जातेय. मला तुझी इतकी आठवण आली की चक्क, ते पावसाचे थेंब माझ्या पापण्यांना ओलावून गेले.
मन जड झालं, आणि एक विचित्र अस्वस्थता मला जाणवू लागली, वाटलं, आता सारी बंधनं तोडावीत, चटकन फोन उचलून तुला फोन करून मनातील साऱ्या भावना व्यक्त कराव्यात आणि सांगून टाकावं...... मला तू खूप आवडतेस.... इतक्याच वीज कडाडली. शुद्ध आली. वाटलं हे सारं मी केल्यावर जर तू नाही म्हटलंस तर....? तर मी ते एक्सेप्ट करू शकेल?
तुला माझ्या बद्दल काय वाटेल? तू म्हणशील यासाठी तू माझ्याशी मैत्री केलीस? यासाठी तू माझी इतकी काळजी घ्यायचास?
या प्रश्नांनी माझे दोन दिवस वाया गेले. आणि मग ठरवलं, काही झालं तरी तुला जे खरं आहे, ते सारे सांगायचे. अगदी सारे काही.......
एसएमएस पाठवण्याचे धाडस मी केले नाही, कारण त्यातून समज कमी परंतु गैरसमज जास्त होतात. आपण दोघांनीही ते अनुभवले आहे. नेटवरची चॅटींगही महाग आहे. बाबांना हिशोब द्यावा लागतो त्यात सारखे इंटरनेटवर पैसे खर्च केल्याचे दिसले तर बाबही रागावतात. मग सर्वात चांगले साधन म्हणजे पत्र. आणि म्हणूनच आज मी तुला या पत्रातून विचारतो आहे.
माझ्याशी लग्न करशील? नाही आता लगेच नाही. मी आता शिकतोय नं? मला नोकरी लागल्यानंतर आपण लग्न करूयात. तुला हे सारे वाचून जरा विचित्र वाटेल परंतु प्लीज मला समजून घे. हे पत्र वाचल्यानंतर तुला जर राग आला तर प्लीज.. प्लीज मला तू सांग. हवं तर शिव्या दे, माझ्यावर रागव, पण अबोला धरू नकोस..
तुझा नकार एकवेळ मोठ्या मुश्किलीने मी पचवू शकेन गं, पण तुझा अबोला, तो नाही माझ्याच्यानं सहन होणार........
तुझ्या उत्तराची वाट पाहतोय.............