* वैभवशाली, समृध्द तळोदे शहर! *
उत्तरेकडे विस्तीर्ण सातपुडा पर्वताच्या रांगा तर दक्षिणेकडे तापी नदिचे विस्तारलेले पात्र यात वसलेले तळोदे हे शहर. तळोदे शहराला स्वतःचा सांस्कृतीक, सामाजिक असा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे तळोदे, पहेलवानकीने गाजणारे तळोदे अशी तळोद्याची पहेचान आहे. क्रीडा, कला, शिक्षण व राजकीय क्षेत्रात तळोद्याचा नाव लौकीक आहे. तळोदा तालुक्यात राहणार्या लोकांना तळोदेकर म्हणून ओळखतात, तालुक्यात आदिवासी बांधवांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. सुरतेची लूट केल्यानंतर शिवछत्रपतींनी तापी नदी किनारी मुक्काम केला होता. ज्या ठिकाणी त्यांचा तळ होता त्या ठिकाणाला तळोदे असे म्हणतात. जहागीरदार बारगळांची गढी तळोद्यात बारगळांची गढी विशेष प्रसिध्द आहे. सन १६६२ मध्ये जहागिरदार भोजराज बारगळ यांनी गढीचे बांधकाम केले. त्यासाठी सात ठिकाणाहुन माती आणण्यात आली. सलग पाच वर्षे बांधकाम सुरु होते. सहा एकर जागेत बारगळांची गढी वसलेली आहे. गढीचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. त्यावरील कोरीव काम अप्रतिम असे आहे. आज ही गढी शेकडो वर्षानंतर ताठ मानेने उभी आहे.
श्री कालिका मातेचा प्रसिध्द यात्रोत्सव
तळोदे शहराच्या पश्चिमेस खर्डी नदिच्या किनार्यावर कालिका मातेचे मंदिर आहे. मनोकामना व नवस पुर्ण करणारी मातेचे मंदिर म्हणून ओळखले जाते. अक्षय तृतियेला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेत हजारो भाविक येतात.
यात्रेत बैल गाडी, संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात.
दशावताराची समृध्द परंपरा
सुमारे दिडशे वर्षांपासून भवानी मातेच्या दशावताराची समृध्द परंपरा शहराला लाभली आहे. या उत्सवाची सुरुवात कार्तिकी एकादशी पासून सुरु होते. यात राम, हनुमान, श्रीगणेश, देवी, देवतांचे मुखवटे घालून उत्सव केला जातो. या उत्सवाला पाहण्यासाठी दुरदुरहून भाविक येतात.
अस्तंबा ऋषिची प्रसिध्द यात्रा
खान्देशातील सर्वात जुनी नगरपालिका
खान्देशातील सर्वात जुनी नगरपालिका तळोदा न.पा.ला मानले जाते.
या पालिकेची स्थापना सन १८६७ साली झाली. त्यावेळी पालिकेचा कारभार एकाच खोलित चालत होता. आता मोठा विस्तार झाला आहे. तळोदा पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष गोविंद दिनूराम राठोड हे होते. आतापर्यंत २३ नगराध्यक्ष झालेले आहेत. भरत बबनराव माळी ५ वेळा, धजा चुनिलाल माळी व गुलाल बुलाखी माळी यांनी २ वेळा नगराध्यक्ष पद भुषविले आहे. विद्यमान नगराध्यक्षा सौ. योजनाताई भरत माळी या आहेत.
रावलापाणीचा प्रेरणादायी स्वातंत्र्य संग्राम
संतश्री गुलाम महाराज यांच्या नेतृत्वाखाली सातपुड्यातील आदिवासी बांधव स्वातंत्र्यपुर्व काळात मोठ्याप्रमाणात जागृत झाला होता. १९४२ चा चलेजाव आंदोलनापुर्वी संत गुलाम महाराजांनी या परिसरात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली होती. त्यातुनच आदिवासी बांधव स्वातंत्र्यासाठी संघटीत होवू लागला. २ मार्च १९४३ रोजी तळोदा तालुक्यातील रावलापाणी परिसरातील निझरा नाल्यात इंग्रजानी आदिवासी बांधवांवर बेछूट गोळीबार केला. त्यात १५ आदिवासी बांधव शहिद झाले. यात ५ बालकांचा समावेश होता. तर २८ जण जखमी झाले होते. इंग्रजानी केलेल्या गोळीबाराच्या खुणा आजही त्या जंगलात आढळतात. आदिवासी स्वातंत्र्यविरांनी केलेले हे बलिदान प्रेरणादायी आहे.
आदिवासी बांधवांचा होलिकोत्सव
आदिवासी बांधवांचा होलिकोत्सव विशेष प्रसिध्द आहे. या उत्सवात आदिवासी बांधवांकडून केले जाणारे दिंडल नृत्य सर्वांना परिचीत आहे. होळी हा सण आदिवासी बांधवांसाठी महत्वाचा आहे. यानिमित्त विविध वेषभुशा करणे, उपवास, पुजा-अर्चा केले जातात.
शब्दांकन- श्री.सुधाकर मराठे
उपशिक्षक