Breking News

सण/उत्सव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सण/उत्सव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २९ मार्च, २०१६

“होळी म्हणजेस आदिवासी आणि आदिवासी म्हणजेस होळी”

“ओली आवे बारा मोयना ओली या,
ओली आवे खोकलू वोलती ओली या…!”
 अशी होळीविषयी बोलीगीते सातपुड्यातल्या गावपाड्यात गायली जाऊ लागली आहेत. होळी म्हणताच आबाल-वृद्धापासुन ते पोरा-सोरापर्यत सर्व आपापल्या परिने होळीमातेची आराधना करण्यास सज्ज होतात. आदिवासींनी निसर्ग संस्कृतीची समरस होऊन साजरा केलेला होळी हा सण त्यांच्या सांस्कृतिक, पारंपारिक जीवनमुल्याची असलेली नाळ घट्ट करणारा अफलातून असाच सण आहे. होळी हा फक्त 1-2 दिवसाचा उत्सव नसून संबंध सातपुड्यात महिनाभर चालणारा महोत्सव आहे. यात आदिवासींचे निसर्ग संस्कृतीची असलेले नाते, जंगल-जल-जमीन यावर आधारित जीवनपद्धती, त्या जीवनपद्धतीवर आधारित आदिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा, रिती-रिवाज, देव-देवता, बोलीगीते, पोशाख, समूहनृत्य, दान-दागिने, पारंपारिक वाद्ये अशा अनेक आदिवासीच्या
वेगळेपणावर आधारित समूहाचा हा सण आहे. ज्यात आदिवासी आपली सर्व सुख-दुःखे विसरून आनंद, उत्साह व समरसता याचा मिलाफ घडवून आणतो. आणि यातूनच अवघ्या विश्वाला साद घालणारी आदिवासी संस्कृती प्रत्ययास येते, सर्वाना एकञित करुन समुहजीवनाचे धडे देते. यावेळी “होळी म्हणजेस आदिवासी आणि आदिवासी म्हणजेस होळी” हे समीकरण बनते, आणि आदिम अस्तीत्व-प्रतीकांची जीवंत अनुभूती घेता येते…! (दांड) माघ अमावस्येला निघलेल्या नव्या को-या चंद्रदेवतेला (नोवू) नमन करुन होळी उत्सवाची सुरवात होते. येथूनच पथ्याची (पालनी) सुरवात होते. नेराय, गोवाण* आणि इतर गोष्टीसाठी पालनी होत असताना जो कोणी मोरखी, बावा तथा ढाणका डोकोअ होईल तो मांसाहार वर्ज्य करतो. स्ञियांना स्पर्श न करणे, खाट-खुर्चीवर न बसणे, स्वतंञ ( अलिप्त ) राहून कमी साधने वापरणे, चपला न घालणे अशी अनेक पथ्ये पाळली जातात. पालनीचा कालावधी पाच-सात-नऊ दिवसाप्रमाणे कमी अधिक असतो. यात पथ्ये पाळताना कचुराई केलो तर होळीचा कोप होतो म्हणतात. आणि या दिवसापासूनच मोरखी, बावे होण्यासाठी जी सामानाची जुळवा-जुळव करावी लागते. त्याची शोधाशोध, साफ-सफाई व जमवा- जमव सुरू होते. गावात होळीचा माहोल तयार होतो. साधारण सप्टेंबर महिन्यापासुन सातपुड्यातील आदिवासींची रोजगार शोधण्यासाठी स्थलांतर होण्यास सुरवात होते. पावसाच्या बेभरोसे शेतीवर आदिवासींच भागत नाही आणि स्थानिक
पातळीवर रोजगार नाही म्हणून आदिवासींची गाव-कुंटूबे ओस पडतात. म्हातारी-वृद्ध मंडळी व लहान पोरं-बाळं तेवढी घर, गाई-गुरांच्या देखभालीसाठी असतात. सातपुड्यातली गावं फेब्रुवारीपर्यत तरी अशीच भकास, उदास व सुनी-सुनी वाटतात. जशी वसंताची चैञपालवी नव्या सुरवातीची चाहूल घेऊन येते तशी होळी आदिवासीत नवचैतन्य घेऊन येते. उत्साह उधळायला, मनसोक्त नाचाया- गायला लावते. खरतर होळी आदिवासींच्या दु:खावर पांघरुण घालते. दुःख विसरुन आनंदाचा शोध घ्यायला लावते. नवनिर्मितीची प्रेरणा देते. दुःख-गरिबीतही आनंदाने नाचता येते. होळी अशीच सहजपणे सर्वाना सामावून घेते. नवीन उत्साह व उभारी देते. यावेळी सातपुड्यातल्या आश्रमशाळा, शाळा ओस पडतात.
वसतीगृहात राहून शिकणारी आदिवासी पोरं गावाकडे परतण्यास आतुर होतात. न चुकता सर्वाची पावले होळीवर थिरकण्यासाठी गावाकडे परतात. गावं कशी पुन्हा एकदा ढोलच्या तालावर एकञ येत नाचू लागतात. एकमेकांशी एकरुप होऊन होळीची तयारी केली जाते. होळी नाचली गायली जाते. नोवू दिसल्यानंतर आदिवासी गाव-पाड्यावर ढोल- ढोलगीच्या तालात युवक-युवतीचा नाच रंगतो. ही गावातील पोरं-पोरी, लहान मुलं याची होळी असते जी गावातील काही मुलं जंगलात जाऊन बांबू उखळून आणतात. आंब्या-जांभूळाची पाने असलेल्या फांदी बांबूला बांधून पेहराव, सजावट केली जाते. बरोबर बाअडी, सानक्ये, साणी* बांधून सोबत ‘ओली डोहू’ आणला जातो. गावाच्या मध्यभागी ‘ओली दोअ’ त्यात लाकडाच्या साहाय्याने होळी उभी करुन ठेवतात.
मग ‘ढोल’वर थाप पडते, फेर धरला जातो, तालाला-ताल मिळतो आणि सहज सुंदर नृत्य रंगते. मुलीं होळीची बोलीगीते गातात आणि युवक आनंद व्यक्त करताना आदिवासी सुरात लय पकडतात. हा ‘गोटूल’चाच एक प्रकार. युवक-युवतीवर वेळेचे निर्बंध नसते. आणि गावातील सर्व मंडळी अर्ध्या राञीपर्यत होळी मध्यभागी करुन नाच-नाचतात. यावेळी गायली जाणारी होळी विषयक गीते निसर्गाची आदिवासींच असलेलं नातं स्पष्ट करतात. हे पुरातन काळापासुन आजपर्यत न चुकता चालत आलेलं आहे. चालत राहिल. होळी निमित्त सर्व गावकरी एकञ येतात. सामानाची जुळवा-जुळव करताना आपसूकच अडी-अडचणीवर चर्चा होते. मुख्य होळीच्या वेळी होणा-या कार्यक्रमाची ही रंगीत तालीम असते. ढोल चढवणे, चामडी बदलणे, नाडू गोवणे अशी कामं करुन ढोल तयार होतो.
ढोलगी, खाट, मांदल, धा-या-तलवारी, हुप, मोरखी पिसे, टोपा, काहटे, डोवे, उंबराची माळ, दान-दागिने, इत्यादीची तयारी होते. काही वस्तू जंगलेत, काही गावात तर काही बाजारातून आणल्या जातात. होळी येईपर्यत मोहाची दारु गाळून तयार केली जाते. आजू-बाजूच्या गावपाड्यात होळीसाठी खोबर (निमंञण) धाडली जाते. मग गावकरी विशिष्ट दिवस ठरवतात व त्याप्रमाणे एक-एक करुन संबंध परिसरात ऐकमेकांत मिळून-मिसळून होळीचा आनंद घेतला जातो.प्रत्येकाची कामे स्वतंञ असली तरी सहकार्याशिवाय होळी होत नसते.  यामुळे गावक-
याची मने जुळतात. गावात एकोपा नांदतो. होळीच्या आवश्यक पुर्वतयारीनंतर खरा रंग येतो तो देवहोळी पेटविल्यानंतर. दाब (ता. अक्कलकुवा) येथे होणारी देवहोळी संपूर्ण सातपुड्यातल्या उत्सवाची नांदी असते. या होळीसाठी सातपुड्यातल्या सर्व भागातून डाया लोक उपस्थित राहून संबंध पहाडास होळी उत्सव शांततेत पार पाडण्याचा संदेश देतात. ह सातपुड्याच्या ह्या होळीचा ढोल-ताशांचा गजर पूर्ण पहाडात दूमदूमत राहतो. मग एक-एक करुन मोलगी-धडगाव परिसरातील गावहोळीचा ‘सीजन’ सुरु होतो. काही ठिकाणी गावहोळीपूर्वी भोग-या बाजार ( होळीच्या तयारीसाठी आवश्यक सामान खरेदी) भरतो.
हाच काही ठिकाणी ‘मेलादा’ म्हणूनही ओळखला जातो. गावहोळीच्या दिवशी सायंकाळी मोरखी, बावा यांची पारंपारिक वेशभूषा त्यांच्या ठरलेल्या बडव्याकडून सर्व सामान ( काहटे, मोरपिसे, दान-दागिने, ढोलगी, टोपा, माळा, तलवारी-धा-या इ.) पूजा करुन परिधान केले जाते. मोरखी, बावा शरीर राखानेही ढिबून घेतात. हातात धा-या तलवारी, डोक्यावर मोरपिसे-टोपा चढवून गळ्यात ढोलगी, कमरेला काहटे-डोवे असा वेशधारी आदिमांचा ताफा वाजत-गाजत, नाचत-गात बाहेर पडतो. राञभर जो तो आपापल्या धुंदीत होळीमातेची आराधना करतो. राञीची झिंग चढल्यावर सकाळ कशी होते तेही कळत नाही. सातपुड्यातली प्रत्येक गावहोळी विषेश असतेच. पण परिसरातील सर्व लोकांच्या मनात घर केलेली होळी म्हणजे काठी येथील राजवाडी होळी व मोलगीची प्रसिद्ध होळी.! येथे साजरी होणा-या होळीच वर्णन करणंच अशक्य. किमान 200-300 ढोल, मोरखी-बावा यांची 15-20 हजाराची तुफान गर्दी आणि साथीत बेधूंद होऊन नाचणारी लाखभर लोकं! यात नियोजित असा कोणताच भाग नसतो. आपापल्या परिने सर्व होळीला येत असतात. मिरवायला धा-या-तलवारी असतात,
असतात गावक-याचे तांडे (मेलू). स्ञियांची संख्याही तेवढीच जास्त, मग राञभर होणारी होळीगीते व आदिम नृत्य. राञीच्या अंधार-उजेळात येथे ना कधी स्ञियांची छेडखानी होते ना कोणतीही हाणामारी. सर्व कसे एकमेकंत मिळून- मिसळून जातात. समतापर्व गाणारी ही होळी राञभर स्ञि-पुरुष एकञ येऊन साजरी करतात. येथे ना दुजाभाव असतो, ना लहान-मोठेपणाचा दर्प. सर्वाना आनंद घेण्याची स्वतंञ मूभा! होळीत गायली जाणारी बोलीगीते आदिम मौखिक साहित्याचा ठेवा आहे. पण त्याचबरोबर ‘मामाच्या पोरी’ व इतर गोष्टीवर पुरुष मंडळीनी योजलेली गीते अफलातूनच! होळी ही म्हणून बघण्याची गोष्ट नाही. होळी फेर धरुन सहभागास प्रवृत्त करते, राञभरचा उत्साह देते.होळीची राञ कशी सरते हे होळीत सहभागी झालो की कळतच नाही. दांडला दंडवत करता-करता राञी तीनच्या सुमारास होळीला पेरविण्यास सुरवात होते. राञभर होळीत येणारा प्रत्येक मोरखी, बावा न चुकता ‘ओली दोअ’ मधील माती बाजूला सारतो. आणलेली लाकडे लावून होळी उभी करतो. प्रांतः सकाळी पाचच्या सुमारास होळी पेटवतात तो खरा उत्कटतेचा क्षण असतो. होळी पेटवल्यानंतर पूर्वेकडे खाली पडली तर वर्ष सुख-समाधानाने जाते म्हणतात पण दुस-या दिशेला पडली तर वर्षभरात विघ्नं येतात म्हणतात. पेटवलेल्या होळीच्या जळत्या आगीतून मोरखी-बावा राख उचलतात. ती माथ्यावर अभिमानाने वंदन करतात. मग होळीवरुन परतण्यास सुरवात होते. सकाळी पायवाटेला धपाधप पावले टाकीत परतणारी लोकं पाहताना, त्यांच्या चेह-यावरील समाधानाचं तेज न्याहाळताना
मन ‘आदिवासी’च होऊन जाते. होळी झाली की सुरवात होते ती मेलादा (भोंग-या ) पर्वाची. मेलादा हे आदिवासी युवक-युवतीच्या आकर्षणाचे असते. मेलादात ‘फाग मागण्याची व मेलादा पूजण्याची प्रथा खूप जुनी आहे. यात पारंपारिक वेशभूषा, वाद्ये तथा आदिवासीच्या ताकतीचे सुरेख प्रदर्शन केले जाते. नृत्याशिवाय तर मेलादा होऊच शकत नाही. मेलादा नृत्यात सहभागी होण्याची मजा काही औरच असते. मोलगी व जामली ( ता. अ.कुवा ) येथील प्रचंड गर्दीचे मेलादा बाजार डोळ्याची पारणे फेडतात. सर्वात शेवटचे मेलादा बाजार धनाजे व बुगवाडे ( ता. धडगाव ) येथे संपन्न होतात. यानंतर गावातील मोरखी मंडळीची गावाच्या प्रत्येक घरो-घरी फेरी निघते. कुंटूब-प्रमुख अत्यंत तन्मयतेने त्यांची सेवा करतो. अंगणात होळीचे नृत्य म्हणजे होळीमातेचे चरण घराला स्पर्श झाले असे समजले जाते. मग सर्व गावकरी मिळून गावाच्या नदी-नाल्यावर जाऊन पालनी सोडतात. होळी तशी काहीही असो, दरवर्षी उत्साहात साजरी होते. या वर्षीची होळीही अशीच खास असते. मी तर महिना भरापासून होळीची वाट पाहतच आहे. मिञमंडळी बरोबर आम्ही जाऊन नाचणार. गाणार. मज्जाच मजा. तसं होळीला जाताना कोणतीही खुण-गाठ बांधून जायचे नसते. पण तेथे जाऊन कोणीही खाली हात परतत नाही हा इतिहास आहे. होळी माणसाला माणुस बनवते, निसर्गाच्या सानिध्यात घेऊन. आदिवासीत्व शिकवते तेही प्रेम, सहकार्य, सेवा, पाहूणचार असं सर्वच देते, मायेच्या आशिर्वादासह.! आणि वर्षभर पुरेल एवढी ऊर्जा व उत्साह देते. तोच होळीचा ठेवा असतो.

शुक्रवार, २५ मार्च, २०१६

सातपुड्यातील होळीला विदेशी पर्यटकांची हजेरी

तळोदा तालुक्यात व सातपुड्याचा पर्वत रांगा व पायथ्यालगत असलेल्या गांव पाडयात आज होलीकाउत्सव साजरा करण्यात आला. ढोल बिरीच्या सुरात आणि घुंगरुचा नाद सातपुड्यातील गांवपाड्यांवर पारंपारिक गेर आणि बावा बुध्या पारंपारिक नृत्य पांच दिवस रंगणार असल्याने या उत्सवामुळे चैत्यनाचे वातावरण असते.
                              तळोदा तालुक्यासह सातपुड्यातील पर्वत रांगा व पायथ्यालगत असलेल्या गांव पाड़यांवर होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो विविध ठिकाणी भोंग-या बाजाराचे आयोजन करण्यात येते. बोरद येथे  मंगळवारी भोंग-या बाजारात विविध वस्तु खरेदी विक्री तुन सुमारे दहा लाखांचे उलाढाल झाली सातपुडा पर्वत रांगाव गांवागांवात गेर नृत्याची धूम असते ढोल, तुतड्या, ढोलकी, पिरवे अशा पारंपारिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधवांच्या उत्साह डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो......
*रोझवा पुनर्वसन या वसाहतीत होळी लोकमहोत्सव-                                                  तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन या वसाहतीत भारत सरकारच्या नंदुरबार येथील नेहरू युवा केंद्र व लोकसमन्वय प्रतिष्ठान तळोदा यांच्या विद्यमाने आदिवासी होळी लोकमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले.  दि 22 रोजी रात्रि आदिवासी होळी लोकमहोत्सवाचे उद्घाटन डफडी वाजून करण्यात आले मान्यवर आदिवासी विकास प्रकल्पधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अतुल निकम, लोकसंघर्ष मोर्चाचे नेत्या प्रतिभा शिंदे, तळोदा समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ए.टी. वाघ, पत्रकार रमाकांत पाटील अदि उपस्थित होते.
          * डोमखेडीची राजवाडी होळी शोभानगर(वडछील पुनर्वसन) वसाहत येथे -डोमखेड़ी,निमगव्हाण ही नर्मदा काठावरची गांव बुडीत क्षेत्रात गेल्याने पूनर्वसनासाठी आलेली प्रकल्पबाधित आपली संस्कृती सोबत घेऊन आली होळीमातेचा "होलीकोत्सव" त्याच परंपरेने साजरा करण्याची गती खंडीत होऊ न देता अधिक तड़फदार पणे, दिमाखदारपणे, शिस्तीने, सांस्कृतिक परंपरेचे  वहन करत जतन करत, ईडापीड़ा टळो, समाजात खुशहाली नांदो यास्तव रात्र भर खुर्ची, ढोल, गळ्यातले ढोल, बाबा बुध्या, गेर आदि विविधनृत्य प्रकाराने होळीमातेला अभिवादन करत , आराधना करत रात्र कधी निघुन जाते हे कळतच नाही. या वर्षी धड़गाव, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, खेतिया, पानसमेल परीसरातून शेकडो संघांनी उपस्थिति लावली होती. अनेक अधिकारी पदाधिकारी, नेते मंडळींनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. दिनांक 23 मार्च रोजी रात्रि 10 वाजे नंतर महोत्सवाला सुरवात झाली तर दिनांक 24 च्या पहाटे 5.30 वाजता समारोप झाला
        * जीवननगर(गोपाळपुर) पुनर्वसन वसाहतीत होळी-
तळोदा तालुक्यातील जीवननगर (गोपाळपुर) या पुनर्वसन क्र सहा वसाहतीत परंपरेनुसार होना-या होलीकोत्सवा निमित्त दि 23 मार्च रोजी रात्रभर ढोल वादन व गेर नृत्य स्पर्धा सह ढोल, बावा, बुदया गे-या विविध कार्यक्रम झाला.
     सातपुड्याच्या पर्वत रांगात वसलेल्या आदिवासी गांव आदिवासी समाजातील अनोखे गीत, रात्र भर चालणारा होळी नृत्य  या सर्व होलिका उत्सवात आदिवासी समाज रचना एवम् संस्कृतिचे दर्शन घडविनारा कार्यक्रम मुळ गांव डोमखेड़ी, निमगव्हाण, सुरुंग, सेलदा भरड,  या गांवातून स्थलांतरित झालेल्या दिडशे कुटुंब जीवननगर (गोपाळपुर) पुनर्वसन क्रमाक सहा या वसाहतीत जुन्या रितिरिवाजा प्रमाणे होलिका उत्सव साजरा करण्यात येत आहे. या वेळी पारंपरिक वेश भूषा परिधान करून , ढोल, बीरी, बासरी  मांदल , ढोलक वाद्याच्या गजरात आणि घुंगुरूंचा निदानात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे  दि 23 मार्च रोजी रात्रि 8 वाजता होलिकाउत्सव प्रारंभ दि 24 ला पहाटे सहा वाजता होळी पेटविन्यात आली रात्रभर बावा-बुदया व घेर नृत्य स्पर्धा पार पडली  दोन्ही नृत्य स्पर्धांना प्रत्येकी प्रथम क्रमांक 3333, द्वितीय क्रमांक 2222, तृतीय क्रमांक 1111 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून नर्मदा बचाव अंदोलनाच्या मेधाताई पाठकर , कार्यकर्त्या  लतिकाताई राजपूत, विजय वळवी अदि उपस्थित होते.



रविवार, १६ ऑगस्ट, २०१५

चैत्र गौर

चैत्र पाड्व्या नंतर चैत्र शुद्ध तृतीयेस सुरु होतो तो चैत्र गौर उत्सव. चैत्र गौर म्हणजे पार्वतीचा उत्सव ,
 चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो, पार्वती माहेर वासासाठी घरी आल्याचे मानले जाते, शंकर पार्वती यांच्या संदर्भात या विषयी एक दंतकथा प्रचलित असुन शंकरांना पाहुणचारासाठी पार्वतीचे घरी या काळात ठेऊन घेतल्याचे मानले जाते, खरेतर पार्वती या माहेरवाशिणीचं कौतुक करण्यासाठी हा सोहळा असतो. जुन्याकाळी विवाहित मुली या काळात माहेरवासा साठी माहेरी येत असत .देवघरातील मातीची, पितळी, लाकडी, सोन्याची पूर्वापार जशी चालत आली असेल त्याप्रमाणे ती चैत्रगौर कोणत्या तरी कोनाड्यात, देवघरात किंवा छोट्याशा झोक्यावर विराजमान करून . चैत्र शुद्ध तृतीयेस देवघरात चैत्र गौरीची स्थापना करतात काही ठिकाणी ती झोपाळ्यात बसविण्याची प्रथा असते, काही भागात अन्नपुर्णे ची पुजा केली जाते, गौरीच्या पुढे आरास करण्याचीही प्रथा दिसते ,आरशीतही कलात्मकता प्रदर्शन असते . कुठं पायऱ्या पायऱ्या करून गौरीची सजावट केलेली तर कुठे
गौरीसाठी खास मखर केलेलं असते ,पायऱ्यांवर सुशोभीत चादर आणि तिन्ही बाजूंनी भरजरी साडय़ांचे पडदे. सर्वात वरच्या पायरीवर गौर. तिच्या समोर घरातली खेळणी. गौरीपुढे कलिंगड टरबूज यांच्या अर्ध्या फळांची कापून केलेली फुले, फराळांच्या विविध पदार्थांची ताटंही ठेवतात . गौरीपुढं एक बाळ ठेवलेलं असते. गौरी पुढे या काळात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढल्या जातात या रांगोळ्याना चैत्रागण असे म्हणतात, या मध्ये झोक्यावरची गौर, कमळ, स्वस्तिक, ज्ञानकमळ, नाग, शंख, त्रिशूळ, तुळशी वृंदावन, डमरू, चंद्र, सूर्यगदा, बेलाचे पान, कैरी किंवा आंबा, गोपद्म, कलश, ध्वज, पंखा, अश्या विविध रांगोळ्या काढल्या जातात. बेल, तुळस, दुर्वा, ब्रह्मा, विष्णू, महेश सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या देवता चैत्रांगणात असाव्यात असा संकेत आहे. या दिवसात चैत्र गौर बसलेल्या घरांमधून मंगळवार, शुक्रवार, या दिवसांना हळदीकुंकू सभारंभ आयोजित केले जातात, संध्याकाळी बायका नटूनथटून एकमेकींकडे चैत्रगौरीच्या
हळदीकुंकवाला जातात, महिलांना कैरीची डाळ, केशरयुक्त पन्हं, बत्तासे, खिरापत देतात. फळे ,हरभ-यांनी ओटी भरतात. या दिवसान मध्ये येणारे मंगळवार, शुक्रवार,या दिवसांना चैत्रगौर विसर्जित करण्याची प्रथा काही ठिकाणी आहे तर ठिकाणी वैशाख शुद्ध तृतीयेस म्हणजेच अक्षय तृतीयेस हिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे, चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. काही लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्वत्र ही प्रथा दिसत नाही स्त्रीशक्तीचं प्रतीक असणारा चैत्रगौर एकप्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंतोत्सव असतो.

रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

बोरद येथील गरबा

           भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा बोरद येथील गरबा
तलोदा तालुक्यातील बोरद गावात गरब्याचा माध्यमातुन भारतीय संस्कृती दर्शन घडविले जात आहे. विविध रुप धारण करुण गरबा उत्सव साजरी करण्याची एक आगळी वेगळी प्रथा दत्त गरबा मंडळ तर्फे गावात रुजवंण्यात आली आहे. सदर गरबा पाहण्यासाठी तलोदा तालुक्यासह शहादा,प्रकाशा, नंदुरबार, आदि परिसरातील नागरीकांची गर्दी होत आहे. ह्यावरून सविस्तर वृत्त असे की गुजरात सीमेलगत असलेल्या तलोदा तालुक्यातील बोरद गावात श्री. काशीनाथभाई पटेल ह्यानी अंबिका मातेचे मूर्तीची स्थापना करुण गावात मंदीर उभारले. तदनंतर त्यांचे सुपुत्र दत्तात्रय काशीनाथ पाटील ह्याचा मार्गदर्शनाने सन 1990 मधे दत्त गरबा मंडळाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला सर्वसामन्य गरबे होवु लागले. आसपासच्या गावातील अनेक मंडळी गरब्यात सहभागी होवु लागले. मात्र कालांतराने गरब्याचे स्वरुप बदलत गेले. नवरात्रीच्या नऊ दिवस रोज विविध अवतार परिधान करुण गरबा नृत्य करण्याचा
 एक आगळा वेगळा पायंडा गावात रुजला ,
गावातील युवाकानी प्रचंड प्रमाणात ह्या गरबा नृत्याला साथ दिली. ह्यावर्षीही नवरात्रच्या पहिल्या व दुस-या दिवशी यमाचा अवतार धारण करुण गरबा नृत्य सादर केले. तर तिस-या दिवशी आदिवासी समाजातील कुलदैवत देवमोगरा मातेचा अवतार धारण करुण विविध दाग दागिने परिधान करुण शिबली नृत्य सादर करण्यात आले. तसेच चौथ्या दिवशी विष्णु अवतार, पाचव्या दिवशी महिषासुर अवतार, सहाव्या दिवशी भारत मातेचे अवताराचे दर्शन घडवले. वरील सर्वच अवतारमय गरबे पाहण्यासाठी आसपासच्या गावातील नागरिकांची प्रचंड प्रामाणात गर्दी उसळत आहे. वरील सर्वच अवतरापैकी भारत मातेचा अवतार पाहण्यासाठी
तलोदा न.पा.चे नगराध्यक्ष सौ योजना माळी व लोकसंघर्ष मोर्चाचा नेता प्रतिभाताई शिंदे, तलोदा शहरातील जहांगीरदार विद्या बारगळ आदी मान्यवर उपस्थीत होते. दत्त गरबा मंडळाच्या एका सद्स्यानी भारत मातेचा अवतार धारण केला होता. तर काही सद्स्यानी संपूर्ण शरीराला भारतीय ध्वजाचा रंगाचे कपडे परिधान केले होते. व अंगाला देखील तसाच रंग लावला होता. एका युवकाच्या हातात अशोकचक्र देण्यात आले होते. तसेच बदलत चाललेली भारतीय संस्कृतीचे रूप ह्यावेळी दाखवण्याचा प्रयत्न दत्त गरबा मंडळातर्फे करण्यात आला. त्यात महिलांचे आधुनिक फैशन चश्मा, स्कुटी सह शोर्ट पोशाख धारण करुण गरब्यात स्कूटीवर बसुन स्कुटिचा फेरा मारण्यात आल्या. तर काही युवकानी हत्ती सह विविध प्राण्यांचे रूप धारण करुण नृत्य सादर केले. लहान बालकांसह उपस्थीत मान्यवरांचे मन जिंकली. सदर गरबे पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मान्यवर दररोज भेटी देत आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद्माकर वळवी, तलोदा न.पा.चे गट नेते भरतभाई माळी, लोकसंघर्ष मोर्चाचा नेता प्रतिभाताई शिंदे, निसार मक्रानी, अरविंद मगरे आदीसह अनेक मान्यवरानी उपस्थिती दर्शवली आहे.सर्वानिच दत्त गरबा मंडळाचे कौतुक करुण
पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर अश्या आधुनिक युगात युवक मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुशनासह पैशाचा चुराळा करत भारतीय संस्कृती विसरत चालले आहे. मात्र तश्याच वातावरणात संस्कृतीची विविधता जपुन ठेवण्याचे कार्य बोरद ह्या गावातुन होत असल्याचा अभिमान वाटतो. दत्त गरबा मंडळाचे अनुकरण करुण सर्वत्र अश्याच प्रकारे गरबे साजरी व्हावे अशी इच्छा उपस्थीत गरब्याच्या सत्कार प्रसंगी तलोदा न.पा.चे गटनेते भरतभाई माळी ह्यानी दिली. गरबा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पाटील, विद्यमान अध्यक्ष किशोर पाटील उपाध्यक्ष योगेश पाटील सचिव जयेश पाटीलसह गायक व वाजक ह्यांचा उपक्रमाची स्तुती करुण शुभेच्छा दिल्या.....





सोमवार, २५ ऑगस्ट, २०१४

बैल पोळा

उन्हातान्हात दिवसभर राबणार्‍या, बळीराजाचा आजन्म मित्र, मायबाप असणार्‍या बैलांच्या विश्रांतीचा,
 त्यांच्या कष्टाचे कौतुक करणारा वर्ष सण म्हणजे बैलपोळा होय. कर्नाटकात यालाच बैंदूर असेही म्हणतात. बैल पोळा हा श्रावण अमावास्या अर्थातच पिठोरी अमावास्येला महाराष्ट्रात सार्ज‍या होणार्‍या या सणाला विशेष महत्त्व आहे. शेतकर्‍याकरिता हा दिवस म्हणजे दिवाळीचा पाडवाच जणू. या दिवशी आपल्यासोबत वर्षभर शेतात राबणार्‍या सर्जा-राजाला मनोभावे सजवण्याचीच जणू बळीराजांमध्ये स्पर्धा सुरू असते. ग्रामीण भागात गावोगावच्या चावड्यांसमोर बैलांना सुशोभित करीत त्यांच्या मिरवणूका काढल्या जातात. बैल सुशोभनाच्या स्पर्धा, तसेच बैल गाड्यांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यंदा न्यायालयाने बैलगाड्यांच्या स्पर्धांवर बंदी घातली असल्याने या स्पर्धा यंदा भरवल्या जाणार नाहीत, असे दिसते. शेतकर्‍यांच्या घरोघरी पुरणपोळ्यांचा घास आज सर्जा-राजाच्या कष्टाकरिता कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता बनवला जातो.
. शहरी भागातले चाकरमानी आजच्या दिवशी मातीच्या बैलाच्या प्रतिकृतींची पूजा करतात आणि ज्यांनी आपल्याला घडवलं त्या सर्जा-राजाची आठवण काढतात. आपला देश शेतीप्रधान असल्याने या देशात बैल पोळा या सणाला महत्त्व आहे. ग्रामीण भागातील शेतकरी हा कृषिप्रधानतेवर अवलंबून असल्याने तो आपला उदरनिर्वाह शेतीवरच करत असतो. शेती म्हटली की, ती बैलाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ऊन, वारा, पाऊस असो अशा कोणताही ऋतू असला, तरी बैलांकडून शेतीचे काम करून घेतले जाते. यामध्ये बैलांना कोणत्याही प्रकारचा आराम मिळत नसतो. बैलांना आराम मिळावा, यासाठी हा सण शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हीही ठिकाणी मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घातली जाते,
त्यांच्या अंगावर रंगरंगोटी करून त्यांना सजवले जाते. त्यानंतर त्यांची पूजा केली जाते. बैलांना सजवून गावातल्या गावात त्यांची मिरवणूक काढली जाते. त्यांच्या अंगावर गुलाल फेकला जातो. बैलांना गावतल्या गावात मिरवले जाते. प्रत्येकांच्या घरासमोर जाऊन बैलांची पूजा केली जाते. - या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.पोळ्यास 'बैलपोळा' असे देखील म्हणतात. पोळा श्रावण अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.
ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात व शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.श्रावण महिन्याची सुरुवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आटोपलेली असते. या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.' या दिवशी, बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात
येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य. बैलाची निगा राखणार्‍या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात.
बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे. पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतात. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकली जाते. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधतात. अशा नाना तर्‍हेने सजविण्यात येते. शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित
करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला 'अतिथी देवो भव:'प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्यासोबत त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतकर्‍याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावामध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकर्‍याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतकर्‍याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत 'अतित कोण?' असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात.

शनिवार, २ ऑगस्ट, २०१४

कानबाई

कानबाई
खान्देशाची आराध्य दैवत म्हणुन कानबाई उत्सव सर्वत्र उत्साहांत साजरी केला जातो. विखुरलेला परिवाराला
 एकत्र आणने हे या उत्सवाचे वैशिष्ट आहे. नंदुरबार जिल्ह्यात रानमाळ, शहादा तालुक्यातील प्रकाशा व धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कासारे या गावात कानबाईचे मंदिर असल्याचे सांगीतले जाते. एका दिवसाच्या कानबाई मातेच्या सण, उत्सव सर्व परिवार एकत्रित येवुन मोठ्या जल्लोषात साजरा करुण पार पाडला जातो. खान्देशची ग्रामदेवता म्हणुन ख्व्याती असलेल्या कानबाई मातेच्या श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतरच्या पहिला रविवारी कानबाई मातेच्या एक दिवशीय स्थापना करुण उत्सव खान्देशात सर्वत्र उत्सवाने साजरा केला जातो. पुर्वी खानाचं राज्य होतं. खान्देश परिसराचा राजा खान ह्याना पुत्र प्राप्ति नसल्याने खान्देश प्रजेने नवस मानला. राजा खान याना कन्या रत्न प्राप्त झाले. त्यावेळी जनतेने "खानबाई' उत्सव साजरा केला. खानभाई उत्सवाला खान्देशात कालांतराने या उत्सवाला अप्रभ्रुष होवुन कानबाई म्हणुन ओळखले जाऊ लागले. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार हां खान्देश- कान्हादेश-खान्देशी लोक कान्हा म्हणजे भगवान कृष्णाला मानतात. म्हणुन त्यानी देवीचा उत्सव साजरी सुरु करण्यासाठी कानबाई हे नाव घेतले. असावे अशी समज आहे. कानबाई हा उत्सव प्रामुख्याने सोनार, शिंपी, चौधरी, माळी, या समाजात साजरा होतो. मात्र आता प्रतेक समाजात कानबाई मातेची स्थापना भाविक मोठ्या प्रमाणात करीत असतात. कानबाईच्या आगमनापुर्वी घराला  रंगरंगोटी केली जाते. घरातील भांडी घासुन पुसुन स्वच्छ  केली जातात. पडदे, चादरी,
बेडशीट्स, कव्हर्स सगळे धुवुन घेतात. परिसर घर। स्वच्छ करुण घरात गोमुत्र शिंपड्तात. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान मोठ्या पुरुषांना मोजुन प्रत्येकाची सव्वा मुठ असे धान्य म्हणजे गहु,चण्याची दाळ घेतले जाते. चक्कीवरुन दळुन आणले जाते. विशेष म्हणजे या दिवशी चण्याच्या दाळीचाच स्वैपाकात जास्त वापर असतो. पुरण पोळी, खीर कटाची आमटी चण्याची दाळ घालुन, गंगाफळ/ लाल भोपळ्याची भाजी असा थाट असतो. कांदा लसूण वर्ज्य असते. कानबाईच्या सजावटीत साड्यांचे पडदे लावुन डेकोरेशन केले जाते.
कानबाईचे नारळ मुख्यतः पुर्वापार चालत आलेले असते किंवा परनुन आणलेले असते. 'कानबाई परनुन आणणे'- पुर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवुन गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. ज्या घरातल्या बाईला काही कापलेलं, भाजलेलं नाही...अंगावर एकही डाग नाही अशा सवाष्णी निवडल्या जायच्या. सासरी असल्यातरी सासरकडचे लोक घेउन यायचे. तेव्हा गावात उत्सव व्हायचा. त्या स्रीयांना नाना वस्त्र अलंकारांनी सजवुन त्यांची पुजा करायचे. गावची गावं जेवायला असायची. टनाने पुरणपोळ्या रांधल्या जायच्या. अक्षरशः बैलगाड्यांवर स्वच्छ धुतलेली धोतरं अंथरुन शिजवलेला भात लादला जायचा. हा सगळा स्वैपाक .नदीवरुन पाणी
 आणण्यापासुन पुरुषमंडळी करायची. तिथे त्या सवाष्णींनी स्पर्श केलेला नारळ घेउन तोच वर्षानुवर्षे पुजेत वापरला जायचा. आता दोंडायचा जवळ असलेल्या खेड्यात नारळ परनले जाते. तर चाळीस गावा जवळ खेड गावात देखील कानबाई परनन्याचे कार्य केले जाते. कानबाईचं मंदीर बांधलय. ज्यांना नविनच कानबाई बसवायची असेल तर ते नारळ घेउन तिथल्या मूर्तीला स्पर्श करुन आणतात. तर असे हे परनुन आणलेले नारळ त्या दिवशी धुवुन घेतात त्यालाच नथ, डोळे, वै. बसवुन इतरही पारंपारीक दागिने घालतात. . आणि केळीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेउन तिची    
स्थापना होते. कलशावरुनच गळ्यातले हार, मणी मंगळसुत्र वै. चढवले जाते. वरुन शेवंतीची वेणी लावुन ओढणी लावली जाते. मग आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट लाटणे, तवा हे सगळं कणकेचच केलं जातं ( ही कणीक पण स्पेशली पीठात साजुक तुप घालुन दुधात मळलेली असते) हे सर्व काशाच्या ताटात ठेउन देवीला ओवाळतात. इतर सणासारखाच इथे ही ज्येष्ठांना मान असतो. मनोरंजन म्हणून मोठ्या प्रमाणात सट्टा व पत्त्याचा खेळ पुरुष मंडळी रात्रभर खेळत असते.तर स्त्रिया रात्री जागरण करुण फुगड्या, गरबे, व विविध पारंपारीक नृत्य
करतात तसेच कानबाई मातेचे गाणी म्हटली जातात. काही परिवारात फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेउन कानबाईच्या दर्शनाला येतात. या दिवशी कुणी कानबाईला काही मानता/ नवस केला असेल तर तो फेडण्यासाठीही गर्दी होते. मुख्यतः नारळाच्या तोरणाचा नवस असतो. आपल्या घरी दर्शनाला येणार्या प्रत्येक भक्ताला लाह्या फुटाण्यांचा प्रसाद दिला जातो. काहींकडे हातापायाची कानबाई असते तरकाहींकडे कानबाई- रानबाई अशा दोघी बहिणी दोन वेगवेगळ्या चौरंगावर बसवतात. दुसर्या सकाळी लवकर उठुन कानबाईच्या विसर्जनाची तयारी होते. कानबाईची आरती करुन अंगणात चौरंग नेऊन ठेवतात.
गल्लीतल्या सगळ्या कानबाया एकाच वेळेस निघतात. ढोल ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेउन बायका नदीवर निघतात. कानबाईचा नि त्या स्त्रीचा नमस्कार करण्यासाठी ही झुंबड उडते. कानबाईपुढे मुले, मुली फुगड्या खेळतात. वाजत गाजत जातांना समोरुन दुसरी कानबाई आली तर दोन्ही कानबायांची चौरंग (डोक्यावर धरलेल्या स्थितीतच) जोडुन भेट घडवली जाते. अशातच एखाद्या कानबाई धरलेल्या स्त्रीच्या अंगात आले तर ती त्याही स्थितीत नाचते पण डोक्यावरचा कलश नि कानबाई अजिबात सरकत नाही. नदीवर पुन्हा एकदा आरती होउन कानबाईच्या नारळाव्यतिरिक्त सगळ्याचे विसर्जन होते. नदीतलीच वाळु घेउन त्यावर कलश नि आपापले कानबाईचे नारळ तसेच डोक्यावर घेउन पुन्हा
 वाद्यांच्या गजरात घरी परततात. पुरणाचे दिवे मग मोडुन त्यांचा बारीक चुरमा केला जातो. दही, दुध, तुप घालुन ह्या चुरम्याची चव अप्रतिम असते. मग हा चुरमा नि पुरणपोळ्या वगैरे देवीला आदल्या दिवशी दाखवलेला नैवेद्य हे सगळं काश्याच्या त्या एका ताटातच देवीचा प्रसाद म्हणुन फक्त घरातलेच लोक खातात. अगदी लग्न झालेल्या मुलीला सुद्धा हा प्रसाद वर्ज्य असतो. दुसर्या दिवशी नि तिसर्या दिवशी पण रोटांचंच जेवण असतं. रोट ( म्हणजे सवा- सवा मुठ गहु घेउन दळुन आणलेलं पीठ) संपेपर्यंत ते खावच लागतं .रोट संपेपर्यंत जेउन हात धुतलेलं पाणी नि उष्ट्या ताटातील पाणी
सुद्धा खड्डा करुन त्यात ओततात. काहीही उष्ट गटारीत किंवा इकडे तिकडे पडु देत नाहीत. पौर्णीमेच्या आत रोट संपवावे लागतात. जर मधेच पौर्णिमा आली तर त्याआधीच उरलेलं पीठं खड्डा करुन पुरुन टाकतात. कानबाईमुळे घरातली, गावातली इडा पिडा टळते असा लोकांचा विश्वास आहे. अहिराणी भाषिक कुटुंबीयांचा हा आवडता सण मानला जातो. या सणात रोजचा प्रसाद दिला जातो. हा प्रसाद फक्त कुटुंबातील व्यक्ती खाऊ शकते. कानुबाईचे विसर्जन दुसर्या दिवशी वाजत- गाजत होते. रविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणूनही संबोधले जाते. गावातल्या स्त्रिया आपापल्या कानुबाईला चौरंगावर बसवून डोक्यांवर घेतात. गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करतात. स्त्रिया सजूनधजून – नऊवारी साड्या अथवा
 लुगडि परिधान करून विसर्जनात सहभागी होतात. मार्गांत पाण्याचा सडा टाकला जातो. ‘कानबाई मायनी जतरा दाट. माय..... जतरा दाट हे दर्शन माले, मिये ना वाट. माय.... मिये ना वाट’ अशा प्रकारे भान हरपत, गाणे गात-गात भरल्या अंत:करणाने कानुबाईचे विसर्जन नदीत केले जाते. खान्देशात सर्वत्र कानबाई हां सण जल्लोश्यात साजरी केला जातो. कानबाई हां सण कुटुंब एकत्रिकरणाचे प्रतिक मानला जातो. बाहेर गावी गेलेले कुटुंब या उत्सवाने एकत्रित येतात....