Breking News

भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भटकंती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

हिमाचल टूरचा चुरशीचा प्रसंग: नियमांवरील विजय

०७ नोव्हेंबर २०२४
         सुधाकर व त्याच्या मित्रांच्या समूहाने ३ लाख १५ हजार रुपयांचे हिमाचल पॅकेज एका कंपनीकडून बुक केले होते. आधीच ठरल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचा करार होता. मात्र, टूरच्या दुसऱ्या दिवशीच कंपनीकडून पूर्ण रक्कम तातडीने भरण्याचा आग्रह होऊ लागला. या प्रसंगामुळे प्रवासाच्या उत्साहावर विरजण पडले, मात्र समूहाच्या धैर्याने आणि ऐक्याने हा वाद चुरशीने हाताळण्यात आला.. यात लेखी करणार देताना नियम पूर्णपणे दिले होते मात्र शब्द देताना वेगळे देत होते याबाबत त्यांच्याशी त्याच वेळी चर्चा करून लेखी नमूद करण्याची विनंती केली होती. त्यांनी विश्वास दर्शवला होता. मात्र ऐनवेळी रक्कम मागण्यास सुरुवात केल्यामुळे समूहाने नकार दिला.    
    सुरुवातीला कंपनीने नियमांकडे कानाडोळा करून, ठरलेल्या अटींना डावलून, समूहावर रक्कम पूर्ण देण्याचा दबाव टाकला. कंपनीचा मॅनेजर थेट धमकीच्या सुरात म्हणाला, "जर पैसे भरले नाहीत तर रात्रीच तुम्हाला चेक-आउट करावे लागेल." या वक्तव्यामुळे समूहात तणाव निर्माण झाला, पण सुधाकरने शांतपणे परिस्थिती हाताळली. त्यांना ठामपणे सांगितले की, “आम्ही ठरलेल्या अटींप्रमाणेच वागू.” समूहातील इतर दहा जणांनी सुधाकरच्या मताला पाठिंबा दिला. त्यांनी मॅनेजरला स्पष्ट केले, “सुधाकर जे म्हणत आहेत, तेच योग्य आहे. आम्ही एकत्र आहोत.”

      मॅनेजरचा दबाव वाढत असताना, सुधाकरने ठाम भूमिका घेतली. त्याने सांगितले, "जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही पोलीस ठाणे गाठू. गरज पडल्यास आंदोलन छेडू." हा निर्णय कंपनीला अडचणीत आणणारा ठरला. रात्री १२ वाजता थेट कंपनीचा मालक शिमला येथे आला.
       मालकाने सुधाकर व समूहाशी चर्चा केली. समूहाच्या ठाम भूमिकेमुळे आणि नियमांच्या आधारावर बोलल्यामुळे शेवटी कंपनीने मध्यस्थी केली. रक्कम कमी करण्यात आली, आणि समूहाच्या अटींनुसार उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने घेण्यास कंपनी तयार झाली. व त्यानंतर मिळणाऱ्या सुविधाही उत्तम मिळाल्या, हा प्रसंग समूहाच्या विजयाचा ठरला. यामुळे न केवल प्रवासाचा आनंद कायम राहिला, तर समूहाने एकीची ताकद काय असते हे दाखवून दिले. हा संघर्ष फक्त कंपनीच्या चुकीच्या धोरणांविरुद्धच नव्हे, तर प्रवाशांच्या हक्कांसाठी उभा राहण्याचा आदर्श ठरला.
      या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट झाली - नियमांना डावलून काम करणाऱ्यांविरुद्ध ठाम राहिल्यास यश मिळतेच. समूहाच्या संयमाने आणि एकजुटीने नियमांवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय झाला..

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

"रेल्वे प्रवासातील अडचणी आणि आनंदाचा प्रवास"

१६ नोव्हेंबर २०२४
प्रवास हा नेहमीच आठवणींचा ठेवा असतो, पण कधी कधी तो आठवणींसोबत संकटांनाही घेऊन येतो. दक्षिण भारताच्या प्रवासातील शेवटच्या दिवशी आमचे तिकीट हरवले होते. त्या गोंधळात, फक्त प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्हाला टीसीला दंड भरावा लागला. ती रक्कम कमी नव्हती, पण त्यावेळी दुसरा पर्यायच नव्हता. तो प्रसंग जसा अवघड होता, तसाच पुढे जाण्याचा अनुभवही देणारा होता. तर हिमाचल हिंडून आल्यानंतर सुरतहून नंदूरबार जाण्यासाठी सुरत भुसावळला पॅसेंजर रेल्वेचे आरक्षित तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही काऊंटरवरून तात्पुरती तिकिटे काढली. 
प्रवासाची सुरुवातच आव्हानात्मक होती.   ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली, मात्र तिच्या प्रत्येक डब्यात पाय ठेवण्यासही जागा नव्हती. ही परिस्थिती पाहून सर्व बायका घाबरल्या. मुलांसोबत गडबड गोंधळ उडाला. महिला आणि लहान मुले गर्दीच्या त्या दृश्याने घाबरली होती. काही मुले रडायला लागली, तर काहींनी घाबरून आईच्या कुशीत आसरा घेतला. गोंधळात सर्वांचा संयम तुटत चालला होता. जागा मिळवणे अशक्य होतं, पण पुढील रेल्वे सकाळी पाच वाजता असल्याने या ट्रेननेच प्रवास करणे गरजेचे होते.

                           रात्र असल्याने पुढील रेल्वे सकाळी पाच वाजता होती. मात्र, त्यावेळी प्रवास करणे कठीण होईल, असे वाटल्याने आम्ही या भरगच्च ट्रेनमध्येच जागा मिळवण्याचा निर्धार केला. सर्व पुरुष मंडळींनी बायकांना व मुलांना सुरक्षित ठेवण्याचे ठरवले. "टीसी आला, तर त्याला मॅनेज करायचे," असेही ठरले.
गर्दीच्या त्या धकाधकीत, कुठेतरी एक कोपरा मिळवून आम्ही थोडासा विसावा घेतला. व्यारा स्थानकावर ट्रेन थांबली, तेव्हा टीसी समोर आला. त्याने आम्हाला पाहिले, आणि प्रत्येकी ५० रुपये घेतले. यानंतर आमच्यासाठी थोडीशी मोकळी जागा उपलब्ध करून दिली. हा सगळा प्रसंग इतका अनोखा आणि मजेशीर वाटला की शेवटी आम्ही सगळेच हसत राहिलो.
हा प्रवास आमच्यासाठी फक्त मार्गक्रमण नव्हता, तर एक अनुभव होता - एका आव्हानाचा, जिद्दीचा आणि परिस्थितीला जुळवून घेण्याचा. ही रात्र आम्हाला खूप काही शिकवून गेली - संकटांमध्ये एकत्र राहणे, संयम राखणे आणि जिद्दीने पुढे जाणे. हा प्रवास जितका कठीण होता, तितकाच आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
 
        या प्रवासात शेवटच्या दिवशी सुरत-भुसावळ पॅसेंजर ट्रेनमध्ये मिळालेला अनुभव व दक्षिण भारतीय सहली दरम्यान हरवलेले तिकिटे या दोन्ही अनुभवांनी एक गोष्ट मात्र शिकवली - प्रवासात संकटे येत असली तरी ती सहनशीलता, एकमेकांना आधार, आणि प्रसंगावधानाच्या जोरावर पार करता येतात. गमावलेले तिकीट असो किंवा जागा, संकटे कधीही येऊ शकतात, पण शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत, तर प्रवास कायम लक्षात राहतो..

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

दिल्लीहून सुरतपर्यंतचा प्रवास: अनुभव, निसर्ग आणि आठवणी*

           
१५ नोव्हेंबर २०२४
दिल्ली निजामुद्दीन स्थानकावर पहाटे ५ वाजता आम्ही वेर्णाकुलम एक्सप्रेसने सुरतसाठी प्रवासाला सुरुवात केली. वातानुकूलित डब्यात रिझर्वेशन असल्याने प्रवास आरामदायक होता. पहाटेच्या शांत वातावरणात ट्रेन सुरू झाल्यावर खिडकीतून बाहेर बघताना हिवाळ्याचा गारठा जाणवत होता. स्टेशनवरचा गोंधळ मागे पडत, शहराच्या वर्दळीपासून दूर जात प्रवासाची खास सुरुवात झाली..

*प्रवासातील पहाटेचा आनंद*

         रेल्वे जसजशी पुढे सरकत होती, तसतसे दिल्लीचा धावपळीतला परिसर मागे पडत मोकळ्या, हिरव्या मैदानांचे दर्शन होऊ लागले. पहाटेचा चहा आणि  नाश्ता घेत गप्पा सुरू झाल्या. बाहेरून येणारा वारा आणि ट्रेनच्या खडखडाटात प्रवास अधिकच रोमांचक वाटत होता.
*राजस्थानचा ओसाड पण मोहक प्रदेश*

       दुपारच्या सुमारास रेल्वेने राजस्थानच्या हद्दीत प्रवेश केला. रुक्ष माती, दूरवर दिसणारे वाळवंटाचे सपाट मैदान, आणि मध्येच दिसणारी छोटी छोटी गावे प्रवासाला वेगळा अनुभव देत होती. कधी कधी उंटगाड्या आणि रंगीत पगड्या घातलेल्या व्यक्ती दृष्टीस पडत होत्या. यावेळी खिडकीतून बाहेर बघताना त्या प्रदेशाच्या वेगळेपणाचा आनंद घेत होतो.

*गुजरातच्या दिशेने प्रवास*
       जसजसा प्रवास पुढे सरकत होता, तसतसे हवा उष्ण होऊ लागली. संध्याकाळपर्यंत गुजरातमध्ये प्रवेश करताच, हिरवीगार शेती, नारळाची झाडं, आणि शेतकरी त्यांच्या कामात मग्न असल्याचे दृश्य दिसू लागले. गुजरातच्या रेल्वे स्थानकांवर स्थानिक पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांची लगबग आणि गुजराती भाषेतला संवाद ऐकून प्रवास अधिकच रंगतदार होत गेला.

*रात्री सुरत स्थानकावर पोहोचलो*

        रात्रीच्या सुमारास सुरत स्थानकावर पोहोचलो. स्टेशनवर उतरताच सुरतच्या व्यापारमय आणि चैतन्यशील वातावरणाची झलक पाहायला मिळाली. प्रवासाचा थोडासा थकवा होता, पण एक अद्वितीय अनुभव मिळाल्याचा आनंदही तितकाच होता. दिल्लीपासून सुरतपर्यंतचा हा प्रवास निसर्ग, संस्कृती, आणि प्रदेशाच्या वैविध्याचा साक्षीदार ठरला..