कर्नाटक राज्याने भाषा, साहित्य व संस्कृतीवर आठ कोटी रुपये अनुदान दिले तर आपल्या राज्यात अजूनही
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला केवळ 25 लाखांचे अनुदान आहे. त्यामुळे शासनाचीच याबाबत मोठी अनास्था असल्याची खंत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी साहित्य संमेलनात व्यक्त केली.
तळोदा येथील महाविद्यालयात रविवारी नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हा आठवे साहित्य संमेलन झाले. त्यावेळी डॉ.श्रीपाद जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी निंबाजीराव बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, राजेंद्रकुमार गावीत, वाहरू सोनवणे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप मोहिते, महामंडळाचे कार्याध्यक्ष विलास देशपांडे, रमाकांत पाटील, अविनाश पाटील, राजू पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव उपस्थित होते. डॉ.जोशी म्हणाले, आपला देश पारंपारिक, बहुभाषिक व आदिवासी जाती-जमातींचा आहे. त्यामुळे भाषा व संस्कृतीला खूप महत्त्व आहे. मात्र शासनाच्या उदासिन धोरणामुळे सध्या त्याच्यावर मोठा आघात होत आहे. वास्तविक साहित्य व संस्कृतीत समाजाच्या
विकासाबरोबरच देशाच्या विकासाचेही प्रतिबिंब आहे. मात्र हल्ली याबाबतच उदासिनता दिसून येत आहे. या विषयी खंत व्यक्त करून शेजारच्या कर्नाटक राज्यात सांस्कृतिक मंडळाला तब्बल आठ कोटीचे अनुदान दिले जाते तर आपल्या राज्यात सांस्कृतिक महामंडळावर केवळ 25 लाखाचे अनुदान राखण्यात आले आहे. तेही वर्षानुवर्षे तेवढेच आहे. त्यावर अजूनही वाढ केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यकत्र्याच्या अनास्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेतही साहित्य क्षेत्रातील व्यक्तिंना पुरेशे प्रतिनिधीत्व दिले जात नसल्याचे सांगून याबाबत कायदेशीर लढाई लढली जात असल्याचे ते म्हणाले. साहित्याच्या क्षेत्रातही मुठभर लोकांची मक्तेदारी वाढल्यामुळे विद्रोही साहित्यिक निर्माण होत आहे. यावरही विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर मराठी भाषेचा विकास करण्याऐवजी राज्यातील 80 हजार मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासन घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्य संमेलनाच्या अवस्थाबाबत डॉ.श्रीपाद जोशी म्हणाले, अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीदेखील निवडणूक घेतली जाते. एवढे दुर्देव या क्षेत्रातदेखील आले आहे. भाषा व संस्कृतीमुळेच देशाचा विकास आहे आणि मुठभर लोकांच्या हाती असलेल ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहनही शेवटी त्यांनी केले.
या वेळी त्यांनी गेल्या आठ वर्षापासून जिल्हास्तरीय साहित्य संमेलने यशस्वी केले जात असल्याने साहित्य अकादमीचे कौतुक केले.
या वेळी संमेलनाचे अध्यक्ष निंबाजीराव बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील सांस्कृतीक उत्सव व परंपरांना प्राचिन इतिहास आहे. त्यात आगळी वेगळी संस्कृती दडलेली आहे. ललित उत्सव, रासगान, गाव दिवाळी या सारख्या परंपरा येथे अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर मंदिर, चैत्य, शिल्प, शिलालेख व लोकसाहित्य, लोककला यातूनही इथल्या साहित्याची जाणीव होते. साहित्यातून समाजातील रुढी, परंपरा यांचा विधायकपणे वापर करीत संस्कृतीची मांडणी केली जाते. त्यामुळेच साहित्यामुळे समाजाची प्रगती होत आहे. साहित्यात बोली भाषेला महत्त्व आहे जर बोलीभाषा नष्ट झाली तर संस्कृतीही नष्ट होईल. त्यामुळे बोलीभाषा टिकली पाहिजे. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.पीतांबर सरोदे यांनी केला. संमेलनाची भूमिका विकास देशपांडे यांनी मांडली तर साहित्य संमेलनाची पाश्र्वभूमि संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी मांडली. सूत्रसंचालन विकास पाटील, रजनी रघुवंशी तर आभार रमाकांत पाटील यांनी मानले. व्यासपीठावर कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष सुदाम पाटील, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या जयाबाई गावीत, साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी, प्राचार्य रामय्या, सुलभा महिरे, डॉ.राजेश वळवी, सतीष वळवी, संजय माळी, रुपसिंग पाडवी, हेमलता डामरे, प्रा.विलास डामरे, राजेंद्र राजपूत, जयसिंग माळी, जितेंद्र पाडवी, हिरामण पाडवी, नीमेश सूर्यवंशी, विनायक माळी, फुलसिंग पाडवी, प्रा.जयपाल शिंदे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ही दिंडी शेठ के.डी. हायस्कूलपासून मेनरोड, तहसील कचेरी, कॉलेज रोडमार्गे महाविद्यालयात समारोप करण्यात आला.
कला-साहित्यातून संस्कृतीचा वारसा
परिसंवाद-१.
जिल्हा साहित्य संमेलनातील परिसंवाद एकमध्ये साहित्य, संस्कृती व कलेचा आजच्या समाज जीवनावरील प्रभाव याविषयांवर सहभागी परिसंवादकारांनी मते मांडली. माणूस घडविण्यासाठी साहित्य खूप महत्त्वाचे आहे. तसेच आपल्याला मिळालेला कलेचा वारसा अधिकाधिक समृध्द व्हायला पाहिजे. कारण कला व साहित्याच्या माध्यमातूनच संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात..
संमेलनातील परिसंवाद एकच्या अध्यक्षस्थानी डॉ.सविता पाटील होत्या. तर संयोजन म्हणून प्रा.जयपालसिंग शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी परिसंवादात श्रीराम दाऊतखाने, दीपक कुळकर्णी यांनी सहभाग नोंदवून साहित्य, संस्कृती व कलेचा आजचा समाज जीवनावरील प्रभाव याविषयी मते मांडली. श्रीराम दाऊतखाने म्हणाले की, माणसाला माणूस बनविण्यासाठीच्या प्रक्रियेत साहित्य खूप उपयुक्त ठरते. साहित्य व कलेपासून प्रेरणा घेऊन अनेक थोर व्यक्ती घडले आहेत. साहित्याचा मानवी समाज जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम घडून येत असतो.
मानवी जीवनावर धार्मिक साहित्य, संत वाड्:मय, प्रबोधन साहित्य, समस्या प्रधान साहित्य यांचा मोठा परिणाम घडून येतो. साहित्याचा मोठा चांगला परिणाम हा समाजजीवनावर होत असतो. तसेच दीपक कुळकर्णी म्हणाले की, साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात आपण वाहून घेऊ शकत नाही. कला जोपासतो पण ती वृद्धींगत करण्यासाठी जेवढी गुंतवणूक समाजाने करायला पाहिजे, तेवढी होत नाही. कलेचा समाज जीवनावर परिणाम होतो, पण कसा व्हायला पाहिजे हे समाज म्हणून आपल्यावर सर्वस्वी अवलंबून असते. आपल्याला जो कलेचा वारसा मिळालेला आहे, तो अधिकाधिक समृद्ध करायला पाहिजे, असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ.सविता पाटील यांनी सांगितले की, संस्कृती, साहित्य व कला या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी असल्याचे सांगितले. दैनंदिन जीवन जगत असतांना ते कला, साहित्य, संस्कृतीच्या अनुषंगाने जगत असतो. कला व साहित्याच्या माध्यमातून संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले..
परिसंवाद-2
'श्यामची आई' नाट्यरुपीने प्रेक्षकांचे डोळे पाणावले!
तळोदा येथे आयोजित नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनातील सभागृह दोनमध्ये सादरीकरणातून
नाट्यरुपीने श्यामची आई या सानेगुरूजींच्या कथेचे महत्त्व पटवून देण्यात आले. आपल्या घाबरट श्यामला बळ देण्यासाठी आई कशी त्या प्रोत्साहन देते यासह सकुमावशी व श्याम यांच्यातील हृदयस्पर्शी संवादाच्या नाट्यरुपी सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले. तसेच आई सोडून सेवा करण्यापूर्वीच आई जग सोडून गेल्याने आता मी घरी जावून काय करु असे श्यामचे वाक्य नाट्यरुपी कानी पडताच भावनिक प्रसंग सादर होताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला..
नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनात दुपारी अडीच वाजेला एकपात्री नाट्यचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी डॉ.माधव कदम यांनी श्यामची आई या कथेचे नाट्यरुपी सादरीकरण केले.
श्याम ज्यावेळी तलावात पोहायला जात नाही, त्यावेळी आई त्याला पोहण्यास जाण्याच्या हट्ट धरते. मात्र भित्रा श्याम लपून बसतो, जाण्यास नकार देतो, अश्यावेळी त्याची आई त्याला फटकारे देऊन पोहण्यास पाठवते. श्याम हिंम्मतीने पोहण्याचा प्रयत्न करतो. श्याम घरी आल्यावर त्याला आई दही देते आणि प्रेमाने जवळ घेवून कुरवाळते व त्याला दही देते. यावेळी श्याम रडतो आणि म्हणतो अंगावरील वळ आले एवढे तू मारलेस, अंगावरचे वळ तरी जाऊदे मगच तुझी दही गोड लागेल. त्यावेळी आई म्हणते, भित्रा होण्यापेक्षा माझ्या श्यामने प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन निडर होऊन पुढे गेले पाहिजे. तसेच नाट्यरुपाच्या दुसऱ्या क्षणात श्यामची घरची परिस्थिती हालाकीची असते. श्य्याम हा अतिशय खोडकर व हट्टी असतो. एकेदिवशी श्याम अंघोळीनंतर अंग पुसण्यासाठी त्याच्या आईचा साडीचा पदर मागतो.
अंघोळ झाल्यानंतर देवपूजेसाठी निघालेल्या श्याम हा आपले पायाला घाण लागू नये. म्हणून आपल्या आईचा पदर खाली टाक मी त्यावरून देवळात जातो, असा अट्टहास धरतो. आई पदर खाली टाकते व श्यामला म्हणते की, श्याम ज्याप्रमाणे तू तुझे पायाला घाण लागू नये. म्हणून काळजी घेत आहे, तशीच काळजी तू तुझ्या मनाला घाण लागू नये म्हणून आयुष्य भर घ्यावी. या प्रसंगासोबतच सकुमावशी व श्याम यांच्यातील हृदयस्पर्शी संवादाचे सादरीकरण करून उपस्थित्यांच्या डोळ्यात पाणी आणले. ज्या आईची सेवा करायची होती, ती आईच या जगाच्या जंजाळ्यातून निघून गेली. आता घरी जाऊन मी काय करू, ज्या आईने माझ्या श्यामला दही आवडते. म्हणून दहाची वाटी दिली. ती आई या जगात नाही. आता मी कश्यासाठी घरी जाऊ असे भावनिक प्रसंग प्रेक्षकासमोर उभे करून प्रचंड टाळ्या वाजवून प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला..
बालकवींच्या कवितांनी रसिक झाले तृप्त
साहित्य संमेलनात बालकट्टा कार्यक्रमात चिमुकल्या कवींनी विविध कविता सादर करुन
श्रोत्ये रसिकांना तृप्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश भट होते. या कार्यक्रमात मी वाचलेली पुस्तकांविषयी हर्षल वाघ या बालकाने सत्यजित रे या लेखकाच्या मृत्यू घर या वाचलेल्या पुस्तकाबाबत अनेक अनुभव व्यक्त केले. संगिता पावरा या विद्यार्थिनीने आर.के.नारायण यांच्या मालगुडी डेज या कथा संग्रह कसे प्रभावित केले हे सांगितले. रोशनी रमेश पाडवी या विद्यार्थिनीने भुता गोष्ट वाचली नंतर काय वाटते, याविषयीही सांगितले. शुभम मनिष मराठे या विद्याथ्र्याने श्रीमद् भगवत गीता वाचल्यानंतर आलेली अनुभूतीही सुंदररित्या विषद केली. कविता सादरीकरणात पूजा राठोड हिने निसर्ग कविता तर दीक्षा गुरव या विद्यार्थिनीने मेरे पापा ही आपल्या आईच्या मदतीने तयार केलेली कविता सादर केली. या कवितेने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच सीमा राठोड या विद्यार्थिनीने बेटी तर मयुरी पाटील हीने पाणी, सूचिता वसावे हिने शांती तर मायावती गावित हिने माझी शाळा, जयश्री वळवी हीने मॉ, वर्षा रामराजे हीने शिक्षक, अवंतिका पाटील व रश्मी भावसार यांनी संस्कृती तर मिलींद धोदरे यांनी आई वर आपली कविता सादर केली. बालकट्टयात सहभाग नोंदविणाऱ्या मुला-मुलींना राजेंद्र गावित, निंबाजीराव बागूल, रमेश भाट, निमेश माळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले. संयोजन निमिश सूर्यवंशी यांनी केले..
राज्य सरकारकडे 75 लाख ते एक कोटी एवढय़ा निधीची मागणी
बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारने 75 लाख ते एक कोटी रुपयांचा निधी दिला असता तर गुजरात सरकारने देखील तेवढाच निधी देऊ केला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे यापूर्वी मंजुर केलेली निधीची मागणी पुर्ण केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात डॉ.श्रीपाद जोशी यांनी म्हटले आहे की, गुजरात सरकारने देखील बडोदा साहित्य संमेलनाला 25 लाखांचा निधी दिलेला आहे. परंतु महामंडळाने आधीच राज्य सरकारकडे 75 लाख ते एक कोटी एवढय़ा निधीची मागणी केली होती, आपण ते देण्याचे जाहीर देखील केले असते तर गुजरात सरकारने देखील तेवढा निधी देऊ केला असता. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नसून राज्य सरकारने तातडीने ती मागणी पुर्ण केल्याची घोषणा करावी. जेणेकरून गुजरात सरकारकडेही तशा वाढीव सहाय्याची मागणी करता येईल. कर्नाटक सरकारने त्यांच्या भाषेच्या साहित्य संमेलनासाठी आठ कोटी रुपये निधी दिल्याचे यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे आपणही तातडीने निर्णय घेवून घोषणा करावी अशी मागणीही या पत्रात श्रीपाद जोशी यांनी केली आहे.