Breking News

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१८

अखेर कुटुंबीयांना मिळाला त्यांच्या नावाचा धनादेश

दै.'पुण्यनगरी'कडून करण्यात आला होता पाठपुरावा.
रूग्णवाहिकेच्या अपघातात मयत अनिल गुरव यांच्या कुटूंबियांना बीव्हीजी ग्रुपतर्फे अनावधानाने दुसऱ्या नावाने देण्यात आलेला धनादेश परत घेण्यात आला होता. मात्र दै.'पुण्यनगरी' ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर काल तात्काळ गुरव कुटूंबियांना त्यांच्या नावाचा धनादेश देण्यात आला. . गेल्या महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्त करून येत असताना नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात घडल्याने यामध्ये चालक अनिल गुरव, अल्लारखा मक्रानी, भिक्कन पवार, या तिघांच्या मृत्यू झाला होता. वेळोवेळी याबाबत दै.पुण्यनगरीने पाठपुरावा करून सदर विषयाला वाचा फोडल्यामुळे मयताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तातडीने उपलब्ध झाली. आर्थिक मदतीचा धनादेश पुणे व नाशिक पथकाने मयताच्या कुटुंबियांना स्वाधीन केले. काही दिवसांपूर्वी अनावधानाने कंपनीच्या सदस्यांकडून गुरव यांच्या धनादेश देण्याऐवजी भिक्कन पवार यांच्या धनादेश गुरव यांना देण्यात आला होता. सदर बाब दुसऱ्या दिवशी कुटूंबियांना दूरध्वनीद्वारे कळविल्यानंतर तातडीने कंपनीच्या सदस्यांनी तो परत घेतला. याबाबत लेखी मागितली असता ती देण्यात टाळाटाळ केल्याने कंपनीने सोबत नेलेला धनादेश कधी परत मिळतो याबाबत कुटुंबीय प्रतीक्षेत होते. मात्र दै. पुण्यनगरीच्या वृत्तानंतर तातडीने डॉ.यु.आर.साने जिल्हा व्यवस्थापक, राकेश पाटील, राजेश परदेशी आदीनी येऊन पंडित गुरव यांना धनादेश स्वाधीन केला. गुरव कुटुंबीयांनी दै.'पुण्यनगरी' चे आभार मानले.

गुरुवार, २६ एप्रिल, २०१८

पुढाऱ्याने बिव्हिजीच्या व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावताच दिले ३० हजार...

मयत कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश देताना 
नंदुरबार - दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर मयताच्या कुटुंबियांना भारत विकास ग्रुपतर्फे आठ हजाराची मदत देऊन थट्टा करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त दै.पुण्यनगरीने प्रकाशित केल्यानंतर मयताच्या कुटुंबियांना मदतीसाठीच्या हालचाली गतिमान होऊन एक लाखाची आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. असे असले तरी अनावधानाने धनादेश बदली झाल्याने सदर धनादेश कंपनीने परत घेतला असून आता पुन्हा धनादेश कधी मिळतो याची प्रतीक्षा आहे.         यादरम्यान कंपनीच्या व्यवस्थापकाने मयताच्या कुटुंबियांना मिळालेल्या रक्कमेच्या अपहार केल्याच्या प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या महिन्यात रुग्णवाहिका दुरुस्त करून येत असताना नंदुरबार- दोंडाईचा रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात घडल्याने यामध्ये चालक अनिल गुरव, अल्लारखा मक्रानी, भिक्कन पवार, या तिघांच्या मृत्यू झाला होता. नेहमी रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी आटापिटा करणाऱ्या तिघे मयत तरुणांची आर्थिक परिस्थिती बेताची असून भारत विकास गृपतर्फे अवघ्या आठ हजाराची मदत करून गुरव कुटुंबियांची थट्टा केल्याचे वृत्त दै.पुण्यनगरीने 2 एप्रिल रोजी प्रकाशित केले. यानंतर मदतीसाठी हालचाली गतिमान झाल्या. दि. २१ एप्रिल रोजी नाशिक येथील विभागीय प्रमुख बाळासाहेब कंकराळे, पुण्याचे डॉ.ज्योत्सना माने, विभागीय अधिकारी डॉ.किशोर देव, रोहित शिंदे या पथकाने तळोदा गाठून गुरव कुटुंबियांना एक लाखाचा धनादेश दिला. मात्र अनावधानाने गुरव कुटुंबियांना दुसऱ्याच नावाने धनादेश देण्यात आल्याने सदरचा धनादेश कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परत घेतला आहे. यामुळे आता परत धनादेश कधी मिळतो, याकडे लक्ष लागून आहे. यावेळी उपस्थितीतांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. घरातील कर्ता पुरुष गेल्याने अंत्यसंस्काराप्रसंगी मदतीची अपेक्षा होती. केवळ आठ हजार आर्थिक मदत देऊन कंपनीकडून थट्टा करण्यात आल्याचे रहवाश्यांनी सांगितले. यावर संबंधीत कंपनीकडून घटनेनंतर तातडीने 50 हजार रु नंदुरबार व्यवस्थांकाच्या खात्यात व 50 हजार रु धुळे येथील डॉ.चव्हाणच्या खात्यावर टाकून मदत करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी संबधित व्यवस्थापकाने सदर रक्कमेच्या अपहाराचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

*आणि व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली*
मयताच्या कुटुंबियांना मदतीसाठी प्रत्येकी 33 हजार रुपये याप्रसंगी कंपनीने मदत पाठविलेली असताना व्यवस्थापकाने प्रत्येक्षात मात्र केवळ आठ हजार रुपये याप्रमाणे मयताच्या कुटुंबियांना मदत केल्याने स्थानिक नेते संतापले. नेत्यांमध्ये व कंपनीच्या व्यवस्थापकात बाचाबाची झाली. शाब्दिक चकमक वाढल्याने स्थानिक राजकीय पुढाऱ्याने व्यवस्थापकाच्या श्रीमुखात लगावली. यावेळी वातावरण सुन्न झाले आणि तात्काळ एक लाखाचा धनादेश पंडित गुरव यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच उर्वरित 30 हजार रुपये देखील गुरव कुटुंबियांना देण्यात आले. त्याचप्रमाणे पी.एफ, पेंशन इन्शुरन्स, एलआयसीच्या माध्यमातून प्राप्त होणार असल्याचे सांगितले.

  *कारवाईकडे लक्ष*
भारत विकास ग्रुप राज्यासह परराज्यात देखील आपल्या सेवेमुळे नावलौकिक आहे, मात्र व्यवस्थापकाने केलेल्या चुकांमुळें कंपनी बाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. कंपनी संबंधित व्यवस्थापकवार काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.... *रुग्णकाहिका कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र विमा काढणे गरजेचे* स्वतःच्या जीव धोक्यात घालून रुग्णाना तातडीने सेवा मिळावी म्हणून रुग्णवाहिकेत असलेले कर्मचारी प्रयत्न करतात. बऱ्याचदा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागतो. याकरिता रूग्णासोबत असणाऱ्या नर्स, वाहन चालकांचे कंपनीकडून स्वतंत्र विमा काढणे आवश्यक आहे. तसेच अपघात घडल्यास भरीव आर्थिक मदत करणेही गरजेचे आहे.

 *108 रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांचे मागण्यांबाबत बीव्हीजीला निवेदन* 
 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवरील कर्मचाऱ्यांच्या विविध मागनीबाबत बिव्हीजीचे चेअरमन हनुमंत गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आहे. सदरच्या निवेदना म्हटले आहे की, रुग्णवाहिकेचा अपघातात जिल्ह्यातील अनिल गुरव, भिक्कन पवार, अल्लरखा मक्रानी या तिघांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विविध मागण्यामध्ये ओंनड्युटी मृत्युमुखी झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी. कुटुंबियामधील एखादया व्यक्तीस नौकरीत सामावून घेण्यात यावे. तिघांचे प्रॉव्हिडंट फंडातील पैसे तात्काळ मिळवण्याची व्यवस्था करण्यात यावी, सदरच्या मागण्या येत्या चार दिवसात पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा 108 कर्मचारी संघटनेने निवेदनातून दिला आहे.

 *प्रतिक्रिया* 
 कँपनीकडून 1 लाख रु देण्यात आले होते.मात्र व्यवस्थापकांकडून 8 हजार रु मयताच्या कुटुंबियांना देण्यात आले. यातून गैरसमज निर्मान झाला असून घडलेल्या प्रकाराबाबत वरिष्ठाना कडविले आहे. याबाबत योग्य ती चौकशी करून योग्य तो निर्णय घेतील..
 *डॉ.ज्योत्स्ना माने*

 *प्रतिक्रिया* 
कँपनीकडून मयताच्या कुटुंबियासाठी नंदुरबार करीत 50000 रु देण्यात आले होते तर 50000 रु धुळे येथील डॉ. निलेश चव्हाण यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र सदर रक्कम एकत्रितरित्या धनादेश स्वरूपात अथवा रोख न देता 3 दिवसाचा दुखवटा पाळण्यासाठी लागणारा खर्च घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांचा हातात द्यावा, असा आदेश वरिष्ठांकडून देण्यात आला होता. या आदेशांचे पालन केले. सदर 8 हजार एवढी रक्कम कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी नाकारली.
 व्यवस्थापक बिव्हीजी ग्रुप नंदुरबार

 *प्रतिक्रिया*
अपघातात कमवता मुलगा गेला आहे. वाहन दुरुस्तीचे नाव करून वयक्तिक कामाकरिता सदर वाहन नेले असल्याचे आम्हास कळत आहे. याबाबत अर्ज फाटे करूनही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. आर्थिक मदत म्हणून देण्यात आलेला धनादेश हा आमच्या नसून भिक्कन पवार यांचा आहे. तो आम्ही परत केला असून अद्याप पावेतो आमच्या नावाचा धनादेश प्राप्त झालेला नाही.
 पंडित गुरव मयत अनिलचे वडील




सोमवार, २ एप्रिल, २०१८

रूग्णवाहिका कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र विमा काढणे गरजेचे

रुग्णवाहिकेवरील चालकाच्या मृत्यूनंतर कुटूंबियांची थट्टा भारत विकास गृपतर्फे आठ हजाराची आर्थिक मदत
दिवस असो की रात्र, पाऊस असो अथवा वादळ वारा मात्र कसलीही पर्वा न करता कठीण परिस्थितीतही वेळेवर रूग्णवाहिका रूग्णालयापर्यंत पोहचवुन असंख्य रूग्णांचे जीव वाचविणाऱ्या रूग्णवाहिकेवरील चालकाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर मात्र त्याच्या कुटूंबियांची थट्टा करण्यात आली आहे. तळोदा येथील वाहन चालक अनिल गुरव याचा रूग्णवाहिका दुरूस्त करून येत असतांना दोंडाईचा जवळील धावडे गावाजवळ अपघात घडला. आणि यात काळाने घाला घालत अनिलसह दोघांचा मृत्यू झाला.अनिलच्या मृत्यूनंतर मात्र भारत विकास गृपतर्फे अवघ्या आठ हजाराची मदत देवून थट्टाच करण्यात आली आहे. . तळोदा येथील अनिल पंडीत गुरव हे गेल्या आठ वर्षांपासुन भारत विकास गृप कंपनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवर चालक म्हणुन कार्यरत होते. अनिल गुरव अनेक रूग्णांसाठी देवदूत ठरले. मात्र नियतीचा खेळ कोणालाही समजत नाही. काळाने घाला घातला आणि गेल्या आठवड्यात धुळ्याहून रूग्णवाहिका दुरूस्ती करून आणत असतांना दोंडाईचानजीक धावडे गावाजवळ ट्रकने रूग्णवाहिकेला धडक दिल्याने भिषण अपघात घडला. आणि यातच अनिल गुरव यांच्यासह त्यांचे मित्र भिकन बापु पवार (रा.तामसवाडी) व अल्ला रखा मक्राणी (अक्कलकुवा) यांचा मृत्यू झाला. अनिल गुरव यांनी तळोदा, धडगाव, अक्कलकुवा, मोलगीसह परिसरातील रूग्णांची सेवा केली आहे. नेहमी रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी आटापिटा करणाऱ्या अनिलचाच मृत्यदेह रूग्णवाहिकेतून घरी पोहचल्यावर मात्र त्याच्या कुटूंबियांचा आक्रोश हृदय हेलवणारा होता. अनिलचा मृतदेह पाहुन सर्वांनी एकच टाहो फोडला. अनिल गुरव यांची परिस्थिती बेताची असून वडील पंडीत गुरव शहरातील हनुमान मंदिर बाहेरच फुलांची दुकान लावतात. चार भावंडांपैकी अनिल तिसऱ्या क्रमांकाचा असून वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षीच घरातील कर्ता मुलगा हरपल्याने अनिलच्या कुटंूबियांवर दुख:चा डोंगर कोसळला. अनिलचे मोठे बंधु आदिवासी प्रकल्पात रोजंदारीवर कार्यरत आहेत. तर दुसरा भाऊ वडीलांना दुकानावर मदत करतो व अनिलचा
 लहान भाऊ पतपेढीचे दैनिक बचत खाते गोळा करतो. अनिल गुरव यांची परिस्थिती बेताची असल्याने अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. मित्र परिवार, नातेवाईक, सगेसोयरे सर्वच अनिल गुरव यांच्या कुटूंबियांच्या दुख:त सहभागी झाले. मात्र आठ वर्ष ज्या कंपनीचे वाहन अनिल प्रामाणिकपणे हाकले, रात्रंदिवस रूग्णांची सेवा हेच आद्य कर्तव्य मानले. त्याच कंपनीने कृतघ्नता दाखवत अवघी आठ हजारांची आर्थिक मदत करून त्याच्या कुटूंबियांची थट्टाच केली आहे. सदर लाजिरवाणा प्रकार पाहून पंडित गुरव यांनी आर्थिक मदत नाकारली. . रूग्णवाहिकेत रूग्णासोबत असणाऱ्या नर्स, वाहन चालकांचे कंपनीकडून स्वतंत्र विमा काढणे आवश्यक आहे. तसेच अपघात घडल्यास भरीव आर्थिक मदत करणेही गरजेचे आहे. यामुळे कंपनीने मयत अनिलच्या कुटूंबियांची थट्टा न करता भरीव आर्थिक मदत देवून भक्कम आधार देण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे..











रविवार, १ एप्रिल, २०१८

तळोद्याचे माजी उपनराध्यक्ष छबुलाल परदेशी यांचे निधन

तळोदा शहरातील भाजी व्यापारी तसेच माजी उपनगरअध्यक्ष छबुलाल ताराचंद परदेशी यांचे काल निधन झाले. यांच्यावर मागील दीड महिन्यापासून सुरत व नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दि.३१ मार्च रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. एका संघर्ष मुर्तीच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.. तळोदा शहरासह तालुक्यात सर्वाना परिचित असलेले छबुलाल परदेशी स्पष्ट वक्ता, विनोदी स्वभाव, उदार मन, मदत करण्याची धडपड, शेतकऱ्यांना आडद दुकानात चांगला भाव मिळावा म्हणून सदैव प्रयत्नशील असलेले, गोर गरिबांचा मदतीला धावून जाणारे व्यक्तमत्व. वडील ताराचंद परदेशी यांच्या आडत दुकानापासून छबुलाल परदेशींनी व्यवसायासह राजकाणाचेही धडे घेतले. शहरात परदेशी समाज हा अल्पसंख्याक असताना देखील केवळ मदत आणि संपर्काच्या जोरावर सर्वांशी कौटुंबिक नाते निर्माण केले. सन.१९८७ साली वयाच्या १९ व्या वर्षी नगरसेवक म्हणून उमेदवारी केली व निवडून आले. कणखरपणा, विकासाचे धोरण, सुस्वभाव या जोरावर पुढील १९९१-९२ वेळी पंचवार्षिक निवडणुकीत विजयी होवून उपनगराध्यक्ष झाले. त्यानंतर विकासाचा ध्यास बाळगून छबुलाल काका यांनी पत्नीस राजकारणात आणुन नगरसेविका केले. परदेशी कुटुंबीयाच्या समाजकारणाच्या जोरावर त्यांचा मुलगा अजय परदेशी तीनवेळा नगरसेवक व आता लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आहेत. कधीही बडेजाव न मिरवीत गावात कोणत्याही पानाच्या ठेल्यावर मित्र परिवारात सहज रमणारे, छबुलाल परदेशी यांना मागील काळात कर्करोगाने पछाडले. नाशिक, मुंबई, सुरत नंदुरबार अश्या ठिकाणी उपचार सुरु होते. सात वर्षे कर्करोगाशी झुंज देत अखेर काल (दि.३१ मार्च) रोजी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. त्यांच्यावर शहरातील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरीकांसह लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी व व्यापारी विजय परदेशी यांचे वडील होत..