Breking News

गुरुवार, ३० मार्च, २०१७

बोगस डॉक्टर शोध मोहीम

डॉक्टराची पथकासोबत हुज्जत आणि मंत्र्यांना दुरध्वनी!

धमकी दिल्याने पथक फिरले माघारीबोरद : बोगस डॉक्टर शोध मोहीमेंतर्गत आलेल्या पथकासोबत संबधित डॉक्टरने घातलेली हुज्जत व एका मंत्र्यांशी दुरध्वनीवरुन संवाद साधल्याने पथकाला कारवाई न करता खाली हात परतावे लागल्याची घटना बोरद गावात एकच चर्चेचा विषय ठरली आहे. या डॉक्टर महाशयांनी चक्क पथकालाच त्यांच्या कुंडल्या बाहेर काढण्याचे दिलेले आव्हानाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या डॉक्टर विरोधात अहवाल तयार करुन वरिष्ठांना सादर करण्याची माहिती देणारे पथकाने गुन्हा दाखल करण्याची हिंमत का दाखविली नाही याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या माहीमेंतर्गत ठिकठिकाणाहून बोगस डॉक्टर आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. तळोदा शहरात देखील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून यामुळे अनेकांनी आपला गाशा गुंडाळत पलायन केले आहे. जिल्हयाभरात चार-पाच बोगस डॉक्टरांवर भरारी पथकाने कारवाई केली आहे. तळोदा तालुक्यातील पथकाने ग्रामीण भागात आपला मोर्चा वळविला आहे. काल बुधवारी तालुक्यातील बोरद गावात पथकाने भेट देवून तपासणी मोहीम राबविली. गावातील एका खाजगी दवाखान्यास पथकाने भेट देऊन संबंधित डॉक्टराकडून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्राची मागणी केली. सदर डॉक्टराकडे बीईएमएसची एलक्ट्रोपॅथीची असलेली पदवी प्रमाणपत्र पथकातील अधिकार्‍यांना दाखविले. पथकाने दवाखान्याची तपासणी केली असता डॉक्टर अलोपॅथिक व्यवसाय करीत असल्याचे पथकाच्या
निदर्शनास आले. दवाखान्यात प्रतिज्योतीची सलाईन, इंजेक्शन आदींसह अलोपॅथीची औषधी आढळून आली. पथकाने अँलोपॅथीची पदवी नसतांना औषधी बाळगणे व रुग्णांवर उपचार करणे कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगत याबाबत विचारणा संबधित डॉक्टरला तंबी दिली. मात्र, संबंधित डॉक्टर हा आलेल्या पथकावर चांगलाच भारी पडला. रुग्णांची सेवा न करता शासनाच्या गलेलठ्ठ पगार घेऊन लाखोंच्या बंगल्यात राहणार्‍या डॉक्टरांनी फक्त माझ्यावर गुन्हे दाखल करुन दाखवावेत, संबंधीताच्या सर्व कुंडल्या मी उघडून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही! असे गावकर्‍यांसमोर खुले आव्हान दिले. संबंधित डॉक्टरने पथकातील अधिकार्‍यांशी चांगलीच हुज्जत घालत अनेकवेळा बोरद रुग्णालयात रात्री-बेरात्री गरोदर मातेचे बाळंतपण करण्यास मला या पथकातीलच एका अधिकार्‍याने बोलविले आहे, त्यावेळी माझी पदवी नाही पाहीली का? असा प्रती सवाल आलेल्या पथकास संबंधीत डॉक्टराने विचारल्याने पथकातील अधिकारी निशब्ध झाले. बोरद गावातील रुगणालाय निष्क्रिय असल्याचा आरोप या डॉक्टरने यावेळी केला. मी येथे राहून रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचे काम करीत असून अनेकांचे प्राण वाचविले आहेत, असे सांगितले. यामुळे पथकातील अधिकारी व संबधित डॉक्टरामधील वाद चांगलाच वाढला. दरम्यान, संबंधीत डॉक्टरने संघटनेच्या अध्यक्षांशी संपर्क साधला असता त्यावर जिल्हाध्यक्षांनी पथकास योग्य ते सहकार्य करण्याचे आदेश संबधित डॉक्टरला दिल्याचे समजते. मात्र, मला संघटनेची गरज नाही मी सक्षम असल्याचे सांगत तात्काळ एका केंद्रीय मंत्र्यांना फोन करुन संबंधीत पथक हे मला त्रास देत असल्याची माहिती दिल्याचे प्रत्यक्षदश्रींनी सांगितले. संबंधित डॉक्टराने दिलेली धमकी व मंत्र्यांशी केलेल्या वार्तालापामुळे पथकाने काढता पाय घेतल्याचे समजते. संबंधीत बोगस डॉक्टराबाबत अहवाल तयार करुन तो वरीष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे पथकातील अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र या घटनेनंतर मंत्र्यांशी संपर्क असणारा डॉक्टर कोण? त्याला संबंधीत पथकाच्या कुठल्या कुंडल्या माहित असाव्यात? याबाबत बोरद गावासह तालुक्यात चर्चा सुरु आहे. वरिष्ठांनी नियुक्त केलेल्या पथकातील अधिकारी व संबंधीत डॉक्टरांची चौकशी करावी, अशी मागणी गावकर्‍यांनी केली आहे.


बुधवार, २९ मार्च, २०१७

समाजमन गहिवरले अन् राहूल मृत्यूच्या दाढेतून परतला!

तळोदयातून 51 हजाराची मदत----
 समाजशक्तीमध्ये किती ताकद असते याचा प्रत्यय वारंवार येत असतो. संघटीतपणे केलेल्या कामाचे निश्‍चितच चांगले फलित येत असते. याच सामाजिक कामाचा अनुभव पारोळा तालुक्यातील देवगाव येथील एका कुटुंबाने घेतला. मोठय़ा भावाचे प्राण वाचविण्यासाठी लहान भावाने गळ्यात झोळी बांधुन भिक मागीतली. समाजमन धावले यानी मृत्यूच्या दाढेतील राहुलला बाहेर आणल्याची घटना घडली. तर 'त्या' युवकाच्या बाबतीत 'देव तारी त्याला कोण मारी' याचा अनुभव त्याचा कुटुंबियांनी घेतला. याबाबत सविस्तर माहिती अशी की. पारोळा तालुक्यातील देवगांव येथील मजूर कुटुंबातील राहुल मराठे (वय १५) यास देवीचा (गौर) आजार झाला. यामुळे त्याच्या डोक्यात ताप शिरला व त्यास प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला. त्यास उठताच चक्कर येवू लागल्याने त्यास उभे राहणेही शक्य होत नव्हते. त्याचे वडील नितीन मराठे यांनी त्याला तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे दाखल केले. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने त्यास पारोळा तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, उलट आजाराला वेगवेगळे फाटे फुटू लागले. राहुलची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक बनत होती. त्यामुळे त्याला तात्काळ धुळे जिल्हा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. धुळे येथे राहुलवर डॉक्टरांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रकृतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. राहुलचे वडील नितीन मराठे यांची अतिशय बिकट परिस्थिती. मोलमजूरी करुन कुटुंबाचा गाडा चालवित असतांना मुलगा राहुल याचा जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होते. प्रयत्न करूनही पैशांअभावी ते अडले होते. डॉक्टरांनी राहुल यास अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, आमचे प्रयत्न सुरु आहेत. ७२ तासात प्रकृतीत सुधारणा झाली तर ठिक नाहीतर आमच्या हातात काही नाही, असे सांगितल्याने नितीन मराठे पूर्णता खचले. आता देवच राहूलला वाचवू शकतो, अशी भावना होवून कुटुंबीय, नातलाग, मित्र, हितचिंतकांनी देवाना साकडे घातले. पैशांचे सोंग घेता येत नाही असे आपण नेहमी म्हणतो. त्यातच अतिदक्षता विभागातील राहुलच्या उपचारासाठी दररोज हजारो रुपयांची आवश्यकता. त्यामुळे मृत्यूशी झुंज देणार्‍या मुलाचे प्राण कसे वाचतील या विवंचनेत मराठे कुटुंब होते. पैशांची जुळवाजुळव करूनही आवश्यक पैसा उपलब्ध होत नव्हता. नातलगांकडे हात पुढे केले, जवळच्यांनी काही प्रमाणात साथ दिली. शेवटी लहान मुलगा रोहित याच्या गळ्यात झोळी बांधून नितीन मराठे यांनी मुलाच्या उपचारासाठी दान मागण्याचा निर्णय घेतला. आपल्या मोठा भाऊचे प्राण वाचावेत यासाठी रोहितने गळ्यात झोळी घेवून परिसरातील देवगाव, तामसवाडी, मुंदाने, पिंपरी, उंदीरखेडा, शेवंगे, हनमंतखेडे, शिवरे आदी आसपासचे खेड्यापाड्यातून झोळी पुढे करत भीक मागितली. मोठय़ा भावाचे प्राण वाचविण्यासाठी अनवानी झोळी घेवून फिरणार्‍या रोहितला पाहून अनेकांचे मन हेलावले. त्याला अनेकांनी आपापल्या परीने मदत दिली. तसेच नितीन मराठे यांचे तळोदा येथील काका शांताराम मराठे यांचे दोन्ही मुले योगेश मराठे व सुधाकर मराठे यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने नितीन मराठे यांना मदतीचा हात दिला. राहुलच्या उपचारासाठी आवश्यक पैसा जमा झाला. देवाची कृपा, डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न आणि माणुसकीच्या सामाजिक बांधलकीतून राहुलवर उपचार होवू लागल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. आठ दिवस अतिदक्षता विभागात अखेरच्या घटका मोजणारा राहुल मृत्युच्या दाढेतून परत आला. शेवटी देव तारी त्याला कोण मारी या उक्तीचा प्रत्यय राहुलबाबत आला. राहूलला जीवदान देण्यात धुळे रुग्णालयात डॉ.जगदिश पाखरे, डॉ.जयवंत देवरे, डॉ.विलास वाडीवाले, सचिन ढोले, डॉ.सुनिल पगारे, डॉ.राजेश शहा, डॉ.महेश अहिरराव, डॉ.योगेश साळुंखे, डॉ.संदिप जोशी यांच्यासह नितीन मराठेंचे बंधू ज्ञानेश्‍वर मराठे, काका राजाराम मराठे, आनंदा मराठे, छगन मराठे, देविदास मराठे, जगदिश रगडे यांनी दरम्यानच्या काळात प्रचंड मेहनत घेतली. या सर्वांच्या मेहनतीनेच राहुल पुन्हा जग पाहात असल्याची भावना त्याचे वडील नितीन मराठेंनी 'पुण्यनगरी'शी बोलतांना व्यक्त केली....








तळोदा पालिकेची मोहीम : कर वसुलीसाठी नागरिकांचा प्रतिसाद

थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल-ताशांचा गजर! 
तळोदा पालिकेची करवसूलीसाठी पालिका विविध क्लुप्ती वापरतांना दिसून येत आहे. मालमत्ता व इतर कर वसूलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून वसूली करण्यात येत आहे. घरासमोर ढोल वाजत असल्याने मालमत्ताधारक आलेल्या पथकाकडे कराचा भरणा करीत आहे. यामुळे पालिकेच्या या क्लुप्तीमुळे वसूलीला प्रतिसाद मिळत आहे. मार्च ऐंडींगमुळे सर्वच विभागांनी वसूली मोहीम हाती घेतली आहे. सर्वाधिक मालमत्ताधारकांकडे पालिकेची कर थकीत आहे. वारंवार नोटीसा बजावून नागरीकांनी कर न भरल्याने आता विविध क्लुप्ती वापरुन वसुलीवर भर दिला जात आहे. शुक्रवारी सकाळपासून शहरातील विविध भागात ढोलचा आवाज घुमू लागला. यामुळे कोणाकडे कार्यक्रम आहे का हे पाहण्यासाठी नागरीक बाहेर येवू लागले. मात्र, ही वाजंत्री कार्यक्रमाची नसून थकबाकीदाराच्या घरापुढे वसूलीसाठी वाजविण्यात येत असल्याने एकच चर्चा सुरु झाली. पालिकेच्या या नवीन वसूलीच्या क्लुप्तीमुळे थकबाकीदार स्वताहून पैसे काढुन देत असल्याचे दिसून आले. यामुळे बर्‍यापैकी करवसूली झाल्याची माहिती पथकाने दिली. शहरातील अनेकांकडे विविध करांची मोठी थकबाकी आहे. वारंवार सूचना, नोटीस देऊनही कर भरण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यामुळे कर वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर पथक ढोल वाजवून वसूलीची नामी शक्कल लढविली आहे. मुख्याधिकारी जनार्दन पवार, वसुलीप्रमुख राजेंद्र पाडवी यांच्यासह पथकातील कर्मचारी कर वसूलीसाठी प्रयतम्न करीत आहेत. १५-२0 जणांचे पथक, घरासमोर वाजणारी वाजंत्री यामुळे थकबाकीदार कर भरणा करीत आहेत. या वसुली पथकात राजेंद्र सैंदाने, विजय सोनवणो, सुनील माळी, राजेंद्र माळी, मनोज परदेशी, दिगंबर माळी, नितीन शिरसाठ, गणोश गावित, दिलीप वसावे, मोहन माळी, अश्‍विन परदेशी, अनिल माळी, राजेंद्र माळी याचा सामावेश आहे. शहरात ७७ थकबाकीदारांकडे एक कोटी २0 लाख कराची थकबाकी आहे. यापैकी ५0 लाखाची वसूली झाली असल्याची माहिती राजेंद्र पाडवी यांनी दिली.

शंभर टक्के वसुलीचे शासन आदेश आहेत. थकबाकीदारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. अनेक थकबाकीदार पालिकेत येऊन थकबाकी जमा करीत आहेत. काही थकबाकीदार टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवून वसूली केली जात आहे. कराची थकबाकी न भरणार्‍यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. - जनार्दन पवार मुख्याधिकारी तळोदा






वनरक्षक सुरेश देसलेंचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

तळोदा येथील वनविभागातील सेवेच्या माध्यमातून वन संरक्षण व वन्यजीव संरक्षणच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य सेवा केल्याबद्दल सोमावल येथील वनरक्षक सुरेश देसले यांच्या कार्याची दखल घेत राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्णपदक देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. मुंबई येथील मंत्रालयात कार्यक्रम झाला. याप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव महाराष्ट राज्य सुमित माणिक, विकास खार्गे, सचिव वने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. वनसंपत्ती संरक्षक व संवर्धनाचे काम प्रभावीपणे करणार्‍या वनअधिकारी व कर्मचार्‍यांचे मनोधेर्य वाढविण्यासाठी राज्यस्तरावरुन पुरस्कार देण्यात आला. यात तळोदा तालुक्यातील सोमावल येथील वनरक्षक सुरेश देसले यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना उत्कृष्ट वनरक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसा प्रस्ताव तळोद्याचे वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांनी त्यांच्या कार्याची दखल घेवून प्रशासनाकडे पाठविला होता. वनरक्षक सुरेश देसले यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. देसले हे वनविभागात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल वनक्षेत्रपाल अशोक पाटील, सहाय्यक वनरक्षक बी.एन.पिंगळे आदींनी त्यांचे कौतूक केले आहे.

सुरेश देसले यांनी या पूर्वी ओघनी वनक्षेत्र खापर तालुका अक्कलकुवा येथे काम केलं असून तळोदा वनक्षेत्रात आमोनी, अरेठी वनक्षेत्रात, उत्कृष्ट काम केलं आहे, विविध प्रशिक्षण सहभाग तसेच वनसरंक्षक व गुन्हा कामी वन वणवा नियंत्रण, वृक्ष लागवड श्रमदानातून वन्यपशु व पक्षी यांच्याकरिता कार्य मानव व वन्यप्राणी संघर्ष व सहउपाय योजना केल्या आहेत, तसेच सुरेश देसले यांनी विविध जागतिक स्तरावर दुर्मिळ झालेल्या प्राण्यांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले आहे. गिधाड पक्षी जखमी अवस्थेत वाल्हेरी नदीतून सुखरुप बाहेर काढून त्यांना जीवदान दिले. गुजरात राज्यहद्दीत सापडलेल्या दुर्मिळ स्टार प्रजातीचा कासवास सुखरूप वरिष्ठ मार्गदर्शन खाली गुजरात वनविभागाचा हवाली केले. सिलिंगपूर वनक्षेत्रात मृत तरस आढल्याने त्याची वरिष्ठच्या मार्गदर्शन खाली नियमानुसार अंत्यसंस्कार केले. तसेच शालेय विद्यार्थी व कर्मचारी ग्रामस्थ यांचा मदतीने वन्यप्राणी साठी छोटे बांधारे तयार केलं आहेत.




मंगळवार, २८ मार्च, २०१७

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या टाकली येथील अभ्यास दौरा....

तळोदा मेवासी वनविभागामार्फत पत्रकार करिता अभ्यास दौऱ्याचे आयोजन सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलता टाकली या छोट्याश्या गावाच्या एका नर्सरीत करण्यात आले होते. निसर्गाच्या विविध छटाचे सुंदर नयनरम्य
देखावे याठिकाणी दृष्टीस पडले, नर्सरीच्या मागच्या बाजूला सुंदरशी नदी वाहत होती. उन्हाचा पारा चढत असला तरी परिसर अतिशय थंड वाटत होता. नदीच्या किनारी येथील लहान बालके आपल्याच जगात रमली होती. सातपुडा परिसरात रस्ता कोंक्रेटीकरणांचे कामे होताना पाहून आपणही अभियंता व्हावे, सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्या पावेतो पोहचण्यासाठी कोंक्रेटीचा रस्ता व्हावे हाच विचार या निरागस बालकांच्या मनात असावा, याच हेतूने खेळाच्या रुपात का असेना नदीच्या काठेला बसुन बालकांचा रस्ते बनविण्याचा खेळ तेथे पाहावयास मिळाला, बालकांच्या खेळण्यातच त्यांची जिज्ञासा दिसत होती. पुढे जाऊन सार्वजनिक बांधकामाला चांगले अभियंता सातपुड्याच्या पायथ्यातून प्राप्त होऊ शकतात यात काही शँका नाही. मात्र सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात रस्ते निर्माण व्हावे ही या बालकांसह अनेकांची इच्छा आजही अतृप्तच आहे. वनविभागाचे वनक्षेत्रपाल अशोक पाटील यांनी वनक्षेत्राबद्दल व विविध वन्यप्राण्याबाबत पत्रकाराना माहिती दिली.
 झाडांचे महत्व, फुलांचे महत्व आदी विविध बाबींचे पृथकरन यावेळी त्यांनी केले. त्यातच महूचे झाड, फुल व त्याचा उपयोग जाणून घेतले. पत्रकार संघातील जेष्ठ पत्रकार, तरुण पत्रकार, आदींनी आपले विविध अनुभवांची देवाण घेवाण येथे केली. पत्रकार मंडळी जुन्या आठवणीत चांगली रमली होती. उन्हाळाचे दिवस असले, पाण्याची पातळी खालावत जरी असली तरी, पाण्याचे प्रमाण या परिसरात बऱ्यापैकी दिसत होते. ठिकठिकाणी वनविभागाकडुन या परिसरात कुत्रीम वन बंधारे बांधण्यात आले आहेत. नक्कीच परिसरात वनप्राण्यांची संख्या चांगली असणार यावरून ते लक्षात येते. वनविभागाकडून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातुन वनप्राण्यांसह आसपासच्या अनेक शेतकऱ्याना त्याचा फायदा होतो. टाकली येथे सुंदर असा धबदबा आहे. सध्या तेथे पाणी नसले तरी त्यांची खोली वरून त्याच्या प्रभाव हा लक्षात येतो. आसपासच्या परिसर फिरून झाल्यानंतर तेथील मजूर व वनरक्षक यांनी पारंपारिक पद्धतीमध्ये आणि अगदी चुलीवर बनविलेल्या जेवणाची चव अशी दुय्यम उत्तम सुविधा येथे करण्यात आली होती. बदलत्या काळा नुसार प्रत्येकाची जीवन शैली बदलली आहे, शहराच्या विकासातून चूल जणू लुप्तच झाली आहे. चुलीवरचे जेवण सोबत पारंपारिक चव अशी आगळी वेगळी मांसाहाराची मेजवानी याठिकाणी करायला मिळाली. झणझणीत कोंबडी आणि रस्सा भाकरी बरोबर हुर्पायची मज्जाच या निसर्गरम्य वातावरणात काही वेगळीच आहे.