Breking News

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

तळोद्यात सफाई कामगारांना मास्क वाटप

शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्­यात येण्याच्या शक्यतेने प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व संदीप परदेशी यांनी सफाई कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले. . तळोदा शहरात दररोज घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येते. नागरिक रोजच्या-रोज कचरा टाकत नसून तो घरात साठवून ठेवतात. त्यामध्ये, शरीराला घातक किडे, मुंग्या, अळ्या, माश्­या तयार होतात. कर्मचारी मोजे किंवा मास्क न घालताच हॉटेल व्यवसायिक तसेच नागरिकांनी दिलेला कचरा वाहनांमध्ये बसून वेगळा करतात. शहरात अनेकवेळा कुत्रे,डुक्करे आदी प्राणी मृत्यूमुखी पडून कुजतात. दरम्यान कचऱ्यामध्ये काम करतांना कामगारांनी सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक असते. परंतु ठेकेदारांकडून अशीे साधने उपलब्ध केली जात नसल्याने प्रभाग क्र.२ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी व त्यांचे पती युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांनी सफाई कामगारांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांना मास्क वाटप केले. तर यापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. मात्र कर्मचारी ते वापरत नसल्याचे आढळून आले आहे. सदर बाब आरोग्याच्या दृष्टीने घ.ातक असल्याबाबत त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवित नसल्याने ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. .

अटी शर्ती प्रमाणे कामे करणे मक्तेदारावर बंधनकारक आहे. आरोग्याच्या दृष्टीने सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे व मास्क पुरविणे बंधनकारक आहे. संबधित ठेकेदाराला याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.. -जनार्दन पवार, मुख्याधिकारी. 

आणि फसवणूक होता होता टळली!

सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी मॅग्नेटिक ्ट्रिरप असलेले जूने एटीएम कार्ड कालबाह्य ठरवून त्याऐवजी नवीन चिप एटीएम कार्ड ग्राहकांना बंधनकारक केले आहे. याचा फायदा चोरटे घेत असून नागरिकांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून जुन्या, नवीन एटीएम कार्ड वरील सोळा डीजीट क्रमांक व पिनकोड मागून ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचा प्रयत्न करीत आहे. काल एका मुख्याध्यापकाच्या सतर्कतेमुळे भामट्याचा प्रयत्न फसला असून याबाबत तळोदा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. . राष्ट्रीयकृत बँकांना जूने एटीएम कार्ड बदलून नवीन चीप एटीएम कार्ड बँक खातेदारांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१८ पासून जुने एटीएम कार्ड पूर्णपणे बंद झालेले आहे. सध्या नवीन चीप बेस्ड एटीएम कार्डसाठी बँकाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. जुने एटीएम कार्ड बंद होणार असल्यामुळे हजारो खातेदार नवीन कार्डसाठी बँकांमध्ये गर्दी करत आहेत. नेमकी हीच बाब काही भामट्यांनी हेरली असून बँक खातेदारांना मोबाईल फोन करून बँकेतून अधिकारी बोलत असल्याच्या भूलथापा देऊन तुमचे जुने एटीएम कार्ड आता रद्द होणार आहे. नवीन चिप बेस्ड एटीएम कार्ड घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तुमच्या १६ अंकी डिजिट नंबर आणि कोड सांगा अशी विचारणा करीत आहेत. बँकांनी नवीन चिप बेस्ड एटीएम कार्ड अनिवार्य केल्यामुळे नागरिकही त्या भामट्याने बोलण्यावर विश्वास देऊन गोपनीय माहिती देऊन टाकतात. यातच फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. तळोदा येथील शेठ के.डी. हायस्कूलचे मुख्यध्यापक दिलीप गिरनार यांना काल बँकेतून बोलत असल्याचा फोन आला आणि संबंधिताने भूलथापा देऊन माहिती मागितली. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे गिरणार यांना समजले व त्यांनी त्या भामट्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी देताच त्याने फोन कट केला. याबाबत गिरणार यांनी तळोदा पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे..

शनिवार, ५ जानेवारी, २०१९

अवजड वाहनांमुळे तळोदा शहरात अपघाताचा धोका वाढला

सूरळीत वाहतुकीसाठी बायपास मार्ग अवलंबावा ; पोलिसांनी वाहतूक शिस्तीसाठी पावले उचलणे गरजेचे
तळोदा शहराची बेशिस्त वाहतूक व्यवस्था चर्चेत आली आहे. याबाबत दै.पुण्यनगरीच्या माध्यमातून वेळोवेळी परिस्थिती सहचित्र मांडण्यात येत आहे. यानंतर पोलिस प्रशासनाकडून वाहतूक शिस्तीसाठी थातूरमातूर कारवाई करण्यात आली.त्या कारवाईतही दुजाभाव केला जात असल्याचा आरोप वाहनधारक करीत आहेत. वहतूकीच्या उपाययोजनेबाबत पोलिस प्रशासन अजूनही फारसे गंभीर दिसून येत नाही. आजही शहरात फॅन्सी नंबर प्लेट असलेले वाहने सुसाट धावत आहेत. बेशिस्त वाहनधारक वाहने भर रस्त्यात उभी करत आहेत. ट्रिपल सीट्स वाहने हाकण्यास जणू पोलिसांनीच परवाना दिला आहे. अल्पवयीन मुले बिनधास्त वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने हाकत आहेत. सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू आहे. ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली व बैलगाड्यांची वर्दळ शहरात वाढली आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने शहरातूनच जात असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. बऱ्याचदा रस्त्यावरील गतिरोधक ओलांडताना उसाने भरलेली वाहने अक्षरश: उभी राहतात. जीवघेणी कसरत करत वाहने शहरातून नेली जात आहेत. परिणामी भरलेले वाहने पडण्याची शक्यता निर्माण होत असून ट्रॉलीतून रस्त्यावर ऊसाच्या मुळ्या पडणे, रस्त्यावर पंक्चर होणे यासारखे प्रकार घडत आहेत. ट्रॅक्टरला एकच हेडलाईट असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते. अनेक ट्रॅक्टरला नंबर नसणे, नवीन ट्राली आरटीओकडे नोंदणी न करता वाहतुकीसाठी खुलेआमपणे वापरली जात आहेत. काही वाहनांना तर परवाना नसतो. या नियमबाह्य बाबींकडे पोलिस प्रशासनासह आरटीओंचे देखील दर्लक्ष आहे. यामुळे कसलीच तमा न बाळगता वाहने वेगात चालवणे, रस्त्यावर कुठेही कधीही, कशीही उभे करणे असे प्रकार होताना दिसून येत आहेत. त्यामुळे इतर वाहनधारक, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. वाहतुकीला शिस्त लागण्याबरोबरच चालकांनी सतर्क राहणे गरजेचे बनले आहे. वाहनाला रिफ्लेक्टर लावले आहेत का, वेग मर्यादेचे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज वाढवत आहे का ? यासारख्या बाबींचीही तपासणी करणे गरजेचे झाले आहे. यामुळे वाहतूक शिस्त आजच्या घडीला वाहतूक पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असून ठोण पावले उचलणे गरजेचे झाले आहे..

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

नवीन वर्षाचे औचित्य साधत आ.पाडवींची डॉ.वाणींशी दिलजमाई

तळोदा पालिका निवडणूकीप्रसंगी भाजपामध्ये आपापसांत राजकीय मतभेद निर्माण होवून आ.उदेसिंग पाडवी डॉ.शशिकांत वाणी यांच्यात काहीसा दूरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आ.उदेसिंग पाडवी यांनी थेट डॉ.शशिकांत वाणी यांचे निवासस्थान गाठून शुभेच्छा दिल्याने मतभेदाची चर्चा थांबली असून यावर पडदा पडला आहे. याबाबत राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे.. भाजपाच्या सत्ता स्थापनेसाठी खांद्याला खांदा लावून तळोदा-शहादा विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे दोघा दिग्गज नेत्यांमध्ये डिसेंबरमध्ये झालेल्या तळोदा पालिकेच्या निवडणूकीपासून काहीसा दूरावा निर्माण झाला होता. पालिका निवडणुकीत डॉ.शशिकांत वाणी यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु ऐनवेळी डॉ.वाणी यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच डॉ.वाणींचे समर्थक असणाऱ्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती. यावेळी डॉ.वाणी पालिका निवडणूकीपासून दूर राहिले होते. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आल्याने डॉ.वाणींची नाराजी होती. डॉ.वाणी यांच्या गटाची नाराजी व निवडणुकीत तटस्थ राहण्याच्या पार्श्वभूमीवर आ.उदेसिंग पाडवी यांनी तळोदा पालिकेत भाजपची सत्ता आली नाही तर या पुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. तळोदा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवत एकहाती सत्तांतर घडवून आणले होते. तेव्हापासून तळोदा भाजपमध्ये डॉ.वाणी व आ.उदेसिंग पाडवी यांचे वेगवेगळे गट निर्माण झाले होते. डॉ.वाणी हे मार्केट कमिटीच्या सतत तीन बैठकांना गैरहजर असल्याचे कारण देऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. नोटीसचे प्रतिउत्तर न दिल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा ठराव सभापती तथा आ.पाडवी यांनी केला होता.. त्याचे उत्तर देत डॉ.वाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन कायदेशीर संधी न देता पूर्वग्रहदूषित व आकसापोटी कारवाई केल्याने तळोदा कृऊबा समितीचा अर्ज फेटाळल्याबाबत माहिती दिली होती. अश्या विविध कारणांमुळे दूरावा वाढत जावुन दोन गट निर्माण झाले होते. वरिष्ठांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यावेळी यश आले नाही. मात्र भाजपा तालुका अध्यक्ष श्याम राजपूत व शहादा तालुका अध्यक्ष किशोर पाटील यांच्या शिष्टाईने केलेल्या सतत प्रयत्नाने दोघे गटांमध्ये समेट घालण्यात यश आले. दरम्यान नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता व वाणी समाजरत्न पुरस्कारानंतर शुभेच्छा देण्यासाठी चक्क आ.पाडवी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत डॉ.वाणींचे निवासस्थान गाठले व शुभेच्छा दिल्या. यावेळी आनंद सोनार, विश्वनाथ कलाल, महेंद्र गाढे आदी उपस्थित होते. आता मात्र नवीन वर्षाचे औचित्य साधून स्वत: आमदारांनी एक पाऊल पुढे टाकत हा दुरावा दूर करण्यासाठी हात पुढे केला आहे. यामुळे आगामी काळात ही सदिच्छा भेट येणाऱ्या वर्षात पक्षासाठी संघटन म्हणून किती उपयुक्त ठरते हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे..


मंगळवार, १ जानेवारी, २०१९

क्षयरूग्णांची संख्या दोन वर्षात नऊशेने वाढली

२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह ; गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना आवश्यक
 क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासन यासाठी पराकोटीचे प्रयत्न करित आहे. असे असले तरी नंदुरबार जिल्ह्यात मात्र क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षात अपूर्ण मनुष्यबळ, व सोयीसुविधांचा अभावामुळे जिल्ह्यात क्षयरूग्णांची संख्या तब्बल नऊशेने वाढली आहे.एकीकडे रूग्णसंख्या वाढत असतांना उपचार करून घेणाऱ्यांच्या प्रमाणात मात्र कमालीची घट झाली आहे.. नंदुरबार जिल्ह्यात क्षयरोग असणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून यामुळे क्षयरोग रोखण्यासाठी अपेक्षित यश मिळत नसल्याचे यातून दिसून येत आहे. भौगोलिक परिस्थिती, अपूर्ण मनुष्यबळ व अत्याधुनिक सुविधांअभावी क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी सेवा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. आदिवासी समाजामध्ये क्षयरोग होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. डोंगराळ भाग आणि गरिबीमुळे उपचार करण्यात अडचणी निर्माण होतात. अश्या विविध कारणांमुळे क्षयरोगावर नियंत्रण आणणे अवघड ठरत आहे. सन २०१६ मध्ये शासकीय आकडेवारीनुसार २०१४ क्षयरुग्ण, सन २०१७ मध्ये २०३० तर हेच प्रमाण तब्बल नऊशेने वाढून सन २०१८ मध्ये यंदा खाजगी व शासकीय रुग्णालयातील आकडेवारी नुसार २ हजार ९०३ इतके झाले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातून सर्वेक्षणनंतर नंदुरबार २९६, शहादा ३३०, तळोदा २८४, धडगाव १४७, खांडबारा २९९, अक्कलकुवा १९६, नवापूर २४५, मोलगी १०९ मिळून जिल्ह्यात शासकीय आकडेवारी १ हजार ९०६ तर खाजगी रुग्णालयातील ९९७ एवढी असून जिल्ह्यात एकूण २ हजार ९०३ एवढे क्षयरोगाचे रुग्ण आहेत. २०१२ पासून ते आजपावेतो २१० क्षयरोग रुग्ण हे उपचाराला दाद देत नसल्याचे आढळले असून त्यापैकी ५४ रुग्ण बरे झाले आहेत व ६४ रुग्ण सद्य:स्थितीत उपचार घेत आहेत. दरवर्षी रोजगारासाठी होणारे स्थलांतर यामुळे अनेक रुग्ण उपचार अर्धवट सोडून रोजगारासाठी गुजरातला जातात. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम राबविताना त्यांना मोफत औषध उपचार उपलब्ध करून दिला जात आहे. दोन उपचार पध्दतीने दर सहा महिन्यांनी रुग्णांची तपासणी केली जाते. तीन महिन्यांत पुन्हा रुग्णांची स्थितीची माहिती घेतली जाते. गावागावात असणाऱ्या परिचारिकांमार्फत सर्वेक्षण कार्यक्रम सुरू असतो. मात्र अपूर्ण मनुष्यबळ, एक्स-रे तंत्रज्ञाचा अभाव, स्वतंत्र इमारत नाही, नादुरुस्त एक्सरे मशीन, आदीं बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.. क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी येणाऱ्या समस्या. जिल्हा निर्मितीपासून ते आजपर्यंत जिल्हा सेवा केंद्रासाठी स्वतंत्र इमारत व स्वतंत्र एक्स-रे मशीन नाहीत, इमारतीसाठी प्रस्ताव तयार केला असून डीपीडीसी अंतर्गत मान्यतेसाठी कार्यवाही सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात येते, अनेक सरकारी रुग्णालयात एक्सरे तंत्रज्ञानाचे पद रिक्त असल्याने आठवड्यात फक्त दोन ते तीन दिवस एक्सरे काढले जातात. त्यासाठी मोबाईल एक्सरे व्हॅनची व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाअंतर्गत ३१ पदे मंजूर असून २९ पदे भरलेली आहेत. सदर सर्व पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात आलेली आहेत. त्यापैकी मोलगी क्षयरोग उपचार पथकासाठी एक प्रयोगशाळा पर्यवेक्षक व जिल्ह्यासाठी चार क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. सदर कर्मचारी अत्यंत तोकड्या मानधनावर गेल्या १८ वर्षापासून काम करीत असून त्यांना कोणता ही विमा संरक्षण दिले जात नाही.. खाजगी व शासकीय रुग्णालयात निष्पन्न झालेल्या रुग्णांना १०० टक्के उपचाराखाली घेत असून सर्वांना शासकीय योजनेचा लाभ उपलब्ध करून दिला जात आहे. अत्याधुनिक क्षयरुग्ण निष्पन्नासाठी २ मशीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त होणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.. डॉ. अभिजित गोल्हार. जिल्हा क्षयरोग अधिकारी, नंदुरबार.