Breking News

बुधवार, २४ मे, २०१७

वीज वितरणच्या सहायक अभियंत्यास शिवसेनेचा घेराव...

तळोदा शहरातील जीर्ण तारा व खांब बदलण्याची मागणी... तळोदा शहरातील जीर्ण व लोंबकळणार्‍या विद्युत तारा तसेच जीर्ण व वाकलेले खांब आणि घरांच्या जवळ असलेल्या विद्युत तारांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता वाढली आहे. वारंवार मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक अभियंता सचिन काळे यांना घेराव घालुन त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. काळे यांना मागण्यांचे निवेदन सादर करुन १५ दिवसात निवारण न झाल्याने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. तळोदा शिवसेना वीज वितरण विभागाच्या भोंगळ कामकाजाचा विरोधात आक्रमक झाली असून याबाबत त्यांनी काल सहाय्यक अभियंता सचिन काळे यांना घेराव घातला. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोदा शहरात वीज वितरण कंपनीच्या विद्युत तारांचे पसरलेले जाळे हे जीवघेणो ठरत आहे. घराच्या लोखंडी जिन्यावरुन, गॅलरीवरुन व घराच्या स्लॅबवरुन हाताने स्पर्श होईल एवढय़ा अंतरावर विद्युत लाईन टाकण्यात आल्या आहेत. स्वत:च्या मालकीचे घर असून देखील घराबाहेर गॅलरीत उभे राहणो कठीण बनले आहे. तसेच लहान बालकांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. जीर्ण तारा व घरावरुन गेलेल्या विद्युत तारांमुळे शहरात मनुष्यहानी झाल्याचे प्रकार मागे घडले आहेत. यात प्रा. हेमंत शुक्ला तर हरकलाल नगर येथे कलर काम करतांना संदीप पाडवी यांना जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच दामोदर नगर येथे विद्युत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे एका ट्रॅक्टरचे टायर पूर्णत: जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. लोंबकळणार्‍या तारांमुळे दरवर्षी शेतातील शेकडो एकर ऊस जळून खाक होत आहे. यामुळे शेतकर्‍याला आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागत आहे. नवीन वसाहतीत विद्युत तारा बदलण्याचे व नवीन पोल टाकण्याचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी चुकीचा पद्धतीने काम करण्यात येवून वीज वितरण विभाग नागरीकांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. उच्च दाबाचा पुरवठा होवून लाखोचे उपकरणो जळून खाक झाल्याच्या घटनेत वाढ झाली आहे. याबाबत अनेकदा तक्रार करुनही वीज वितरण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. तळोदा तालुका हा वीज बिल वसुलीमध्ये जिल्ह्यात आघाडीवर आहे. मात्र वीज वितरण विभागाच्या गलथान कामामुळे वीज बिले भरुन ही जनतेला जीव मुठीत घेऊन जगावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासर्व समस्यांसाठी काल शिवसेनेने सहाय्यक अभियंता यांना घेराव घातला.





गल्लीबोळातील क्रिकेट करतेय मनोरंजन!...

आयपीएलचा हंगाम व शाळांना उन्हाळयाची सुट्टी असल्याने बाल गोपालमंडळी सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहे. आयपीएलमुळे क्रिकेटचा जोर पसरल्याने गल्लोगल्लीत उन्हातान्हाची पर्वा न करता गल्ली क्रिकेटचे सामने रंगल्याचे पहावयास मिळत आहे. यावेळी करण्यात येत असलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी व अहिराणी कॉमेंट्रीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. गेल्या महिन्याभरापासून आयपीएलचे रंगलेले सामने रविवारी मुबईने फायनल जिंकल्याने संपले. टेलिव्हिजनमुळे क्रिकेटची लोकप्रियता सर्वत्र वाढली असून क्रिकेट हा लहान-मोठयांचा आवडता खेळ बनला आहे. अनेक गावांमध्ये मोठय़ा मैदानांचा वणवा आहे. त्यामुळे गल्लीतच क्रिकेट खेळण्याची हौस भागवली जाते. या गल्ली क्रिकेटमध्ये लहाण्यासोबत मोठेही सहभागी होताना दिसत आहेत. स्टंप म्हणून कधी स्टूल, सायकल, डब्बे, भिंत, मोटार सायकलीचे चाक किंवा टायर याचा वापर केला जात आहे. उंच फटका मारल्यास बाद, एक टप्पा झेल बाद, घरावर चेंडू गेल्यास बाद असे विविध नियम गल्ली क्रिकेटच्या खेळात लागू करण्यात आले आहेत. खिडक्यांची काच, येणार्‍या जाणार्‍यांना चुकवून चेंडू तुडविण्याची कला या गलली क्रिकेटमध्येच पाहावयास मिळत आहे. क्रिकेटमध्ये रस असणारे अनेक भाषेचा वापर करत कॉमेंट्रीने प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडत आहे. दुधाची तहान ताकावर का होईना भागविण्याचा हा प्रकार असल्याने सध्या सर्वत्र गल्ली क्रिकेटचे दिवस सुरू आहे. गल्लीत येणार्‍यांना चेंडू लागू नये, खिडक्यांच्या काचा फुटू नयेत याकरिता कापड, मोजाच्या चेंडू बनवून क्रिकेटचा आनंद घेतला जात आहे. टाइमपास म्हणून जरी क्रिकेट खेळत असले तरी त्यांच्यात जिंकण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहून ओट्यांवर बसलेले प्रेक्षक प्रोत्साहीत करतांना दिसून येत आहेत.









सोमवार, १५ मे, २०१७

तळोद्यात बर्फ कारखान्यात वीजचोरी

पथकाची कारवाई : मालकास साडेपाच लाखाचा दंड ......
तळोदा शहरातील एका बर्फ कारखान्यास वीज वितरणच्या भरारी पथकाने अचानक दिलेल्या भेटीत वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बर्फ कारखाना मालकास तब्बल साडेपाच लाखाचा दंड वीज वितरणने ठोठावला आहे. यामुळे वीज चोरी करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. महावितरणकडून घरगुती, व्यावसायीक व कृषीकरिता वीज पुरवठा दिला जातो. यासाठी महावितरणकडून रीतसर वीज देयक दिले जाते. वीज वापरापोटी ग्राहकांनी विद्युत देयक भरणो अपेक्षित असते. परंतु काही ग्राहक वीज देयक कमी यावे, यासाठी मीटरमध्ये तांत्रिक बदल करणो किंवा थेट विद्युत खांबावरून वीज पुरवठा घेणो आदी प्रकारातून वीज चोरी करतात. तसेच काही ग्राहक वीजेचा अनधिकृत वापर करतात. अशा ग्राहकांना चाप लावण्यासाठी महावितरणच्या भरारी पथकांकडून कारवाई करण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील औद्योगिक अथवा मोठे ग्राहकांना झिरो युनिट अथवा कमी बिल जात असल्याचे मुख्यालयाच्या निदर्शनास आल्याने जिल्हातून भरारी पथक तयार करून तालुक्यात होत असलेली वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. संबंधित पथकाने तळोदा शहरात ठिकठिकाणी जाऊन वीजचोरी बाबत तपासणी केली. शहरातील खटाई माता परिसरात कमलेश भामरे यांचा बर्फ तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यावर पथकाने अचानक धाड टाकून तपासणी केली. यावेळी थ्रीफेज लाईन असून मिटरच्या सप्लाय बायपास करण्यात आल्याचे संबंधित पथकास आढळून आले. तसेच इतर काही गोष्टींची तपासणी केली असता ठीकठिकाणी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्याने भरारी पथकाने पंचनामा करून मिटरला सील लावले. पथकाने सर्व्हिस केबल व इतर साहित्य ताब्यात घेतले. या वीजचोरी प्रकरणी संबधित कारखाना मालकास पाच लाख ४९ हजार ५६0 रुपये एवढा दंड ठोठावला आहे. बसस्थानक परिसरातील घरगुती ग्राहक गोरख गोविंद चव्हाण यांनी रिमोटच्या सहायाने वीजमिटर गोठून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना ३३ हजार ६५0 एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई भरारी पथकातील उपकार्यकारी अभियंता इंगळे, सहायक अभियंता कोष्टी व सहकार्‍यांनी केली. या कारवाईमुळे वीज चोरी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोमवार, ८ मे, २०१७

हातोडा पुलाचे उदघाटन पुन्हा ऐरणीवर!

आमदार उदेसिंग पाडवी यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तळोदा ते नंदुरबार रस्त्याला जोडणारा हतोडा पुलाचे उद्घाटन करण्याबात प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली होती. मात्र पुलाची सध्याची स्थिती पाहता पुल अध्यापही काही महिने पूर्ण होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदार पाडवी यांनी काढलेल्या पत्रकाबाबत एकच चर्चा रंगली असून हतोडा पूल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पुढाऱ्यांनी पुलाच्या श्रेय घेण्याच्या घाई करण्या ऐवजी पुलाच्या कामाला गती मिळून योग्यरीत्या काम होण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे जनतेकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. तळोदा तालुक्याच्या थेट जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या नंदूरबारशी संपर्क यावा, यासाठी तत्कालीन मंत्र्याच्या प्रमुख पुढाकाराने सन २००७ - ०८ मध्ये हातोडा पूलाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाली. तेव्हा पासूनच या पुलाचे उद्घाटन दोन मंत्र्यानी केल्याने पूल चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा सेतू म्हणून ओळखला जाणारा गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी पुलावरील भराव खचून पूल चर्चेचा विषय बनला होता. तर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार उदेसिंग पाडवी यांनी जून 2016 मध्ये पूल सुरू करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे पुल तयार होण्यास विलब झाला होता... तर सध्या पूल पूर्णतः तयार होण्यापूर्वीच आमदार उदेसिंग पाडवी यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हातोडा पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली होती. मात्र हतोडा पुलाची सध्याची स्थिती पाहता अद्याप काही महिने तरी पूलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे चित्र समोर आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला आमदार उदेसिंग पाडवी यांनी बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यासह हातोडा पुलाची पाहणी केली होती. त्यावेळी एस ३ या स्लॉब चे काम होऊन पुर्ण सेंटरिंग झाले होते व मात्र त्यावर स्लॉबसाठी क्रेन उपलब्ध नसल्याने कामाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र १५ एप्रिल पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार पाडवी व पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यांच्या आश्वासनानुसार आमदार पाडवी यांनी कोणत्याही परिस्थितीत मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात या पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस याच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार असल्याचे निश्चित झाले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रक काढून दिली होती. मात्र मे महिन्याच्या पहिला आठवडा संपायला आला, तरी हातोडा पुलाचे उदघाटन होण्याची कोणतीही चिन्हे अद्याप तरी दिसून येत नसल्याने जिल्हावासीयांच्या आशेवर पाणी फिरले आहे. महा आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्रीनी हतोडा पुला बाबत कुठलीही चर्चा, विचारणा अथवा साधी पाहणी देखील केली नसल्याने जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रामुख्याने तळोदा व धडगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या तापी नदीवर या हातोडा पुलासाठी निधी मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी निधी आणण्यासाठी प्रयत्न केलेत त्यासोबत श्रेय घेण्याची स्पर्धा राजकीय वर्तुळात अनेकदा झाली. यापुढे ही ती राहणार आहे. या स्पर्धेत मात्र प्रत्यक्षात हातोडा पुलाचे काम पूर्णत्वास आणण्यासाठी येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याची चर्चा रंगत आहे. अनेकदा या पुलाचे काम पूर्ण होऊन उद्घाटनाच्या तारखा निश्चित झाल्याचे सांगण्यात आले व प्रत्यक्षात मात्र उद्घाटनाच्या तारखेचा तो दिवस उगवलाच नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कामाचे श्रेय लाटण्याची घाई करण्याऐवजी लवकरात लवकर हतोडा पुलाचे लोकार्पण व्हावे, अशी आशा जिल्हावासीयांना आहे..

*या पुलाला पुलाला एकूण सुमारे ५८ कोटी ४० लाख निधी खर्च करण्यात आला आहे. पुलाच्या बांधकामाचे काम अहमदनगर येथील राजदीप बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रा.ली या कंपनीला देण्यात आले आहे. नदीत असलेल्या पाण्यामुळे पुलाचा कामाची मुदत अनेकदा वाढवून घ्यावी लागली आहे. पुलाचा इंस्टीमेट व कालावधी ठरवतांना तापी नदीत असलेल्या पाणी साठ्याचा विचार केला गेला नाही. नदीत पावसाळा व हिवाळ्या दरम्यान भरपूर पाणी साठा असतो.त्यामुळे ठेकेदाराला काम करणे सोयीचे नसते. फक्त उन्हाळ्यातील तीन चार महिने काम करण्यात येत असते. या कामाचा कालावधी सन २००९ ते २०११ पावसाळ्या सह देण्यात आला होता. पुन्हा २०११ -१२ कालावधी वाढविण्यात आला. नदीत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पाणी साठ्यामुळे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यासाठी ३ मार्च १७ च्या
आदेशान्वये ३१ मार्च पावेतो सुधारित मुदत वाढविण्यात आली आहे.* 

 *या उन्हाळ्यात तापी नदीतला पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुलाचे काम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. पुलाचे ९ पिलर्स व ११ फाउंडेशन झाले आहे. पुलाला ६२.५० मीटर लांबीचे १० स्लॅब असून नंदुरबार बाजूकडील १५ मीटर अप्रोज रस्ता व तळोदा बाजूकडील ३५ मिटर ऑप्रोज,असा एकूण ६७५ मीटर लांबीचा हा पूल आहे.*