Breking News

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

दसऱ्याच्या दिवशी घेतलेला त्या एका निर्णयाने… उभे राहिले तळोदा येथील ऐतिहासिक राम मंदिर!

सुधाकर मराठे

         दसरा–विजय, धर्म आणि नीतिपथाचा उत्सव. रावणावर श्रीरामांनी मिळविलेला विजय असो वा मराठा सरदारांचे शस्त्रपूजन करून मोहिमा सुरू करण्याचे शौर्यपूर्ण क्षण असोत, दसरा हा अन्यायावरील न्यायाचा आणि दुष्टावर सज्जनांचा विजय दर्शविणारा पर्व आहे. अशा या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर घेतलेला निर्णय तळोद्याच्या पुरातन राम मंदिराच्या स्थापनेशी जोडला गेला आणि या मंदिराच्या इतिहासाला एक अद्वितीय धार्मिक–सांस्कृतिक अधोरेखित मिळाले.

         मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ युद्धाचा नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक समन्वय यांचा संगमही आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आजचे प्रसिद्ध तळोदा येथील राम मंदिर, ज्यामागे एक ऐतिहासिक आणि धार्मिक कथा दडलेली आहे.

       अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नारायणराव बारगळ हे राजस्थानातील उदयपूरच्या महाराणा संग्रामसिंह यांच्या सैन्यात जहागिरदार होते. त्यांना बुढा परगणा ही जहागिरी दिली होती. ते युद्ध करत होते. चार–पाच दिवस झाले तरी युद्धात अपेक्षित यश मिळत नव्हते. संकटाच्या त्या काळात नारायणरावांनी आपल्या श्रद्धेचा आधार घेतला. त्यांनी श्रीरामचंद्राला साकडे घातले –

       जर आम्हाला आज सायंकाळ पावेतो या युद्धात विजय मिळाला, तर आम्ही तुम्हाला आमच्या घरी पंचायतसह आणून स्थापू.

      असे म्हणतात की यानंतर युद्धात मराठ्यांना यश लाभले. आपल्या नवसाप्रमाणे नारायणरावांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह महादेव, पार्वती भवानी माता आणि राधा–कृष्ण अशा विविध मूर्ती गढीवर आणल्या.

       मात्र, या मुर्त्या कुठे स्थापित कराव्यात, यावर गढीतील ब्राह्मण समुदायामध्ये मतभेद झाले. देवाचे पावित्र्य राखले जाईल का, यावर शंका उपस्थित झाली. कारण हा राजवाडा होता; कटकारस्थाने, राजकीय बैठका, लष्करी हालचाली या सर्वांचा साक्षीदार असलेल्या गढीत देवतांची स्थापना योग्य नाही, असे काहींचे मत होते.

       तेव्हा खुद्द नारायणराव पुढे सरसावले. त्यांनी ठाम शब्दांत सांगितले –

मी हे कबूल केले आहे आणि माझी श्रद्धा यात आहे.

      तरीही सर्वांचा एकमताने निर्णय व्हावा म्हणून गावच्या चावडीशेजारी असलेल्या बारगळ हवेलीत मूर्ती स्थापण्याचा पर्याय मान्य झाला.

     दसऱ्याच्या दिवशीच राम पंचायत मूर्ती स्थापनेचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विजयादशमी हा दिवसच विजयाचा आणि नवा संकल्प करण्याचा मानला जातो. रामायणातील परंपरेनुसार याच दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून धर्माची पुनर्स्थापना केली होती. मराठा साम्राज्यातही दसरा हा शौर्याचा आणि शस्त्रपूजेचा दिवस होता. त्यामुळे नारायणरावांनी आपल्या नवसपूर्तीचा अंतिम निर्णय या दिवशी घेणे ही श्रद्धा, परंपरा आणि मराठा शौर्याचा अद्भुत संगम ठरला.

         या मंदिराची स्थापना ही फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक सहमती आणि श्रद्धेचा विजय मानली जाते. विशेष म्हणजे, ज्या काळात हे घडत होते त्या काळात देशात पानिपतचे तिसरे युद्ध (1761) घडले होते. त्या युद्धात मराठा सेनापती भोईटे होते. त्यांच्या मालकीची हवेली – आज जी जिल्हा परिषद शाळा (भोई बिल्डिंगसमोर) म्हणून ओळखली जाते – त्या काळी तबेला म्हणून वापरात होती.
         या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की धार्मिक श्रद्धा आणि राजकीय–लष्करी कर्तव्य यांचा समन्वय मराठा परंपरेत खोलवर रुजलेला होता. दसऱ्याच्या दिवशी झालेला हा निर्णय विजयाची आठवण करून देतो आणि मराठा शौर्याची परंपरा जिवंत ठेवतो.
       आजही हे राम मंदिर त्या श्रद्धेचा जिवंत पुरावा आहे आणि मराठा इतिहासाच्या अध्यायात एक महत्त्वाची नोंद म्हणून उभे राहिले आहे. दसऱ्याचा तो ऐतिहासिक क्षण या मंदिराच्या स्थापनेतून पिढ्यान्‌पिढ्या स्मरणात राहिला आहे....

प्रतिक्रिया : 
     शहरातील बारगडांच्या हवेलीत राम मूर्तीसह अन्य मूर्तीच्या स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय जहागिरदारांचा होता. सध्या रामाची हवेली जीर्ण झालेली आहे. लवकरच पुनर्निर्माण केला जाणार आहे. ..
अमरजित बारगळ
जहागिरदार तळोदा