सुधाकर मराठे
आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, काहींचा सहवास जास्त काळ लाभतो, तर काही चुटपुटत्या सहवासातही आपल्या मनावर कायमच्या कोरल्या जातात. काही चित्रपटाच्या माध्यमातून भेटतात, तर काही पुस्तकातून, चित्रातून, गाण्यातून. प्रवासातून आपल्याला आकर्षित करून जातात. अशा भेटलेल्या, आठवणीतल्या, सहवासातल्या, स्मरणात कोरल्या गेलेल्या काही व्यक्तींचे मनावर उमटलेले ठसे म्हणजे मित्र सखा ज्ञानेश्वर राठोड ...
आपण चांगलं काम केलं की मित्रच नव्हे तर समाज ही आपल्या मागे उभा राहतो. याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानेश्वर यास आम्ही प्रेमाने ज्ञानु असे म्हणतो, चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव या छोट्याश्या बंजाऱ्यांच्या तांड्यातून आलेले ग्रामीण भागातील हरहुन्नरी नेतृत्व, राजकारण समाजकारण आणि ग्रामीण पर्यटनशाखाचा अभ्यासक अशी एक त्यांची वेगळी ओळख, सहज, सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे. निगर्वी, प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे. कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा, आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभाव गुणामुळे तळोदा शहरातील प्रत्येक तरुणासोबत त्याचे मैत्रिपूर्वक संबंध प्रस्थापित झाले होते. मनात कुणाबद्दलही आकस, राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे.
वडिलोपार्जितच शेती व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय, वडील दगडू राठोड हे घोडेगावात सर्वांना परिचित धार्मिक वृत्तीचे, त्यांच्या पत्नी घोडेगावातील माजी सरपंच राहून चुकलेल्या महिला, त्यांचे दोघे भाऊ उच्चशिक्षित, एक जण दुबई येथे स्थित होते तर दुसरे मुंबई येथे बेस्ट मध्ये वाहन चालक होते. अत्यंत हालाखीचा परिस्थितीवर मात करत तीन मुली व दोन मुलांचा प्रपंच हाकत मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करणारे हे दोघी दाम्पत्यांनी आपल्या मुलांना संस्काराचे चांगले धडे दिले आणि त्यामुळेच 'मुहँ मे राम बगल में छुरी! अशी कपटनिती ज्ञानु यांच्या जवळपासही नाही. समाजपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी, त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते.
२००६ या वर्षी तो शिक्षणासाठी आपल्या मोठ्या बहिणीकडे तळोदा येथे आला. बारावीचे वर्ष असल्याने अभ्यासाची एक वेगळी स्पर्धा स्वतःशीच त्याची होती. या निमित्ताने कधी रोकडमन हनुमान, कनकेश्वर महादेव मंदिर तर कधी शाळा कोलेजचे पटांगण, ओट्टे, मोकळे मैदान हे त्याचे अभ्यासासाठी आवडते ठिकाण, त्याची व माझी एक वेगळीच गट्टी झाली, दिवसभरात सोबत असणे अभ्यासा सोबतच खेळांवर विशेष लक्ष देत तळोदा शहरात एक वेगळे स्थान आम्ही प्रस्थापित केले, ही मैत्री जपत असताना कुठेही काही संकट आले तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची आमची तयारी असायची.
ज्ञानूने बहुतांश शिक्षण हे घरापासून लांब राहूनच पूर्ण केले, त्यामुळे विविध गावात राहून आलेला वेगवेगळ्या शहरांची माहिती त्याला होती. सर्वात प्रथम स्वप्नाचे शहर असे संबोधले जाणाऱ्या मुंबईला तो आम्हाला घेऊन गेला, मुंबईला त्याचे काका राहत असल्यामुळे बऱ्यापैकी मुंबई त्याने पायीच रोंदली होती, याचा फायदा आम्हालाही झाला. त्याने मुंबईचे बहुतांश परिसर आम्हाला पाईचं फिरवल्यामुळे पहिल्या फेरीतच मुंबई माझ्याही चांगलीच डोक्यात बसली. त्या दिवसापासून ते सलग आजवर विविध कडू गोड अनुभवांसह त्याचे आणि माझे नाते एक भावाप्रमाणे आहे. त्याचे कुटुंब व माझ्या कुटुंबातील असलेले हितसंबंध हे रक्ताच्या नात्यासारखे आहेत. एकमेकांच्या सुख दुखात धावून येत, नाते संबंध जोपासण्यासाठी सुरू असलेले आमचे प्रयत्न यामुळे आम्ही आजही शारीरिक दृष्टिकोनातून लांब असलो तरी मानसिक दृष्ट्या सदैव सोबत असतो.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात बहुतांश कालावधी गेला कमी वयातच मेहनत करण्याची तयारी असल्याकारणाने कुठलेही काम हाती आले तरी ते करून आपले जीवन सार्थक होईल हे ठाऊक असले तरी प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जात संसाराचा गाडा ओढावा लागतो.
तळोदा सारख्या शहरात शिक्षण घेऊन आज तो समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजकार्यात अग्रेसर असलेल्या प्रथम फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहे. या माध्यमातून तळागाळातील लोकांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे कार्य त्याचे आजही सुरू आहे, असे करत असताना त्याची आवड देखील जोपासली जात आहे याचा आनंद वेगळाच आहे, वर्ष लोटत चालली वेळ निघत आहे अनेक जबाबदाऱ्या आपल्या अंगी येत असल्या तरी या सहजरीत्या पार करत आयुष्याचे कडू गोड आठवणी घेऊन जीवनप्रवास हा सुरू आहे. ज्ञानेश्वर यास मिळालेली अर्धांगिनी देखील हुशार मितभाषी सी देखणी मनमिळावू व समंजस असल्यामुळे आयुष्याचा जीवन प्रवास हा सुखाचा सुरू आहे या सुखात एक मुलगा व एक मुलगी अशी भर पडली आहे.
या जीवन प्रवासात अगदी किशोरवयापासून असलेला मित्र सोबत असल्याचा आनंदच वेगळा आहे या माध्यमातून केवळ आम्ही दोघेच नव्हे तर बहुतांश मित्रांना सोबत ठेवून वार्षिक सहल काढून एक मित्रत्वाचे नाते रक्ताच्या नात्या सारखे घट्ट करण्याचा आमचा प्रयास आहे. आपण सामाजिक ऋण फेडण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत या उक्तीचा साजेसे वागण्याचा त्याचा प्रयत्न आयुष्याची एक शिकवण देणारा आहे....
खुप छान आणि सुंदर लेखन...
उत्तर द्याहटवाखुप छान तुमची मैत्री सदैव फूलत राहो
उत्तर द्याहटवा