Breking News

सोमवार, २ डिसेंबर, २०१३

साहेब अजून किती बळी हवेत??


(नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या सातपुड्याच्या डोंगर दऱ्यावरील झाडांची संख्या लाकूडतोडीच्या वाढत्या प्रमानामुळे कमी होऊ लागली आहे. सातपुडा बोडका होत असतानाच उपलब्ध अवस्थेत नसलेले पाणवठे यामुळे जंगलातील हिंस्त्र प्राणी गाववसत्यांकडे येऊ लागले आहेत. दिवसाआड नागरिकांना बिबट्या, अस्वल,तरस अश्या हिंसक प्राण्यांचे दर्शन घडत असल्याने त्यांच्यात प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंस्त्र प्राण्यांच्या दहशतीने अनेकांनी रोजगारावर पाणी सोडून पोटाची खडगी भरण्यासाठी गुजरात राज्यात स्थलांतर केले आहे. हिंस्त्र प्राण्यांचा हल्ल्यात हल्ल्याचा बळींची संख्या दिवसेगणित वाढत असताना मात्र वनविभाग अगदी आरामात झोपलेल्या अवस्थेत आहे. घटनेनंतर कार्यवाही करण्यापेक्षा हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नये, त्यांना जंगलातच सुरक्षितता वाटावी, अशा उपाययोजनाकडे वांविभागाने दुर्लक्ष केले आहे. यामुळे उपाययोजनांसाठी वनविभाग अजून किती बळींची वाट पाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे....)

नंदुरबार तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसला आहे. जिल्ह्यात तोरणमाळ, डाब यासारखी पर्यटनस्थळे याच सातपुडाच्या डोंगर दऱ्यात आहेत. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या सातपुडा आजही मोठ्या प्रमाणात वनौषधीसह वनप्राण्यांचे अस्तित्व आढळुन येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वनविभागाच्या आशीर्वादाने म्हणा किंवा दुर्लकक्षाने मोठ्या प्रमाणात होणारी लाकुडतोड यामुळे सातपुडा बोडका होऊ लागला आहे. याचाच परिणाम म्हणून सातपुडायाच्या जंगलात वास्तव्यास असलेले हिंस्त्र प्राणी बिबट्या, अस्वल, तरस हे गावाकडे सरकतानाच्या घटना घडू लागल्या आहेत. वनप्राण्यांचा सुरक्षतेसाठी आवश्यक त्या प्रमाणात जंगल व याचबरोबर त्या जंगलात ठिकठिकाणी पाणवठे असणे गरजेचे आहे. मात्र काही वर्षांपासून होणारे कमी पर्जन्यमान यामुळे पाणवठे कोरडे पडले आहेत. तर जंगलही कमी झाल्याने हिंसक प्राण्यांना भक्ष शोधण्यासाठी गावाकडे धाव घ्यावी लागत आहे. दिवसाआड तळोदा व शहादा तालुक्यात शेतकरी, शेतमजुरांना बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने त्यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
                          सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा, अक्कलकुवा, व शहादा तालुक्यात वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. सुमारे दोन वर्षापूर्वी तळोदा तालुक्यातील रांझणी शिवारात स्वयंपाकासाठी सरपण घेण्यासाठी गेलेल्या पढरकीबाई पाडवी (वय 45)या महिलेवर अस्वलाने हल्ला चढविल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने नंदुरबार जिल्ह्या रुग्नालयात दाखलही केले. मात्र उपचार घेतानाच त्यांच्या मृत्यु झाला. तर 24 जुन 2015 रोजी आमलाड शिवारात वडिलांसोबत गाई चारण्यासाठी गेलेल्या गोपाळ राजू भरवाड (वय 14) या बालकाला बिबट्याने उचलून त्याला सायंकाळी त्याचा मृत्यूदेह खेळाच्या शेतात आढळला. दरम्यानच्या काळात तळोदा तालुक्यातील मेंढपाळसह मजुरांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले बिबट्याने चढवले आहेत. यात गाई, बकऱ्या व घोडे, बिबट्याने फस्ट केल्याच्या घटना ताज्या आहेत. तळोदा तालुक्यातील खरवड, मोड, न्यूबन, जुवानी, छोटा धनपुर, लाखापुर, रांझणी, प्रतापपुर, कोठार आदी परिसरात वेळोवेळी बिबट्या दर्शन देत आहे. नागरिकांकडून प्रत्येकवेळी तक्रार केली जाते. मात्र वनविभाग पाहिजे त्या प्रमाणात मनावर घेत नाही. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड अशी भीती कायम आहे.              
नोव्हेंबर 2015 च्या पहिल्या आठवड्यात धडगाव तालुक्यात बिबट्याने दोन बालकांचा बळी घेतला होता. यात शेलदा गावात एका 11 वर्षीय बालीकेच्या बळी गेला. या बालिकेच्या हाडांचा सांगाडा आढळून आला. याबाबत वनविभाग मात्र अभिनज्ञ होता. ही घटना १४ नोव्हेंबर रोजीची होती. तर १७ नोव्हेंबर रोजी तिनसमाळ येथे नातलगांकडे आलेल्या एक नऊ वर्षीय बालक आपल्या बहिणीसह पाणी घेण्यासाठी गेला असता त्या दोघावर बिबट्याने हल्ला केला. यात बहीण पळ काढण्यात यशस्वी झाला. मात्र या बिबट्याच्या हल्ल्यात त्या बालकाला आपला जीव गमवावा लागला. याबाबत लोकप्रतिनिधीनी जिल्हाधिकारीकडे तक्रार केल्याने जिल्हाधिकाऱ्यानी वनविभागाच्या अधिकाऱ्याची कानउघडणी केल्याने अधिकाऱ्यानी घटनास्थळाकडे धाव घेतली. दोघा मयत बालकांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. तर जखमी बलिकेवर धडगाव येथे उपचार करण्यात आले होते. तत्पूर्वी सुमारे दोन वर्षापूर्वी शहादा तालुक्यातील म्हसावद- पिप्री रस्त्यावरील कोकणवाडा शिवारात एका विहिरीत बिबट्या पडला होता. विहिरीत तीन दिवस मुक्कामानंतर वनविभागाने धुळे येथुन तज्ञ मागवून बिबट्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देत सहीसलामत बाहेर काढले होते. तर काही महिन्यापूर्वी परिवर्धे शिवारात उसाच्या शेतात बिबट्याची चार पिल्ले आढळून आली होती. वनविभागाला माहिती मिळाल्यानंतर मादीचा शोधासाठी त्या लहान-लहान पिलांना शेतातच ठेवण्यात आले होते. मात्र चार दिवसानंतर या पिलांची प्रकृती खराब होऊ लागल्याने वनविभागाने
घाबरून या पिल्लाना बोरीवली येथील वन्यजीव संरक्षण पार्क येथे हलविले होते. मात्र या ठिकाणी एक-एक करीत चारही पिलांचा मृत्यु झाला असल्याची माहिती मिळाली आहे. शहादा तालुक्यातील काथर्दे दिगर येथे बिबट्याने दर्शन दिल्याने वनविभागाने ह्याठिकानी पिंजरा लावला होता. मात्र विशेष अशी खबरदारी घेतल्याने नदीत लपून बसलेल्या बिबट्याने वनविभागाच्याच कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविल्याने यात दोन जण जखमी झाले होते. तसेच वर्षभरापुर्वी नवापूर तालुक्यातुन दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर चरणमाळ घाटात बिबट्याने हल्ला चढविला होता. मात्र यावेळी मोठ्या आत्मविश्वासाने महिलेने बिबट्याचे जबडे घट्ट पकडून ठेवले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी आरडा ओरड केल्याने बिबट्याने पळ काढला होता. या महिलेच्या हिमतीमुळे दाम्पत्यास प्राण वाचले होते. जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांच्या घटनेत अनेकदा मनुष्यहानी व पाळीव प्राण्यांची हानी झाली आहे. मात्र वनविभाग आवश्यक त्या प्रमाणात उपाययोजना आखत नसल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. जंगलातून हिंस्त्र प्राणी गावाकडे येऊ नयेत. यासाठी वनविभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र वनविभा आवश्यक ती खबरदारी घेत नसल्याने अजून किती बळींची वाट पाहणार? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा