Breking News

रविवार, १० मे, २०१५

लाकडी बैलगाडे संपुष्टात


तळोदा तालुक्यात सध्या मशागतींच्या कामांना शेतकर्‍यांनी वेग दिला असून खरिप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरीवर्ग सज्ज झाला असून मशागतींसाठी लागणार्‍या लाकडी औजारे व लाकडी बैलगाडे संपुष्टात आले आहेत. ग्रामिण भागात लाकडी साधनांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. मशागतीसाठी लागणार्‍या नांगर, पांभर, वखर, टिकाव, फावडी, कोळपे आदी प्रकारच्या लाकडी औजारांची ग्रामिण भागात कमतरता जाणवत असून त्याजागी लोखंडी औजारांचा प्रामुख्याने शेतकरी वर्गाकडून वापर करण्यात येत आहे. ग्रामिण भागात सुरुवातीच्या काळात लाकडी औजारांची दुरुस्ती गावातील सुताराकडून धान्याचा मोबदला देवून करण्यात येत होती. परंतु आता चांगल्या प्रकारच्या लाकडांची उणीव जाणवत असल्याने त्याचप्रमाणे ते बनविण्यासाठी खर्च व वारंवार दुरुस्ती करावी लागत असत.काम चालु असताना बिघाड झाल्यास काम सोडून घरी येणे भाग पडत असत. यासाठी लाकडी
औजारांच्या जागी लोखंडाची औजारे शेतकरी वर्गाकडे दिसत आहेत. या औजारांना वारंवार दुरुस्तीची आवश्यकता भासत नाही. भासते तर तत्काळ दुरुस्ती करणारा कारागिर तालुक्याच्या ठिकाणी किंवा गावात उपलब्ध होतो. मात्र लाकडी औजारे दुरुस्ती करणार्‍या कारागिरांचा ग्रामिण भागांमध्ये तुटवडा जाणवत असतो. तालुक्यातील ग्रामिण भागांमध्ये लाकडी बैलगाडे संपुष्टात आली असून त्याजागी लोखंडी बैलगाड्यांचा सर्वत्र वापर दिसून येत आहे. लोखंडी बैलगाडे जास्त कालावधीपर्यंत टिकत असते. त्याचप्रमाणे वारंवार दुरुस्तीची गरज पडत नसल्याचे मत शेतकरी सांगतात. सध्या तालुक्यात मशागतींच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर प्रामुख्याने करताना दिसून येत आहे.
बहुतेक शेतकर्‍यांनी आपली बैलजोडीची बाजारपेठेत विक्री केली असल्याचे मत अनुभवी शेतकरी सांगतात. अल्पभूधारक शेतकर्‍यांना बैलजोडी सध्या परवडण्यायोग्य नसल्याचे समजते. यांत्रिक साधनांच्या वापरात दिवसेंदिवस वाढ होत असून तालुक्यातील शेतकरी आधुनिक शेतीकडे वळताना दिसून येत आहेत. नवनविन   प्रयोग शेतकर्‍यांकडून  करण्यात येत आहेत. यामुळे आर्थिक उत्पादनात वाढ होताना दिसून येत आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा