Breking News

सोमवार, २६ ऑक्टोबर, २०१५

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा

तळोदा शहराला रथोत्सवाची लाभलेली 120 वर्षाची परंपरा.. तळोदा शहरात कोजागरी पौर्णिमेला पार पडणार्‍या संत खंडोजी महाराजांच्या रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणार्‍या रथोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह गुजरात राज्यातील भाविकांची गर्दी होते. १२0वर्षांची आध्यात्मिक परंपरा असलेल्या रथोत्सवामुळे तळोदा शहराची सांस्कृतिक ओळख आजही कायम आहे. गुजरात महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील कुकरमुंडा येथे संत खंडोजी महाराजांचे समाधी मंदिर आहे. त्यांच्या प्रेरणेने दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला रथोत्सव व इतर धार्मिक कार्यक्रम संस्थानतर्फे होतात. येथील विठ्ठल मंदिराचे संस्थापक संत विठ्ठलस्वामी महाराज यांनी संत खंडोजी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रथ तयार केला. या रथाचे कोरीव काम व कलाकुसर म्हणजे गतकालीन लाकडी शिल्पकला आणि कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना आहे. १00 वर्षांपूर्वी तळोदा शहरात उत्कृष्ट गवंडी, मिस्तरी व लाकडी काम करणारे कुशल कारागीर होते. हा रथ तयार करण्यासाठी या कारागिरांसोबतच परराज्यातील शिल्पकार बोलावण्यात आले होते. त्यांच्या अथक परिश्रमातून लाकडी रथ तयार करण्यात आला आहे. रथ तयार करणारे संत विठ्ठलस्वामी महाराज हे मूळचे कर्नाटकचे तेथून ते पंढरपूरला आले, तेथे ते संत खंडोजी महाराजांच्या संपर्कात आल्यानंतर तळोद्याला आले. विठ्ठल महाराज खंडोजी महाराजांना ते गुरू मानत असल्याने गुरुंच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला तळोदा शहरात रथोत्सव मिरवणुकीची संकल्पना त्यांनी सुरू केली. १२0 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आजही सुरू आहे. या रथाची दरवर्षी कोजागरी पौर्णिमेला येणार्‍या संत खंडोजी महाराज पुण्यतिथीला तळोदा शहरातून मिरवणूक काढण्याची १२0 वर्षांची पंरपरा आहे. पूर्वी रथाच्या मिरवणुकीत लेझीम, तालीम, ढोल, ताशांच्या गजरात वाद्य व लेझीम पथक प्रमुख यांचे आकर्षण होते. स्मारक चौक, मेन रोडवर रथ मिरवणुकीत शहरातील विविध व्यायामशाळेतील मल्ल मल्लखांब, दांडपट्टा व इतर र्मदानी खेळांचे प्रात्यक्षिक करत. भाविकांचा या कसरतींना भरभरून प्रतिसादही मिळे. कालांतराने रथाच्या मिरवणुकीतील या कसरती बंद करण्यात आल्या. या रथोत्सवात तळोदा शहरातील आबालवृद्ध सहभागी होतात. या रथोत्सवाच्या परंपरेचे हे यंदा १२१ वे वर्ष आहे. यानिमित्त यंदा भाविकांमध्ये उत्साह संचारला आहे. रथोत्सवाचे संयोजन रथोत्सव समितीतर्फे दरवर्षी केले जाते. या समितीत तळोदा शहरासह नंदुरबार जिल्ह्यातील सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हे धार्मिक कार्य पार पाडतात. शहरातील ओंकारदास वाणी यांनी त्यांचे घर रथ ठेवण्यासाठी दान म्हणून दिले होते. १00 वर्षांपूर्वी दिलेले हे घर कालांतराने जीर्ण झाल्यानंतर ह.भ.प. उद्धव महाराज व दात्यांच्या अर्थसाहाय्याने घराचे नव्याने बांधकाम करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा