Breking News

रविवार, ८ मे, २०१६

वासुदेव बदलत्या काळानुसार आता कालबाह्य


‘दान करा हो माऊल्यांनो, भाग्यवंताच्या सुनांनो, लेकीच्या हाताने,
नातवांनो, आजोबा उद्धार करा’ असे गुणगान करीत सकाळच्या प्रहरी दान मागणारा वासुदेव बदलत्या काळानुसार आता कालबाह्य होत आहे. वासुदेवाच्या डोक्यावर वाकळ आणि मोरासारखा उंच तुरा असा पेहराव असतो. तो गावात आला की, बच्चे कंपनीला जाग येत असे. हिच बालके वासुदेवाच्या मागे असल्याने आकर्षण ठरायचे. घरातील महिलांना वासुदेवाला दान करणे म्हणजे पितरापर्यंत पोहोचले असे मानायचे. वासुदेव कुठले हे ग्रामीण भागातील लोकांना निश्चित माहिती नाही. परंतु, दक्षीण महाराष्ट्रातून ही परंपरा विदर्भात आल्याचे जाणकार मंडळी सांगतात. भल्या पहाटे दान मागणाऱ्या या वासुदेवाला कधीही रिकामे जावे लागत नसे. मात्र, वासुदेव आता दुर्मिळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वपित्री अमावास्या व अक्षयतृतीया या दोन महत्त्वाच्या सणांना वासुदेव आवर्जुन गावागावात फिरून ‘दान करा हो दान करा’ म्हणत असे. सुना व सासऱ्याचे नाव सांगत ते पितराचा उद्धार करीत होते. दान दिल्यावर वासुदेवाने आजोबाचे नाव गाण्यातून घेतले तर नातवाला मोठा आनंद होत असे. दान कसे करावे, दान केल्याने पुण्यकर्माचा कसा लाभ मिळतो हे तो सांगायचा. दानात मिळालेले धान्य तो गाणे म्हणून गोलाकार फिरून आपल्या झोळीत टाकल्यानंतर आशीर्वाद देऊन पुढच्या घरी जात असे. दान मिळाल्यानंतर घरोघरी पितरांचे नाव घेऊन अमुकाच्या सुनेच्या हाताने, नातवाच्या हाताने सुपातले दान घेतल्यानंतर तो ललकारी मारत असे. वासुदेवाच्या हाताने पितरांचा उल्लेख होत असल्याचे प्रकर्षाने जाणवायचे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा