Breking News

बुधवार, १२ जुलै, २०१७

तळोद्याच्या सरवारे दांम्पत्याने समाजापुढे एक नवा आदर्श

स्वत:साठी तर सर्व जगतात. मात्र, जे जिवंतपणी व मृत्यूनंतर देखील दुसर्‍यांसाठी जगतात ते खरच आदर्शवत ठरतात. जिवंतपणी समाजासाठी देह झिजवत असलेले पण मृत्यूनंतर देखील देहदान करून मानवतेसाठी सर्व काही अर्पण करणार्‍या तळोद्याच्या सरवारे दांम्पत्याने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तळोदा शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रा.पुरुषोत्तम शंकरसा सरवारे (कलाल, वय ८३) व त्यांच्या अर्धांगिनी सौ.लीलावती सरवारे (वय ७७) यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला आहे. धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्र विभागाला त्यांचे देह सूपूर्द केले जाणार आहे.
 वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना चिकित्सा व संशोधनासाठी मानवी देहाची गरज असते. परंतु देहांच्या अभावापोटी ते योग्य शिक्षण घेऊ शकत नाही. या विद्यार्थ्यानी आपल्या देहाचा उपयोग करून मानवी शरीराची रचना अभ्यासून चिकित्सक बनावे व पुढे आपल्या वैद्यकीय कारकिर्दीत रुग्णांवर योग्य उपचार करून रुग्णांचे जीवन वाचवावे, अशी प्रा.पुरुषोत्तम सरवारे यांची इच्छा असून यासाठी त्यांनी आपल्या मृत्युपत्रात सुद्धा आपल्या देहदानाचा संकल्प लिहून ठेवला आहे. पतीच्या देहदानाने प्रेरित होऊन त्यांच्या पत्नी सौ.लीलावती सरवारे यांनी देखील पतीप्रमाणो देहदानाची इच्छा आपल्या मुलांजवळ मांडली. मुलांनी संमती दिल्याने या उभयतांची देहदानाची संकल्पपूर्ती त्यांच्या मरणोत्तर त्यांचे मुले योगेश सरवारे, डॉ.हेमंत सरवारे, पंकज सरवारे, मुलगी सौ.श्यामला नारायण सोनवणो हे करणार आहेत.
                                       प्रा.सरवारे यांनी पुणो विद्यापीठाच्या हिंदी विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले असून तळोदा येथील कॉलेज ट्रस्टचे ते माजी कार्यकारिणी सदस्य होते. त्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी तळोद्यात हिंदी सेवा संघाची स्थापना केली. सध्या ते जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष असून ते उत्कृष्ट हिंदी सूत्रसंचालक आहेत. सरवारे दाम्पत्याचा देहदानाच्या संकल्पाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.


मृत्यूनंतर सदगती मिळते या अंधश्रद्धेपायी शरीर जाळून नष्ट करण्याऐवजी चामड्यासह सर्व शरीराचा अधिकाधिक उपयोग मानवजातीला व्हावा, सर्व अवयवांच्या गरजू व योग्य लोकांना फायदा व्हावा, जास्तीत जास्त लोकांना देहदानाची प्रेरणा मिळावी, या हेतूने आम्ही देहदानाचा निर्णय घेतला आहे. कालबाह्य रूढी-परंपरा तसेच वेळ व पैसा वाचविण्यासाठी आमच्या मृत्यूनंतर उत्तरकार्य देखील पाच दिवसाचे व त्यात फक्त गोती कुटुंबच सहभागी होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. प्रा.पुरुषोत्तम शंकरसा सरवारे (कलाल)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा