तळोदा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून वाहनचालक रस्त्याच्या मध्यभागीच वाहने उभी करीत असल्याने सामान्य नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तळोदा पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीला लगाम लावाला अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे..
तळोदा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहरात विविध कार्यालये असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ विविध कामानिमित्त व बाजार करण्यासाठी नियमित शहरात येत असतात. शहरातील स्मारक चौक, बसस्थानक परिसर, आनंद चौक, कॉलेजरोड, बँक परिसर, भाजी मंडई आदी भागात नेहमीच नागरीकांची वर्दळ असते. शहरातील वाढती वाहनांची संख्या, वाढते अतिक्रमण, बायपासचे भिजते घोंगडे, जूने अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान हातोडा पूल सुरु झाल्यापासून शहरातून परिवहन मंडळाचा बसेस जात असल्याने स्मारक चौक व तर वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक ठप्प होत असून पोलिसांच्या माध्यस्थीशिवाय वाहतूक सुरळीत करणे शक्य होत नसल्याची सध्याची स्थिती आहे. अनेकवेळा नंदुरबारकडे जाणारी व तळोदाकडे येणारी बस एकाचवेळी येत असल्याने एकच गलका करतात. तळोदा शहराला केवळ चार वाहतूक पोलिस देण्यात आले असून ते केवळ स्मारक चौकात दिसून येतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून वाहनधारकांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. बाजारपेठेत आलेले ग्राहक आपली वाहने रस्त्यावर कुठेही उभे करतात. मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेमार्फत पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने हा कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच भाजीविक्रेते, फळ विक्रेते व इतर व्यावसायिक भर रस्त्यावर अतिक्रमण करीत आहे. परिणामी रस्ता अरुंद होऊन वाहने जाण्यास जागाच उरत नसल्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेकवेळा सर्वसामान्यांना वाद-विवादांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेने अवैद्य वाहतूकीने डोके वर केले असून शिस्त बिघडली आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेत असतांना रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करीत असल्याने वाहतूकीची कोंडी होत आहे. मुख्य रस्त्यावर कुठेही नो पार्किंगचा बोर्ड लावण्याची तसदीही पोलिस प्रशासन घेत नाही. पालिकेने यापूर्वी रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले होते. मात्र सद्यस्थितीत ते पट्टे अदृश्य झाले आहेत. याबाबत पालिका व पोलिस प्रशासनाने वाहतूकीची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे. .
सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. दिवसभरातुन उसाने भरलेले अवजड वाहने शहराबाहेरील बायपास मार्गाचा वापर न करता सरळ शहरातून जातात. रस्त्यावर असलेले गतिरोधक तसेच वळण मार्गामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. अवजड वाहनांना अंकलेश्वर-बऱ्हाणपूर (बायपास) मार्गाचा अवलंब केल्यास काही प्रमानात का असेना वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तर टॅक्सी चालकांना वीजवितरण कार्यालयाच्या मागील बाजूला तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा वापर केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा