Breking News

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

नवीन वर्षाचे औचित्य साधत आ.पाडवींची डॉ.वाणींशी दिलजमाई

तळोदा पालिका निवडणूकीप्रसंगी भाजपामध्ये आपापसांत राजकीय मतभेद निर्माण होवून आ.उदेसिंग पाडवी डॉ.शशिकांत वाणी यांच्यात काहीसा दूरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आ.उदेसिंग पाडवी यांनी थेट डॉ.शशिकांत वाणी यांचे निवासस्थान गाठून शुभेच्छा दिल्याने मतभेदाची चर्चा थांबली असून यावर पडदा पडला आहे. याबाबत राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे.. भाजपाच्या सत्ता स्थापनेसाठी खांद्याला खांदा लावून तळोदा-शहादा विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे दोघा दिग्गज नेत्यांमध्ये डिसेंबरमध्ये झालेल्या तळोदा पालिकेच्या निवडणूकीपासून काहीसा दूरावा निर्माण झाला होता. पालिका निवडणुकीत डॉ.शशिकांत वाणी यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु ऐनवेळी डॉ.वाणी यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच डॉ.वाणींचे समर्थक असणाऱ्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती. यावेळी डॉ.वाणी पालिका निवडणूकीपासून दूर राहिले होते. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आल्याने डॉ.वाणींची नाराजी होती. डॉ.वाणी यांच्या गटाची नाराजी व निवडणुकीत तटस्थ राहण्याच्या पार्श्वभूमीवर आ.उदेसिंग पाडवी यांनी तळोदा पालिकेत भाजपची सत्ता आली नाही तर या पुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. तळोदा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवत एकहाती सत्तांतर घडवून आणले होते. तेव्हापासून तळोदा भाजपमध्ये डॉ.वाणी व आ.उदेसिंग पाडवी यांचे वेगवेगळे गट निर्माण झाले होते. डॉ.वाणी हे मार्केट कमिटीच्या सतत तीन बैठकांना गैरहजर असल्याचे कारण देऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. नोटीसचे प्रतिउत्तर न दिल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा ठराव सभापती तथा आ.पाडवी यांनी केला होता.. त्याचे उत्तर देत डॉ.वाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन कायदेशीर संधी न देता पूर्वग्रहदूषित व आकसापोटी कारवाई केल्याने तळोदा कृऊबा समितीचा अर्ज फेटाळल्याबाबत माहिती दिली होती. अश्या विविध कारणांमुळे दूरावा वाढत जावुन दोन गट निर्माण झाले होते. वरिष्ठांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यावेळी यश आले नाही. मात्र भाजपा तालुका अध्यक्ष श्याम राजपूत व शहादा तालुका अध्यक्ष किशोर पाटील यांच्या शिष्टाईने केलेल्या सतत प्रयत्नाने दोघे गटांमध्ये समेट घालण्यात यश आले. दरम्यान नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता व वाणी समाजरत्न पुरस्कारानंतर शुभेच्छा देण्यासाठी चक्क आ.पाडवी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत डॉ.वाणींचे निवासस्थान गाठले व शुभेच्छा दिल्या. यावेळी आनंद सोनार, विश्वनाथ कलाल, महेंद्र गाढे आदी उपस्थित होते. आता मात्र नवीन वर्षाचे औचित्य साधून स्वत: आमदारांनी एक पाऊल पुढे टाकत हा दुरावा दूर करण्यासाठी हात पुढे केला आहे. यामुळे आगामी काळात ही सदिच्छा भेट येणाऱ्या वर्षात पक्षासाठी संघटन म्हणून किती उपयुक्त ठरते हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा