तळोदा शहराच्या पिढ्यान् पिढ्या येथे शिकून मोठ्या झाल्या. शहरातील कदाचित एकही घर नसावे ज्या घरात शेठ के.डी . हायस्कूलमध्ये शिकलेला माजी विद्यार्थी नसेल . शाळेचे माजी विद्यार्थी देश - विदेशात आज विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. अशा शेठ के . डी. हायस्कूलमध्ये आजपावेतो २४ हजार ६०२ विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. जे आज आपापल्या क्षेत्रात नाव कमवीत आहेत. मात्र शाळेप्रति कृतज्ञता बाळगून आहेत. त्यामुळे आजही अनेक माजी विद्यार्थी मेळावे भरविले जातात. त्यातून इतिहासाला उजाळा दिला जातो. तर भविष्याची वाटचाल अजून भक्कमपणे करण्याची हिंमत त्यातून मिळते. हातोडा रस्त्यावर शेठ के.डी. हायस्कूलची भव्य इमारत आहे. या इमारतीत व तेथील मैदानाने अनेक सोहळे व कार्यक्रम पाहिले आहेत. त्यात शाळेने शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच उपक्रम मोठ्या हिरिरीने पार करत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. तोच वारसा अमृतमहोत्सवी वर्षानंतरही सुरू असल्याचा अभिमान आजही शाळेशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाच्या मनात आहे.
शाळेचे व्यवस्थापन पालिकेकडे असताना पालिका संचलित शाळाप्रमुख म्हणून एस .के.काळकर, एस. जी. भावे, व्ही.एम. घुले, एस. एस. फाळके, व्ही . एच . खर्शीकर , डी. एम . वाणी अशा दिग्गज प्रशासकांनी शाळेचे कामकाज सांभाळले होते, तर १९४४ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यानंतर शाळेचे पहिले मुख्याध्यापक म्हणून गोरख हुलाजी महाजन, त्यानंतर एस . के. घाटे, नागेश रंगनाथ लिमये, तुकाराम सोनजी पटेल, शंकर बापू शिंपी , कृ.वि. कानुगो, कांतिलाल बुलाखी वाणी, गजानन विनायक जोशी, विष्णुदत्त नथू तिवारी, काशीनाथ नारायण गुजराथी, वासुदेव जगन्नाथ साळी, दादाभाई हांडुजी धोदरे, धना ओंकार भोई, अमृतलाल विठ्ठलदास वाणी, उखा गणपत पिपरे, लाला हरिभाऊ पाटील, सदाशिव गिरधरसा चित्ते, अशोक मयाराम चव्हाण , विजयकुमार जंगलू राणे, विजयकुमार धुडकू ठाकरे, पुंडलिक राघो खुनेपिंप्रे, दिलीप भानुदास गिरणार अशा दिग्गज शिक्षकांनी येथील मुख्याध्यापकपद सांभाळले होते.आता सध्या जितेंद्र लक्ष्मणराव सूर्यवंशी समर्थपणे मुख्याध्यापकपदाची धुरा सांभाळत आहेत.
येथील शिक्षकदेखील नवरत्नांची खाण शोभावी अशा परंपरेतील असतात. अनेक क्षेत्रांतील गाढे अभ्यासक असलेले शिक्षक शाळेला लाभले होते. तोच वारसा आजही शिक्षक चालवत आहेत. त्यामुळे शिक्षकांचा आदर्श वारसा लाभलेल्या या शाळेत आज ३७ शिक्षक व १४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, बालकांच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ , ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धती यानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील वंचित व गरजू घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहाबरोबरच नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे शिक्षण दिले जात आहे. व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तालुक्यात केवळ येथेच राष्ट्रीय छात्रसेना अर्थात एनसीसीचे युनिट आहे . संस्कृत विषयाचे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक आहे. त्यामुळे मुख्याध्यापक जितेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शाळेची शैक्षणिक घोडदौड आजही आश्वासकपणे सुरू आहे. त्यामुळे तळोदा परिसरात शेठ के .डी. हायस्कूल म्हटले की दीपस्तंभ दिसावा अशी अवस्था होते. परिसरात आजही शेठ के.डी. हायस्कूल खराखुरा शिक्षणाचा ब्रॅन्ड शोभून दिसते एवढे मात्र निश्चित...
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शेठ के . डी हायस्कूलची वाटचाल ८१ वर्षांची झाली आहे . परिसरातील शिक्षणाची गरज लक्षात घेता शेठ खुशालभाई दुल्लभदास वाणी कुटुंबाने आपली शेतजमीन शाळेसाठी दिल्याने त्यांचे नाव शाळेला देण्यात आले होते . त्यामुळे १९४० मध्ये शेठ खुशालभाई दुल्लभदास हायस्कूल नावाने सुरू झालेल्या शाळेचे व्यवस्थापन सुरवातीला पालिकेकडे होते. त्यानंतर २१ ऑगस्ट १९४४ ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यानंतर शाळेचे व्यवस्थापन संस्थेकडे आले. शाळेचे तळोदा परिसरातील शैक्षणिक क्षेत्रातील योगदान भव्य आहे. शेठ के.डी . हायस्कूलची वाटचाल आजही परिसरात दीपस्तंभासारखी सुरू आहे.
जितेंद्र सूर्यवंशी, मुख्याध्यापक, तळोदा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा