Breking News

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

निर्भीड, सामाजिक वसा घेतलेलं, कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व : श्री. वतनकुमार मगरे साहेब....

"झाले बहू, आहेत बहू, होतील बहू" या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच उच्च ध्येय बाळगून, आत्मविश्वासाने प्रयत्नांची पराकाष्टा करून तळोद्यातील वतनकुमार मगरे हे यशाची एकेक पायरी चढून सार्वजनिक बांधकाम विभागात उच्च पदस्थ अधिकारी बनले. निर्भीड, सडेतोड, निगर्वी, हजरजबाबी, कुटुंबवत्सल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून ते नेहमीच गोरगरिबांना मदत करीत असतात तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. एकत्र कुटुंब पद्धतीवर त्यांचा भर असून प्रचंड व्यापातून देखील ते कुटुंबाची काळजी घेतात. वतनकुमार मगरे हे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे माजी कोषाध्यक्ष तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे माजी चिटणीस, विश्वस्त वामनराव देवचंद मगरे यांचे सुपुत्र आहेत.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या ठसा उमटविणारे वतनकुमार वामनराव मगरे यांच्या जन्म तत्कालीन धुळे जिल्ह्यातील तळोदे तालुक्यात ३ सप्टेंबर १९६९ रोजी झाला. लहानपणापासून ते शांत आणि अभ्यासात हुशार होते. प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत बहुतेकदा त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षक धुळे येथील महाजन हायस्कुलमध्ये झाले. सुरुवातीला त्यांची घरची आर्थिक परिस्थिती तेवढी मजबूत नव्हती, त्यातल्या त्यात त्यांच्या स्वाभिमानी स्वभाव होता, यामुळे त्यांचा पुढील शिक्षणाची व नोकरीची चिंता त्यांचा वडिलांना सतावत होती. दहावी पास झाल्यानंतर भारतीय नौदलात जाण्याची संधी त्यांना मिळाली होती. परंतु पुढील शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी ती संधी नाकारली. आणि दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर खामगाव येथील गव्हर्मेंट पॉलीटेक्निकला प्रवेश घेतला. नंतरचे दोन वर्ष पुन्हा धुळे येथे शिक्षण घेतले. वडील वामनराव मगरे हे सुद्धा उच्चशिक्षित होते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. परंतु काम करणारे वरिष्ठ अभियंते त्यांचे श्रेय घेत कारण ते पदवीधारक होते. आपल्या विषयाचे अपेक्षित ज्ञान नसताना केवळ पदवीमुळे इतरांना मान मिळतो आणि धन ही मिळते. मग मी ही पदवी का मिळवू नये असे ठरवून त्यांनी देखील बीई करण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी ते नोकरी करीत होते आणि त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मालकाला सांगितले. हुशार आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती आपल्याला सोडून जातो आहे, म्हणून मालकाने वतनकुमारांची मनधरणी केली आणि नोकरी सोडू नका मी तुम्हाला माझ्या धंद्यात भागीदारी देतो असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. अत्यंत विनम्रपणे त्यांनी मालकाला सांगून त्यांच्या भावी जीवनाची कल्पना देऊन नोकरी सोडली आणि धुळे येथील एसएसव्हीपीएस संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वार्षिक परीक्षेत प्रथम आल्याने तिसऱ्या वर्षी ते महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी झालेत तर चौथ्या वर्षाला त्यांना युनिव्हर्सिटी रीप्रेझेंटटेटीव होण्याचा मान मिळाला. जनरल सेक्रेटरी झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम त्यांच्याकडे होते. दरम्यान एकदा वडील वामनराव यांचे लक्ष घरातील देव्हाऱ्याकडे कडे गेले, तिथे त्यांना एक रामपुरी चाकू दिसला. वडील अचंबित झाले त्यांनी वतनकुमारांना चाकू बाबत विचारले. चाकू माझ्याच आहे असे उत्तर वतनकुमार यांनी दिले. स्वभावाने अत्यंत मवाळ, धार्मिक, कोणालाही दुःख न देणाऱ्या व्यक्तीकडे हा चाकू कसा? त्यांनी परत विचारले. तेव्हा वतनकुमार यांनी उत्तर दिले की, बापूजी चाकू मला नाईलाजाने जवळ ठेवावा लागतो. कारण परराज्यातील काही विद्यार्थी खूप बेशिस्त, गुंडगिरी, भाईगिरी, मारामाऱ्या करणारे आहेत. त्यांच्याजवळ चाकू व इतर हत्यारे असतात आणि ते सदैव दहशतीचे वातावरण निर्माण करत असतात. महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी असल्यामुळे ही सारी भांडणे सोडवावी लागतात. प्रसंगी पोलीस स्टेशनला सुद्धा जावे लागते. गुंड पोरांना असे वाटू नये की जनरल सेक्रेटरी हा कमकुवत आणि घाबरट आहे. त्यामुळे त्यांच्यावर वचक असावा म्हणून त्यांना फक्त घाबरवण्यासाठी चाकू मला बाळगावा लागतो असे त्यांनी सांगितले. कशालाही न घाबरता, जसाच तसे या म्हणीप्रमाणे प्रसंगी धाडसाने वागणे हा त्यांच्या स्वभावाचा एक पैलू आहे. त्यांच्यामुळे पुढे महाविद्यालयात असे वातावरण निर्माण झाले की, भांडणे बंद होऊन सर्वांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण झाले.
बीई झाल्यानंतर एमईच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने त्यांना सांगली येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाला, शिवाय दर महिन्याला दोन हजार दोनशे रुपये शिष्यवृत्ती देखील मंजूर झाली. सांगली येथे हा अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना त्यांनी गव्हर्मेंट पॉलीटेक्निक श्रेणी एक, मुंबई टेलिफोन महानगर निगम, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, लेफ्टनंट ईन आर्मी, मुंबई महानगरपालिका या सर्व श्रेणी एक अधिकाऱ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. या सर्व परीक्षांमध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. आणि सर्वच ठिकाणी त्यांना नोकरीसाठी बोलावणे देखील आले. शेवटी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता श्रेणी एकची नोकरी स्वीकारली. प्रारंभी त्यांनी नंदुरबार इथे नोकरी केल्यानंतर तळोदा, नाशिक, इगतपुरी, अहमदनगर या ठिकाणी त्यांनी सेवा केली. आपल्यावर जी काही जबाबदारी सोपवली गेली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आणि कर्तव्य दक्षता सिद्ध करणे हा त्यांच्या स्वभाव धर्म असल्यामुळे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची मर्जी जिंकणे त्यांना सहज शक्य झाले. माणसापेक्षा माणसाचे काम सर्वांना प्रिय असते आणि हे वतनकुमार मगरे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. कोणावरही विसंबून न राहता आपल्या कामाला लागणे हे त्यांचा रोमारोमात भिनले आहे. आणि त्यामुळेच त्यांनी सर्वच क्षेत्रात यश मिळवले आहे.
आतापर्यंतच्या सेवाकाळात वतनकुमार मगरे यांच्यावर अनेक संकटे आलीत मात्र त्यांनी सर्व संकटांवर आपल्या संयमाने, धैर्याने मात केली. कार्यकुशलता, कार्यकत्परता, मनमिळाऊ स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती, अडचणीच्या वेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून गरजू लोकांना मदत करण्याची वृत्ती या सर्व गुणांमुळे ते ज्या-ज्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कार्यालयीन कर्मचाऱ्यांना नेहमीच हवेहवेसे झालेत आणि आपल्या विशिष्ट स्वभावाच्या कायमचा ठसा उमटवला. वतनकुमार मगरे हे वामनराव मगरे यांचे चिरंजीव आहेत, वामनराव मगरे यांनी देखील जवळपास ३० वर्षापेक्षा अधिकचा काळ समाजकार्य केले. समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मानणारे ते होते आणि तोच वारसा वतनकुमार मगरे यांनी पुढे चालवला आहे. तोंडाने बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य करून दाखवने हीच खरी समाजसेवा आहे असे ते म्हणतात. आजकाल बऱ्याच श्रीमंत लोकांना दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा होत नाही, अशा परिस्थितीत अहोरात्र मेहनत करून कमावलेले लाखो रुपये समाजकार्यात लावणारे दानशूर स्वर्गीय वामनराव देवचंद मगरे व वतनकुमार वामनराव मगरे हे लोकांमध्ये एक आगळेवेगळे आणि विरळ पिता पुत्राची जोडी आहे. स्वतःच्या प्रगतीच्या आधी ते भावंडाच्या प्रगतीची काळजी घेणारे आहेत. स्वतःच्या प्रगतीसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी जीवन कसे जगावे याच्या आदर्श त्यांनी घालून दिला आहे आणि हे त्यांच्या संपर्कात आल्यावरचं कळते. स्वकष्टाने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणारे, कोणत्याही प्रकारच्या मोठेपणा न मिरवता सामान्य माणसात मिसळणारे आणि विविध गुणांनी संपन्न अशा वतनकुमार मगरे यांच्यासारखे व्यक्तिमत्व आजच्या सोशल मीडियाच्या युगात दृष्टीप्रथास पडणे दुरापास्त झाले आहे असेच म्हणावे लागेल.
चौकट
जीवनातील परमोच्च आनंदाचे क्षण :
● महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन १९९४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी - १ या पदावर नियुक्ती.
● मार्गप्रकल्प उपविभागात काम करीत असताना १९९८ मध्ये हातोडा पुलाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे काम करून आराखडा मंजूर केला.
● अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील होराफडी येथे २००१ साली रस्ता तयार केला. त्याठिकाणी सर्वप्रथम शासकीय वाहन पोहोचण्याच्या आनंद अविस्मरणीय होता.
● सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे बाधित झालेल्या सावऱ्यादिगर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम २०१३ रोजी सुरू केले.
● पुतणी पायल चे लग्न स्वतः उभारलेल्या वामनराव बापूजी मंगल कार्यालयात थाटात लावून दिले.
● तळोदा परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या कॉलेज ट्रस्टला ११ लाख, ११ हजार, १११ रुपयांची भरीव अशी देणगी दिली.
● सहा जुलै २०२४ रोजी त्यांची कॉलेज ट्रस्ट येथे संचालक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
● देव मोगरा विद्या प्रसारक संस्थेच्या करारनामा १६ मे २०१४ रोजी केला.
● तळोद्यातील आर्ट्स अँड कॉमर्स ट्रस्ट या न्यासाचा तहहयात, वंश परंपरागत विश्वस्तपदी नियुक्ती झाली.

सध्या राबवित असलेले प्रकल्प :
मनरमा नगर, कीर्ती नगर, वामनराव बापूजी नगर, मनोकिरण नगर, सर्वेश नगर, गोदावरी नगर तसेच वामनराव बापूजी मंगल कार्यालय व मनोरमा वामनराव मगरे शैक्षणिक संकुल.

भविष्यातील ध्येय व उद्दिष्टे (स्वप्न)
       तळोदा येथे स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्र सुरू करणे, तळोदा येथे पॉलीटेक्निक, इंजीनियरिंग, शिक्षण शास्त्र, वैद्यकीय,विधी महाविद्यालय व इतर अनुषंगिक उच्च शिक्षणाची महाविद्यालये सुरू करणेसाठी प्रयत्नशील राहणे,तळोद्यात एक मोठा मॉल तयार करणे जिथे विविध स्वरूपाच्या वस्तू माफक दरात मिळतील.तळोद्याच्या विकासासाठी मग ते रस्ते असो शालेय इमारती असो किंवा तळोदेकरांच्या हिताच्या दृष्टीच्या गोष्टी असो यात तन-मन-धनाने प्रयत्न करून बदल घडवून आणणे. शेतीपूरक उद्योगांचा विकास करणे. व्यसनमुक्ती केंद्र उभारणे, अध्यात्मिक प्रगतीसाठी अभ्यासकेंद्र निर्माण करणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, विधवाश्रम,निर्माण करून गोरगरिबांची व पिडीतांची सेवा करणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा