Breking News

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

'हिमाचलची जादू, पंजाबचा रंग आणि दिल्लीचा वैभव: एक अविस्मरणीय सफर"

हिमाचल प्रदेशाचा प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याचा एक अतुलनीय अनुभव! जणू काही स्वप्नातील प्रदेशातच आपण पोहोचलो आहोत, असे वाटते. घनदाट हिरवाई, उंच बर्फाच्छादित पर्वत, थंडगार बोचरी हवा, आणि धुक्यात लपेटलेले रस्ते—सर्व काही मनाला मोहवणारे वाटते.
               शिमल्याच्या राजसी सौंदर्यापासून प्रवासाला आमची सुरुवात झाली, गाडी सुरू झाल्यापासूनच सर्व जण एकमेकांची मजा घेत, मस्करी करत, आणि जुन्या आठवणींना उजाळा देत होते. कोणीतरी नवीन "जोशात" गाणी लावली आणि मग सगळेच आवेशात गाण्यांवर नाचायला लागले. गाडीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हास्याचे लहरी घुमायला लागल्या. कधी कोणी उशाशी असलेले स्नॅक्स लपवायचं, तर कोणी हसून हसून पोट दुखेपर्यंत काही तरी विनोद करायचं—हे काही थांबायचं नाव घेत नव्हतं. लहान मुलं प्रत्येक गाडीतले किचकट मार्ग आणि चढ उतार पाहून "मला भीती वाटते" असं ओरडत असत, आणि मग त्यांच्या प्रतिक्रिया पाहून सगळे खळखळून हसायचे.
             हळूहळू डोंगरांच्या उंच-उंच उतारावरून जाणारे रस्ते, त्यावरून दिसणारे आकाशाच्या जवळचे दृश्य, आणि भोवतालच्या देवदारच्या जंगलांचा शांत सुगंध मन प्रसन्न करणारे वातावरण, शिमल्यातील प्रसिद्ध मॉल रोडवर फिरताना जुन्या वास्तू, कॅफे, आणि थंडीची गार हवा एक विलक्षण अनुभव देतो.

त्यानंतर मनालीतील बर्फाने झाकलेली कडेकपारी, बीयस नदीच्या काठावरची शांतता, आणि मनालीतील अटल टनेलच्या रस्त्यांवरील साहसी सफर आपल्याला थक्क करते. बर्फाच्या खेळांचा आनंद घेताना, आपले मनही त्या शुभ्र वातावरणात विरून जाते. सोलंग व्हॅलीत बर्फावरून स्कीईंग करणे, पैराग्लायडिंगसारख्या साहसी खेळांमध्ये सहभागी होणे, ही एक रोमांचकारी अनुभूती होती. धर्मशाला आणि मॅकलोडगंज येथे पोहोचल्यावर तिबेटी संस्कृतीची ओळख होते. तिबेटी मोनेस्ट्रीचे शांत वातावरण, प्रार्थनेचे ढोल, आणि सुंदर बौद्ध मूर्ती या गोष्टी मनाला शांती देतात. मॅकलोडगंजच्या रस्त्यावर फिरताना तिबेटी खाद्यपदार्थांची चव घेण्याचा आनंद काही वेगळाच आहे.

                डलहौसीतील खाजगी, शांत परिसर, पाइन वृक्षांनी भरलेले रस्ते, आणि चंबा खोऱ्यातील निसर्ग सौंदर्य, प्रत्येक क्षणाला नवा रंग देतात. डलहौसीची हवा, त्यातील मोकळेपणा, आणि शीतल झुळूक आपल्याला ताजेतवाने करते.
   हिमाचल प्रदेशातील प्रत्येक ठिकाण आपले स्वतःचे खास वैशिष्ट्य घेऊन आलेले असते. या अद्भुत प्रवासामध्ये मिळणारे सौंदर्य, साहस, आणि शांतता—सर्व काही मनात रुंजी घालणारे आहे.. 
           डलहौसीच्या थंड, शांत वातावरणातून बाहेर पडताना डोंगराळ रस्त्यांवरून जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. गाडी हळूहळू घाटातून उतरू लागते आणि पाहता पाहता बर्फाच्छादित डोंगर मागे राहू लागतात. डलहौसीची रमणीयता मनात साठवत आणि डोंगरांच्या वळणांवरून जाताना समोर येणारा नवा प्रदेश आपल्या मनाला उत्सुक करतो.
                    अमर शहिदांचे पवित्र स्थान असलेल्या अमृतसरकडे जाताना पंजाबची हिरवीगार शेती, लांबवर पसरलेले गहू-सरसोचे शेत, आणि गावांतील पारंपारिक रितीरिवाजांची झलक दिसते. अमृतसरमध्ये पोहोचल्यावर थोडा विसावा घेऊन, सुवर्ण मंदिराच्या दर्शनासाठी जाताना मंदिराच्या सोनेरी तेजात मन हरवून जाते. या शांत मंदिरात भक्तीचा अनुभव काही वेगळाच असतो. गुरुद्वारात भेट देऊन लंगरचा प्रसाद ग्रहण केल्यावर, परिसरातील भक्तांच्या सेवा भावना मनाला स्पर्श करते.
त्यानंतर, वाघा बॉर्डरला भेट देण्याचा अनुभव आमचा हुकला. अमृतसरहून दिल्लीकडे निघताना प्रवासात पंजाबच्या संस्कृतीची झलक दिसली. दिल्लीतील पहाट वेळेत येणाऱ्या थंडीने प्रवासात नवीन ऊर्जा भरली. पहाटे पाच वाजेची एर्नाकुलम ट्रेन असल्याने राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक स्थळांची भेटी पासून आम्ही वंचित राहिलो, 
               
                 अशा प्रकारे, डलहौसीच्या निसर्गरम्य वातावरणातून अमृतसरच्या भक्तिमय भावनेतून आणि दिल्लीच्या ऐतिहासिक स्थळांना मुकताना, प्रवासाचा हा अनुभव कायमच स्मरणात राहील. हा प्रवास म्हणजे फक्त स्थळदर्शन नव्हे, तर हास्य कल्होल आणि मित्रांच्या खट्याळपणाचे जंगी साक्षात्कार होता. प्रत्येक थांब्यावर हास्याची एक नवीन कहाणी तयार होत होती, आणि त्याचे गोड आठवणींमध्ये रूपांतर होत होते.

शिमल्याचे पर्वत, हिरवीगार झाडी,
बर्फाची चादर, स्वप्नातील गाणी।
थंड वाऱ्याची झुळूक हळुवार वाजे,
मनाला सुखावते, आनंद साजे।

मनालीचे रंग, धुकेलेली सृष्टी,
गंगाच्या प्रवाहात धरण्याची शक्ती।
निसर्गाचा तो साज सुंदर असे,
आनंदाचा प्रवास मनाला फसे।

अमृतसरचे सुवर्ण मंदिर पवित्र,
भक्तिमय वातावरण, दिव्य चित्र।
लंगरमध्ये भोजन, प्रेमाचा मेळ,
मनात कायमचा राहतो त्याचा ठेळ।

धर्मशालेचे शांती, शांत पाण्याचे सरोवर,
मंदिराच्या घंटा, घुमतो दूरवर।
ध्यानधारणा येथे मनाला येती,
शांतता शोधण्यास येथे मन रमेती।

डलहौसीच्या वाटा, हिरवेगार झाड,
फुलांच्या बागा, पक्ष्यांचा थवा वाढ।
प्रवासाच्या आठवणी मनात भरती,
जीवनात आनंदाचा गोडवा साठती।

शिमला, मनाली, अमृतसर, धर्मशाला, डलहौसी,
स्मृतींमधून फिरतात आनंदाचे फुलझडी।
प्रत्येक क्षण अनमोल, प्रत्येक क्षण खास,
संगतीत मित्रांबरोबर हा आनंदाचा प्रवास।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा