Breking News

रविवार, १ डिसेंबर, २०२४

"नात्यांचे महत्त्व उलगडणाऱ्या संगीता काकूंना अखेरचा निरोप"

"आपुलकीचा अविरत प्रवास: संगीता काकूंना आदरांजली"

०१ डिसेंबर २०२४
            मध्य प्रदेशातील जाहूर गावातील संगीता मराठे यांचे जीवन एक आदर्श कुटुंबवत्सल स्त्री म्हणून ओळखले जाते. त्यांचा विवाह पारोळा तालुक्यातील देवगाव येथील गणेश मराठे यांच्यासोबत झाला. हा संसार एका सुखसमृद्ध आणि सुसंस्कृत कुटुंबात सुरू झाला. स्व. विरभान मराठे मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाने परंपरेचा वारसा जोपासला, ज्यामध्ये सुसंस्कृतता, प्रेम, आणि एकोप्याचा संगम दिसून येतो. संगीता मराठे यांचा स्वभाव हा अतिशय प्रेमळ, नम्र, आणि मनमिळाऊ होता. त्या प्रत्येकाला आपलेसे करणाऱ्या होत्या. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्या एक आदर्श गृहिणी, प्रेमळ आई, आणि कुटुंबाचा आधार होत्या.

         त्यांचा वैवाहिक जीवनाची सुरुवात ही अत्यंत संपन्न आणि समाधानकारक परिस्थितीत झाली. त्या कुटुंबाची मुळं मजबूत होती, आणि त्यामध्ये सौहार्द, समजूतदारपणा, आणि नात्यांचा आदर यांचा सुंदर मिलाफ होता. संगीता यांनी आपल्या स्वभावाने आणि कौशल्याने या कुटुंबाला अधिक मजबुती दिली.

          संगीता आणि गणेश मराठे यांच्या संसारात दोन मुलांच्या आगमनाने कुटुंबाचा विस्तार झाला. मोठा मुलगा अमोल आणि नंतर पंकज उर्फ काल्याच्या जन्माने त्यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. पुढे, दोघा मुलांची लग्न थाटामाटात झाली. या नात्यांमध्ये त्यांनी सासू आणि आजी म्हणूनही आपले स्थान कायम राखले. नातवंडांनी त्यांच्या जीवनात आणखी गोडवा भरला.

           परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. गणेश आणि संगीता यांच्या आयुष्यातही आर्थिक अडचणींनी प्रवेश केला. कुटुंबाने या कठीण काळाचा एकत्रितपणे सामना केला. संगीता यांनी अशा काळातही कधीही आपल्या जबाबदाऱ्या टाळल्या नाहीत. त्याचबरोबर, त्यांच्या प्रकृतीने काही आव्हाने उभी केली. दीर्घकालीन आजारामुळे त्यांना उपचारांसाठी विविध ठिकाणी जावे लागले. गणेश मराठे यांनी त्यांच्या आरोग्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. यामुळे काही काळासाठी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, परंतु नंतरचा काळ अधिक कठीण ठरला.

        1 डिसेंबर 2024 रोजी संगीता काकू यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसाठी हा धक्का होता. त्यांनी मागे दोन मुले, सुना, नातवंडे, आणि आठवणींचा एक मोठा ठेवा सोडला. संगीता मराठे यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची गोड स्मृती आणि दिलासा देणारा स्वभाव कायमच त्यांच्या परिवारासाठी प्रेरणादायी ठरेल.

           काकूंच्या निधनाने कुटुंबासाठी एक मोठी हानी झाली आहे. त्या फक्त कुटुंबातील सदस्य नव्हत्या, तर सर्वांच्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या मृदू स्वभावाने, सहकार्याने आणि आपुलकीने त्यांनी प्रत्येक नात्याला अधिक मजबूत केले होते.
            त्यांचा एक प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहील तो म्हणजे भडगाव येथील आमचे मोठे काका गोविंद मराठे यांच्या निधनानंतर, आमच्या वडिलांची प्रकृती बिघडली होती त्यांना तब्येतीची बातमी कळताच, काकूंची तळमळ, प्रेम, आणि आपुलकी दिसून आली. क्षणाचाही विचार न करता त्या व पुष्पा काकू तळोदा येथे आमच्या सोबत पोहोचल्या. त्यांच्या दिवसभराच्या सहवासाने आणि प्रेमळ स्वभावाने संपूर्ण कुटुंबाला आधार मिळाला. हा दिवस फक्त त्यांच्या सहवेदनेचा नव्हे, तर त्यांच्या नात्यांप्रती असलेल्या प्रामाणिकतेचा ठेवा ठरला.

      त्यांनी आमच्याबद्दल उद्गारलेले शब्द " सुर्यवंशी वाड्यात तुम्ही दोघे भावासारखे भाऊ नाहीत, पैसा कमावण्यापेक्षा खर्च करण्याची धमक तुमच्यात आहे," तुमची सहर कुणालाही येणार नाही. या त्यांच्या शब्दांतून त्यांच्या निस्वार्थ स्वभावाचा प्रत्यय येतो. या वाक्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सखोलता स्पष्ट केली आहे.

        काकू या प्रत्येकासाठी आपुलकीने वागणाऱ्या होत्या. कुटुंबातील प्रत्येक समस्या आणि संकटाच्या वेळी त्या धैर्याने उभ्या राहत. त्यांच्या जाण्याने केवळ भावनिकच नाही, तर कुटुंबाला आधार देणारा महत्त्वाचा स्तंभ हरपला आहे. त्यांचा जाणे ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे. त्यांची आठवण कुटुंबासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या कृतीतून, शब्दांतून, आणि वागणुकीतून त्यांनी कुटुंबासाठी कायमचा वारसा तयार केला आहे.

      "स्व.संगीता काकू, तुमच्या आठवणींनी आमचे मन सदैव भरून राहील. तुमच्या कुटुंबासाठी दिलेले प्रेम आणि आधार आम्ही कधीही विसरू शकत नाही. तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. आपणास भावपूर्ण श्रद्धांजली."..

२ टिप्पण्या: