Breking News

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

हलाखीतून हिरोपर्यंत – जगणं अग्निहोत्री यांची यशोगाथा

सुधाकर मराठे 
         जगण्यात संघर्ष असतोच, पण काही माणसं त्याच संघर्षाला आपल्या आयुष्याचं शस्त्र बनवून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे जगन अग्निहोत्री यांची.
          लहानपणापासूनच संकटांनी वेढलेलं आयुष्य. वडील अगदी लहान वयातच सोडून गेले. चार भावांच्या कुटुंबाची जबाबदारी आईच्या खांद्यावर आणि पुढे पुढे  स्वतः यांच्यावर येऊन पडली. शिक्षण घेणं शक्यच नव्हतं, कारण घर चालवायचं होतं. त्यामुळे 'हाताला येईल ते काम' हेच आयुष्याचं तत्त्व बनलं.

        सुरुवात झाली ती अगदी सामान्य कामांपासून. काही काळ त्यांनी तळोदा अक्कलकुवा जाणारी जीप गाड्यांवर किन्नरी करत जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. नंतर पेट्रोल पंपावर काम केलं. काम काहीही असो, प्रामाणिकपणा आणि मेहनत हेच त्यांच्या प्रत्येक कामाचं वैशिष्ट्य राहिलं.

       'जाणता राजा' पतपेढीत त्यांनी कलेक्शन एजंट म्हणून काम सुरू केलं. पैशांची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या प्रामाणिक स्वभावाची लोकांना जाणीव होऊ लागली. याच काळात त्यांनी रिक्षा चालवून मुलांना शाळेत ने-आण करण्याचं काम केलं.

      आपली स्वतःची रिक्षा असावी ही इच्छा होती. म्हणून एकदा ते एका पतसंस्थेत कर्जासाठी गेले. पण तिथे त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रामाणिकपण, मनातलं स्वच्छेपण पाहून त्यांना रिक्षा कर्जाऐवजी एक अनपेक्षित संधी मिळाली – "तू इथेच कामाला लाग", असं त्या पतसंस्थेचे प्रमुख भाजप प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांनी सांगितलं.

      त्यानंतर जगन यांनी पतपेढीतच काम सुरू केलं आणि आपल्या सचोटीने, व्यवहारकुशलतेने आणि मेहनतीने तिथेही वेगळी छाप सोडली.

        परंतु एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. शेती ही त्यांची खरी ओढ होती. मात्र स्वतःची मालकी शेती नव्हती, त्यांनी भाडे तत्वावर शेती केली,  जमेल तशी शेतीत पाऊल टाकलं आणि जमिनीवर स्वतःच्या घामाच्या बळावर यश मिळवलं. कुठलीही शेती पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी शेतात रात्रंदिवस कष्ट करून आज यशस्वी शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

        स्वभावाने जगन अग्निहोत्री हे मनमोकळे, कुठलाही छल कपट न करणारे, नातेसंबंध जपणारे आणि मित्रांच्या गराड्यात रमणारे व्यक्तिमत्व आहे. व्यवहारात सतत प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा ठेवून त्यांनी शहरात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

         आज त्यांचं नाव घेतल्यावर फक्त संघर्ष नाही, तर यश, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांची जिवंत उदाहरणं आठवतात...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा