Breking News

रविवार, २ एप्रिल, २०१७

आरोग्य केंद्रात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करा

तळोदा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर चोविस तास सेवा पुरविण्यात यावी, आरोग्य केंद्रांवर तात्काळ एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करावी, डोनर पध्दत बंद करुन शेतमजुरांना अपघातसमयी मोफत रक्त पुरविण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन मार्क्‍सवादी कम्यूनिस्ट पक्षातर्फे गटविकास अधिकारी शरद मगर यांना देण्यात आले. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
                                 जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम सुरू आहे. तळोदा शहरातून डॉ.तुषार मिरघे, डॉ.प्रितेश चौधरी, मोड येथून नंदकिशोर चौधरी, अनिल धनगर आदींवर  तळोदा शहरासह ग्रामीण भागातून व्यवसाय करणार्‍या बोगस डॉक्टरांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे तालुक्यातील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील अनेक बोगस डॉक्टरकीच्या व्यवसाय करणार्‍यांनी गाशा गुंडाळत पलायन केले आहे. गावात गल्लोगल्लीत दिसणारे डॉक्टर सापडत नसल्याने यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या वाढली आहे. अपूर्ण कर्मचार्‍यांमुळे रुग्णांना व नातेवाईकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या तापमानात आरोग्य सेवेअभावी रुग्णांना नंदुरबार, तळोदा, प्रकाशा, शहादा आदी ठिकाणी जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तळोदा तालुका कम्युनिस्ट पक्षाने बोगस डॉक्टर शोध मोहीमेला सर्मथन दिले असून मात्र यामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीसाठी तालुक्यातील आरोग्य केंद्रातील रिक्त पदांची भरती करण्याची मागणी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी शरद मगर यांना निवेदन दिले असून आदिवासी भागातील रुग्णांसाठी २४ तास सेवा देणारे एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध करावेत, अशी मागणी केली आहे. अपघातासमयी शेतमजुरांना रक्ताची आवश्यकता असताना असताना डोंनर उपलब्ध केला तरच रक्त उपलब्ध करून देऊ अशी अट टाकली जाते. डोनर पद्धत बंद करून शेतमजुरांना मोफत रक्त उपलब्द करून द्यावे, तात्काळ वरिष्ठानी याकडे जातीने लक्ष देऊन समस्या सोडवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रुबाबसिंग ठाकरे, दयायनंद चव्हाण, अनिल ठाकरे, भाऊराव बिरारे, बहादूर पाडवी यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा