आयपीएलचा हंगाम व शाळांना उन्हाळयाची सुट्टी असल्याने बाल गोपालमंडळी सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहे. आयपीएलमुळे क्रिकेटचा जोर पसरल्याने गल्लोगल्लीत उन्हातान्हाची पर्वा न करता गल्ली क्रिकेटचे सामने रंगल्याचे पहावयास मिळत आहे. यावेळी करण्यात येत असलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी व अहिराणी कॉमेंट्रीने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
गेल्या महिन्याभरापासून आयपीएलचे रंगलेले सामने रविवारी मुबईने फायनल जिंकल्याने संपले. टेलिव्हिजनमुळे क्रिकेटची लोकप्रियता सर्वत्र वाढली असून क्रिकेट हा लहान-मोठयांचा आवडता खेळ बनला आहे. अनेक गावांमध्ये मोठय़ा मैदानांचा वणवा आहे. त्यामुळे गल्लीतच क्रिकेट खेळण्याची हौस भागवली जाते. या गल्ली क्रिकेटमध्ये लहाण्यासोबत मोठेही सहभागी होताना दिसत आहेत. स्टंप म्हणून कधी स्टूल, सायकल, डब्बे, भिंत, मोटार सायकलीचे चाक किंवा टायर याचा वापर केला जात आहे. उंच फटका मारल्यास बाद, एक टप्पा झेल बाद, घरावर चेंडू गेल्यास बाद असे विविध नियम गल्ली क्रिकेटच्या खेळात लागू करण्यात आले आहेत. खिडक्यांची काच, येणार्या जाणार्यांना चुकवून चेंडू तुडविण्याची कला या गलली क्रिकेटमध्येच पाहावयास मिळत आहे. क्रिकेटमध्ये रस असणारे अनेक भाषेचा वापर करत कॉमेंट्रीने प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पडत आहे. दुधाची तहान ताकावर का होईना भागविण्याचा हा प्रकार असल्याने सध्या सर्वत्र गल्ली क्रिकेटचे दिवस सुरू आहे.
गल्लीत येणार्यांना चेंडू लागू नये, खिडक्यांच्या काचा फुटू नयेत याकरिता कापड, मोजाच्या चेंडू बनवून क्रिकेटचा आनंद घेतला जात आहे. टाइमपास म्हणून जरी क्रिकेट खेळत असले तरी त्यांच्यात जिंकण्यासाठी लागलेली स्पर्धा पाहून ओट्यांवर बसलेले प्रेक्षक प्रोत्साहीत करतांना दिसून येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा