Breking News

रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

तळोद्यात उपनगराध्यक्षांनी मांडली वेगळी चूल!

आमदार व सत्ताधारी गटाला डावलून विकासकामांचे उद्घाटन : चर्चेला उधाण : आज आमदारांच्या हस्ते उद्घाटन
तळोदा पालिकेच्या सत्ताधारी गटातील उपनगराध्यक्षा हे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांना विश्वासात न घेता स्वत:च शहरातील विकास कामांचे उद्घाटन करीत श्रेय लाटण्याच्या करीत असलेल्या प्रयत्नाबाबत एकच चर्चा सुरू आहे. उपनगराध्यक्षांच्या या प्रकाराबाबत सत्ताधारी व स्थानिक आमदार गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर यामुळे एकेका कामाचे दोनवेळा उद्घाटन केले जात आहे. तर उपनगराध्यक्षांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मांडलेली वेगळी चूल बाबत खमंग चर्चा सुरु असून मात्र त्यांनी सत्ताधारी काँग्रेस व सध्या विरोधातील भाजपा यांची नााजी ओढवून घेतल्याचे बोलले जात आहे. . तळोदा पालिकेची निवडणूक अवघ्या तीन महिन्यावर आली आहे. मात्र प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. शहरात सध्या विकास कामांचे श्रेय घेण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. मात्र ही स्पर्धा सत्ताधाऱ्यांमध्येच रंगल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तळोदा पालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. सत्ताधारी गटातील उपनगराध्यक्षपद रुखसनाबी अब्बास अली यांना देण्यात आले आहे. नुकतेच अल्पसंख्यांक निधीतुन ३० लाखाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यात जामा मस्जिद व इमाम अहमद रजा चौक, संगम टेकडी आदी परिसरात रस्ते काँक्रीटीकरण, गटार बांधकाम आदी कामांचा सामावेश आहे. या विकासकामांचे उद्घाटन उपनगराध्यक्षा रुकसानाबी सय्यद व त्यांचे बंधू रईस अली यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कामाचे उद्घाटन करुन घेण्यात उपनगराध्यक्षा यांचे बंधू रईस अली अब्बास अली यांना अधिक रस असल्याचे बोलले जात आहे. या कार्यक्रमाला माजी क्रीडामंत्री ॲड.पद्माकर वळवी, पालिकेचे गटनेते भरतभाई माळी, नगराध्यक्षा सौ.रत्ना चौधरी, बांधकाम सभापती संजय माळी, सुभाष चौधरी यांच्यासह नगरसेवक आदींना डावलून कामांचे उद्घाटन करीत असल्याची शहरात चर्चा रंगली आहे. उपनगराध्यक्षांनी विकास कामांचे उद्घाटन करतांना स्थानिक आमदार, नगराध्यक्ष, विविध समितीचे प्रमुख, विद्यमान नगरसेवक यांना बोलाविणे अपेक्षित असताना त्यांना डावलून स्वत:च विकासकामांचे उद्घाटन करुन नेमके काय साधत आहेत याबाबत संभ्रम अवस्था असून त्यांच्या या कामामुळे उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. मागील काळापासून काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात होत. मात्र, या उद्घाटन कार्यक्रमामुळे त्यास पुष्टी मिळाली आहे. सदर विकास कामाचा निधी हा राज्यसरकारच्या माध्यमातून प्राप्त होत असल्याने उद्घाटनला स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधीना आमंत्रित करणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक आमदार व भाजप गटाला डावलून सदर उद्घाटन केल्याने आमदार गोटातून व भाजप पदाधिकारी नाराज झाले आहेत. तर सदर उदघाटन हे राजकीय हेतू साधून करण्यात आल्याचे भाजपाने नाराजी व्यक्त कली आहे. त्यामुळे आज रविवारी आ.उदेसिंग पाडवी व स्थानिक लोकप्रतिनिधीच्या हस्ते पुन्हा या कामाचे शासकीय उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे शहरात एकच चर्चा आहे..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा