तळोदा येथील नगरपालिका निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेसाठी काल बुधवारी (दि.१३) मतदान यंत्रांची उमेदवारांसमक्ष तपासणी करुन यंत्रे सीलबंद करण्यात आली. यंत्रे सीलबंद करण्यापूर्वी सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधींना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे तपासून सीलबंद केली. यावेळी ३५ केंद्रासाठी ३९ मतदान पथक व १६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे..
तळोदा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि.१७ डिसेंबर रोजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी एकूण नऊ प्रभागात मतदान होणार आहे. त्यासाठी तळोदा येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात काल दि.१३ रोजी मतदान यंत्रांची तपासणी करण्यात आली. आठ ठिकाणी असलेल्या ३५ मतदान केंद्रांसाठी ३५ बैलट युनिट व ३५ कंटोल युनिट तर ऐनवेळी उपयोगात आणण्यासाठी ५ अतिरिक्त युनिट तयार करण्यात येवून निवडणूक रिंगणातील उमेदवार व निवडणूक प्रतिनिधींच्या समक्ष मतदान यंत्रे सीलबंद करण्यात आली. यासाठी चार टेबल लावण्यात आले होते. सदर कामकाजासाठी दोन नायब तहसिलदार व आठ तलाठींची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विनय गौडा, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्यधिकारी जनार्दन पवार, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या देखरेखीखाली ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यता आली. प्रत्येक यंत्रावर तीन भाग असून त्यात पहिल्या भागात नगराध्यक्ष पदाच्या तीन उमदेवारांची नावे व चिन्ह तर चौथ्या क्रमांकावर नोटाचे बटन आहे. त्यानंतर दुसऱ्या भागात नगरसेवक पदाच्या अ प्रभागाच्या व तिसऱ्या भागात ब प्रभागाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची नांवे व चिन्ह आहेत. तसेच प्रत्येक अ आणि ब च्या उमेदवारानंतर नोटाचे बटन आहे. दि.१६ डिसेंबर रोजी मतपेट्या निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रांवर पाठविण्यात येतील. प्रत्येक बुथवर एक मतदान यंत्र असेल ३५ केंद्रांसाठी ३९ मतदान पथक असून त्यात १५५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दहा महिला कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याची माहिती, निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा यांनी दिली..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा