Breking News

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

कोठारच्या दरीत नवजात अर्भकाचा टाहो!

गावकरी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी अर्भकास जीवदान :
तळोदा तालुक्यातील कोठार येथील दरीत एक नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले आहे. या नवजात अर्भकास तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथील डॉक्टरांनी उपचार सुरु केल्याने त्याची प्रकृती स्थिर असून सदर अर्भकास पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे.. तळोदा शहरापासून सुमारे १५ किमी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी कोठार गाव आहे. येथूनच सातपुड्याच्या जंगलास सुरुवात होते. कोठार येथील गुलाबसिंग पाडवी हे काल शुक्रवारी २ वाजेच्या सुमारास गावानजीकच्या जंगलातून जात असतांना त्यांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे ते आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना एका लहान दरीत एक नवजात अर्भक (पुरुष जातीचे) बेवारस स्थितीत आढळून आले. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुलाबसिंग पाडवी यांनी कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेचे शिक्षक गोविंदू पाटील यांना याबाबत कळविले व कोणाला तरी संपर्क करण्यास सांगितले.गोविंद पाटील यांनी तळोदा
तालुक्यात आरोग्यमित्र म्हणून काम पाहणारे आ.उदेसिंग पाडवी यांच्या कार्यालयातील कौशल सवाई यांच्याशी संपर्क साधत घटनेबाबत माहिती कळविली. कौशल सवाई यांनी तळोदा पोलिस ठाण्यात संपर्क साधला व १०८ रुग्णवाहिका देण्याबाबत विनंती केली. रुग्णवाहिकेत डॉ. रिमन पावरा व कौशल सवाई हे कोठार येथे दाखल झाले. होते. डॉ. पावरा यांनी नवजात अर्भकाची तपासणी केली. अर्भकाचा श्वासोच्छवास सुरु असल्याने त्यास तातडीने प्राणवायू लावत त्याची स्वछता केली. कोठार येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नवजात अर्भकाला तातडीने तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सदर अर्भक १७०० ग्रॅम वजनाचे असून त्यावर डॉ.विजय पाटील यांनी उपचार करुन अतिदक्षता विभागात दाखल केले. तीन-चार तासापासून बाळाला दुध न मिळाल्याने त्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यावर उपचार सुरु करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीश अधिक्षक डॉ.विजय पाटील यांनी अर्भकाची पाहणी केली. सदर अर्भकास पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत नोंद करण्यात आली नव्हती..

  बाळाची प्रकृती चांगली आहे. चार-पाच तासापासून त्याला दुध न मिळाल्याने त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. त्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येवून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. . - डॉ.महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी तळोदा.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा