Breking News

मंगळवार, ८ मे, २०१८

तळोदा तालुक्यातील अनेक भागात भर उन्हाळ्यात पाण्याची भूजल पातळी प्रचंड खालावल्याने कूपनलिका बंद पडत आहेत. पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाळ्याला अद्याप महिना-दीड महिन्याचा अवकाश असल्याने पिके वाचवायची कशी? अशा विवंचनेत शेतकरी सापडले आहेत. शासकीय पातळीवर लोकसहभागातून राबविल्या जाणाऱ्या गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार सारख्या योजना राबवून पाणी पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत मात्र कार्यवाही होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.. तळोदा तालुका पाण्याच्या बाबतीत सुखी तालुका म्हटला जात होता. मात्र, मागील पाच वर्षांपासून सिंचन योजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे व पीक पेरा नियोजन नसल्याने अती पाण्याचा
उपसा करणाऱ्या पिकांचे क्षेत्र वाढत गेल्याने तालुक्यातील अनेक भागात ३० मीटरवर असलेली पाणी पातळी आता ६० मीटरवर गेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या कुपनलिकांमधील १०० फुटांवर असलेल्या मोटारी २०० फुटांवर उतरविल्या आहेत. तालुक्यात २०० फुटांवर जमिनीत खडक लागत असल्याने त्याच्या खाली बोअर होत नाही. फेब्रुवारी महिन्यातच दलेलपूर, कढेल, खेडले, तऱ्हावद या भागातील पाणी पातळी खालाविली. त्यानंतर चिनोदा, रांझणी, मोरवड, तळवे, खरवड, पिंपरपाडा, तलावडी, सिलिंगपूर, बंधारा, सावरपाडा, राणीपूर, रोझवा, गोपाळपूर, पाडळपूर, सलसाडी, रेवानगर, सरदार नगर, रोझवा पुनर्वसन, भंवर, गणेश बुधावल यासह तळोदा शिवाराचा काही भागातील पाणी पातळी खालावली आहे. तालुक्यात सर्वात जास्त उसाची लागवड असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या उपसा भूगर्भातून केला जातो. त्या प्रमाणात पाण्याचा निचरा जमिनीत होत नसल्याने पाणी पातळी खाली जात असून मागील पाच वर्षांपासून दरवर्षी हा प्रश्न तालुक्याला भेडसावत आहे. यावर उपाययोजना मात्र होत नसल्याने दिवसेंदिवस पाणी प्रश्न बिकट होत आहे. यावर गावगावात नियोजन होऊन उपलब्ध पाण्याच्या साठ्याप्रमाणे पिकांचा पेरा व्हायला हवा. परंतु याबाबत शेतकरी सुद्धा नियोजन करीत नसून अधिक पैसा देणारे उसासारखे पिके घेत असल्याने व रात्रदिवस पाण्याच्या उपसा होत असल्याने पाणी पातळी खालावत आहे. शासकीय पातळीवर सुद्धा यावर उपाययोजना केली जात नसून गाळमुक्त शिवार गाळमुक्त धरण योजना राबवून गावातील लहान-मोठ्या तलावातील व शासकीय लघुसिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जातेय. याची दखल जलसंपदा विभागाने मात्र कधीच घेतली नाही.. जलयुक्त शिवार सारख्या योजनाची व्याप्ती वाढविली पाहिजे मागच्या वर्षी तालुक्यात आठ गावात ही योजना राबविली गेली आहे. या वर्षी १० गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे मागच्या वर्षीच्या आठ गांवात या योजनेची फलश्रुती काय ते या वर्षीच्या पावसाळ्यानंतरच कळेल. आज पाणी प्रश्न बिकट झाला असून हातात असलेली पिके वाचवायची कशी? असा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांना भेडसावत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा