पत्नी रूग्णालयात असतांनाही आ.पाडवींनी दिले वृक्षारोपणाला प्राधान्य
वृक्ष लागवड अभियानाचा काल शुभारंभ असतांनाच आ.उदेसिंग पाडवी यांच्या पत्नी अर्चना पाडवी यांची अचानक प्रकृती खराब झाल्याने त्यांचा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. रात्रभर उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. मात्र काल वृक्ष लागवड मोहिमेचा पहिला दिवस असल्याने आ.पाडवी यांनी पत्नीला रूग्णालयातच सोडून कर्तव्याला प्राधान्य देत वृक्ष लागवड मोहिमेस हजेरी लावुन उत्साह वाढविला. आ.पाडवींनी यामुळे लोकप्रतिनिधींपुढे आदर्श निर्माण केला आहे..
पर्यावरणाच्या ढासळता समतोलावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रम हाती घेण्यात आला असून जिल्ह्यात ५१ लाख वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. काल वृक्ष लागवड मोहिमेचा पहिला दिवस होता. मात्र त्यातच आ.उदेसिंग पाडवी यांच्या धर्मपत्नी अर्चना पाडवी यांना श्वास घेण्यास त्रास होवु लागला. आ.पाडवी यांनी शनिवारी रात्री ठिकठिकाणी दूरध्वनीवरून स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधून उपचारास सुरूवात केली. मात्र अर्चना पाडवी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने रात्री २ वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील खाजगी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तरीही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. असे असतांना काल मात्र वृक्ष लागवड मोहिमेचा पहिला दिवस असल्याने आ.पाडवी यांनी आजारी असणाऱ्या पत्नीला रूग्णालयातील अतिदक्षता विभागातच सोडून वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभप्रसंगी हजेरी लावली. खरेतर पत्नी रूग्णालयात असतांना त्यांना वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष करता आले असते. .
मात्र त्यांनी आधी कर्तव्य व नंतर कुटूंबाला प्राधान्य देत लोकप्रतिनिधीतील गुणांची ओळख करून दिली. तळोदा येथील स्वामीनारायण मंदिर परिसरात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीप्रसंगी ते म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेवुन वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेणे गरजेचे झाले आहे. आज पत्नी रूग्णालयात असून तिला माझ्या धीराची गरज असतांनाही मी वृक्ष लागवडीसाठी आलो असून कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. प्रत्येकाने कर्तव्याला प्राधान्य दिल्यास वृक्ष लागवड चळवळ होवुन मोठ्या प्रमाणावर वृक्ष संवर्धन झाल्यास भविष्यात याचा फायदा होईल, असे आ.पाडवी यांनी सांगितले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा