Breking News

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

मद्यधुंद बसचालकाची अनकंट्रोल ड्रायव्हिंग

आमलाडजवळ बस फरशी पूलावर आदळल्याने फुटले तीन टायर; प्रवाशांचा थरकाप, कारवाईची मागणी
मद्याने चिंगाट झालेल्या बसचालकाने झिंगाट होवून भरधाव वेगाने सुसाट बस पळविली. प्रवाशी आमचे दैवत असे ब्रीद मिरविणाऱ्या परिवहन महामंडळाच्या या चालकाने वाहन चालविण्याच्या या चित्तथरारक सर्कसमुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. सरळ महामार्गावरही नागमोडी घिरट्या घालणारी बस शेवटी आमलाडजवळील एका पूलावर आदळली अन बसचे एक-दोन नव्हे तर तीन टायर फुटल.ेमात्र तरीही मद्यधुंद चालकाची शुध्द हरपलेलीच. बऱ्हाणपूर-अक्कलकुवा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी शहादा ते तळोदा प्रवासादरम्यान हा थरार अनुभवला. काहींनी तर चक्क मृत्यूच समोर पाहिल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या मद्यप्रिय बसचालकावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या काही वाहनचालकांचे कारनामे बऱ्याचदा ऐकण्यात येतात. काहीसा असाच प्रकार गुरूवारी घडला. बऱ्हाणपूर-अक्कलकुवा बसच्या चालकाने मद्य प्राशन करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. शहादा येथून तळोदा येथे सदर वाहन येत असताना त्या वाहनात साधारण ४० ते ५० प्रवाशी बसले होते. दरम्यान आमलाड नजीक तोल जाऊन फरशी पुलाच्या कठड्यावर एसटी आदळली. त्यात या वाहनांचे ३ टायर जागीच फाटले तर एका चाकाची अक्षरश रिंग बाहेर आली. कसेबसे करत
 वाहनांवर नियंत्रण मिळविले मात्र तोपर्यंत प्रवाशांचा जीव भांड्यात पडला होता. प्रवाशांचा थरकाप उडाला. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान याबाबत वाहन चालकाला विचारणा केली असता एस टी पंक्चर झाल्याचे कारण सांगत अरेरावीदेखील केल्याचे प्रवाशांनी सांगितले. शहादा ते तळोदा दरम्यान २ ते ३ ठिकाणी या बसचा अपघात होता होता वाचला. अक्कलकुवा आगाराच्या वाहन चालकाकडून प्रवश्यांशी अरेरावी करण्याबाबत वेळोवेळी तक्रारी येतात. मात्र आगार प्रशासनाकडून बेशिस्त व बेजबाबदार चालकांवर कारवाई होत नसल्याने या प्रकारात वाढ होत आहे. तर अक्कलकुवा आगाराच्या बसेस खरंच सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर रस्त्याची झालेली दुुरावस्था त्यावर मद्यपान करून बेजबाबदारपणे वाहन हाकणाऱ्या त्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी एकच मागणी यावेळी प्रवाशांकडून करण्यात आली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा