Breking News

बुधवार, २२ मे, २०१९

चारा छावणी-पाण्याची समस्या सोडवा ; तहसीलदारांच्या आश्वासनाने रात्री उशिरा आंदोलन मागे

तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कुवलीडाबरी येथे पाणी टंचाई बाबत प्रशासनाने गाढवाच्या
सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र ३१५ मानवी लोकसंख्या व ५९२ जनावरे संख्या असलेल्या या गावाला १७ गाढव प्रत्येकी ३२ लिटर प्रमाणे साधारणत: ११०० लिटर पाणी दोन खेपा करून नेत आहेत. प्रत्येकी व्यतीला दरडोई २० लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, प्रत्येक एका व्यक्तीला केवळ तीन लिटर पाणी मिळत असल्याने पाण्याची तृष्णा भागवणे अवघड ठरत आहे. चारा छावणीची अत्यंत आवश्यकता आहे. केवळ परंपरा पडू नये यासाठी शासन छावणी उभारत नसल्याचा आरोप लोकसंघर्ष मोर्चाने केला. याबाबत तातडीने उपाययोजना व्हावी म्हणुन काल तहसील कार्यालयात हंडा मोर्चा काढण्यात आला. मागणी मान्य होत नसल्याने सायंकाळ उशिरापर्यंत आंदोलक ठाण मांडून बसले होते. दरम्यान चारा छावणी बाबतची जाहिरात आज (दि.२१) प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. २५ तारखेपर्यंत चारा छावणी सुरु होणार असल्याचे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. .
तळोदा तालुक्यापासून अवघ्या ९ किमी. असलेले रापापूर व चौगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुयलीडाबरी, पालबारा, गोऱ्यामाळ, माळखुर्द, चिलमाळ, डेब्रामाळ आदी गावांना मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता नसल्याने याठिकाणचे प्रश्न गंभीर बनलेले आहेत. वन अधिकार कायदा झाला, कायदा अंतर्गत वनसामुदायिक अधिकार मिळाला ते मालक झाले. तरी देखील आदिवासींचा रस्त्याचा प्रश्न आजही सुटलेला नाही. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुका हा संपूर्ण तालुका दुष्काळी म्हणून जाहीर आहे. असे असताना ही शासनाने कुठलेही पूर्व
नियोजन व उपाययोजना न केल्याने तब्बल दुष्काळाचा झळा या ग्रामस्थाना पोहचल्यानंतर ग्रामस्थ व लोकसंघर्ष मोच्र्या या संघटनेचा माध्यमातून संघर्ष केल्यानंतर अखेर गाढवांवर पाणी पुरवठा करण्याचा निर्णयापुढे शासनाला झुकावे लागले. प्रत्येकी व्यक्तीमागे २० लिटर पाणी देणे गरजेचे आहे. मात्र, याठिकाणी एका कुटुंबामागे मागे केवळ तीन लिटर पाणी दिले जात आहे. याठिकाणी गाय, बैल, बकरी असे ५९२ जनावरे असून त्यांच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. ग्रामस्थांनी महिन्याभरपूर्वीच चारा छावणी उभारण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले व अनधिकृतपणे असा पायंडा पाडला जाऊ नये. याबाबतीत शासन लोकांना न्याय देण्याऐवजी ही भूमिका घेतली, असा आरोप लोकसंघर्ष मोर्चाने केला आहे. ग्रामस्थाना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, तेथील मूलभूत सुविधा मार्गी लागव्यात, जनावरांसाठी चारा छावणी तात्काळ सुरू करावी, यासाठी संतप्त गावकऱ्यांनी सोमवारी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी हंडा मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयात ठिया मांडला. यावेळी खेमजी गवल्या वसावे, विनायक कुर्ता वसावे, रेवा सोत्या वसावे, पालाबार येथील नरपत राजा
पाडवी, इला पेचरा पाडवी, मैथून मोजा पाडवी, बोर्डीबाई खेमजी वसावे,अनिता कालुसिंग वळवी, लासु बाई काल्या वसावे, वळवी रमेश, गुलाबसिगं वळवी, दिलीप वळवी, कालूसीग नाईक,आमशा वसावे, राकेश पाडवी, सायसिग वसावे, ठाकूरसिग वसावे,बोखां वसावे, दिलवर वसावे, दिलीप नाईक, बाबुसिंग वसावे, राजा पाडवी, देविसिंग वसावे महाजन, निशांत मगरे, गणेश पराडके आदी उपस्थित होते..

 गाढवांचा सहाय्याने स्थानिक निधीतून पाणी पुरवठा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच कुयलीडाबरी हे गाव वनक्षेत्रात येते. दरम्यान सदर रस्त्यासाठी वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. केवलापाणी पावेतो रस्त्याची परवानगी प्राप्त झालेली असून कामे प्रगतीपथावर आहेत. . -

सावित्री खर्डे, गटविकास अधिकारी.

 तळोदा तालुक्यापासून अवघ्या ९ किमी.असलेल्या या गावात स्वातंत्र प्राप्तीनंतर सुद्धा मूलभूत सुविधा नाहीत. आदिवासीच्या जीवाशी आजही खेळ सुरूच आहे. गाढवांच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असला तरी प्रतिडोई तीन लिटर पाणी पुरविले जाते आहे. जनावरांसाठी आजही चारा पाण्याचा प्रश्न बिकट आहे. प्रधासनाने तातडीने यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. .
 -प्रतिभा शिंदे, लोकसंघर्ष मोर्चा.

 दीड वर्षाचे बाळ घेऊन हंडा मोच्र्यात सहभागी झाले आहेत. गावात उच्च शिक्षित तरुण-तरुणी आहेत. मात्र केवळ गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने तरुणांचे लग्न होत नाही. कोणी मेलेच तर दशक्रिया विधीसाठी सुद्धा करणे अवघड ठरते, सपूर्ण गाव एकवटून त्याठिकाणी सहकार्य करते. पाहुणे आले तर त्यांची सोय करणे अवघड ठरते..
 -उषा वळवी, कुयलीडाबरी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा