Breking News

मंगळवार, ७ मे, २०१९

घोटभर पाण्यासाठी जीव होई कासावीस... तहानेसाठी भटकंती रातन्दिस कैफियत :

तळोद्यातील तिघा गावांना टंचाईच्या झळा; स्वातंत्र्याची सत्तरी उलटूनही रस्ता नाही
  शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, निवारा या सारख्या मुलभूत सुविधांपासून स्वातंत्र्याची सत्तरी उलटल्यानंतरही तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रहिवासी वंचितच आहेत. किमान माणूस म्हणून जगण्यासाठी असणाऱ्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी येथील रहिवाश्यांचा संघर्ष आजही कायम आहे. समस्यांचा पाढा तर संपता संपत नाही. तळोदा तालुक्यातील कोयलीडाबर, गोरामाळ व चिडीमाळ या गावांना जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्याने पायवाटेनेच जावे लागते. यामुळेच की काय ही गावे विकासापासून आऊट ऑफ कव्हरेज आहेत. असो, पण किमान पिण्याचे पाणी तरी मिळावे, रहदारीसाठीचा रस्ता तरी व्हावा, अशी आस येथील रहिवाश्यांना आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी खोल विहीरीत उतरून रानावनातील भटकंतीचे येथील दाहक वास्तव मनाला चटका लावुन जाणारे असले तरी याची दखल मात्र कोणीही घेत नसल्याने आता संघर्षाबरोबर हक्कासाठी
आंदोलनच उभारायचे असा निर्धार येथील रहिवाश्यांनी केला आहे.. गावात वीज पुरवठा करण्यासाठी येथील रहिवाश्यांनी सुमारे पाच ते सहा कि.मी.अंतरापर्यंत वीजेचे पोल व विद्युत रोहित्र अक्षरक्ष: दोर बांधुन ओढून आणले. परंतू अद्यापही त्यांना याची मजूरी अदा करण्यात आली नाही. संतप्त ग्रामस्थांसह लोकसंघर्ष मोर्चाने याची तक्रार तळोदा गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी कोयलीडाबर, चिडीमाळ व गोरामाळ या गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, गुरांसाठी चारा छावणी सुरू करावी, रस्त्याचे काम युध्द पातळीवर सुरू करावे, मुलभूत सुविधा पुरवाव्यात अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दुष्काळाच्या झळा आता ग्रामीण व आदिवासी क्षेत्रासह सर्वत्रच तीव्र होवु लागल्या आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोयलीडाबर, गोरामाळ व चिडीमाळ येथील रहिवाश्यांनी केला आहे.
तळोदा शहरापासून अवघ्या २० ते २५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावांना जाण्यासाठी स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर अजूनही रस्त्याची प्रतिक्षाच आहे. पायवाट तुडवित येथील रहिवासी मार्गक्रमण करतात. यामुळे देश विकसनशील कडून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करीत असला तरी येथील रहिवाश्यांच्या समस्या मात्र जैसे थे आहे. कोयलीडाबर गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन विहीरी बांधण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. असे असले तरी यातील एक विहीर अर्धवट बांधकाम असून तिला पाणी आलेच नाही. तरीही येथे सौर ऊर्जेवरचा पंप व मशिन बसवुन काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या विहीरीने कधीच तळ गाठला आहे. यामुळे तहान भागविण्यासाठी येथील रहिवाश्यांना खोल विहीरीत उतरून झिऱ्यांमधून पाणी भरून तहान भागवावी लागते. हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. येथे माणसाच्याच पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत तर जनावरांच्या तहानेसाठी होणारे हाल समस्यांमध्ये अधिकच भर टाकतात. चिडीमाळ व गोरामाळच्या पाड्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. गावात रस्ताच नसल्याने टँकरने पाणी पुरवठा होत नाही. यामुळे तहान भागविण्यासाठी रानोवनी करावी लागणारी भटकंती येथील रहिवाश्यांच्या पाचवीला पूजलेली आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने याची दखल घेवून येथील रहिवाश्यंाची तहान तरी भागवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे..




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा