Breking News

मंगळवार, १४ मे, २०१९

पायपीट करीत तहसीलदारांसह अधिकारी पोहचले कुयलीडाबरी

तळोदा तालुक्यातील कुयलीडाबरी, केलापाणी, पालाबारी, गोरामाळ, चिडीमाळ अशा दुर्गम भागातील पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने गावात जाऊन पाणी व चारा छावण्यांबाबत तालुका प्रशासनास प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पायवाट तुडवित तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे, विस्तार अधिकारी बी.के.पाटील, ग्रामसेवक वसावे, माळखुर्दचे ग्रामसेवक आर.डी.पावरा, ग्रामीण पाणी
पुरवठा शाखा अभियंता सोनवणे, भूजल सर्वेक्षणचे अहिरे, डॉ.विश्वास नवले, रापापुर येथील सरपंच भिकलाल वळवी, अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक यांनी शनिवारी भेट दिली. केवलापाणी पर्यंत सर्व अधिकारी वाहनाने त्याठिकाणी पोहचले.त्यानंतर ७ ते ८ किमी अंतर पायपीट करीत पोहचतांना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झालेली होती. गावात पहिल्यांदा अधिकारी पाहून ग्रामस्थ देखील अवाक झाले होते. ग्रामस्थांनी अधिकारी पाहून आनंद व्यक्त करत विविध समस्यांचा पाढा वाचला.. गावात रस्ताच नसल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. यामुळे तहान भागविण्यासाठी रानोवनी करावी लागणारी भटकंती व डोंगराळ भागात पाण्यासाठी तेथील रहिवाशांचे हाल पाहून तहसीलदार देखील अवाक झाले. रोजगार सोडून तहानेसाठी काय दिव्य पार पाडावे लागते याची प्रत्यक्ष अनुभूमी अधिकाऱ्यांनी घेतली. अनेकांना डोंगर उतरून खाली जावे लागत असल्याचे यावेळी सांगितले.
दररोज डोंगरावर चढून पाणी आणणे अवघड आहे. तसेच ग्रामस्थांकडे १७ गाढव असुन केलीपाणी व पालबारी येथील विहीरीच्या माध्यमातून कुयलीडाबरी येथे गाढवाच्या मदतीने पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. दरम्यान कुयलीडाबरी येथे ३ विहीरी असून केवळ एका विहिरीत झरा पाझरता आहे. त्यातून गावाची पाण्याची तहान भागवणे शक्य नसल्याने ग्रामपंचायत मार्फत खोलीकरण व ब्लास्टींगचे कामे सुरू असून २० ते २५ फूट खोलीकरण करूनही याठिकाणी पाणी लागलेले नाही. पर्याय म्हणून केवलापाणीपर्यंत ट्रॅकरने पाणी नेऊन पुढे गाढवाच्या साहाय्याने पाणी पोहचविण्यासाठी नियोजन करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. दरम्यान केलीपाणी,कुयलीडाबरी, पालाबारी या गावांच्यामध्ये एका खाजगी विहीरीला पुरेसे पाणी आढळले. सदर विहीर अधिग्रहण करून ते ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. .








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा