दि.०६ नोव्हेंबर २०२४
सकाळी 10:30 वाजेला १० मित्रांसह आम्ही दिल्लीत निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचलो. आमच्यातील काही जण दिल्लीला प्रथमच आले असल्याने शहराचे वातावरण आणि गजबज त्यांच्यासाठी विशेष अनुभव होता. रात्रीच ट्रॅव्हल प्लॅनर श्रीमती हेमांगी यांनी रात्रीच आमची शिमला येण्याची व्यवस्था केल्यामुळे स्टेशनवर आमची दोन १५ आसन असलेल्या टेम्पो ट्रॅव्हल गाड्या आमची वाट पाहत उभ्या होत्या. आम्ही प्रवास सोयीसाठी दोन गटांत विभागलो.
दिल्लीच्या धावपळीतील क्षण टिपत आणि गप्पांचा आनंद घेत आम्ही गाड्यांतून शिमलाकडे रवाना झालो. "मीट माय हॉलिडेज" या ट्रॅव्हल कंपनीने आधीच आमच्या सोयीची सर्व व्यवस्था केली होती, त्यामुळे आम्हाला प्रवासाचे टेन्शन नव्हते. दिल्ली सोडताच लवकरच रस्त्यावरील निसर्ग बदलू लागला. पंजाब लुधियानाच्या मोकळ्या रस्त्यांवरून चालताना समोरच्या डोंगरांच्या रांगा हळूहळू स्पष्ट दिसू लागल्या. सगळे प्रवासी एका वेगळ्या आनंदात होते, प्रत्येक ठिकाणची नवी अनुभूती घेण्यासाठी उत्सुक होते.
हळूहळू घाटरस्त्यांवर गाडी चढू लागली आणि थंड वाऱ्याचे झोत जाणवू लागले. खिडक्यांमधून येणारी थंडीचे स्पर्श आणि हिमालयाच्या पर्वतश्रेणीचे विहंगम दृश्य मनाला मोहून टाकणारे होते. रस्त्याच्या वळणांवरून जाताना डोंगरांवरून दिसणारी छोटी-छोटी घरं, वाहणारे नद्यांचे प्रवाह, आणि हिरवाईनं नटलेला परिसर हा निसर्गाच्या अद्भुततेचा अनुभव देत होता.
रस्त्याच्या मार्गात चहा आणि स्नॅक्ससाठी थांबण्याच्या ठिकाणी आम्ही स्थानिक चहा आणि गरमागरम भाजीचा आनंद घेतला. त्यातली वेगळीच चव आणि ताज्या हवेचा स्पर्श मन प्रसन्न करत होता. शिमल्याच्या दिशेने जाताना, रस्त्यांवरचे शंकूच्या आकाराचे देवदाराचे झाडे आणि उंच उंच पर्वतांचे दृश्य पाहून आम्हाला खूपच आनंद झाला.
शिमल्याच्या जवळ येताना थंडी अधिकच वाढली होती, आणि हवेतला बोचरा स्पर्श आम्हाला हिमालयाच्या जवळ असल्याची जाणीव करून देत होता. शेवटी, संध्याकाळच्या सुमारास आम्ही शिमल्याला पोहोचलो. डोंगरांच्या कुशीत वसलेले, धुक्यांनी झाकलेले, आणि लाईट्सनी उजळलेले शिमला अप्रतिम दिसत होते. थंड हवेत वातावरण एकदम शांत आणि स्वप्नवत वाटत होतं.
हॉटेलवर पोहोचल्यावर थोडासा आराम केला, आणि मग सगळेजण शिमल्याच्या प्रसिद्ध मॉल रोडला फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा