साध्या पण कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वाचे धनी सुरज पंडित पाटील यांचे केवळ ४० व्या वर्षी झालेले आकस्मिक निधन मनाला चटका लावणारे आहे. दै. पुण्यनगरी कार्यालयात ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या सुरजने आपल्या समर्पित वृत्तीने आणि निष्ठेने संस्थेतील प्रत्येक सदस्याच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.
सुरज पाटील हे नाव म्हणजे कामाप्रती निष्ठेचा आदर्श. जाहिराती सेटअप करणे, बातम्या सुसूत्र करणे यांसारख्या तांत्रिक बाबींमध्ये त्याचा हातखंडा होता. संस्थेच्या छोट्या-मोठ्या कामांसाठी तो नेहमी तत्पर असायचा. जाहिरातीचे आर.ओ. भरण्यापासून जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी व बँकेत जाऊन भरण्या करणे पावेतो प्रतिनिधींसोबत काम करण्यापर्यंत, त्याने कार्यालयातील विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडल्या.
सुरजचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्याने कधीही संताप व्यक्त केला नाही, कुणालाही दुखावले नाही. त्याच्यात सर्वांना धरून चालण्याची असामान्य कला होती. त्याचा चेहरा नेहमी हसरा असायचा, आणि त्याच्या सकारात्मक उर्जेमुळे कार्यालयाचे वातावरण नेहमी प्रसन्न असे,
अवघ्या कमी वयात, जीवनाचा उत्कर्ष गाठण्याच्या टप्प्यावर त्याला आजाराशी सामना करावा लागला. त्या संघर्षाने त्याला खूप थकवले, पण त्याने कधीही स्वतःला खचू दिले नाही. दुर्दैवाने, ४० व्या वर्षी त्याच्या या सुंदर प्रवासाचा अंत झाला, ज्यामुळे त्याचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि परिचित हळहळले.
सुरजच्या आठवणींमध्ये त्याचे हसरे रूप, काम करण्याची लगन, आणि सर्वांशी केलेले आपुलकीचे वागणे नेहमीच जिवंत राहील. त्याचा संघर्ष, त्याची मेहनत, आणि त्याचा साधेपणा यामुळे तो कायम लोकांच्या हृदयात राहील.
सुरजभाऊ यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासाठी, सहकाऱ्यांसाठी, आणि संस्थेसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या निष्ठेचे, साधेपणाचे आणि सकारात्मकतेचे उदाहरण आपल्यासाठी कायम प्रेरणादायी ठरेल. सुरज, तुमच्या आठवणी आणि कार्याची सावली आमच्यासोबत नेहमी राहील. दैनिक पुण्यनगरीतील एक सहकारी अश्या अचानक गेल्याचे आयुष्यभर दुःख असेल. तुला भावपूर्ण श्रद्धांजली!
सुधाकर मराठे
तळोदा प्रतिनिधी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा