जीवनात काही माणसं अशी भेटतात की त्यांचं मन इतकं मोठं असतं की ते पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व देतात. अशाच एका सुसंस्कृत, दिलदार आणि माणुसकीने ओथंबलेल्या व्यक्तिमत्त्वाचा अनुभव मला डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या रूपाने आला.
जानेवारी 2021 मध्ये मी आणि माझे गुरू मित्र कालूभाऊ त्यांच्या नवीन इमारतीच्या स्लॅबवर बसून गप्पा मारत होतो. त्यांच्याच प्लॉटच्या मागच्या बाजूला डॉ. महेंद्र चव्हाण यांचा एक प्लॉट होता. सहज बोलता-बोलता प्लॉट विक्रीसंदर्भात चर्चा सुरू झाली.
"तुम्ही हा प्लॉट विकणार आहात का?" भाऊने सहज विचारलं. "मला दिला नाही तरी चालेल, पण विकणार असाल तर चांगल्या व्यक्तीला द्या." त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवली.
डॉ. महेंद्र चव्हाण हे शांतपणे हसले आणि म्हणाले, "कालूसर, हा प्लॉट मी सुधाकरला द्यायला इच्छुक आहे. तुम्ही दोघे चांगले मित्र आहात आणि कायम सोबत राहणार. हाच माझा उद्देश आहे. एक प्लॉट गौरवला देऊ आणि एक सुधाकरला."
त्या एका वाक्याने त्यांनी माझ्यासाठी जणू अनमोल भेट देण्याचा निर्णय घेतला होता.
हा निर्णय झाला आणि आठवड्याभरातच मी आणि गौरवभाऊ वाणी प्रत्येकी ५०,००० रुपये घेऊन डॉ. चव्हाण यांच्याकडे गेलो.
पण आश्चर्य म्हणजे, त्यांनी त्या रकमेतून फक्त ५०० रुपये घेतले आणि प्लॉटची फाईल आमच्या हातात दिली!
"लवकर नोंदणी करून घ्या, बाकी रक्कम मला गरज लागेल तेव्हा मागेन," असे ते हसत म्हणाले.
मी त्यांना सांगितले, "रक्कम हातात आली तसे तसे मी परत करत जाईन."तेवढ्यावरच समाधान मानत त्यांनी प्लॉट माझ्या नावावर करण्याचा निर्णय घेतला.
ठरल्याप्रमाणे, वेळोवेळी मी रक्कम पूर्ण केली, पण एक अर्थी हा प्लॉट मला बक्षीस म्हणूनच मिळाला!
डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या सारख्या माणसांमुळेच या जगात अजूनही विश्वास, नाती आणि माणुसकी जिवंत आहे. त्यांनी नफा- तोट्याच्या गणितात न अडकता फक्त विश्वास आणि मैत्रीच्या नात्यावर मला हा प्लॉट दिला.
आजही मी हा प्रसंग आठवतो, तेव्हा त्यांची मोठी मनाची वृत्ती आणि माणुसकीने भारलेले व्यक्तिमत्त्व यामुळे मन अभिमानाने भरून येतं. अशा व्यक्तीमुळेच समाज सुंदर आणि सुसंस्कृत बनतो..
डॉ.महेंद्र चव्हाण यांच्यासारख्या माणसांसाठी एकच शब्द – सलाम!
*आभारी कालू भाऊ आणि डॉ.चव्हाण दादा...*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा