Breking News

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

तळोदा परिसरासाठी वरदान ठरलेला महामंत्र सरस्वतीनंदन स्वामी महाराजां ५१ वर्षांची अखंड सप्ताह परंपरा

तळोदा परिसरासाठी वरदान ठरलेला महामंत्र

तळोदा : ०७ ऑगस्ट २०२५ 
       श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेचा संगम घडवणारा एक ऐतिहासिक प्रसंग तब्बल ५१ वर्षांपूर्वी बडोदा येथील आश्रमात घडला, ज्याने तळोदा परिसराच्या अध्यात्मिक आणि पर्यावरणीय जीवनात आमूलाग्र बदल घडवला. या प्रसंगाच्या केंद्रस्थानी होते दिव्य अंतर्दृष्टी लाभलेले सरस्वतीनंदन स्वामी महाराज, ज्यांच्या मुखकमलातून प्रकट झालेला २३ अक्षरी महामंत्र आजही तळोदा परिसरासाठी एक आशिर्वादमंत्र ठरला आहे. या मंत्रावर आधारित अखंड सप्ताह परंपरा गेल्या पाच दशकांहून अधिक काळ तळोदा गावात सातत्याने जपली जात आहे.  
      १९७० च्या सुमारास तळोदा येथील वैद्यराज शंकरराव गोविंदराव मराठे आणि वडाळी येथील मदन बापूजी निकम हे दोघे सरस्वतीनंदन स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी बडोदा येथील आश्रमात गेले होते. त्यांनी महाराजांना नम्र विनंती केली – “तळोदा येथे सात दिवसांचा सप्ताह सुरू करायचा आहे, कृपया मार्गदर्शन द्या.” त्या वेळी मुलजी शंकर गुरु सरस्वतीनंदन उर्फ ‘मुलजी मामा’ देखील उपस्थित होते. महाराजांनी ही विनंती ऐकून काही काळ ध्यानधारणा केली आणि शेवटी त्यांनी श्रावण शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी सूर्योदयापासून सात दिवस अखंड नामजप करण्याची आज्ञा दिली. त्यांनी त्या वेळी जो मंत्र दिला, तो होता – “ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन” – हे २१ अक्षरी मंत्र होते, ज्यात 'घन' हा शब्द एकदाच होता.
दोघे शिष्य महाराजांची आज्ञा घेऊन परत तळोद्याला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचले. परंतु आश्रमात ध्यानस्थ अवस्थेत असलेल्या स्वामी महाराजांना अंतःप्रेरणा झाली की मंत्रामध्ये आवश्यक बदल शिल्लक आहे. त्यांनी तातडीने मुलजी मामा यांना सांगितले – “ते दोघे स्टेशनवर आहेत, ट्रेनला उशीर आहे, त्यांना परत बोलवा.” आणि खरेच, ते दोघे तिथेच होते. आश्रमातून पाठवलेल्या माणसाने त्यांना शोधून पुन्हा आश्रमात आणले. त्यानंतर महाराजांनी स्पष्ट निर्देश दिले की, “हा मंत्र २३ अक्षरी असावा, आणि ‘घन’ शब्द पुनः घ्यावा.”

त्याच साक्षीला, पुन्हा उच्चरित झाला २३ अक्षरी महामंत्र –
!! ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन घन !!

स्वामी महाराजांनी या मंत्राचा अर्थही समजावून सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हे सत्य गुरुदेव, आपण पूर्णब्रह्म, सर्वज्ञ, अंतर्ज्ञानी आहात. आपण सुख, समृद्धी, आरोग्य, शांती आणि अध्यात्मिक उन्नती प्रदान करणारे आहात. ‘सोऽहम’ म्हणजे ‘मी तोच आहे’ – म्हणजे परमात्मा सर्वत्र आहे, प्रत्येक प्राणिमात्रात आहे. ‘दयाघन घन’ म्हणजे आपण दयेचा, करुणेचा सतत वर्षाव करणारे आहात.”
गुरुआज्ञेनुसार शंकरराव मराठे आणि मदन निकम यांनी तळोदा येथे सप्ताह सुरू केला. सप्ताहाची खास वैशिष्ट्ये म्हणजे सात दिवस २४ तास अखंड महामंत्राचा जप, सामूहिक सहभाग, आणि संपूर्ण गावातील धार्मिक उत्सवाचे वातावरण. विशेष म्हणजे, हा सप्ताह गेल्या ५१ वर्षांपासून सलग सुरू आहे, कोणतीही खंडितता न होता. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने सप्ताह साजरा केला जातो. सप्ताहाच्या समारोपाला ढोल-ताशा, लेझीम, तालीम पथक, भजनी मंडळ आणि पालखी सोहळा अशा पारंपरिक वेशात महाराजांच्या प्रतिमेसह संपूर्ण गावात शोभायात्रा काढली जाते. महामंत्राच्या गजरात गावभर प्रदक्षिणा केली जाते.
या आध्यात्मिक पर्वानंतर संपूर्ण गावासाठी एक पवित्र भंडारा आयोजित केला जातो. यात डाळ-भात, चण्याची भाजी आणि गूळ-लापशी यांचा समावेश असतो. हा भंडारा अत्यंत पवित्रतेने, शुभ्र वस्त्र झाकून, स्वयंपाक खोलीत महाराजांच्या प्रतिमेजवळ ठेवून भक्तांना वाटला जातो. संपूर्ण गाव भोजन घेतल्यानंतर जो प्रसाद उरे, तो तापी नदीत विसर्जित केला जातो – हा एक प्रकारचा निसर्गाशी असलेला दयाळू संवाद आहे, ज्यामध्ये जलचर प्राण्यांनाही प्रसादाचा लाभ मिळावा अशी भावना असते.
या अखंड सप्ताहाच्या काळात अनेक भक्तांनी स्वप्नात, ध्यानात किंवा प्रत्यक्ष अनुभूतीच्या रूपात गुरु महाराजांचे दर्शन घेतल्याचे अनुभव कथन केले आहेत. ही अनुभूती म्हणजे महाराजांच्या कृपेची जिवंत साक्षी आहे. त्यांच्या उपस्थितीची जाणीव आजही अनेकांना दरवर्षी होत असते.

या महामंत्राचा प्रभाव परिसरात प्रकर्षाने दिसून येतो. सुसम पर्जन्य, चांगली शेती, पर्यावरणीय समतोल, आरोग्यदायी वातावरण आणि सामाजिक सलोखा – हे सगळे परिणाम या जपाच्या सामूहिक ऊर्जेने घडत असल्याचा दृढ विश्वास गावकऱ्यांमध्ये आहे. अति-वृष्टी वा दुष्काळ यांसारख्या टोकाच्या हवामान बदलांपासून परिसर सुरक्षित राहिलेला आहे.

आजच्या धावपळीच्या युगात, गावातील ही आध्यात्मिक परंपरा अधिकच महत्त्वाची वाटते. केवळ धार्मिकतेपुरती मर्यादित न राहता, ही चळवळ सामाजिक एकजूट, पर्यावरण रक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करणारी आहे. हा इतिहास केवळ गतकाळाचे स्मरण नसून, वर्तमानात जपावयाची आणि भविष्यात टिकवावी अशी एक विलक्षण श्रद्धा-अभियान आहे.

गेल्या पाच दशकांपासून जपला जात असलेला हा मंत्र म्हणजे तळोदा गावाच्या सामूहिक सद्भावनेचा, गुरुकृपेवरील विश्वासाचा आणि अध्यात्माच्या उन्नतीचा जीता जागता पुरावा आहे.

!! ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन घन !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा