Breking News

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५

दसऱ्याच्या दिवशी घेतलेला त्या एका निर्णयाने… उभे राहिले तळोदा येथील ऐतिहासिक राम मंदिर!

सुधाकर मराठे

         दसरा–विजय, धर्म आणि नीतिपथाचा उत्सव. रावणावर श्रीरामांनी मिळविलेला विजय असो वा मराठा सरदारांचे शस्त्रपूजन करून मोहिमा सुरू करण्याचे शौर्यपूर्ण क्षण असोत, दसरा हा अन्यायावरील न्यायाचा आणि दुष्टावर सज्जनांचा विजय दर्शविणारा पर्व आहे. अशा या विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर घेतलेला निर्णय तळोद्याच्या पुरातन राम मंदिराच्या स्थापनेशी जोडला गेला आणि या मंदिराच्या इतिहासाला एक अद्वितीय धार्मिक–सांस्कृतिक अधोरेखित मिळाले.

         मराठा साम्राज्याचा इतिहास केवळ युद्धाचा नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक समन्वय यांचा संगमही आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आजचे प्रसिद्ध तळोदा येथील राम मंदिर, ज्यामागे एक ऐतिहासिक आणि धार्मिक कथा दडलेली आहे.

       अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात नारायणराव बारगळ हे राजस्थानातील उदयपूरच्या महाराणा संग्रामसिंह यांच्या सैन्यात जहागिरदार होते. त्यांना बुढा परगणा ही जहागिरी दिली होती. ते युद्ध करत होते. चार–पाच दिवस झाले तरी युद्धात अपेक्षित यश मिळत नव्हते. संकटाच्या त्या काळात नारायणरावांनी आपल्या श्रद्धेचा आधार घेतला. त्यांनी श्रीरामचंद्राला साकडे घातले –

       जर आम्हाला आज सायंकाळ पावेतो या युद्धात विजय मिळाला, तर आम्ही तुम्हाला आमच्या घरी पंचायतसह आणून स्थापू.

      असे म्हणतात की यानंतर युद्धात मराठ्यांना यश लाभले. आपल्या नवसाप्रमाणे नारायणरावांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्यासह महादेव, पार्वती भवानी माता आणि राधा–कृष्ण अशा विविध मूर्ती गढीवर आणल्या.

       मात्र, या मुर्त्या कुठे स्थापित कराव्यात, यावर गढीतील ब्राह्मण समुदायामध्ये मतभेद झाले. देवाचे पावित्र्य राखले जाईल का, यावर शंका उपस्थित झाली. कारण हा राजवाडा होता; कटकारस्थाने, राजकीय बैठका, लष्करी हालचाली या सर्वांचा साक्षीदार असलेल्या गढीत देवतांची स्थापना योग्य नाही, असे काहींचे मत होते.

       तेव्हा खुद्द नारायणराव पुढे सरसावले. त्यांनी ठाम शब्दांत सांगितले –

मी हे कबूल केले आहे आणि माझी श्रद्धा यात आहे.

      तरीही सर्वांचा एकमताने निर्णय व्हावा म्हणून गावच्या चावडीशेजारी असलेल्या बारगळ हवेलीत मूर्ती स्थापण्याचा पर्याय मान्य झाला.

     दसऱ्याच्या दिवशीच राम पंचायत मूर्ती स्थापनेचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. विजयादशमी हा दिवसच विजयाचा आणि नवा संकल्प करण्याचा मानला जातो. रामायणातील परंपरेनुसार याच दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून धर्माची पुनर्स्थापना केली होती. मराठा साम्राज्यातही दसरा हा शौर्याचा आणि शस्त्रपूजेचा दिवस होता. त्यामुळे नारायणरावांनी आपल्या नवसपूर्तीचा अंतिम निर्णय या दिवशी घेणे ही श्रद्धा, परंपरा आणि मराठा शौर्याचा अद्भुत संगम ठरला.

         या मंदिराची स्थापना ही फक्त धार्मिक नव्हे, तर सामाजिक सहमती आणि श्रद्धेचा विजय मानली जाते. विशेष म्हणजे, ज्या काळात हे घडत होते त्या काळात देशात पानिपतचे तिसरे युद्ध (1761) घडले होते. त्या युद्धात मराठा सेनापती भोईटे होते. त्यांच्या मालकीची हवेली – आज जी जिल्हा परिषद शाळा (भोई बिल्डिंगसमोर) म्हणून ओळखली जाते – त्या काळी तबेला म्हणून वापरात होती.
         या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की धार्मिक श्रद्धा आणि राजकीय–लष्करी कर्तव्य यांचा समन्वय मराठा परंपरेत खोलवर रुजलेला होता. दसऱ्याच्या दिवशी झालेला हा निर्णय विजयाची आठवण करून देतो आणि मराठा शौर्याची परंपरा जिवंत ठेवतो.
       आजही हे राम मंदिर त्या श्रद्धेचा जिवंत पुरावा आहे आणि मराठा इतिहासाच्या अध्यायात एक महत्त्वाची नोंद म्हणून उभे राहिले आहे. दसऱ्याचा तो ऐतिहासिक क्षण या मंदिराच्या स्थापनेतून पिढ्यान्‌पिढ्या स्मरणात राहिला आहे....

प्रतिक्रिया : 
     शहरातील बारगडांच्या हवेलीत राम मूर्तीसह अन्य मूर्तीच्या स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय जहागिरदारांचा होता. सध्या रामाची हवेली जीर्ण झालेली आहे. लवकरच पुनर्निर्माण केला जाणार आहे. ..
अमरजित बारगळ
जहागिरदार तळोदा

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

हलाखीतून हिरोपर्यंत – जगणं अग्निहोत्री यांची यशोगाथा

सुधाकर मराठे 
         जगण्यात संघर्ष असतोच, पण काही माणसं त्याच संघर्षाला आपल्या आयुष्याचं शस्त्र बनवून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे जगन अग्निहोत्री यांची.
          लहानपणापासूनच संकटांनी वेढलेलं आयुष्य. वडील अगदी लहान वयातच सोडून गेले. चार भावांच्या कुटुंबाची जबाबदारी आईच्या खांद्यावर आणि पुढे पुढे  स्वतः यांच्यावर येऊन पडली. शिक्षण घेणं शक्यच नव्हतं, कारण घर चालवायचं होतं. त्यामुळे 'हाताला येईल ते काम' हेच आयुष्याचं तत्त्व बनलं.

        सुरुवात झाली ती अगदी सामान्य कामांपासून. काही काळ त्यांनी तळोदा अक्कलकुवा जाणारी जीप गाड्यांवर किन्नरी करत जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला. नंतर पेट्रोल पंपावर काम केलं. काम काहीही असो, प्रामाणिकपणा आणि मेहनत हेच त्यांच्या प्रत्येक कामाचं वैशिष्ट्य राहिलं.

       'जाणता राजा' पतपेढीत त्यांनी कलेक्शन एजंट म्हणून काम सुरू केलं. पैशांची जबाबदारी सांभाळताना त्यांच्या प्रामाणिक स्वभावाची लोकांना जाणीव होऊ लागली. याच काळात त्यांनी रिक्षा चालवून मुलांना शाळेत ने-आण करण्याचं काम केलं.

      आपली स्वतःची रिक्षा असावी ही इच्छा होती. म्हणून एकदा ते एका पतसंस्थेत कर्जासाठी गेले. पण तिथे त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रामाणिकपण, मनातलं स्वच्छेपण पाहून त्यांना रिक्षा कर्जाऐवजी एक अनपेक्षित संधी मिळाली – "तू इथेच कामाला लाग", असं त्या पतसंस्थेचे प्रमुख भाजप प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी यांनी सांगितलं.

      त्यानंतर जगन यांनी पतपेढीतच काम सुरू केलं आणि आपल्या सचोटीने, व्यवहारकुशलतेने आणि मेहनतीने तिथेही वेगळी छाप सोडली.

        परंतु एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. शेती ही त्यांची खरी ओढ होती. मात्र स्वतःची मालकी शेती नव्हती, त्यांनी भाडे तत्वावर शेती केली,  जमेल तशी शेतीत पाऊल टाकलं आणि जमिनीवर स्वतःच्या घामाच्या बळावर यश मिळवलं. कुठलीही शेती पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी शेतात रात्रंदिवस कष्ट करून आज यशस्वी शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

        स्वभावाने जगन अग्निहोत्री हे मनमोकळे, कुठलाही छल कपट न करणारे, नातेसंबंध जपणारे आणि मित्रांच्या गराड्यात रमणारे व्यक्तिमत्व आहे. व्यवहारात सतत प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा ठेवून त्यांनी शहरात आपली एक खास ओळख निर्माण केली आहे.

         आज त्यांचं नाव घेतल्यावर फक्त संघर्ष नाही, तर यश, प्रामाणिकपणा आणि जिद्द यांची जिवंत उदाहरणं आठवतात...

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

• सामाजिक कार्य आणि कौटुंबिक जबाबदारी पार पाडणारे : चेतन पाटील

(सुधाकर मराठे)
        चेतन पाटील हे एक शांत, संयमी, निगवी आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची प्रामाणिकता आणि साधेपणा त्यांच्या जीवनात ठळकपणे दिसून येतात. चेतन यांचा जन्म एक शिक्षक कुटुंबात झाला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात शिस्त आणि शिक्षणाचे संस्कार पक्के आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बरी राहत नसल्यामुळे तिला वेळोवेळी दवाखान्यात नेणे, तिची काळजी घेणे यामध्ये चेतनची भूमिका अतिशय मोलाची ठरते. कुटुंबातील या जबाबदारीमुळे चेतनची त्यांच्याविषयीची निष्ठा आणि सेवाभाव अधिक दृढ झाला आहे.

चेतनचे मोठे भाऊ वैभव पाटील हे व्यवसायिक आहेत. आणि चेतन त्यांना त्यांच्या कामात सहकार्य करतात. ते केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित न राहता, को-ऑपरेटिव्ह बँकेत कर्मचारी म्हणून आपली नोकरीही प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. बँकेतील कामातही त्यांची प्रामाणिकता आणि जबाबदारीची भावना स्पष्टपणे जाणवते.

क्रीडा क्षेत्रातही चेतनचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांचा 'रायझिंग स्टार" क्रिकेट संघात समावेश असून, त्यांची अष्टपैलू कामगार संघासाठी उपयोगात पडली आहे. त्यांनी या संघात खेळताना आपल्या क्रीडाप्रेमाची चुणूक दाखवली आहे. क्रीडा क्षेत्रातील त्यांची आवड आणि त्यांचा सहभाग त्यांच्या व्यक्तिमत्वात एक उत्साही बाजू जोडतो.

लग्न उशिरा झाले असले तरी, त्यांना साधी आणि सरळ स्वभावाची शहादा येथील पायल सहजीवनी म्हणून लाभली आहे, ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन शांततेत आणि समजूतदारपणात सुरू आहे. सहजीवनीही कुटुंबात सर्वांना सामावून घेणारी, साधी, सरळ आणि समजूतदार असल्याने दोघेही एकमेकांना चांगले पूरक ठरतात.

चेतनच्या जीवनात मित्रांचा आणि मैत्रीचा मोठा भाग आहे. त्यांच्या मित्रांच्या कोणत्याही मदतीला तो नेहमी धावून येतो. मित्रांचे विवाह समारंभ असो, किंवा कुटुंबातील इतर कार्य चेतन त्या प्रत्येक कार्याल मनापासून सहकार्य करतो. मित्रांशी असलेले त्याचे स्नेहसंबंध आणि त्याच्या प्रामाणिकतेमुळे, त्याला सर्वत्र आदराने पाहिले जाते.

विष दगडाच्या माध्यमातून वैद्रद्यकीय सेवा

त्यांच्या साधेपणामुळे आणि निस्वार्थी सेवाभावामुळे चेतनचे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांमध्ये एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून स्थान आहे. जे त्यांच्या नैसर्गिक गुणांसह सामाजिक कार्यात देखील सक्रिय आहेत. त्यांनी वारसााने लाभलेला एक नैसर्गिक दगडाच्या माध्यमातून सर्फ दंश किंवा अन्य विषारी जनावरांच्या दंशाचे विष उतरविण्याचे कार्य अनेक वर्षांपासून करत आहेत. या दगडाला स्थानिक भाषेत "विष दगड" म्हणून ओळखले जाते आणि याची परंपरागत उपयोगिता दंश स्थानिक विषयांच्या उपचारासाठी वीर. चेतन आहे या दगडाच्या विशेष गुणाचा अभ्यास करून, त्याचा वापर करतात, अनेक लोकांना दंशाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मदत...

गुरुवार, ७ ऑगस्ट, २०२५

तळोदा परिसरासाठी वरदान ठरलेला महामंत्र सरस्वतीनंदन स्वामी महाराजां ५१ वर्षांची अखंड सप्ताह परंपरा

तळोदा परिसरासाठी वरदान ठरलेला महामंत्र

तळोदा : ०७ ऑगस्ट २०२५ 
       श्रद्धा, भक्ती आणि गुरुकृपेचा संगम घडवणारा एक ऐतिहासिक प्रसंग तब्बल ५१ वर्षांपूर्वी बडोदा येथील आश्रमात घडला, ज्याने तळोदा परिसराच्या अध्यात्मिक आणि पर्यावरणीय जीवनात आमूलाग्र बदल घडवला. या प्रसंगाच्या केंद्रस्थानी होते दिव्य अंतर्दृष्टी लाभलेले सरस्वतीनंदन स्वामी महाराज, ज्यांच्या मुखकमलातून प्रकट झालेला २३ अक्षरी महामंत्र आजही तळोदा परिसरासाठी एक आशिर्वादमंत्र ठरला आहे. या मंत्रावर आधारित अखंड सप्ताह परंपरा गेल्या पाच दशकांहून अधिक काळ तळोदा गावात सातत्याने जपली जात आहे.  
      १९७० च्या सुमारास तळोदा येथील वैद्यराज शंकरराव गोविंदराव मराठे आणि वडाळी येथील मदन बापूजी निकम हे दोघे सरस्वतीनंदन स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी बडोदा येथील आश्रमात गेले होते. त्यांनी महाराजांना नम्र विनंती केली – “तळोदा येथे सात दिवसांचा सप्ताह सुरू करायचा आहे, कृपया मार्गदर्शन द्या.” त्या वेळी मुलजी शंकर गुरु सरस्वतीनंदन उर्फ ‘मुलजी मामा’ देखील उपस्थित होते. महाराजांनी ही विनंती ऐकून काही काळ ध्यानधारणा केली आणि शेवटी त्यांनी श्रावण शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी सूर्योदयापासून सात दिवस अखंड नामजप करण्याची आज्ञा दिली. त्यांनी त्या वेळी जो मंत्र दिला, तो होता – “ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन” – हे २१ अक्षरी मंत्र होते, ज्यात 'घन' हा शब्द एकदाच होता.
दोघे शिष्य महाराजांची आज्ञा घेऊन परत तळोद्याला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचले. परंतु आश्रमात ध्यानस्थ अवस्थेत असलेल्या स्वामी महाराजांना अंतःप्रेरणा झाली की मंत्रामध्ये आवश्यक बदल शिल्लक आहे. त्यांनी तातडीने मुलजी मामा यांना सांगितले – “ते दोघे स्टेशनवर आहेत, ट्रेनला उशीर आहे, त्यांना परत बोलवा.” आणि खरेच, ते दोघे तिथेच होते. आश्रमातून पाठवलेल्या माणसाने त्यांना शोधून पुन्हा आश्रमात आणले. त्यानंतर महाराजांनी स्पष्ट निर्देश दिले की, “हा मंत्र २३ अक्षरी असावा, आणि ‘घन’ शब्द पुनः घ्यावा.”

त्याच साक्षीला, पुन्हा उच्चरित झाला २३ अक्षरी महामंत्र –
!! ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन घन !!

स्वामी महाराजांनी या मंत्राचा अर्थही समजावून सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार, “हे सत्य गुरुदेव, आपण पूर्णब्रह्म, सर्वज्ञ, अंतर्ज्ञानी आहात. आपण सुख, समृद्धी, आरोग्य, शांती आणि अध्यात्मिक उन्नती प्रदान करणारे आहात. ‘सोऽहम’ म्हणजे ‘मी तोच आहे’ – म्हणजे परमात्मा सर्वत्र आहे, प्रत्येक प्राणिमात्रात आहे. ‘दयाघन घन’ म्हणजे आपण दयेचा, करुणेचा सतत वर्षाव करणारे आहात.”
गुरुआज्ञेनुसार शंकरराव मराठे आणि मदन निकम यांनी तळोदा येथे सप्ताह सुरू केला. सप्ताहाची खास वैशिष्ट्ये म्हणजे सात दिवस २४ तास अखंड महामंत्राचा जप, सामूहिक सहभाग, आणि संपूर्ण गावातील धार्मिक उत्सवाचे वातावरण. विशेष म्हणजे, हा सप्ताह गेल्या ५१ वर्षांपासून सलग सुरू आहे, कोणतीही खंडितता न होता. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात मोठ्या भक्तिभावाने सप्ताह साजरा केला जातो. सप्ताहाच्या समारोपाला ढोल-ताशा, लेझीम, तालीम पथक, भजनी मंडळ आणि पालखी सोहळा अशा पारंपरिक वेशात महाराजांच्या प्रतिमेसह संपूर्ण गावात शोभायात्रा काढली जाते. महामंत्राच्या गजरात गावभर प्रदक्षिणा केली जाते.
या आध्यात्मिक पर्वानंतर संपूर्ण गावासाठी एक पवित्र भंडारा आयोजित केला जातो. यात डाळ-भात, चण्याची भाजी आणि गूळ-लापशी यांचा समावेश असतो. हा भंडारा अत्यंत पवित्रतेने, शुभ्र वस्त्र झाकून, स्वयंपाक खोलीत महाराजांच्या प्रतिमेजवळ ठेवून भक्तांना वाटला जातो. संपूर्ण गाव भोजन घेतल्यानंतर जो प्रसाद उरे, तो तापी नदीत विसर्जित केला जातो – हा एक प्रकारचा निसर्गाशी असलेला दयाळू संवाद आहे, ज्यामध्ये जलचर प्राण्यांनाही प्रसादाचा लाभ मिळावा अशी भावना असते.
या अखंड सप्ताहाच्या काळात अनेक भक्तांनी स्वप्नात, ध्यानात किंवा प्रत्यक्ष अनुभूतीच्या रूपात गुरु महाराजांचे दर्शन घेतल्याचे अनुभव कथन केले आहेत. ही अनुभूती म्हणजे महाराजांच्या कृपेची जिवंत साक्षी आहे. त्यांच्या उपस्थितीची जाणीव आजही अनेकांना दरवर्षी होत असते.

या महामंत्राचा प्रभाव परिसरात प्रकर्षाने दिसून येतो. सुसम पर्जन्य, चांगली शेती, पर्यावरणीय समतोल, आरोग्यदायी वातावरण आणि सामाजिक सलोखा – हे सगळे परिणाम या जपाच्या सामूहिक ऊर्जेने घडत असल्याचा दृढ विश्वास गावकऱ्यांमध्ये आहे. अति-वृष्टी वा दुष्काळ यांसारख्या टोकाच्या हवामान बदलांपासून परिसर सुरक्षित राहिलेला आहे.

आजच्या धावपळीच्या युगात, गावातील ही आध्यात्मिक परंपरा अधिकच महत्त्वाची वाटते. केवळ धार्मिकतेपुरती मर्यादित न राहता, ही चळवळ सामाजिक एकजूट, पर्यावरण रक्षण आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करणारी आहे. हा इतिहास केवळ गतकाळाचे स्मरण नसून, वर्तमानात जपावयाची आणि भविष्यात टिकवावी अशी एक विलक्षण श्रद्धा-अभियान आहे.

गेल्या पाच दशकांपासून जपला जात असलेला हा मंत्र म्हणजे तळोदा गावाच्या सामूहिक सद्भावनेचा, गुरुकृपेवरील विश्वासाचा आणि अध्यात्माच्या उन्नतीचा जीता जागता पुरावा आहे.

!! ॐ सोऽहम जय जय पूर्ण सत्य श्री गुरुदेव दया घन घन !!

शुक्रवार, ६ जून, २०२५

दिलखुलास, दोस्ती दुनियेतील राजा माणूस : ज्ञानेश्वर राठोड

सुधाकर मराठे                     
                      आपल्याला अनेक व्यक्ती भेटतात, काहींचा सहवास जास्त काळ लाभतो, तर काही चुटपुटत्या सहवासातही आपल्या मनावर कायमच्या कोरल्या जातात. काही चित्रपटाच्या माध्यमातून भेटतात, तर काही पुस्तकातून, चित्रातून, गाण्यातून. प्रवासातून आपल्याला आकर्षित करून जातात. अशा भेटलेल्या, आठवणीतल्या, सहवासातल्या, स्मरणात कोरल्या गेलेल्या काही व्यक्तींचे मनावर उमटलेले ठसे म्हणजे मित्र सखा ज्ञानेश्वर राठोड ...       
          आपण चांगलं काम केलं की मित्रच नव्हे तर समाज ही आपल्या मागे उभा राहतो. याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानेश्वर यास आम्ही प्रेमाने ज्ञानु असे म्हणतो, चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव या छोट्याश्या बंजाऱ्यांच्या तांड्यातून आलेले ग्रामीण भागातील हरहुन्नरी नेतृत्व, राजकारण समाजकारण आणि ग्रामीण पर्यटनशाखाचा अभ्यासक अशी एक त्यांची वेगळी ओळख, सहज, सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे. निगर्वी, प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे. कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा, आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभाव गुणामुळे तळोदा शहरातील प्रत्येक तरुणासोबत त्याचे मैत्रिपूर्वक संबंध प्रस्थापित झाले होते.  मनात कुणाबद्दलही आकस, राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे. 

वडिलोपार्जितच शेती व्यवसाय हा त्यांचा प्रमुख व्यवसाय, वडील दगडू राठोड हे घोडेगावात सर्वांना परिचित धार्मिक वृत्तीचे, त्यांच्या पत्नी घोडेगावातील माजी सरपंच राहून चुकलेल्या महिला, त्यांचे दोघे भाऊ उच्चशिक्षित, एक जण दुबई येथे स्थित होते तर दुसरे मुंबई येथे बेस्ट मध्ये वाहन चालक होते. अत्यंत हालाखीचा परिस्थितीवर मात करत तीन मुली व दोन मुलांचा प्रपंच हाकत मुलांच्या शिक्षणासाठी धडपड करणारे हे दोघी दाम्पत्यांनी आपल्या मुलांना संस्काराचे चांगले धडे दिले आणि त्यामुळेच 'मुहँ मे राम बगल में छुरी! अशी कपटनिती ज्ञानु यांच्या जवळपासही नाही. समाजपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी, त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते.         
                २००६ या वर्षी तो शिक्षणासाठी आपल्या मोठ्या बहिणीकडे तळोदा येथे आला. बारावीचे वर्ष असल्याने अभ्यासाची एक वेगळी स्पर्धा स्वतःशीच त्याची होती. या निमित्ताने कधी रोकडमन हनुमान, कनकेश्वर महादेव मंदिर तर कधी शाळा कोलेजचे पटांगण, ओट्टे, मोकळे मैदान हे त्याचे अभ्यासासाठी आवडते ठिकाण, त्याची व माझी एक वेगळीच गट्टी झाली, दिवसभरात सोबत असणे अभ्यासा सोबतच खेळांवर विशेष लक्ष देत तळोदा शहरात एक वेगळे स्थान आम्ही प्रस्थापित केले, ही मैत्री जपत असताना कुठेही काही संकट आले तरी त्या संकटांना सामोरे जाण्याची आमची तयारी असायची.
   
 ज्ञानूने बहुतांश शिक्षण हे घरापासून लांब राहूनच पूर्ण केले, त्यामुळे विविध गावात राहून आलेला वेगवेगळ्या शहरांची माहिती त्याला होती. सर्वात प्रथम स्वप्नाचे शहर असे संबोधले जाणाऱ्या मुंबईला तो आम्हाला घेऊन गेला, मुंबईला त्याचे काका राहत असल्यामुळे बऱ्यापैकी मुंबई त्याने पायीच रोंदली होती, याचा फायदा आम्हालाही झाला. त्याने मुंबईचे बहुतांश परिसर आम्हाला पाईचं फिरवल्यामुळे पहिल्या फेरीतच मुंबई माझ्याही चांगलीच डोक्यात बसली. त्या दिवसापासून ते सलग आजवर विविध कडू गोड अनुभवांसह त्याचे आणि माझे नाते एक भावाप्रमाणे आहे. त्याचे कुटुंब व माझ्या कुटुंबातील असलेले हितसंबंध हे रक्ताच्या नात्यासारखे आहेत. एकमेकांच्या सुख दुखात धावून येत, नाते संबंध जोपासण्यासाठी सुरू असलेले आमचे प्रयत्न यामुळे आम्ही आजही शारीरिक दृष्टिकोनातून लांब असलो तरी मानसिक दृष्ट्या सदैव सोबत असतो. 
 
                                शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात बहुतांश कालावधी गेला कमी वयातच मेहनत करण्याची तयारी असल्याकारणाने कुठलेही काम हाती आले तरी ते करून आपले जीवन सार्थक होईल हे ठाऊक असले तरी प्रत्यक्ष आयुष्य जगत असताना अनेक समस्यांना सामोरे जात संसाराचा गाडा ओढावा लागतो.
तळोदा सारख्या शहरात शिक्षण घेऊन आज तो समाजकार्य महाविद्यालयाच्या माध्यमातून  समाजकार्यात अग्रेसर असलेल्या प्रथम फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करत आहे. या माध्यमातून तळागाळातील लोकांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे कार्य त्याचे आजही सुरू आहे, असे करत असताना त्याची आवड देखील जोपासली जात आहे याचा आनंद वेगळाच आहे, वर्ष लोटत चालली वेळ निघत आहे अनेक जबाबदाऱ्या आपल्या अंगी येत असल्या तरी या सहजरीत्या पार करत आयुष्याचे कडू गोड आठवणी घेऊन जीवनप्रवास हा सुरू आहे. ज्ञानेश्वर यास मिळालेली अर्धांगिनी देखील हुशार मितभाषी सी देखणी मनमिळावू व समंजस असल्यामुळे आयुष्याचा जीवन प्रवास हा सुखाचा सुरू आहे या सुखात एक मुलगा व एक मुलगी अशी भर पडली आहे.  
           या जीवन प्रवासात अगदी किशोरवयापासून असलेला मित्र सोबत असल्याचा आनंदच वेगळा आहे या माध्यमातून केवळ आम्ही दोघेच नव्हे तर बहुतांश मित्रांना सोबत ठेवून वार्षिक सहल काढून एक मित्रत्वाचे नाते रक्ताच्या नात्या सारखे घट्ट करण्याचा आमचा प्रयास आहे. आपण सामाजिक ऋण फेडण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत या उक्तीचा साजेसे वागण्याचा त्याचा प्रयत्न आयुष्याची एक शिकवण देणारा आहे....

गुरुवार, १ मे, २०२५

कष्ट, प्रेम आणि एकता यांचे प्रतीक ; शांताराम मराठे (आप्पा) संघर्ष, कष्ट आणि यशाचा गाथा

काही व्यक्तींचे जीवन संघर्ष आणि कठोर परिश्रमांनी भरलेले असते, परंतु त्यातूनच ते आपले व्यक्तिमत्त्व घडवतात आणि एक मजबूत पाया उभारतात. अशाच व्यक्तींमध्ये आमचे वडील शांताराम मराठे (आप्पा) यांचा समावेश होतो. आप्पांचे जीवन हे परिश्रम आणि साधेपणाचे प्रतीक आहे. बाहेरून कडक स्वभाव असला तरी, त्यांच्या अंतरंगात मृदुता, प्रेम, आणि मुलांवर उत्तम संस्कार करण्याची अपार क्षमता आहे. त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवासातून प्रेरणा घेत, मुलांनीही मेहनतीने मार्गक्रमण करावे, असे संस्कार त्यांनी त्यांच्या मुलांना दिले. त्यांच्या जीवनाचे हे दर्शन म्हणजेच 'नारळ'सारखे व्यक्तिमत्त्व – बाहेरून कठोर, पण आतून प्रेमळ आणि मृदू आभाळ भर माया देणारे विशाल हृदयी आमचे आप्पा..
                                                                    *जन्म आणि प्रारंभ*

               पारोळा तालुक्यातील देवगाव येथे शांताराम मराठे यांचा वेडू सखाराम मराठे यांचा कुटुंबात जन्म झाला. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील पहिला धक्का बसला. त्यांच्या आई, पार्वता हिने कष्ट करून संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण केले. तिच्या कठोर परिश्रमामुळे शांताराम यांना शिक्षण घेण्याची संधी मिळाली, आणि त्यांनी १२ वी पावेतो शिक्षण पूर्ण केले.                                             *कुटुंबाची जबाबदारी*    


        आप्पाचे मोठे बंधूं स्व.गोविंद मराठे नोकरीसाठी बाहेर गेले आणि लहान बंधू स्व.दिगंबर मराठे हे राजकारणात बळी गेले. यामुळे कुटुंबाची जबाबदारी आप्पांवर आली. या परिस्थितीत त्यांनी धाडसाने पुढे येऊन आपल्या कुटुंबासाठी काम करणे सुरू केले.                  

 *करियरची सुरुवात*

           आप्पांनी आपल्या करियरची सुरुवात पोस्टमन म्हणून केली. त्यानंतर त्यांनी टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला, ज्या अंतर्गत त्यांनी लेडीज टेलर म्हणून काम केले. त्यांची हातकला आणि कष्ट यामुळे त्यांना शेतीसाठी देखील वेळ मिळाला, ज्यामुळे शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय बनला.      

                   संघर्ष*                                                 सुरुवातीच्या काळात, आप्पांनी हाताला मिळेल ते काम केले. त्यांच्यासोबत आमच्या आई आशाबाईने देखील त्यांच्या व्यवसायात साथ दिली. बाजारात मठ पापड विक्री करताना त्यांनी आपल्या कौशल्याचा वापर केला. तसेच, भाजीपाला विक्री, बर्फाचा गोला, कुल्फी विक्री आणि भाजलेल्या शेंगांची विक्री करून त्यांनी उदरनिर्वाह चालवला.  

*पत्नीची लाभली साथ:*

       आप्पांच्या विवाह आशाबाई मराठे यांच्याशी झाला, जे नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नबाबाई आणि संपत बढे यांची एकुलती एक मुलगी होती. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर १५ दिवसांनी, त्यांची आई नबाबाईने तळोदा येथे घर जवाई म्हणून राहण्यास आमंत्रित केले. या समर्थनामुळे शांताराम यांना स्थिरता मिळाली. आप्पांच्या जीवनात पत्नी आशाबाई यांची साथ ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या सहकार्यामुळे आणि समर्पणामुळे शांताराम यांना त्यांच्या कुटुंबाचा आधार मिळाला आणि अनेक आव्हानांचा सामना करण्याची शक्ती प्राप्त झाली. आप्पांना आणि त्यांच्या कुटुंबाला अनेक कठीण काळांचा सामना करावा लागला. आईने या सर्व कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन दिले. घरच्या कामातून ते बाहेर कसे पडतील याची काळजी घेत, त्यांनी आपले सर्वस्व कुटुंबासाठी समर्पित केले. दोघांनी मिळून व्यवसायात काम केले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य मजबूत झाले. त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आणि योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या मुलांचे यश हे आप्पा आणि आई यांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. आईने आप्पावर नेहमी विश्वास ठेवला. त्यांनी एकमेकांना प्रेरित केले आणि संकटांच्या काळात एकमेकांना आधार दिला. या विश्वासामुळे त्यांच्यातील प्रेम आणि एकजुटीला एक विशेष बळ मिळाल

संतती आणि संस्कार

             आप्पांचे ४ मुलांचे विवाह झाले. त्यांनी आपल्या मुलांना चांगले संस्कार दिले. मोठा मुलगा योगेश मराठे राजकारणात सक्रिय आहे, तर लहान मुलगा सुधाकर मराठे नोकरी, पत्रकारिता व व्यवसायात सक्रिय आहे. दिपीका शिंदे ही नंदूरबार येथे तर रुपाली पाटील हिचा विवाह भाच्याशी करून नात्यात दृढता निर्माण केली आहे. ते स्पर्धा परीक्षेचा माध्यमातून मुंबई येथे वर्ग दोन अधिकारी आहेत.  त्यांच्यातील हिम्मत आणि कष्टामुळेच त्यांनी समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

                                                                             *पुतण्याना सांभाळण्याची जबाबदारी* त्यांचे मोठे बंधू स्व.दिगंबर मराठे हे अभद्र राजकारणाचा शिकार झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पुतण्याचा देखील सांभाळ केला, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाची एकता आणि एकमेकांसाठी प्रेम वाढले. यामुळे त्यांच्या कुटुंबात एक विशेष बंध तयार झाला, जो नेहमीच एकत्र राहण्यासाठी प्रेरित करतो.

         *अवास्तव पैसा खर्च करण्यापेक्षा गुंतवणुकीवर भर

              आप्पाचे आर्थिक नियोजन नेहमीच उत्तम होते. त्यांनी आपल्या जीवनात आर्थिक व्यवस्थापनाचे महत्व लक्षात घेतले आणि कधीही अनावश्यक खर्च करण्यापेक्षा वाचवण्यात आणि गुंतवणुकीत विशेष लक्ष दिले पाहिजे असे ते नेहमी म्हणत. त्यांना अनावश्यक खर्च टाळण्याची खूप आवड होती. त्यांनी नेहमीच आवश्यकतेनुसार खर्च करण्याचा विचार केला. या मानसिकतेमुळे त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता दिली. त्यांचे आर्थिक नियोजन त्यांच्या जीवनाच्या अनेक आव्हानांमध्ये मदतगार ठरले.

*जळला अर्धगवायूच्या आजार*

           2022 साली आप्पांना अर्धगवायूचा झटका आला, ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक मोठा धक्का बसला. यामुळे त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता भासली आणि त्यांना सुरत येथील नामांकित INS रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गंभीर परिस्थितीत, त्यांना त्यांच्या पत्नी आणि लहान मुलगा सुधाकर यांचा खूप मोठा आधार मिळाला. कुटुंबाने या कठीण काळात आपल्या पतीला प्रोत्साहन दिले. तसेच, सुधाकरने आपल्या वडिलांची काळजी घेतली आणि त्यांना बरे होण्यासाठी प्रोत्साहित केले. अर्धगवायूच्या उपचारानंतर, त्यांचे आरोग्य सुधारले, आणि यानंतर सुधाकरने आपल्या वडिलांच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी मोठा निर्णय घेतला. 

त्यांनी नबाई वास्तू साकारली, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला एक स्थिरता मिळाली. वडिलांचा मनात एक चिंता होती, ती म्हणजे त्यांच्या मोठ्या मुलीची आर्थिक परिस्थिती बाबत. तिच्या भविष्यातील चिंता लक्षात घेऊन, सुधाकरने तिला घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. या कृतीने मुलीला सुरक्षिततेची भावना दिली आणि तिला एक स्थायीत्व मिळवून दिले. 

*नातेवाइकांशी भेटीगाठी*  आजारपणानंतर, सुधाकरने सर्व नातेवाइकांना भेटीगाठी घेण्याची संधी साधली. त्यांच्या कुटुंबात एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण झाली आणि सर्वांनी एकमेकांच्या सुख-दुखात सहभागी होण्याचे महत्त्व जाणले.

                      त्यांचे जीवन हे प्रेरणादायी असून संघर्षातही धैर्याने टिकून राहण्याची शिकवण देते. त्यांच्या यशाची कथा ही सुर्यवंशी कुटुंबातील प्रत्येकासाठी प्रेरणा आहे, ज्यांनी आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी कठोर परिश्रम घेतले त्यांच्या जीवनातील मूल्ये, आदर्श आणि कष्ट यामुळे ते त्यांच्या कुटुंबासाठी एक महान नायक बनले आहेत....   


9595008844