Breking News

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

तोरणमाळ

महाराष्ट्रातील हिल्स स्टेशन्सच्या क्रमवारीत राज्यात दुस- या क्रमांकावर असलेलं तोरणमाळ
समुद्रसपाटीपासून एक हजार ७६ मीटर उंचीवर वसलेलं असून या पठाराचं क्षेत्रफळ ४१ चौरस किलोमीटर इतकं आहे. सातपुडयाच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदूरबार जिल्ह्यात हा परिसर मोडतो. सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचं पठार उंच आहे. तोरणमाळची सरासरी उंची ३३३६ फूट एवढी आहे. राज्याच्या प्रमुख शहरांपासून अलिप्त असल्याने तोरणमाळ तसं अनाघ्रात पर्यटनस्थळ आहे. कालपर्यंत इथं दळणवळणाच्या सोयींचा अभाव होता. या सर्वाचा फायदा मात्र एक निश्चित झाला, तो म्हणजे तोरणमाळ आपलं नसर्गिक सौंदर्य आजही टिकवून आहे. घाटवळणाचे रस्ते, बाजूला हिरवीगर्द झाडी, हिरव्या गवताचा गालिचा पांघरून डौलाने उभे असलेले डोंगर, त्यांच्यावर गर्द वनराई, हे तोरणमाळचं वैशिष्टय़. आकाशाला भिडू पाहणा-या डोंगरांमधून एका वेगळ्या संगीताची आणि सौंदर्याची निर्मिती करत खळखळणारे झरे, धबधबे, वन्यप्राणी, दूरवर जाऊन क्षितिजाचा ठाव घेऊ पाहणा-या पाऊलवाटा या सर्वाना आसमंतात कवटाळून तोरणमाळ भोगवादाच्या शहरी संस्कृतीपासून अलिप्त आहे. पुराणात तोरणमाळचा ‘तूर्णमाळ’ असाही उल्लेख सापडतो. मुबलक प्रमाणात तोरणाची झाडे असल्याने त्याला तोरणमाळ हे नाव पडलं असावं. पण माळवा साम्राज्याचा राजा मांडू याच्या राजधानीचं ठिकाण काही काळ तोरणमाळ होतं. त्याच्या ताब्यात असलेल्या सातपुडा
पर्वतावरील राज्याचं द्वार अथवा तोरण म्हणूनही या प्रदेशाला तोरणमाळ म्हटलं जात असावं. तोरणमाळ या डोंगरी किल्ल्यापासून खानदेशचा इतिहास सुरू होतो. आज तिथे फक्त या किल्ल्याचे अवशेष आहेत, त्याचं बांधकाम भक्कम असल्याचे ते पुरावे आहेत. याच किल्ल्याला लागून किंवा मधे अश्वत्थामाचं मंदिर आहे आणि किल्ल्यात त्याचं वास्तव्य असल्याची भावना स्थानिक जनतेत आहे. महाभारतकाळात तोरणमाळ येथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करत होता. खानदेशचा सर्व प्रदेश त्याच्या राज्यात समाविष्ट होता. तोरणमाळ ही त्याच्या साम्राज्याची राजधानी होती. भामेर येथील दंतकथेनुसार, तोरणमाळचा राजा युवनाश्व हा भामेर येथील किल्ल्यात पावसाळ्यात वास्तव्य करून राहत होता. कदाचित पावसाळ्यातील चार महिने तोरणमाळ येथे प्रचंड पाऊस पडत असेल. तोरणमाळला जाण्याचे-येण्याचे रस्ते बंद होत असावेत. मात्र आज परस्थिती बदलली आहे पावसाळ्यातही तोरणमाळ येथील वाहतूक सुरळीत सुरु असते.पांडवांनी एका यज्ञप्रसंगी एक अश्व सोडला होता. तोरणमाळचा राज युवनाश्व याने या घोडय़ाला अडवून तो भामेर
ऊर्फ भम्बागिरीच्या किल्ल्यात लपवून ठेवला होता. तेव्हा पांडवांनी युवनाश्वशी युद्ध करून त्याचा पाडाव केला आणि आपला घोडा सोडवून नेला. त्यावेळेपासून कदाचित पांडव आणि युवनाश्व यांच्यात मैत्री झाली असेल किंवा युवनाश्वाने पांडवांचं मांडलिकत्व स्वीकारलं असेल. नेमकं काय झालं कुणास ठाऊक? पण कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडव यांच्यात जे युद्ध झालं त्या युद्धात तोरणमाळचा राजा युवनाश्व हा पांडवांच्या बाजूने लढल्याची आख्यायिका सांगितली जाते. युवनाश्व राजा शक्तिशाली होण्यास तोरणमाळचा सुरक्षित किल्ला कारणीभूत ठरला, असं संशोधकांचं मत आहे. गोरक्षनाथांच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याशी नाथपंथीयांचाही संबंध जोडला जातो. आज तोरणमाळला हिल स्टेशन म्हणून जशी मान्यता आहे तसं त्याचं गोरक्षनाथांची तपोभूमी म्हणूनही धार्मिकदृष्टया महत्त्व आहे. गोरक्षनाथ आणि मिच्छद्रनाथ यांनी हजारो वर्षापूर्वी इथं तपश्चर्या केली होती. दरवर्षी महाशिवरात्रीला इथं त्यांची यात्रा भरते.
एका आख्यायिकेनुसार, आज ज्या ठिकाणी तोरणमाळचा प्रसिद्ध यशवंत तलाव आहे त्याच्या मध्यवर्ती तळाशी एक मंदिर आहे. या मंदिरातच गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली होती. याच ठिकाणाहून तीन किलोमीटर अंतरावर मिच्छद्रनाथांची गुंफा आहे. त्याकाळी या भागात पाणी नव्हतं. एकदा मोठया प्रमाणावर दुष्काळ पडला. तेव्हा मिच्छद्रनाथ, गोरक्षनाथ यांनी आपल्या तपश्चय्रेने नर्मदामातेला इथं बोलावलं. माता नर्मदेने पाणी देण्याचं मान्य केलं, परंतु क्षमतेपेक्षा पाणी जास्त आल्यास ते परत द्यावं ही अट घालूनच ते दिलं. त्यातून या तलावाची निर्मिती झाली, असं सांगतात. चौदा खाटांच्या विणकामासाठी लागणारा दोर या तलावाचा तळाचा ठाव घेण्यासाठी तलावात सोडण्यात आला होता. तरीसुद्धा तळाचा ठाव लागला नसल्याची आख्यायिका सांगितली जाते. आज हा तलाव ओतप्रोत भरून वाहतो. हे वाहणारं पाणी
सीताखाईच्या धबधब्यातून सरकल नदीला जाऊन मिळतं व ही नदी पुढे नर्मदेला जाऊन मिळते. या तलावाशेजारी एक नाथमंदिर आहे. दर शिवरात्रीला या मंदिरात गोरक्षनाथांची यात्रा भरते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तीनही राज्यांच्या सीमारेषांचा संगम असलेल्या इथल्या जंगल दरीतल्या आदिवासींचं तोरणमाळवर बेहद्द प्रेम आहे. इथल्या निसर्गसौंदर्यावर त्यांची असीम श्रद्धा आहे. तोरणमाळ परिसरात पाहण्यासारखी अनेक सौंदर्यस्थळं आहेत. तोरणमाळला पोहोचल्यावर दृष्टीस पडतो तो दूरवर पसरलेला यशवंत तलाव. महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही तोरणमाळच्या सौंदर्याने मोहिनी घातली होती. त्यांच्या भेटीनंतर २६ सप्टेंबर १९६९ रोजी या तलावाचं ‘यशवंत तलाव’ असं नामकरण करण्यात आलं. या तलावाचं जुनं नाव अज्ञातच आहे. या तलावाच्या सभोवर हिरवीगार झाडी आहे.
कुठल्याही बाजूने या तलावाचं सौंदर्य न्याहाळता येतं. कधीही न आटणा-या या तलावात विहार करण्यासाठी खास स्वयंचलित बोटींची व्यवस्थाही आहे. २७ मीटर खोल असलेल्या या तलावाचं सौंदर्य बोटींवर बसून न्याहाळणं, हा एक वेगळाच अनुभव आहे. तोरणमाळ परिसराला याच तलावातून पाणीपुरवठा होतो. सीताखाई ही गर्द झाडींनी नटलेली अंगावर शहारे आणणारी दरी आहे. तीनही बाजूंनी फाटलेला पहाड आणि मधेच एक उंच सुळका. निसर्गाच्या अचाट शक्तीने साकारलेलं हे एक निसर्गनिर्मित शिल्पच म्हणावं लागेल. पावसाळ्यात त्यावरून खळखळणारा धबधबा म्हणजे सीताखाईचा वस्त्रालंकार वाटतो. सीताखाईला लागूनच एक तलाव आहे. या तलावात सर्वत्र
कमळाची फुलं दिसतात. आपण विनंती केली तर इथली आदिवासी बालकं आनंदाने, अत्यंत चपळाईने तलावात शिरून कमळाची फुलं आपल्याला आणून देतात.मावळत्या सूर्याचं लोभस दर्शन ही एक तोरणमाळची खासियत आहे. मावळताना इथला सूर्य अक्षरश: हसरा असतो, असं म्हटलं जातं. इथला पाऊस अनुभवणं, हाही एक अविस्मरणीय अनुभव असतो. खडकी व आमदरी ही विशेष उल्लेखनीय सौंदर्यस्थळं आहे. इथून आगपेटीच्या आकाराच्या झोपडया आणि माणसांच्या मुंग्यांप्रमाणे हालचाली दृष्टीस पडतात. तोरणमाळला जाताना चार किलोमीटर अगोदर सातपायरीघाट लागतो. घाटवळणाच्या अतिशय शेवटच्या उंच टोकावरून या घाटाकडे पाहिलं तर एकाखाली एक, असे रस्त्यांचे सात पदर दृष्टीस पडतात. जणू या हिरव्यागार झाडीची मलमली शाल पांघरलेल्या डोंगराने सात फे-यांची माळ परिधान केली आहे, असा आभास होतो. किल्ल्याच्या तोरणावरील
रस्त्यांची माळ, या अर्थानेही ‘तोरणमाळ’ हे नाव या प्रदेशाला पडलं असावं व ते सयुक्तिकही वाटतं. थोडा वेळ थांबून या घाटाचं सौंदर्य पाहणं ही अनेक आनंददायी आश्चर्याची अनुभूती असते. निसर्गाच्या सौंदर्यात मानवी कौशल्यांची भर पडली तर घाटातही सुंदरतेचा आभास निर्माण करता येतो, हे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी इथे सिद्ध करून दाखवलं आहे. सातपायरी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कपारीत एक लेणी आहे. तिला मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं आहे. ही लेणी रस्त्यापेक्षा बरीच खोल आहे. तिचं प्रवेशद्वार कोरलेलं असून त्यावर नक्षीकाम असलेली ललाटपट्टी आहे. समोरचं चौकोनी दालन आता गाभारा बनला आहे. भिंतीवर पुरुषभर उंचीची, पाठीमागे सदाफणा नागाचं छत्र असलेली समभंगातील पारसनाथाची उभी मूर्ती आहे.
या मूर्तीच्या डाव्या बाजूला गज आणि अश्व उभे आहेत, तर उजव्या बाजूस यक्षिणी बसलेल्या आहेत. हे जैन लेणं पारसनाथ किंवा नागार्जुन या नावाने प्रचलित आहे. आदिवासी बांधव तोरणमाळचे मूळ रहिवासी आहेत. प्राचीन काळापासून अगदी मांडू राजा व युवनाश्व राजाच्या काळातही इथं आदिवासी राहत असल्याचे संदर्भ सापडतात. शहरी जीवनाच्या एकूण प्रवाहापासून ही माणसं अलिप्त आहेत. सर्वत्र कालबाह्य झालेली वस्तू विनिमयाची पद्धत (वस्तूच्या मोबदल्यात वस्तूंची देवाणघेवाण) प्लॅस्टिक मनीच्या आजच्या युगातही दिसून येते. पारदर्शकता इथल्या आदिवासींमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जा आहे. वन्यपक्षी, प्राणीही इथं वास्तव्याला आहेत. अस्वलांचं प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी वाघानेही इथं आपलं दर्शन दिल्याचं सांगितलं
जातं. तोरणमाळ हे ठिकाण दुर्गम आणि खडतर असल्यामुळे त्याठिकाणी फारशी वर्दळ नसते. वर्दळीचा अभाव हेच तोरणमाळच्या सौंदर्याचं गुपित आहे. नियोजनबद्धरीतीने या पर्यटनस्थळाचा विकास केला तर इथे ऐतिहासिक, नसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि साहसी पर्यटनाच्या अमर्याद शक्यता एकवटलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने तिथे ‘तोरणमाळ हिल रिसॉर्ट’ सुरू केलं आहे. खानदेशातील या एकमेव हिल स्टेशनला दोन-तीन दिवस मुक्काम करून समाधान होत नाही. इथला कोपरान् कोपरा अदभुत सौंदर्याने नटला आहे. वळणावळणाचे रस्ते, दूरवर जाणा- या पाऊलवाटा, दाट आणि कुठे कुठे विरळ असलेली आदिवासी बांधवांची घरं आपल्या भोगवादी संस्कृतीपासून कितीतरी अलिप्त आहेत. शहाद्याहून तोरणमाळला जाताना लेघापाणी सोडल्यानंतर कालापाणी येथील दरीत कोसळणारे जलप्रपात मंत्रमुग्ध करतात. अत्यंत आवेगाने खोल दरीत कोसळणारे हे धबधबे फक्त पर्जन्यकाळातच दिसतात. हिरव्यागार अशा या जंगलात विविध वृक्ष, विविध पक्षी विलक्षण नेत्रसुख देत असतात आणि पर्यटक या सृष्टीसौंदर्याच्या पाशात अडकतो. सातपायरींचे दृश्य तर अलौकीक सौंदर्याचाच आनंद देते.
वळणावळणाने जेव्हा सात पायऱ्या चढत आपण व्ह्य़ू पॉईंटवर जातो त्यावेळी गुहेतील नागार्जुन मंदीर पाहणे हा एक आगळाच आनंद म्हटला पाहिजे. ११४३ मीटर उंचीवर असलेल्या या व्ह्य़ू पॉईंन्टवरून पर्यटक येतो तेव्हा थक्क व्हायला होते. एवढा अवघड पर्वत आपण कसा पार केला, याचे आश्चर्य तर वाटतेच पण त्याच बरोबर नागमोडी वळणाच्या सातपायऱ्यांच्या घाटही अचंबित करतो. ते नयम मनोहर दृष्य डोळ्यास पुन्हा पुन्हा साठवावेसे वाटते. सातपुडा पर्वतावरील एवढय़ा उंचीवरील यशवंत तलाव पर्यटकाला पुन्हा विस्मयचकीत करतो. सभोवतालच्या वृक्षवेलींनी नटलेला हा तलाव सृष्टीच्या चमत्काराची एक सुखद अनुभूती देतो. सीता खाईकडे जात असताना वाटेत लागणारा कमळ तलाव, त्यातील सुरेख कमळाची फुले, काठावर सतत पहारा देणारे महाकाय वटवृक्ष जणू साखळी करून उभे असलेले दिसतात, या वृक्षांच्या वयाचा अंदाज करणेही अवघड असल्याचे जाणवते. आणि नंतर समोरच दिसती ती महाकाय दरी, सीताखाई ! या सीताखाईच्या डोंगरावरून अलगदरित्या उडी घेणारा आणि खाईत धो- धो कोसळणारा धबधबा पुन्हा पर्यटकाला भूलोकावरील सौंदर्याचा दृष्टान्त देतो. हे अतिरम्य भिरभिरणारे काळे पांढरे जलोद बिलगतांना पाहून मन मोहून टाकते. भुरळ घालणाऱ्या सृष्टी सौंदर्याच्या पाशातून विलग होणे अवघड होऊन बसते. कितीतरी काळ पर्यटक हे निसर्गसौंदर्य न्याहाळीत असतो.
त्यातच तरूण पर्यटकांनी आवाज दिला, तर निरव वातावरणात त्यांचे शब्द डोंगर दऱ्यातून घुमतच राहतात. एकदा-दोनदा नव्हे तर पाचदा. सीताखाईच्या हा प्रतिध्वनी पॉइन्टवर पर्यटकांना हर्षोल्हासित करतो. खडकी पॉईन्टवरही असाच आनंद लाभतो. आडवा-तिडवा पहुडलेला सातपुडा आणि त्याने परिधान केलेला हिरवा शालू, त्यातच पुन्हा गिरकी घेणारे ढग, त्यांनी दऱ्या खोऱ्यात कडय़ा-कपारांना, उंच उंच सुळक्यांना घातलेले आलिंगन किंवा ढगांची दंगामस्ती हे सारे सौंदर्य लुब्ध करीत असते. सूर्योदय किंवा सूर्यास्त पॉइन्टवरही अशीच अनुभूती मिळते. सध्या ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे सूर्यदर्शन होत नाही, तरी आपला आनंद तसूभरही कमी होत नाही. बऱ्याच अवधीनंतर आपल्याला जाणीव होते की आपण स्वत:ही ढगातच आहोत. ढगांनी आपल्यालाही अलिंगन दिले आहे. ढग आपल्याशीही मस्ती करीत आहेत. ते आपल्याजवळ धिंगाणा घालीत आहेत. तेव्हा मात्र परिपूर्ण आनंदाची खरी जाणीव होत असते.

२ टिप्पण्या:

  1. एक चांगला माहितीपूर्ण लेख आमच्या सुधाने मेहनतीने लिहून लोकांना अर्पण केला फक्त आपल्या भागातील एक उपेक्षित पर्यटन स्थळ व् त्याची एतिहासिक माहिती लोकांना व्हावी त्याचे महत्त्व कलावे यासाठी केलेला हा प्रयत्न वाया जाणार नाही याची अपेक्षा करतो

    उत्तर द्याहटवा