Breking News

सोमवार, ३१ जुलै, २०१७

हातोडा पूल तत्काळ सुरु करावा तळोद्यातील पालकांसह नागरीकांचे जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन
 हातोडा पुलाचे काम पूर्ण होताच उद्घाटनासाठी विलंब न करता शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता व रुग्णवाहिकेसाठी सदरचा पुल सुरु करावा, अशी मागणी तळोदा शहरातील पालक वर्ग व नागरिकांनी केली आहे.. याबाबत जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधींना पालक व नागरीकांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्याला जोडणारा महत्वाचा दुवा समजला जाणारा हातोडा पुलास विविध अडचणीमुळे विलंब होत आहे. मागील वर्षापासून तारीख पे तारीखचा सिलसिला सुरु आहे. हातोडा पुलाचे या शैक्षणिक वर्षात उद्घाटन होईल. या आशेवर अनेकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शाळेते केले आहेत. मात्र हातोडा पुलाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव हे अतिदुर्गम भागाचे अंतर कमी व्हावे. या दूर दृष्टीकोनातून शासनाने दि.२८ फेब्रुवारी २००९ पासून तापी नदीवर तळोदा हातोडा सज्जीपुर- नंदुरबार असा हातोडा पुलाचे बांधकाम सुरू आहे. तापी नदीला येणारा पुर, निधीची समस्यांसह वेळोवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे पुल चर्चेचा विषय बनला आहे. मागील आठ वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. येत्या दि.१५ ऑगस्ट रोजी हातोडा पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली असता सध्या अध्र्याहून अधिक रस्त्याचे डांबरीकरण अद्याप बाकी आहे. अप्रोच रस्त्याची लेव्हलिंग करणे, रेलिंग करणे, साईडपट्टया बांधणे, पाणी निचरा होण्यासाठी पाईप जोडणी आदींचे कामे बाकी आहेत. आ.उदेसिंग पाडवी यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हातोडा पुलाचे उद्घाटन करणार असल्याचे सांगितले आहे. सध्याची स्थिती पाहता पुलाचे उद्घाटन लांबण्याची शक्यता आहे. तळोदा येथून नंदुरबार येथे येण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रकाशा मार्गे लांब अंतराचा प्रवास करुन यावे लागते. म्हणून कामे पूर्ण होताच उद्घाटनासाठी विलंब न करता हातोडा पूल तात्काळ सुरू करावा, अशी मागणी पालक वर्ग व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, खा.डॉ.हिना गावीत, आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, गटनेते भरत माळी यांच्याकडे केली आहे. निवेदनावर चेतन पवार, डॉ.अमर राजकुळे, मुकूंद वाघ, ॲड.सरजू शहा, निमेश सूर्यवंशी, मुकेश वाणी, राम सूर्यवंशी, अमोल गुजराती, संदेश सूर्यवंशी, सूर्यकांत पिंपरे, दिनेश पाटील, सचिन सुगंधी, जितेंद्र जावरे, डॉ.पंजराळे, मुकेश कर्णकार यांच्यासह ५० पालकांची नावे आहेत..


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा