Breking News

शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

आर्थिक मदत देता की थट्टा करताय!

जुलै महिन्यात तळोदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत नुकसानग्रस्तांना शासनातर्फे
प्रत्येकी कुटुंब दोन हजार रुपये याप्रमाणे १८ नुकसानग्रस्तांना ३६ हजार रुपयाची शासकीय मदत देण्यात आली आहे. या मदतीची रक्कम संबधितांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. हजारो, लाखोंचे नुकसान झालेले असतांना शासन दोन हजार रुपये देवून आर्थिक मदतीऐवजी थट्टा करीत असल्याची खंत नुकसानग्रस्तांनी व्यक्त केली आहे.. तळोदा तालुक्यात दि.५जुलै रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे नदी नाल्याना मोठा पूर आला होता. त्यात बोरद येथील नाल्याला रात्रीच्या सुमारास अचानक मोठा पूर आल्याने नाल्याजवळील मिठी खाडी व भट्टी हट्टी परिसरात पाणी शिरल्याने घरातील धान्य व संसारपयोगी साहित्य वाहून गेले होते. यावेळी महसूल विभागातर्फे ३० घरांचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. यातील १८ नुकसानग्रस्तांना शासनाकडून प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित नुकसानग्रस्त अद्याप मदतीपासून वंचित असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुराच्या पाण्यात संपूर्ण संसार वाहून गेलेल्यांनो दोन हजार रुपये भरपाई देवून शासन गरीबांची थट्टा करीत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी यासाठी सरपंचा वासंतीबाई ठाकरे व ग्रा.प.सदस्यांनी सतत पाठपुरवा केला. त्यांच्या प्रयत्नामुळे १८ लाभार्थ्यांना भरपाई मिळाली आहे. या १८ नुकसानग्रस्तांसाठी ३६ हजाराची भरपाई रक्कम त्या त्या लाभाथ्र्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार योगेश चन्द्रे यांनी दिली. यात सुकलाल मराठे, राहुल राहसे, तुळशीदास कोळी, भिका कपूर, कलुबाई ठाकरे, उषाबाई वारुळे, दिलीप कोळी, भिका कापुरे, मोतन वारुळे, संतोष कोळी, सुभाष कोळी, शिवराम ठाकरे, विनोद पाटील, पुंडलिक पाटील, विक्रम ठाकरे, शकुंतला गुरव, रघु नाईक, लोटन न्हावी आदींच्या समावेश आहे. नुकसान ग्रस्तांना तुटुपुंजी रक्कम दिल्याने नाराजीचा सूर उमटत असून शासनाने नुकसानग्रस्तांची थट्टा केली आहे का? अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा