Breking News

रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

लढाऊ बाण्याचे शिलेदार'सुहासदादा नाईक'


आदिवासींच्या खडतर प्रवासात १९७०-८० चे दशकही तसे संघर्षाचेच राहिले. अशा काही संघर्षांना सुहासदादा नाईक हे बाल साक्षीदार ठरले. १९७२ मध्ये जन्मलेले नाईक यांच्या डोळ्यासमोर अनेक घडामोडी घडतच होत्या. त्यातून समाज हिताचे काय अन् विघातक काय याची उकल सुहासदादा नाईक यांना बालपणीच होत होती. या घडामोडीतून अस्वस्थ होणारे दादा हे सामाजिक संघर्षास प्रेरीत झाले. बालवय असले तरी त्यांनी अन्य बाबी तथा घटकांमधून बोध घेण्यास सुरुवात केली. पुढे तळोदा तालुक्यातील रामपूर येथील महाराज वेच्या नाईक यांच्या प्रतिष्ठीत परिवारातला एक चाणाक्ष बुद्धीमत्तेचा नवयुवक म्हणून नवी ख्याती त्यांना मिळाली. मुंबईच्या चळवळीतून
 पुढे आलेले क्रांतीचे प्रणेते
शाळा-महाविद्यालयीन जीवनही नेतृत्वाचेच राहिले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे पेलवत मुंबईसारख्या महानगरात अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदावरुन आदिवासींची धुरा समर्थपणे सांभाळली. मुंबईत राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर तत्कालीन धुळे जिल्ह्यातील अन्य समाजाच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील ते लढत होते. यातून'आपली माती; आपली नाती' हे ब्रीद ते जपत होते. 
विद्यार्थ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देत त्या सोडविण्यासाठी सुहासदादा हे थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करीत होते. हेच नेतृत्व मुंबई, ठाणे महानगरपालिका व मुंबई बेस्ट भरतीतही आदिवासी व धुळे जिल्ह्यातील मुलांच्या पाठीशी राहिले.
सातपुड्याच्या पायथ्याशी अतिदुर्गम भागातील  असंख्य तरुण मुंबईसह अन्य मेट्रो सिटींमध्ये नोकरीच्या शोधासाठी जात होते. आदिवासी तरुणांना नोकरी मिळावी यासाठी सुहासदादा सातत्याने प्रयत्न करत होते. विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करुन देत होते. यातून अनेकांनी कठीण परिश्रमातून नोकरी मिळविली देखील. यामुळे की काय अनेक परिवार आजही सुहासदादांच्या संपर्कात येऊन त्यांचे आभार मानतात. दादांकडे असलेल्या दातृत्वातून अनेक आदिवासी बांधवांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आदिवासी तरुणांप्रती असलेल्या या तळमळीमुळेच ते आज आदिवासी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. अशा या भक्कमपणे उभ्या नेतृत्वाने अनेक परिवारात सुख-समृद्धी आणली. या सुख प्राप्त परिवाराने हृदयाच्या एका कोपऱ्यात सुहासदादांचे नाव कायमचे कोरले असून ते त्यांच्या प्रती ऋणही व्यक्त करीत आहे. या सुखी परिवाराच्या अन्य नात्यागोत्यांच्या माध्यमातून दादांची ख्याती सर्वदूर निर्माण झाली.

या आदिवासी नेत्यांची मुंबईत चळवळ सुरु असतानाच समाज कल्याण विभागाने आदिवासी आरक्षणाची टक्केवारी कमी करण्याचा घाट घातला. तसा शासन निर्णयही जारी केला. ही बाब समाजासाठी कधीही भरुन न निघणारे नुकसानच होते. दरम्यान, या उमद्या नेत्यांने आदिवासींचा आवाज बुलंद केला. काही राजकीय नेत्यांच्या सहकार्याने तत्कालीन आदिवासी विकास मंत्री गोविंदराव चौधरी यांच्यावर दबाव टाकत शासनास संबंधित शासन निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. हे आदिवासींच्या चळवळींपैकी एक क्रांतिकारी यश ठरले. या क्रांतीचे प्रणेते म्हणून सुहासदादा नाईक यांनाच श्रेय दिले गेले.

कायदा व हक्क यातील उज्वल नेतृत्व
 राज्यशास्त्र व इतिहास विषयातील पदवीधर दादांनी एलएलबीला प्रवेश घेत वकिली तथा कायद्याची धडेही मुंबईत गिरवले. भूतलावरील सर्व आदिवासी संस्कृती, रुढी, बोलीभाषा, इतिहास व मौखिक परंपरा यांची खोलवर माहिती, सोबतीला भारतीय कायदा, आदिवासी हक्क व अधिकार यांचा चिकित्सक अभ्यास. यातून आदिवासी चळवळीशी त्यांचे नाते जोडले गेले. चिकित्सक अभ्यासामुळे ख्यातीप्राप्त सुहासदादा हे ख्यातनाम वक्तेही ठरले. व्याख्यान व प्रबोधनासाठी राज्यभर फिरताना त्यांना त्यांच्या ऋणानुबंधातले जुन्या मित्रांच्या भेटी होत गेल्या व नवे मित्रही त्यांच्याशी जुळत गेले. दादा त्यांच्या प्रत्येक व्याख्यान व मार्गदर्शनात जराशीही कसर सोडत नसत अगदी काळजाला भिडणाऱ्या भाषेतून ते थेट श्रोत्यांच्या मनात घर करुन जातात. आदिवासी चळवळ व लढ्यांच्या बाबतीत प्रत्येक बांधवांमध्ये सुहासदादांनी चेतना जागवलीत. कायद्याच्या चिकित्सक अभ्यासामुळे आदिवासींचे हक्क व अधिकार व्याख्यानातून प्रत्येकाच्या मनावर बिंबवत गेले. त्यांचे प्रभावी व्याख्यान आदिवासी बांधवांमध्ये संघर्ष सज्जतेची उर्जाच भरुन जाते. त्यातून केवळ तरुणच नव्हे तर अबालवृद्धही लढा अन् विद्रोहासाठी उभा ठाकतो. सुहासदादा 'लढाऊ बाण्याचे उज्वल नेतृत्व' ठरतात.

बोगस आदिवासींच्या विरोधातील वादळ
 आरक्षणदृष्ट्या आदिवासींना वाढलेल्या ताटाकडे अनेकांचे वर्षानुवर्षे लक्ष लागून आहे. त्यांनी ताटातलाच नव्हे तर आदिवासींच्या तोंडचा घासही पळवला. अशा बोगस आदिवासींविरुद्ध सुहास दादांनी नवा लढा उभारला. देशाच्या कानाकोपऱ्यात नेमका आदिवासी कोण, कुठे विखुरला? याचा दादांना गाडा अभ्यासच. त्यामुळे खरा कोण, खोटा कोण ते त्यांना सहज कळते. सेवा सहकार्य व दानधर्म पाळताना सुहास दादांनी जातीचा विचार न करता मानवी मुल्ये जपत सढळ हाताने मदत केली. मात्र जातीबाबत ते अगदी गंभीर राहिले. आदिवासी समाज अधोगतीला प्रमुख कारण ठरणाऱ्या बोगस आदिवासी नोकरदार, विद्यार्थी यांचा सुहासदादा प्रत्येक पातळीवर सुक्ष्म निरीक्षण करतात. ही त्यांची विशेष ओळख. बोल-चालीतूनच व्यक्तींची जातीविषयक पारख करणारे सुहास दादा जात प्रमाणपत्रबाबत दक्ष राहण्याचा इशारा अवघ्या खान्देशातील आदिवासींना देतात.
लाखो बोगसांनी आदिवासींच्या नोकऱ्या, जागा बळकावल्याने सुहासदादांनी शस्त्रांची नव्हे कायद्याच्या लढाईला सुरुवात केली. अनेक वर्षांपासून बोगसांच्या मुद्दयावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. यासाठी त्यांच्यावर संकटाचे आभाळच कोसळलेत मात्र  दादा डगमगले नाही. समाजाप्रती एकनिष्ठ राहिले. बोगसांविरुद्ध प्रखरतेने व्यक्त होणारे दादा आजही समर्थपणे लढतच आहे. म्हणून बोगसांची बीपी वाढवणारे दादा आज खोट्यांच्या विरोधातील वादळच ठरत आहे.

शिष्टाचारपूर्ण प्रगल्भ राजकारणी
 सुहासदादा सन २००३ पासून राजकारणात असले तरी बहुतांश राजकीय बाबी त्यांना नवीन नव्हत्या. १९९५ मध्ये माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी तळोद्यातून विधानसभेची अपक्ष उमेदवारी केली. त्यावेळी दोन तालुक्यांच्या विशाल प्रदेशात प्रचाराची अवघड असे आव्हान एकट्या दादांनी स्वीकारले. ते त्यांनी सहज पेलवलेही. विद्यार्थी दशेतच मोठ्या नेत्यांनाही लाजवेल अशी महान कामगिरी त्यांनी मुंबईसारख्या महानगरात राहून बजावली होती. विधी शाखेचा अभ्यास व राज्यशास्त्रातील पदवीमुळे त्यांना जणू राजकीय वलयच होते. २०१४ मध्ये अमोनी ता.तळोदा गटातून निवडून आल्यानंतर २०१६ ते २०१९ पर्यंत त्यांनी जि.प.उपाध्यक्षपद भूषविले. जि.प.मध्ये प्रतिनिधित्व करताना जनसेवेत तत्परता, पारदर्शकता ठेवणारे दादा निष्पक्ष राहिले. त्यांच्यातील शिष्टाचारपूर्ण वागणुकीने दादाांना नवी प्रतिष्ठा लाभली. अधिकारी-पदाधिकारी, जनता, कर्मचारी यांच्यात समन्वय राखणाऱ्या दादांच्या प्रगल्भतेमुळे त्यांच्याशी अवघ्या जिल्ह्याची जनता जोडत गेली. जनसंपर्कात मोठी भर पडली अन् बघता-बघता ते जिल्ह्याचेच नेते बनले.

जनतेच्या नजरेत भविष्यातला कर्तव्यदक्ष आमदार
 मुळात सेवा, सहकारी पार्श्वभूमीचे सुहासदादा प्रत्येकाला आपलेसे वाटू लागले. निष्पक्ष सेवेमुळे भविष्यातला कर्तव्यदक्ष आमदार या नजरेतून जनता त्यांच्याकडे पाहू लागली. दादांना विधीमंडळात पाठवायचे व तेथे पाहायची इच्छा जिल्ह्याची तरुणाई व अबालवृद्धांकडून व्यक्त होऊ लागली. जनतेत दादांप्रति विश्वासार्हताही वाढीस लागली. यामुळे त्यांनी २०२४ ची तयारी सुरू केली. त्या दिशेने पाऊल टाकतांना काँग्रेस विचारधारेचे सुहास दादांनी पक्षाचे सर्वेसर्वा राहुल गांधी यांची सदिच्छा भेटही घेतली. तेथे नंदुरबार जिल्हा व गांधी परिवार यांच्यातील जुन्या नात्यावर चांगलीच चर्चा रंगली. दरम्यान, आपले विचार व काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या सुहास दादांच्या विधानसभा उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा करीत राहुल गांधींनी त्या दृष्टीने शब्दही दिला. त्यामुळे 'आदिवासी चळवळी व संघर्षातून उदयास आलेला हा लढाऊ बाणा' राजकारणात 'ध्रुवा'सारखे आपले अढळ स्थान निर्माण करेल यात
शंका नाही.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा