माझ्यासह १० वर्गमित्र, त्यातील काही वर्ग मित्र व काही रायझिंग स्टार क्रिकेट संघाचे सदस्य आहेत, आमची मैत्री म्हणजे एक विशेष बंधन आहे. लहानपणापासूनची निखळ मैत्री, एकमेकांसोबतचे असंख्य अनुभव आणि आठवणींनी समृद्ध असलेले आम्ही मित्र दरवर्षी भारतातील विविध ठिकाणी एकत्र प्रवास करतो. आमच्या या प्रवासात केवळ पर्यटन नसते, तर आमच्यातील नाते अधिक घट्ट करण्याचा उद्देशही असतो.
सन २०२२ च्या पाँडिचेरी बालाजी दर्शनानंतर २०२४ साली आम्ही हिमाचल प्रदेश, दिल्ली, आणि पंजाब या उत्तरेकडील रमणीय स्थळांना भेट देण्याचे ठरवले, आणि खास गोष्ट म्हणजे यावेळी आम्ही मागच्या प्रमाणे कुटुंबीयांनाही या प्रवासात सहभागी करून घेतले. या प्रवासामुळे आम्हाला निसर्गसौंदर्य अनुभवण्याबरोबरच आपआपल्या कुटुंबांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची अनोखी संधी मिळाली. आमच्या या साहसी प्रवासाची ही कहाणी म्हणजे एकत्र कुटुंब, मैत्री आणि निसर्गाच्या सान्निध्यात अनुभवलेले रमणीय क्षण यांचे मिश्रण आहे.
८ जोडपी कुटुंबीयांसह नंदूरबार रेल्वे स्थानकावर खान्देश एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करण्यासाठी उत्साहात जमली होती. प्रवासाची तयारी, मुलांची लगबग, आणि सामानाच्या गडबडीत सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत गर्दीत आपापली स्थान मिळवली. काही बालके नवीन ठिकाणाला भेट देणार असल्यामुळे अत्यंत आनंदी होती; काही जण खेळण्यांत मग्न तर काही आईच्या कुशीत झोप घेण्याच्या तयारीत होती.
रेल्वे स्थानकावर वातावरण हलकंफुलकं होतं, प्रत्येकाने आपले सामान व्यवस्थित ठेवलं आणि आपल्या स्थानांवर बसले. गाडी सुरू झाल्यावर, खिडकीतून बाहेर बघत मुलं निसर्गसौंदर्याचा आनंद घेत होती. पसरलेल्या शेतं, छोटी गावं, नदीचे किनारे या सर्व दृश्यांनी मुलांना भुरळ घातली होती. प्रवासात थोड्याच वेळात बिस्किटं, चिप्स आणि फळांच्या पिशव्या उघडल्या गेल्या.
मुलांचे खेळ, त्यांचे हसणे-खिदळणे, आणि त्यांचे आई-वडिलांशी केलेले गोड संवाद, यामुळे डब्यात एक प्रसन्न वातावरण तयार झाले. काही जोडपी आपापसात गप्पा मारत होती, तर काहीजण मुलांच्या काळजीत मग्न होते. बालकांना खिडकीतून बाहेर बघण्यात विशेष आनंद मिळत होता. थंडीचा गारवा आणि प्रवासातील आल्हाददायक अनुभवामुळे प्रत्येकजण आनंदात होता. ज्ञानुचे कुटुंब ब्रहानपुर येथून निघाले. प्रशांत लोट्याचे कुटुंब एक दिवस अगोदरच जळगावात दाखल झाले होते. तर सुधाकर व राहुल यांचे कुटुंब दुपारी १२ वाजे नंतर नंदूरबार येथून भुसावळसाठी प्रवासाला बसणार होते.
हळूहळू सर्वांनी भुसावळ जवळ आल्याची जाणीव झाली, आणि गाडी थांबल्यावर सर्वजण आपले सामान सांभाळत खाली उतरले. भुसावळ येथे मित्रपरिवाराचा पुढील प्रवासासाठी नियोजन तयार होताच, आनंदी चेहरे आणि प्रवासाची उत्सुकता यामुळे प्रत्येकजण पुढील वाटचालीसाठी सज्ज होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा