Breking News

सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

तळोद्याच्या आठवणींची गोडी जपणारे ठिकाण ; अनिल जनरल स्टोअर्स

तळोदा : काही दुकाने अशी असतात, जिथे आपण वस्तू खरेदी करण्यासाठी जातो; मात्र परतताना सोबत एखादी वस्तू नव्हे, तर एक सुंदर आठवण घेऊन येतो. तळोदा शहरातील अनिल जनरल स्टोअर्स हे अशाच आठवणी जपणारे ठिकाण आहे. आजही या दुकानात पाऊल टाकले की वस्तूंपेक्षा आधी जुन्या दिवसांची आठवण होते. एखादा परिचित चेहरा दिसतो, एखादा जुना आवाज कानावर पडतो आणि नकळत बालपण डोळ्यांसमोर उभे राहते.
           सन १९५२ च्या आसपास एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमधून सुरू झालेल्या या दुकानाने तळोद्याच्या बदलत्या काळाचा साक्षीदार होत अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. शहर बदलले, बाजारपेठेचे स्वरूप बदलले, नवनवीन दुकाने आली; मात्र अनिल जनरल स्टोअर्सशी जोडलेल्या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.

           या आठवणींमध्ये एक नाव आवर्जून घेतले जाते. नरेंद्रलाल रतीलाल वाणी (दादा) वयाची ९३ वर्षे पार करूनही दादा आजही अनिल जनरल स्टोअर्समध्ये येतात. वय वाढले, काळ बदलला; मात्र दुकानाशी असलेले त्यांचे नाते आजही कायम आहे. दादा दुकानात दिसले की अनेक जुन्या ग्राहकांच्या आठवणींना उजाळा मिळतो. एकेकाळी तळोदा शहरातील विविध कार्यालयांना व शाळांना लागणारे जनरल साहित्य, शैक्षणिक साहित्य तसेच दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू याच दुकानातून मिळत असत. त्या काळी आजच्यासारखी मोठी बाजारपेठ नव्हती. सुविधा मर्यादित होत्या; मात्र दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील विश्वास हा सर्वात मोठा होता.
         ' अनिल जनरल स्टोअर्समध्ये सर्वच मिळते जे मिळते ते चांगलेच मिळेल,’ असा विश्वास ग्राहकांच्या मनात निर्माण झाला होता. हाच विश्वास वर्षानुवर्षे या व्यवसायाची खरी ओळख बनला.
दादांच्या हातची रेवडी अन् चॉकलेटची गोड आठवण
          या दुकानाची ओळख केवळ व्यापारापुरती मर्यादित नाही. तळोद्याच्या अनेक मुलांच्या बालपणीच्या गोड आठवणी या दुकानाशी जोडलेल्या आहेत. लहानपणी एखादी वस्तू घेण्यासाठी दुकानात गेल्यावर दादांच्या हातून मिळणारी रेवडी किंवा चॉकलेट हा त्या काळातील मोठा आनंद असायचा. वस्तू किती रुपयांची घेतली, यापेक्षा हातावर ठेवलेली ती छोटीशी रेवडी किंवा चॉकलेट अधिक लक्षात राहायचे. यासोबतच दादा मिश्किलपने पुन्हा पुन्हा रेवडी मागणाऱ्या चिमटी देखील खोळत असे, आज मोठे झालेल्या एखाद्या जुन्या ग्राहकाला विचारले तर तो सहज सांगतो,
‘लहानपणी अनिल जनरल स्टोअर्समध्ये जायचो... दादांकडून रेवडी मिळायची.’ एवढीच छोटीशी आठवण; मात्र आयुष्याची कित्येक वर्षे उलटून गेल्यानंतरही ती मनात कायम राहते. त्या मायेची आणि आपुलकीची किंमत यापेक्षा वेगळी काय असू शकते?

काळ बदलला, पण विश्वास कायम राहिला
       काळ पुढे सरकत गेला. व्यापाराच्या पद्धती बदलल्या. टॅक्स, व्हॅट आणि त्यानंतर जीएसटी अशा विविध टप्प्यांतून व्यवसाय पुढे गेला. बाजारपेठेचे स्वरूपही बदलले. मात्र नियमांचे पालन करत, ग्राहकांचा विश्वास जपत व्यवसाय करण्याची परंपरा अनिल जनरल स्टोअर्सने कायम ठेवली.

         आजही एखादा जुना ग्राहक अनेक वर्षांनी दुकानात आला, तर त्याची नजर वस्तूंवर फारशी थांबत नाही. तो आधी दादांना शोधतो.
‘दादा कसे आहेत?’
‘तब्येत कशी आहे?’
‘अजूनही रोज येतात का?’
            या काही शब्दांमध्ये कित्येक वर्षांचे नाते सामावलेले असते.

एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत...
       कधी काळी या दुकानात चिमुरडा म्हणून आलेला एखादा मुलगा आज स्वतःच्या मुलाला घेऊन येथे येतो. काही जण आपल्या नातवंडांनाही घेऊन येतात.
पिढ्या बदलतात... माणसे मोठी होतात... शहर बदलते...
पण काही ठिकाणे मात्र आपल्याला पुन्हा त्याच जुन्या काळात घेऊन जातात.

         अनिल जनरल स्टोअर्स हे तळोद्याचे केवळ एक जुने दुकान नाही; ते तळोद्याच्या बदलत्या काळाचे एक जिवंत स्मरण आहे. येथे वस्तूंची खरेदी-विक्री झाली; पण त्यासोबत माणसांची नातीही जपली गेली. विश्वास मिळाला, आपुलकी मिळाली आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आठवणी मिळाल्या.

           आज या दुकानात गेल्यावर कोणाला आपले बालपण आठवेल, कोणाला दादांच्या हातची रेवडी आठवेल, कोणाला मिळालेले ते छोटेसे चॉकलेट आठवेल, तर कोणाच्या डोळ्यांसमोर नरेंद्रलाल दादांचा प्रेमळ चेहरा उभा राहील. काळ पुढे जात राहतो. दुकाने बदलतात, वस्तू बदलतात, खरेदीची पद्धत बदलते; पण मनात घर करून राहिलेल्या काही आठवणी मात्र कधीच जुन्या होत नाहीत.
         अनिल जनरल स्टोअर्स ही अशीच एक आठवण आहे.तळोद्याच्या अनेक पिढ्यांनी अनुभवलेली, दादांच्या मायेने गोड झालेली आणि आजही मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत असलेली. कारण काही दुकानांत आपण वस्तू घ्यायला जातो;
पण काही ठिकाणी गेल्यावर नकळत आपलेच बालपण पुन्हा भेटते.... दुकान आजही सुरू आहे. सध्या दादांचे चिरंजीव योगेशभाई वाणी हे जनरल स्टोअर्स सांभाळत आहेत. आजही येथे विश्वास कायम आहे. 2026 साली दुकानाला नवीन रूप प्राप्त झाले आहे. 

६ टिप्पण्या:

  1. Really every word is 1000% true. We have witnessed it very closely being a family member.. and we are proud to be a part of the legacy. Nerendrakaka(We lovingly call him BHAI) has taught us Business tactics and customer satisfaction is his Prime motive behind everything.

    उत्तर द्याहटवा
  2. A very beautiful and touching article! Dada’s dedication to his work, his daily discipline, and his love for the people are truly commendable. People know us purely by the name of his store, Anil Brothers . Being our grandfather, we all grand kids and new generation have received a great role model.🙏🏻💕

    उत्तर द्याहटवा
  3. शालेय स्टेशनरी म्हणजे पाटीवरची पेन्सिल, शीस पेन्सिल, खोड रबर, कंपास पेटी, नवनीत ची वही आणि शाळेत मिळालेले नसलेले पुस्तक आपल्याला येथे हमखास मिळणार. योगेश भाई आणि आम्ही सर्व वर्ग मित्र त्यांचा घराच्या गल्लीत क्रिकेट खेळणार आणि दुकानावर जावून बॉल आणणार, चॉकलेट खाणार, मारुती मंदिरावर जाणार. दादांचा स्वभाव मनमिळावू आहे आणि तोच वारसा आत्ता योगेश भाई चालवत आहेत.

    उत्तर द्याहटवा
  4. I really appreciate what you have written. It makes me proud to be associated with this family and to see how Dada and Papa conducts himself with such dedication, discipline, and love towards his customers. The values and business ethics that they has taught us will always be an inspiration for us and for generations to come.

    उत्तर द्याहटवा