सुधाकर मराठे :
परिस्थिती माणसाला थांबवत नाही; जिद्द हरली तरच माणूस थांबतो. या विचाराला आपल्या संपूर्ण आयुष्याने खरे ठरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे तळोद्याचे स्वर्गीय ओंकारराव मराठे.
७ ऑगस्ट १९३६ रोजी तळोदा येथे एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील स्व. शंकरराव गणू मराठे हे कष्टकरी होते. शंकररावांना पाच पत्नी होत्या. त्यापैकी गिनीबाई यांचे ओंकारराव हे पुत्र, तर दुसऱ्या आईपासून जन्मलेल्या नबाबाई संपत मराठे या त्यांच्या मोठ्या बघीनी होत्या. दोघा भाऊ-बहिणीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्या काळात तळोदा पालिकेचा माध्यमातून कंदिलांमध्ये तेल टाकून गावातील दिवे लावले जात. अशा परिस्थितीत शंकरराव गणू मराठे कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
ओंकाररावांनीही लहानपणापासूनच परिस्थितीशी दोन हात केले. शिक्षणाची पुरेशी संधी मिळाली नाही आणि त्यांनी केवळ सातवीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र शरीराने धडधाकट, बुद्धिमान आणि जिद्दी असलेले ओंकारराव परिस्थितीपुढे कधीच झुकले नाहीत.
मित्रांनी दाखवला पोलीस भरतीचा मार्ग
घरात खाण्याची भ्रांत, खिशात पैसे नाहीत आणि भविष्याची कोणतीही निश्चित दिशा नाही, अशा परिस्थितीत त्यांच्या मित्रांनी त्यांना पोलीस भरतीचा प्रयत्न करण्यासाठी आग्रह केला. त्यांच्यासोबत धर्मदास माळी आणि जगन माळी हेही होते.
एकदा प्रयत्न करून बघूया, या आशेने ओंकारराव मित्रांसोबत पोलीस भरतीसाठी गेले. त्या काळात महाराष्ट्र आणि गुजरात हे संयुक्त राज्य होते. मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द लहानपणापासूनच असावी. पोलीस भरतीच्या सर्व परीक्षा त्यांनी जिद्दीने उत्तीर्ण केल्या आणि स्वतःला सिद्ध केले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांना मात्र यश मिळाले नाही. पण जिद्दीने पेटलेल्या ओंकाररावांनी आपल्या हालाखीच्या परिस्थितीवर मात करण्याचा निर्धार केला.
१९५६ साली त्यांनी पोलीस खात्यात प्रवेश केला
सध्या गुजरात राज्यात असलेल्या झगडिया येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली. एका गरीब कुटुंबातील मुलाने कठोर परिश्रमाच्या जोरावर सरकारी नोकरी मिळवली आणि आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली. त्यानंतर ते कधीही थांबले नाहीत. गुजरात राज्यातील पोलीस क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केली जी आजतागायत कायम आहे.
उत्तर प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल आणि गुजरात राज्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती. आनंदी बेन पटेल यांचा सोबत...
वडिलांच्या मायेची ती आठवण...
ओंकाररावांच्या बालपणीचा एक प्रसंग आजही मनाला चटका लावून जातो. त्यांना चित्रपट पाहण्याची आवड होती. मात्र घरची परिस्थिती इतकी बिकट होती की, चित्रपट पाहण्यासाठी त्यांच्या खिशात दमडीही नसे. पैसे नसल्यामुळे कधी कधी चित्रपटगृहात त्यांना आत प्रवेश मिळत नसे. अशावेळी त्यांचे वडील शंकरराव गणू मराठे तेथे पोहोचत.
“दादा, मी तुमच्या दिव्यांमध्ये तेल ओतण्याचे काम करीन; पण माझ्या पोराला चित्रपट बघू द्या... अशी विनंती ते करीत आणि आपल्या मुलाला चित्रपट पाहण्याची संधी मिळवून देत.
हा प्रसंग केवळ गरिबी सांगणारा नाही; तर एका कष्टकरी वडिलांच्या आपल्या मुलावरील अपार प्रेमाची साक्ष देणारा आहे.
संसार उभा केला, मुलांना घडवले
पोलीस खात्यात सेवा बजावताना ओंकाररावांनी उंच पदे गाठली. परिस्थितीशी जुळवून घेत त्यांनी आपला संसार सुखाचा केला. त्यानंतर धरणगाव येथील कल्याणी कुटुंबातील शोभादेवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना प्रथम राजेश हा मुलगा, तर भारती आणि तरुणा या कन्या झाल्या. आपल्या मुलांना त्यांनी चांगले शिक्षण, संस्कार आणि आयुष्याची भक्कम दिशा दिली.
त्यांचे चिरंजीव राजेश मराठे हे गुजरात येथे ONGC मध्ये चीफ मॅनेजर (एच.आर.) या पदापावेतो गेले. त्यांची द्वितीय कन्या भारतीबेन या एअर होस्टेस होत्या, तर कनिष्ठ कन्या तरुणाबेन या शिक्षिका आहेत. कुटुंबातील सर्वांचे लग्नसोहळेही त्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून थाटामाटात पार पाडले.
मात्र मन तळोद्यातच राहिले...
नोकरीमुळे गुजरातमध्ये वास्तव्य असले तरी तळोद्याशी असलेली त्यांची नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. गावात आले की जुन्या मित्रांना भेटणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा भाग होता. जगन माळी, धर्मदास माळी यांच्यासह अनेक जुन्या मित्रांशी ते सतत संपर्कात राहत. वर्षे सरली. परिस्थिती बदलली. नोकरीत पद वाढले. जीवनमान बदलले. मात्र जुन्या माणसांबद्दलचे प्रेम आणि गावाबद्दलची आपुलकी त्यांच्या मनातून कधीच कमी झाली नाही.
नबाबाई म्हणजे ओंकाररावांच्या काळजाचा तुकडा
नबाबाई संपत मराठे ही ओंकाररावांची बहिण, दोघांचे नाते अतूट होते. आई गिनीबाई लहानपणीच देवाघरी गेल्यानंतर ओंकाररावांच्या बालपणात बहिण नबाबाईंचा आधार होता. या नात्यातील माया आयुष्यभर कायम राहिली. नबाबाईंची परिस्थितीही अत्यंत बिकट होती. त्यांनी काबाडकष्ट करून आयुष्याचा संसार उभा केला. अनेक कठीण प्रसंग आले; पण भाऊ ओंकाररावांनी तिला कधीही एकटे सोडले नाही.
नबाबाईंची मुलगी म्हणजे आशाबाई आमची आई. ओंकाररावांचा आशाबाईंना नेहमीच मोठा आधार होता. तिच्या अडचणीच्या काळात ते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत. हे नाते केवळ भाऊ-बहिणीचे नव्हते; ते मायेचे, आधाराचे आणि आयुष्यभर जपलेल्या विश्वासाचे होते.
बहिणीच्या शेवटच्या इच्छेसाठी अहमदाबादहून तळोदा
२०१६ साल. नबाबाई आजारी पडल्या. त्यांची प्रकृती चिंताजनक होती शेवटली घटका मोजत असताना. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांना आपल्या भावाला एकदा पाहायचे होते, त्यांना भेटायचे होते. ही इच्छा ओंकारदादांना समजताच त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. अहमदाबादवरून ते थेट तळोद्याला आले. आपल्या बहिणीची भेट घेतली. तिच्याशी मनभरून बोलले. तिच्या जवळ बसले. ती दोघा भावा-बहिणीची शेवटची भेट ठरली.
ओंकारदादांनी बहिणीला भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नबाबाईंनी अखेरचा श्वास घेतला. काही नाती शब्दांत व्यक्त होत नाहीत. ती अशाच शेवटच्या भेटीतून, अश्रूंमधून आणि आयुष्यभराच्या मायेच्या आठवणींतून व्यक्त होतात. बहिण गेली, पण तिच्या मुलीला भाऊ कधी विसरला नाही
आज आम्ही ज्या नबाई नावाच्या इमारतीत वास्तव्यास आहोत, ते घर म्हणजे स्वर्गीय नबाबाई आणि स्वर्गीय ओंकारराव मराठे यांची वडिलोपार्जित मिळकत, नबाबाई गेल्यानंतरही ओंकाररावांनी आपल्या भाचीला (आशाबाईला) कधीही एकटे सोडले नाही. उलट, त्यांच्या वाट्याला असलेल्या घरातील हिस्सा त्यांनी आपल्या भाचीला दिला.
ही केवळ घराची किंवा मालमत्तेची गोष्ट नव्हती. ही बहिणीच्या मृत्यूनंतरही तिच्या मुलीची जबाबदारी आपलीच आहे, या भावनेतून केलेली कृती होती. नाते रक्ताचे असते; पण ते जपण्यासाठी मन मोठे असावे लागते. ओंकाररावांचे मन तसेच मोठे होते. पोलीस अधिकारी झाले, पण माणूसपण कधी हरवले नाही
गरीब घरातून निघालेला मुलगा पोलीस खात्यात दाखल झाला. कठोर परिश्रमाने उंच पदावर पोहोचला. कुटुंबाला सुख दिले. मुलांना शिक्षण दिले. त्यांचे संसार उभे केले. पण या सगळ्या यशानंतरही त्यांनी आपल्या मातीला, आपल्या गावाला आणि आपल्या माणसांना कधीच विसरले नाही. यशाने त्यांना मोठे केले; पण नात्यांनी त्यांना माणूस म्हणून मोठे ठेवले.
शेवटच्या दिवसांतही नात्यांची परंपरा कायम ठेवली, कोरोना महामारीत ओंकाररावांची प्रकृती बिघडली आणि अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. माणूस शरीराने निघून जातो; पण त्याने जपलेली नाती, दिलेला आधार आणि केलेल्या आठवणी मागे राहतात.
आजही त्यांच्या संस्काराने पुढे जात असलेले त्यांचे चि.राजेश मराठे आणि त्यांच्या पत्नी नलिनी मराठे यांनी ओंकाररावांनी जपलेली नात्यांची ही परंपरा पुढे सुरू ठेवली आहे. ओंकाररावांचे आयुष्य मागे वळून पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते
गरिबीने त्यांना झुकवले नाही.
परिस्थितीने त्यांची जिद्द मोडली नाही.
यशाने त्यांना आपल्या मातीपासून दूर केले नाही. आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी नाती जपण्याचे कर्तव्य सोडले नाही.
स्व. शंकरराव गणू मराठे यांचा कष्टकरी मुलगा, स्व. ओंकारराव मराठे- गुजरात पोलीस खात्यातील कर्तव्यनिष्ठ अधिकारी,
आणि नबाबाई संपत मराठे यांचा जिवाभावाचा भाऊ...
ही त्यांची केवळ ओळख नाही; तर एका संघर्षमय आणि माणुसकीने भरलेल्या आयुष्याची कहाणी आहे. बहिणीसाठी अहमदाबादहून तळोद्याला धावून येणारा भाऊ, भाचीसाठी स्वतःचा घरातील हिस्सा देणारा मामा, मित्रांना आयुष्यभर जपणारा सोबती, कुटुंबाला शिक्षण-संस्कार देणारा पिता, पत्नीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा पती, नातवंडांना आठवणींची आणि संस्कारांची शिकवण देणारा आजोबा आणि तळोद्याची माती शेवटपर्यंत मनात जपणारा एक माणूस...
हीच स्वर्गीय ओंकारराव मराठे यांची खरी ओळख.
आज ते आपल्यात नाहीत; पण त्यांच्या आठवणी आहेत. त्यांच्या मायेचा स्पर्श आहे. त्यांनी जपलेली नाती आहेत. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पुढच्या पिढीला दिलेला माणुसकीचा वारसा आहे.
काही माणसे काळाच्या पडद्याआड जातात; पण त्यांनी जपलेली नाती त्यांच्या जाण्यानंतरही बोलत राहतात...
स्वर्गीय ओंकारराव मराठे यांना विनम्र अभिवादन!...
Thnk U DADA....
खूप सुंदर लिखाण. भावनिक असून त्यात ओंकार राव दादांचा संघर्ष, चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व उत्तम रित्याने चित्रित केले आहे. त्यांचे आपल्या जन्मभूमी तळोड्यावरील प्रेम, कुटुंबाने दिलेले प्रेम आणि त्यांचे संगोपन, तसेच त्यांच्या बहिणी आणि तिच्या कुटुंबाप्रती असलेली आपुलकी मन हेलावून टाकणारी आहे.
उत्तर द्याहटवा🙏
हटवाआम्हाला योग्य मार्गावर चालण्याचे संस्कार देणारे आमचे बाबा आज आमच्यातून निघून गेले. त्यांचे विचार आमच्या पाठीशी सदैव राहतील. कोटी कोटी प्रणाम व भावपूर्ण श्रद्धांजली!"
उत्तर द्याहटवाखूब खूब छान सुधाकर. वडीलाची संपूर्ण journey चि हे लेखन अदभुत आहे. डॉडयात पानी एवुन आले. आणि मन।पासुन थैंक्स
कोई शब्द ज नाहीं तुझ्या हया लेखन ला शत शत् नमन 🙏